Thursday, January 4, 2018

वढू...कोरेगांव भीमा आणि मिथकप्रियतेचे बळी

Image result for koregaon bhima

भारतीयांना मिथकांचा अतोनात सोस आहे हे आता वेगळे सांगावे लागत नाही. मिथक बनवणारे, मिथकांवर श्रद्धा ठेवनारे, मिथकांमुळेच भारतातील अनेक समाज अवनतीस पोहोचले तर काही लायकी नसतांनाही सामाजिक दृष्ट्या पुढारलेल्यांत गणले गेले. देवतांच्या मिथकांपासून ते सामाजिक मिथकांची आपल्याकडे रेलचेल आहे. आधी समजा आधुनिकतेचा आणि विज्ञानवादाचा वारा नव्हता म्हणून मिथकीय अडानीपणा खपून गेला पण विसाव्या आणि एकविसाव्या शतकातही आमची मिथकापासुन सुटका झाली नाही. आमचे पंतप्रधानच जेंव्हा "आमच्याकडे प्राचीन काळीच प्लास्टिक सर्जरी होत होती..." अशी विधाने करतात तेंव्हा मिथकांचा केवढा गडद प्रभाव आमच्यावर आहे याच्या जाणीवेने मन खिन्न व्हायला होते.

नुकतेच वढू येथील गोविंद महाराची समाधीचे विटंबणा आणि कोरेगांव भिमा येथील २०० व्या शौर्य दिवसाच्या अभिवादन कार्यक्रमात उसळलेली दंगल आणि तिचे महाराष्ट्रभर पसरलेले विद्वेषाचे वादळ या सर्वांचे जन्मदाते गेल्या शतकात निर्माण केल्या गेलेल्या मिथक असावे याबाबत फारसे आश्चर्य वाटून घ्यायचे कारण नसले तरी त्यामागे समाजमनात खदखदत असलेला परस्परांबाबतचा संताप, द्वेष, संशय आंणि कुरघोडीची अथवा धडा शिकवण्याची उबळ आपल्याला चिंतेत टाकणारी आहे. मिथक हे एक कारणमात्र आहे. 

गेल्या तीन-चार वर्षात जातीय असलेल्या महाराष्ट्रातील सारीच जातीय समीकरणे बदलली. जातीगटांचे परस्परसंबंध बदलले. मराठा क्रांती मोर्चांनी सुरुवात झाली. अर्थात त्याला कोपर्डी प्रकरनाची पार्श्वभुमी होती. आरक्षण हासुद्धा या मोर्चांचा विषय असल्याने ओबीसीही बिथरले आणि कधी नव्हे ते एकत्र यायला लागले. एकीकडे दलित, दुसरीकडे मराठे आणि तिसरीकडे ओबीसी अशी काहीशी विचित्र रचना होत गेली. मराठा मोर्चांमागे संघाचा मेंदू आहे अशाही वदंता उठल्या. ब्राह्मणांनीही आरक्षण-मागणीत उडी घेतली असली तरी त्या मागणीला कोणी गांभिर्याने घेण्याची शक्यता नव्हती. त्यात नितीन आगे प्रकरणात आरोपी निर्दोष सुटले तर कोपर्डी प्रकरणात आरोपींना फाशी. कोरेगांवला जे घडले त्यामागे सुप्त पातळीवर मानसिकतेवर राज्य करणारी ही भावना नव्हतीच असे म्हणता येणार नाही.  आणि अशा स्थितीत बनणारी मानसिकता तार्किक पद्धतीनेच अभिव्यक्त होते असे नाही. आपण दबलो आहोत, आपल्याला चिरडले जाते आहे ही भावना अनेक प्रकारे अभिव्यक्त होऊ शकते आणि या प्रकरणी ती तशी झालीही.  आणि त्याच वेळीस अन्य सामाविष्ट घटकही याच मानसिक पार्श्वभुमीवर इतिहासातील एका मिथकाल प्रत्युत्तर द्यायला प्रतीमिथके घेऊन आले हेही या निमित्ताने महत्वाचे. 

