भारतीय राजकारणात प्रचंड वादळ माजवणारे बोफोर्स प्रकरण कोणाला आठवत नाही? माजी पंतप्रधान राजीव गांधी या प्रकरणात पुरते बदनाम झाले होते. य प्रकरणाचे पडसाद अगदी आताही अधुन मधुन उमटत असतात. हे प्रकरण उजेडात येत होते आणि या प्रकरणामागील अनेक आंतरराष्ट्रीय कट-कारस्थानांच्या थिय-याही चर्चेत होत्या. त्या होत्या असे जसे सिद्ध झाले नाही तसेच त्या नव्हत्या हेही सिद्ध झाले नाही. पण माझ्या सारख्या रहस्य-थरार लेखकाला अशी प्रकरणे आव्हान देणार यात शंका नव्हती. मी या प्रकरणाला पुर्णतया वेगळे वळण देत एक थरार कादंबरी जन्माला घातली. तिचा नायक होता अर्थातच एकांडा शिलेदार समीर चक्रवर्ती!
ग्राहाम मरे हा एक बडा अमेरिकन उद्योगपती. तोफा, क्षेपणास्त्रे, जहाज बांधणी ते बांधकाम क्षेत्रात अग्रेसर. जगभरातील सरकारे याच्या इशा-यावर बनतात वा कोसळतात अशी अफवा असलेला माणूस. पण नव्या प्रकारच्या संशोधनांमुळे त्याच्या तोफा-क्षेपणास्त्रे पुर्वीएवढ्या मागणीत नाहीत. अगदी आखाती राष्ट्रेही त्याला भीक घालत नाहीत. अशा स्थितीत एकमेव ग्राहक म्हणून त्याच्या टीमसमोर भारत हे एकमेव नांव संभाव्य ग्राहक म्हणून येते. पण भारतही आपल्या तोफा घेईल की नाही याबाबत तो साशंक असतो.
आणि अशाच काळात त्याला एका माफियातर्फे एक भयानक माहिती समजते. मरे आनंदाने उड्या मारायचाच काय तो बाकी राहतो. त्यातून मरेलाही पडद्यावर न आणता सुरु होते एक "ब्लॅकमेल" प्रकरण! ब्लॅकमेल केले जाते ते चक्क भारतीय पंतप्रधानांना! त्या माफियांच्या विसंगत मागण्या मान्य न केल्यास होणारा परिणाम म्हणजे पंतप्रधान पद जाणे...आणि कायमचे बदनाम होणे! बरे, मागण्या मान्य कराव्यात तर देशाचे अपरिमित नुकसान! हेरखात्यांनाही यात गोवता येत नाही. मग पंतप्रधान चौधरी आंतरराष्ट्रीय एकल-दहशतवादी-हेर समीर चक्रवर्तीलाच या प्रकरणात निमंत्रित करतात. समीर ही केस हाती घेतो. इटली ते अमेरिका असा थरारक आणि रहस्यमय प्रवास करत आणि जीवावरचे धोके घेत तो या प्रकरणाच्या तळाशी पोहोचतो आणि एक सुंदर छोकरी गटवत रहस्यभेद कसा करतो याची थरारक आणि प्रणयरम्यही कथा म्हणजे "ब्लॅकमेल" ही कादंबरी.
समीर चक्रवर्तीला नायक बनवत मी जवळपास आठ कादंब-या लिहिल्या. भारताचा म्हणून हा तसा एकमेव महानायक. नीति-अनीतीची फारशी फिकीर न करता, बुद्धीकौशल्य आणि सामर्थ्य पणाला लावून हाती घेतलेली कामगिरी, मग ते कोठेही आणि कोणाही विरुद्ध असो, यशस्वी करणारा. समीर चक्रवर्तीच्या थरार कथा लिहिणे ही एक आनंददायी आणि आव्हानदायी बाब. वाचकांनाही या कादंब-या आवडत गेल्या. अलीकडेच ही कादंबरी स्टोरीटेल या स्विडिश कंपनीच्या भारतीय विभागातर्फे श्राव्य स्वरुपात लौंच झाली आहे. श्राव्य स्वरुपात आलेली ही समीर चक्रवर्ती नायक असलेली तिसरी कादंबरी. ज्या स्विडिश कंपनी बोफोर्समुळे मला ही कादंबरी सुचली त्याच देशातील प्रकाशन संस्थेने ही कादंबरी श्राव्य स्वरुपात प्रकाशित करावी हा एक योगायोगच. अर्थात माझे आयुष्यच अगणित योगायोगांनी भरलेले आहे हेही खरे.
ही कादंबरी ऐकण्यासाठी स्टोरीटेलचे सदस्य व्हा...खालील लिंकला भेट द्या!
https://www.storytel.in/books/130544-Blackmail
(Published in Saptahik Chaprak)
No comments:
Post a Comment