Saturday, December 9, 2017

शिस्तबद्ध गुंतवणुकीसाठी SIP


कोणतीही गुंतवणुक करत असतांना ती पद्धतशीर पद्धतीने केली तर अधिक लाभदायक ठरु शकते हे आपण सर्वच जाणतो. आपण जी काही बचत करू शकतो ती शिस्तबद्धपणे गुंतवत नेण्याने आपली सांपत्तिक वाढ तर करु शकतोच पण गुंतवणुकीचे उद्दिष्ट पुर्ण होण्यातही त्याची मदत होऊ शकते. म्युच्युअल फंडांमध्ये SIP (म्हणजे Systematic Investment Plan) आपल्याला अशा शिस्तबद्ध गुंतवणुकीचे पर्याय देते. या योजनेतुन आपण करबचतीसाठी असलेल्या म्युच्युअल फंडांतही गुंतवणुक करुन करबचतही साध्य करु शकता. शेयर मार्केट तसेच म्युच्युअल फंडांमधील गुंतवणुकदारांनाही याची विशेष माहिती नसते, त्यामुळे आपण या शिस्तबद्ध गुंतवणुक योजनेबद्दल समजावून घेऊ.

म्युच्युअल फंडामध्ये ठरावीक रक्कम नियमीतपणे गुंतवत राहणे म्हणजे SIP. यामुळे आपल्याला नियमित गुंतवणुकीची सवय लागते हा एक फायदा तर आहेच पण बाजारपठेचा कल काय आहे हे वारंवार तपासत बसण्याची कटकट यात रहात नाही. नियमित रक्कम गुंतवत राहिल्याने आपली गुंतवणुक बाजाराच्या चढ-उताराप्रमाणे सरासरी गाठत असल्याने ती चिंता करत बसण्याची आवश्यकता फारशी रहात नाही. समजा तुम्ही दरमहा म्युच्युअल फंडात गुंतवणुक करायची ठरवली पण SIP वापरले नाही तर तुम्हाला एक तर त्यासाठी वेळ काढावा लागेल व दुसरे म्हणजे बाजारपेठेच्या कलाचा तुमच्या निर्णयावर प्रभाव पडून एकतर तुम्ही गुंतवणूक वाढवाल अथवा गुंतवणुकीचा निर्णय पुढे ढकलाल. SIP मध्ये मात्र तसे होत नाही. तुमची रक्कम ठरवुन दिलेल्या वेळेला तुमच्या खात्यातुन जमा होत जाते. त्यासाठी तुम्हाला कसलाही वेळ घालवावा लागत नाही वा एकदा विचारमुर्वक निर्णय घेतल्यानंतर पुन्हा पुन्हा अभ्यासाचा त्रास घ्यावा लागत नाही.

यातुन होणारे फायदे महत्वाचे आहेत. आपल्या आर्थिक जीवनाला शिस्त लागते जिचा आपल्या देशात ब-यापैकी अभाव आहे. दरमहा गुंतवणूक करत गेल्याने म्युच्युअल फंड योजनेच्या खरेदीची आपसुक सरासरी होत जात असते. याचा फायदा असा की आपसुक गुंतवणुकदाराच्या संपत्तीत नियमित भर पडत जाते. शिवाय दिर्घकाळात नियमितपणे अशी गुंतवणुक करत राहिल्याने परताव्यावरही परतावा असा फायदा होतो. म्हणजेच आपली गुंतवणुक ही गुंतवणुकीतुनच मिळणा-या नफ्यातुन वाढते व एका परीने नफ्यावर नफा अशा स्थितीचा फायदा मिळतो. म्हणजेच एकाच वेळीस मोठी रक्कम गुंतवण्यापेक्षा SIP द्वारे नियमित गुंतवणूक आपल्याला अधिक लाभ देते. हा फायदा चक्रवाढीच्या स्वरुपाचा असतो. स्मार्ट गुंतवणुकदार तरुण वयातच आपल्या उत्पन्नातील ठरावीक भाग SIP योजनेत गुंतवुन आपली उद्दिष्टे साकार करण्यासाठी संपत्तीची निर्मिती करु शकतात. यात घर घेणे, मुलांचे शिक्षण, विवाह किंवा निवृत्तीनंतरच्या जीवनासाठी आवश्यक असनारी रक्कम किंवा अन्य कोणत्याही उद्दिष्टासाठी SIP आपल्याला सहाय्यकारी ठरु शकते.

बरे या योजनेत किती रक्कम नियमित गुंतवावी यावर बंधन नाही. महिन्याला किमान ५०० रुपये इतकी अल्प रक्कमही आपण नियमित गुंतवू शकता. म्युचुअल फंडांच्या अनेक योजना नुसत्या मासिकच नव्हेत तर दर पंधरवडा ते द्वैमासिक अशा हप्त्यात SIP ची गुंतवणुक स्विकारतात. त्यामुळे आपल्याकडील बचतीच्या रकमा कधी उपलब्ध असतील याचा अंदाज घेऊन आपण आपली गुंतवणुक योजना ठरवू शकतो. भविष्यातील आपली गुंतवणुक क्रमाक्रमाने वाढवत न्यायची असेल तर स्टेप-अप पद्धतीचाही अंगिकार करता येतो.

आपले जीवन आर्थिक दृष्ट्या सुरक्षित करणे हे आजच्या आधुनिक युगात महत्वाचे बनले आहे कारण आपल्या जीवनशैल्या बदललेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने अर्थसाक्षर असने ही काळाची गरज आहे. एकदम गुंतवणुक करता येणे सर्वांना शक्य नसते. गुंतवणुक करण्याची क्षमता कमी असली तर पुर्वी त्यासाठी फार कमी पर्याय उपलब्ध होते. सामान्यांची आर्थिक उद्दिष्टे साकार होणे गरजेचे असल्याने आधुनिक काळात गुंतवणुकीचे नवनवे मार्ग खुले झाले आहेत. म्युच्युअल फंडातील "सिप" पद्धतीने गुंतवणुक ही तरुण वयापासुनच भविष्यातील मोठी आर्थिक उद्दिष्टे साकार करायला मदत करु शकते. एकदाच स्वत: अभ्यास करुन  किंवा गुंतवणुक सल्लागाराची मदत घेऊन योग्य वेळीच योग्य निर्णय घेणे उज्ज्वल भवितव्यासाठी सहाय्यकारक ठरेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकला भेट द्या
https://www.reliancemutual.com/campaigns/RMFContest/index.html


(वैधानिक सूचना: म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते. कोणतीही गुंतवणूक करतांना योजनेशी संबंधीत कागदपत्रे काळजीपुर्वक पहावीत व मगच गुंतवणुकीचा स्वजबाबदारीवर निर्णय घ्यावा.)

1 comment:

  1. धन्यवाद सर, माहिती बद्दल.

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...