संभाजी महाराजांच्या जीवनातील अनेक बाबी अजुन कोड्यासारख्या आहेत. इतिहासाने अनेक बाबी अज्ञातात तरी ढकलल्यात अथवा भ्रमांच्या पडद्यात ठेऊन इतिहासकारांनाही तर्क करण्यावरच अवलंबून ठेवले आहे. अशी स्थिती अनेकदा मिथके बनवायला कामाला येते. संभाजी महाराजांना औरंगजेबाने हाल हाल करुन ठार मारले हे आपण सारेच जाणतो. संभाजी महाराजांच्या शिराचीही गांवोगांव भाल्यावर टोचून मिरवणुक काढले गेली. देहाचे तुकडे तुकडे केले गेले असे संदर्भ येतात. पण त्यांचे अंत्यसंस्कार केले गेले की नाही याबाबत इतिहास मौन आहे. श्री. य. न. केळकर यांच्या ' मराठेशाहीतील वेचक वेधक ' या पुस्तकातील ' संभाजी महाराजांची समाधी ' या लेखात " ... संभाजी महाराजांचा वध औरंगजेबाने केल्यानंतर त्यांचे शव त्याने कोल्ह्या - कुत्र्यांकडून खावविण्याकरता टाकून दिले होते. नंतर त्याच्या शवाचे तुकडे व शीर एकत्र करून, उचलून नेऊन एका मराठा सरदाराने त्यास मौजे वढू येथे विधीपूर्वक अग्नी संस्कार केला व तेथे अर्थातच छोटीशी देवळी पण केली. दहनाची ती जागा निश्चित होती आणि म्हणूनच पुढे शाहू महाराजांनी त्याच स्थळी पक्के वृंदावन बांधले. " एवढी माहिती येत असली तरी त्या सरदाराचे नांव येत नाही अथवा तो मोगलांचा सरदार होता की शंभुराजांचाच याचाही उलगडा होत नाही. 

 डॉ. सौ. कमल गोखले यांनी आपल्या "शिवपुत्र संभाजी" मध्ये म्हटलेय की, " वढूला शिरच्छेद केल्यानंतर तुळापुर येथील संगमावर संभाजीराजांचे दहन केले असावे, याला कागदोपत्री आधार मिळत नाही. संभाजीमहाराजांच्या शवाला जे शिवले त्यांना शिवले पाटील हे नाव मिळाले, असा समज असला तरी ती एक भाकड कथाच आहे. शिवपूर्वकाळापासूनच ' सिवले पाटील ' नावाचे उल्लेख आढळतात." 

याचा अर्थ एवढाच की शंभुराजांचे विटंबना झालेले शरीर शिवले म्हणून "शिवले" हे आडनांव पडले हे मानण्यास अडचण आहे. पण समजा तसे नसले तरीही एक वास्तव हे आहे की शंभुराजांच्या मृत्युपासुन ते शाहू महाराज सुटून आल्यानंतरही १७१५ पर्यंत वढू येथे संभाजी महाराजांचे कसलेही स्मारक नव्हते. ते का नव्हते याचा खल मात्र कोनीही केलेला दिसत नाही. शाहू महाराजांनी वढू येथे वृंदावन बांधवले आणि या वृंदावनाची नित्य पूजा - अर्चा व्हावी व अन्नछत्र चालावे याकरता माणसे नेमून त्यांना इनामही दिले होते, त्याची नोंद खालीलप्रमाणे :-
" कै. संभाजी राजे स्वामी यांचे वृंदावन दर जागा मौजे वढूत || पाबळ येथे करून शुश्रूषेसाठी व व्यवस्थेसाठी भिकाराम गोसावी, वासुदेवभट, शामभट धर्माधिकारी ठेवून धूपदीप, नैवेद्य, बागतुलसी व अन्नछत्राबद्दल बागाईत जमीन बिघे ५, कोरडवाहू वहीत जमीन बिघे २० आणि बाकीची पडजमीन बिघे १०५ मिळून १२० बिघे जमीन दिली. "

शिवाय यानंतर संभाजी महाराजांच्या वृंदावनाची हा झाडलोट करणा-या गोविंद गोपाळ ढगोजी मेगोजीलाही शाहू महाराजांनी इनाम जमीन दिली होती. त्यासंबंधी पेशवे दप्तरातील दि. १९ मे १७२३ च्या कागदपत्रातील डॉ. गोखलेंनी दिलेली नोंद पुढीलप्रमाणे :- " गोविंद गोपाळ ढगोजी मंगोजी हे तीर्थरूप राजश्री कैलासवासींचे वृंदावन मोजे वढू तर्फ पाबळच्या राणांत आते तेथे हे राहून वृंदावनाची सेवा करिताती. याजनिमित्य स्वामी याणी कृपाळू होऊन मौजे वढू तर्फ पाबळ येथील खालसा पड जमिनीपैकी अवल दुम सीमती प्रतीची जमीन बिघे कुलबाब कुलकानु इनाम दिली.  ..."

आपल्या वर्तमानातील वादळाला मुळकारण ठरलेले गोविंद गोपाळ महार ते हेच. "ढगोजी मेघोजी" हे पद असून ते तत्कालीन महारांचे गुरुपद दर्शवते. म्हणजे गोविंद गोपाळ हे गुरु होते आणि संभाजी महाराजांच्या वृंदावनाची सेवा करण्यासाठी नेमले गेले होते. यांचे आडनांव काय हे इतिहासाला तरी माहित नाही. त्यांची समाधी आज दाखवली जात असली तरी तरी ती कोनी बांधली याबाबतही माहिती उपलब्ध झालेली नाही. असे असले तरी शंभुराजांच्या वृंदावनाचा सेवेकरी म्हणून त्याचे इतिहासात असायला हवे तेवढे स्थान असायलाच हवे. 

गोविंद महार व त्याच्या स्थानिक सहका-यांनी औरंगजेबाला न जुमानता संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे रात्रभर गोळा केले आणि त्यांचे अंत्यसंस्कार केले गेले असे मिथक केवळ जात्युभिमान वाढवण्यासाठी बनवले गेले. पण तेही ठीकच होते कारण ऐतिहासिक पुराव्यांच्या अभावात हे दावे करता येणे शक्यही होते. फार कशाला....संभाजी राजांच्या देहाचे तुकडे तुकडे करुन नदी काठावर फेकल्याचे सर्वात पहिले जर कोणाला कळले असेल तर ते म्हणे जना परटीणीला. तिने आपली मालकीन राधाबाई व इतर महिलांना गोळा करुन संभाजी राजांच्या देहाचे तुकडे गोळा करुन अंतिम संस्कार करण्याचा निश्चय केला व त्याप्रमाणे अंधार्‍या रात्रीत धडपडत जावुन त्या सर्व महिलांनी संभाजी राजांच्या देहाचे विखुरलेले तुकडे गोळा करुन गावात आणले असेही एक मिथक बनवले गेलेले आहेच! जातीमाहात्म्याच्या अशा बखरी प्रत्येक जातेत आपल्याला आढळतात. ते असो, पण सरत्या वर्षात झाले असे की कोणाला तरी अवदसा आठवली आणि गोविंद महाराने संभाजी राजांच्या शरीराचे तुकडे गोळा करुन अंत्यसंस्कार केले तेंव्हा मराठे लपून बसले होते अशा आशयाच्या प्रक्षोभक अफवा पसरवण्यात आल्या. याची परिणती अशी झाली की काही लोकांनी रातोरात गोविंद महाराच्या समाधीवरील छत्री उखडून फेकली. या वेळीस जातीय शिवीगाळही झाली. या प्रकरणात वढू बुद्रुकमधील ४९ जणांवर गुन्हेही दाखल झाले. ३० डिसेंबर रोजी पोलिसांनी सात जणांना या गुन्ह्यात अटकही केली. खरे तर एक जानेवारी जवळ आलाय, जव्ळच असलेल्या कोरेगांव भीमा येथे दोनशेवा "शौर्य दिन" मोठ्या प्रमानात साजरा केला जानार आहे, त्यावर या घटनेचे पडसाद पडणार याची कल्पना शासनाला यायला हवी होती. परंतू तसे काहीही झालेले दिसत नाही.

१ जानेवारी १८१८ रोजी वढुपासुन जवळच असलेल्या कोरेगांव (भीमा) येथे ब्रिटिश आणि पेशव्याच्या सैन्यात युद्ध झाले होते. या युद्धात अवघ्या पाचशे महारांनी पेशव्याच्या २८ हजार सैन्याला पराजित करुन अन्याय्य, जातीयवादी व मनुवादी पेशवाईला जमीनदोस्त केले आणि त्या विजयाच्या स्मृती प्रित्यर्थ इंग्रजांनी तेथे विजय स्तंभ उभारला आणि तो महारांच्या शौर्याचे प्रतीक असल्याने तेथे दरवर्षी १ जानेवारीला पुर्वाश्रमीचा महार समाज येत असतो. बाबासाहेबही येथे किमा दोनदा तरी येऊन गेले आहेत. किंबहुना शोषित, अन्यायाने ग्रस्त आणि आत्माभिमान हरवून बसलेल्या आपल्या बांधवांच्या अंत:करनातील न्यूनगंड झटकून टाकत "तुम्ही पराक्रमी होता...आहात...तुम्हीच अन्याय्य पण बलाढ्य पेशवाईचा पराभव केलात..." हे सांगून त्यांचे आत्मबळ वाढवणे आवश्यक असल्याने कोरेगांवच्या लढाईला एका समाजाच्या आत्माभिमानाचे कोंदन दिले गेले. या कोंदनाने काही पिढ्यांना पराजित मानसिकतेतून बाहेर काढायला मदत केलीही. पण हेही एक मिथकच होते. तरुण शिक्षित पिढ्यांनी तरी या घटनेचा इतिहास अभ्यासत मिथकातून बाहेर पडायला हवे होते. पण तसे झाले नाही. 

प्रसिद्ध इतिहास संशोधक संजय क्षीरसागर यांनी सर्व प्रथम २०१२ मध्येच कोरेगांव भीमाच्या लढाईचे सत्य लोकांसमोर आणले. ही लढाई म्हणजे एक अपघाताने ओढवली गेलेली एक चकमक होती. त्यामागे कसलेही तत्वज्ञान नव्हते की सामाजिक न्यायाची भावना नव्हती. इंग्रजांच्या सैन्यात महार सैनिक होते पण त्यांना शेवटी लढायचे होते ते त्यांच्या अधिका-यांच्या आदेशानुसार. मग समोर कोणताही शत्रू असो. म्हणजे युद्धात लढणे, शौर्य गाजवणे त्यांच्या हातात असले तरी युद्धाचे निर्णय घेणे, रणभुमे ठरवणे अथवा युद्धाचे तत्वज्ञान ठरवणे त्यांच्या हाती नव्हते. असे असले तरी अगदी उच्चशिक्षित तरुणही समर्थन करतांना "भीमा-कोरेगाव युद्धामुळे जुलमी पेशवाईची विषारी नांगी पूर्णपणे ठेचली गेली, हे पेशवाईची झळ बसलेल्यांसाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रदेशीयासाठी जास्त महत्वाचे आहे..." असे म्हणतात. पण तरीही या युद्धाचा कोणताही निकालच मुळात लागला नाही, दोन्ही बाजु नंतर आपापल्या मार्गाने जर निघून गेल्या असे जर आहे तर कोणत्या पेशवाईची आणि कशी नांगी ठेचली गेली? 

संजय क्षीरसागरांनी केलेली या युद्धाची मांडणी थोडक्यात अशी:  

१. खडकी आणि येरवडा येथील लढाया झाल्यानंतर बाजीराव पुणे शहर सोडून निघून गेला. त्याच्या पाठीवर जनरल स्मिथच्या नेतृत्वाखाली ब्रिटीश फौजेची एक तुकडी होतीच. स्मिथच्या फौजेला पाठीवर घेऊन बाजीराव पुण्याच्या आसपासच्या दीड - दोनशे किलोमीटर्सच्या परिघात पळत होता असे म्हटल्यास वावगे ठरू नये. जनरल स्मिथ हा पेशव्याच्या पाठलागावर होताच. त्याला रोखून धरण्याची कामगिरी बहुतेक त्रिंबकजी डेंगळेवर सोपवण्यात आलेली होती असे दिसून येते. ब्राम्हणवाडा येथून बाजीराव पुण्याच्या दिशेने निघाला. त्याच्या हेतूंची / बेताची  इंग्रजाना अजिबात कल्पना नव्हती.  मुंबईची इंग्रज फौज पुण्याच्या दिशेने येत होती तिला अडवण्याचा पेशव्याचा बेत असावा किंवा पुणे शहर परत एकदा आपल्या ताब्यात घेण्याचा त्याचा हेतू असावा असा इंग्रजांचा समज झाला. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत बाजीरावाचे मनसुबे उधळून लावण्याचे त्यांनी ठरवले. पुण्यामध्ये इंग्रजांची फारशी मोठी फौज नव्हती. पुण्यातील इंग्रजांना त्वरीत कुमक करेल असे एक ठाणे जवळच होते व ते म्हणजे शिरूर हे होय! 

२. शिरुर येथील इंग्रज फौजेस तातडीने पुण्यास जाण्याचा आदेश देण्यात आला. इकडे जनरल स्मिथ मराठी सैन्याचा प्रतिकार मोडून काढत बाजीरावास पकडण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करत होता. बाजीराव पेशवा ब्राम्हणवाडा येथून चाकणच्या पुढे फुलगावी मुक्कामास आला. शिरूर येथील ब्रिटीश सैन्यावर हल्ला करण्याची त्याची योजना नव्हती त्याचप्रमाणे पुण्यात जाण्याची देखील त्याची इच्छा नव्हती. नाहीतर चाकण येथून तो फुलगावी न जाता तडक पुण्याला जाऊ शकत होता. यावेळी पुण्यात इंग्रजांची फौज अगदीच अत्यल्प अशी होती. जर बाजीराव पुण्यावर चालून गेला असता तर पुणे शहराचे रक्षण त्यांच्या  हातून झालेच असते असे म्हणता येत नाही. परंतु बाजीराव अथवा त्याचे सरदार अधिक व्यवहारी होते.  जनरल स्मिथच्या नेतृत्वाखाली बडी इंग्रज फौज आपल्या पाठलागावर आहे याची त्यांना कल्पना होती. तसेच शिरूर येथे इंग्रजांची एक तुकडी मुक्कामाला असल्याची माहिती त्यांना  होतीच. पुणे ताब्यात घेतल्यावर शिरूर येथील ब्रिटीश तुकडीचा बंदोबस्त त्यांना करावा लागला असता आणि तोपर्यंत ज. स्मिथ पुण्याजवळ येऊन ठेपला असता. किंवा असेही म्हणता येते कि एकाच वेळेस त्यांना ज. स्मिथच्या आणि शिरूर येथील ब्रिटीश सैन्याचा मुकाबला दोन आघाड्यांवर करावा लागला असता.  हे सर्व लक्षात घेता  पुणे ताब्यात घेण्याचं भरीस न पडता स्मिथ पासून शक्य तितके लांब जाण्याचाच निर्णय मराठी सरदारांनी किंवा पेशव्याने घेतला असे म्हणता येते.

३. त्यामुळेच पुणे उजव्या बाजूला टाकून फुलगावी  येथे मराठी सैन्याचा तळ पडला. आधी सांगितल्यानुसार ब्रिटिशांना मराठी मुत्सद्यांच्या बेताची अजिबात कल्पना नसल्याने त्यांनी पेशवा कदाचित पुण्यावर चालून जाईल हि शक्यता गृहीत धरून शिरूर येथील ब्रिटीश तुकडीला पुण्याला जाण्याचा आदेश दिला. त्यानुसार शिरूर येथील इंग्रज फौज कॅप्टन फ्रांसिस स्टॉन्टनच्या नेतृत्वाखाली पुण्याच्या दिशेने रवाना झाली. शिरूरच्या इंग्रज पथकाला पेशवा फुलगावी मुक्कामाला असल्याची बातमी मिळाली नव्हती असे दिसून येते. उपलब्ध माहितीवरून शिरूर येथुन ब्रिटीश सैन्य 31 डिसेंबर 1817 रोजी सायंकाळी किंवा रात्रीच पुण्याच्या दिशेने रवाना झाले होते. साधारण 35 - 40 किमी. अंतर कापून हि फौज जेव्हा कोरेगाव जवळ येऊन पोहोचली त्यावेळी शत्रू सैन्याला समोर उभे असल्याचे पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला असावा. परंतु, ब्रिटीश अधिकाऱ्यांनी अनपेक्षीत प्रसंग ओळखून कोरेगाव ताब्यात घेण्याची चलाखी केली. मराठी फौजांनी जर यापूर्वीच कोरेगावचा ताबा घेतला असता तर इंग्रजांना या वेळी आपला बचाव करणे अतिशय अवघड गेले असते पण मराठी सरदार याबाबतीत फारच गाफील राहिले असे म्हणावे लागते. इकडे ब्रिटीश लष्कराची निशाणे दृष्टीस पडताच मराठी मुत्सद्द्यांत चलबिचल  झाली असावी. कारण उपलब्ध माहितीवरून त्या दिवशी फुलगाव येथील मुक्काम उठवून साताऱ्याच्या दिशेने  जाण्याचे त्यांचे आधीच ठरले होते व त्यानुसार बरीचशी मराठी पथके पुढे रवाना झाली होती. खुद्द बाजीराव पेशवा आणि बापू गोखले व इतर काही सरदार मागे राहिले होते. रात्रभर प्रवास करून दमलेली ब्रिटीश पथके कोरेगावात पोहोचली त्यावेळी सकाळचे ९ - १० वाजून गेले होते. तरीही या ठिकाणी मराठी सैन्याशी लढाई दिल्याखेरीज आपला निभाव लागणे शक्य नसल्याचे त्यांनी ओळखले. मराठ्यांची सेना पुढे जय्यत तयारीनिशी सज्ज असल्याने पुणे तर दूरच पण सुरक्षितपणे माघार घेणे देखील शक्य नव्हते. असो, इकडे बाजीरावाने आपल्या सरदारांना ब्रिटीश फौजांशी लढण्याची आज्ञा दिली किंवा असेही म्हणता येईल कि मराठी सरदारांनी इंग्रजांना लढाईमध्ये गुंतवण्याचे ठरवून बाजीरावाला सातारा जवळ करण्याचा सल्ला दिला. कसलीही पूर्वकल्पना नसताना किंवा आगाऊ डावपेच आखलेले नसताना मराठी व इंग्रजी सैन्याला कोरेगाव येथे एकमेकांशी झुंजणे भाग पडले.
             
४) मराठी सरदारांच्यापेक्षा इंग्रज अधिकारी संधी व भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेण्यात जास्त कुशल असल्याचे या लढाईत दिसून येते. रात्रभर प्रवास केलेला असूनही कोरेगाव हे स्थळ ताब्यात घेण्यात त्यांनी कमालीची तडफ दाखवली. यावेळी ब्रिटीश पथकांच्या सोबत तोफा असल्याने त्यांनी माऱ्याच्या जागा पाहून आपल्या तोफा पेरल्या. मराठी सैन्याचा तोफखाना आधीच पुढे गेल्याने त्यांना आपल्या तोफखान्याचे पाठबळ लाभू शकले नाही किंवा त्यांच्या लांब पल्ल्याच्या तोफा पुढे पाठवल्यामुळे मागे राहिलेल्या लहान तोफांचा या प्रसंगी मराठी फौजेला फारसा फायदा झाला नाही असे लढाईच्या उपलब्ध वर्णनावरून लक्षात येते. असो, कोरेगावात घुसलेल्या इंग्रजी फौजांचा समाचार घेण्याची किंवा त्यांना लढण्यात गुंतवण्याची जबाबदारी बापू गोखलेवर येऊन पडली होती. इंग्रजांनी गावाचा आश्रय घेतलेला असल्याने बापूला आपल्या तोफांनी इंग्रज पथकांना सडकून काढता आले नसावे. त्याउलट मराठी फौजा मोकळ्या मैदानावर असल्याने आणि ब्रिटीशांनी मोक्याच्या जागी तोफांचे मोर्चे उभारले असल्यामुळे त्यांच्या तोफा मराठी सैन्यावर आगीचा वर्षाव करत होत्या. इंग्रजांचा तोफखाना बंद पडला नाही तर आपल्या फौजेची बरीच हानी होईल हे ओळखून बापूने लष्कराला कोरेगावावर चालून जाण्याचा आदेश दिला. त्यानुसार मराठी पथके कोरेगावावर चालून गेली. परंतु, इंग्रज सैनिकांनी गावातील घरांचा आश्रय घेतलेला असल्याने त्यांच्यावर थेट चाल करणे किंवा हातघाईच्या लढाईत त्यांचा समाचार घेणे त्यांना शक्य झाले नाही. सदाशिव आठवले लिहीतात त्यानुसार हि लढाई अनिर्णीत राहिली. भीमा - कोरेगाव येथील लढाईमध्ये ना मराठी सैन्य जिंकले ना इंग्रज ! 

५)  सुर्यास्तापर्यंत लढाई देऊन बापू गोखलेने जेजुरीच्या मार्गाने साताऱ्याच्या दिशेने कूच केले. लढाई चालू असतानाच बाजीराव पेशवा त्याच मार्गाने पुढे साताऱ्याच्या रोखाने गेला असल्याने त्याची पिछाडी सांभाळत त्याच मार्गाने जाणे बापूला भाग होते. कोरेगाव येथील लढाईमध्ये सहभागी घेतलेल्या मराठी सैन्याने जेजुरीच्या अलीकडे असलेल्या राजेवाडी या ठिकाणी आपला तळ ठोकला. हे ठिकाण कोरेगावपासून सुमारे 30 - 35 किलोमीटर्स अंतरावर आहे. कोरेगावच्या लढाईने बाजीराव पेशव्याच्या फौजेच्या अनेक उणीवा मात्र परत एकदा प्रकर्षाने जगासमोर म्हणा किंवा शत्रूसमोर आल्या असेच म्हणावे लागते. जरी या संघर्षात मराठ्यांची सर्व फौज सहभागी झाली नसली तरी इंग्रजांच्या एका पथकाचा निःपात करण्यात त्यांना आलेले अपयश ठळकपणे लक्षात येते. पाठीवर असलेल्या जनरल स्मिथच्या प्रचंड फौजेला रोखून धरण्याची जबाबदारी यावेळी मराठी सैन्याने किंवा काही इतिहासकार सांगतात त्यानुसार त्रिंबकजी डेंगळेने पार पाडली नसती तर कोरेगाव येथे बापू गोखलेचा साफ निकाल लागला असता असेच म्हणावे लागते. पण तसे झालेले नाही. कोरेगावची लढाई झाल्यावर शिरूरहून पुण्याला निघालेली ब्रिटीश फौज, लढाई झाल्यावर दुसऱ्या दिवशी शिरूरच्या दिशेने मागे वळली. जर कोरेगावची लढाई त्यांनी जिंकली असती तर विजयी पथके जल्लोष करत थेट पुण्याला गेली असती आणि त्या शहरात आपल्या विजयाचा मोठा उत्सव त्यांनी केला असता. यामुळे पुण्यातील पेशव्याच्या व पेशवाईच्या समर्थकांना मोठीच दहशत बसली असती. परंतु कोरेगावात इंग्रजांचा विजय झाला नसल्याने त्यांनी पुण्याकडे जाण्याचे एकप्रकारे टाळले असेच म्हणावे लागते. या ठिकाणी आणखी एक मुद्दा असा उद्भवतो कि, जरी इंग्रजांचा कोरेगाव येथे पराभव झाला नसला तरी त्यांनी तसेच पुढे पुण्यात जाण्याचे का टाळले असावे ? माझ्या मते, जनरल स्मिथ 2 जानेवारी 1818 रोजी चाकण जवळ आल्याची बातमी मिळाल्यामुळे आणि कोरेगावच्या झुंजात ब्रिटीश सैन्याची बरीच हानी झाल्यामुळे तसेच नजीकच्या काळात  तरी पुण्यावर बाजीरावाची स्वारी येण्याची शक्यता नसल्याने शिरूरहून आलेली ब्रिटीश पथके परत मागे फिरली असावीत. कोरेगाव येथे इंग्रजांनी जो काही स्तंभ अथवा स्मारक उभारले आहे ते ब्रिटीशांच्या विजयाचे प्रतीक आहे असे म्हणणे धाडसाचे आहे. शत्रूच्या तुलनेने त्यांची फौज अल्प असताना देखील मोठ्या शौर्याने आणि शिकस्तीने सामना करून त्यांनी आपला बचाव केला त्याबद्दल इंग्रजांना अभिमान वाटणे स्वाभाविक आहे. त्यामुळेच त्यांनी त्या ठिकाणी एक स्मारक उभारले असल्यास नवल नाही.          

तर हा झाला कोरेगांव भिमाच्या लढाईचा इतिहास. पेस्झव्याचा अस्त या युद्धाने केला नाही. पेशवाईचा (अथवा मराठेशाहीचा) असत्च म्हणायचे असेल तर तो पुर्वीच झाला होता. १८०२ मध्ये हडपसरच्या युद्धात यशवंतराव होळकराच्या हातून बाजीरावाचा संपुर्ण पराजय होऊन त्याला पळून जावे लागले होते. तो इंग्रजांना जाऊन मिळणार असे लक्षात येताच यशवंतरावाने बाजीरावाला मागे बोलावण्याचा प्रत्यत्न केला, पण त्यात यश आले नाही. ३१ डिसेंबर १८०२ रोजी वसई येथे तह झाला व त्यानुसार पेशवा इंग्रजांचा मांडलिक बनला. असे असले तरी शिंदे, भोसले व यशवंतराव होळकर यांनीच हा करार अमान्य करुन ब्रिटिशांशी युद्ध सुरु ठेवायचे ठरवले आणि एकटा यशवंतरावच शेवटपर्यंत लढू शकला हा झाला इतिहास. ्पण म्हणून "धनगरांनी पेशवाई बुडवली" असा अभिनिवेश कोणी केला नाही!

१८१८ च्या या कोरेगांव भिमाच्या चकमकीवरुन अस्पृश्यांना हीन वागणूक देणारे, जातीयवादी पेशव्याचा विनाश करणारे बहाद्दर ५०० महार हे एक सिनेम्यटिक मिथक असले, काहींना ते प्रेरणादायी वाटत असले तरी या युद्धाचे वास्तव वरीलप्रमाने आहे. २००वा शौर्य दिवस साजरा करतांना पेशव्याची (अथवा मनुवादी ब्राह्मणांची) निंदा करीत असतांनाच दुसरीकडून साहजिकच पेशवाई बुडवली म्हणजे मराठेशाही आणि म्हणजेच राष्ट्रीय सत्ता बुडवली म्हणून हा विजय दिवस साजरा करणारे देशद्रोही आहेत अशी मांडणी करणारे समोर आले. हेही एक मिथकच! संभाजी भिडे नामक उपद्व्यापी गृहस्थ आणि हिंदु जनजागर समितीचे मिलिंद एकबोटे यांनी या प्रकरणात आपल्या कार्यकर्त्यांच्या मार्फत तेल ओतायचे काम केले  आणि कोरेगांव भिमा येथे दंगल उसळली हे पोलिसांचा एफायारच म्हणतो. समाजमाध्यमांतील हिंदुत्ववादी तरुनांनीही ज्वर वाढवला. एल्गार सभेतील मेवाणींची भडक वक्तव्येही कोठेतरी वातावरणाला पेटवू पाहणारी होती. कोरेगांव भिमाचा इतिहास आपल्या पद्धतीने उजळवायला सुरुवात झाली. एक खोट दुस-या खोट्याने सिद्ध होत नाही हे खरे पण ते समजावुन घेण्याच्या मानसिकतेत कोण असणार? एकंदरीत ही लढाई, दलित विरुद्ध मराठा, दलित विरुद्ध ब्राह्मण आणि दलित विरुद्ध सारे अशा विकृतरंगी दृष्टीकोणातुन पण पुर्ण द्वेषाने लढण्याचा प्रयत्न झाला आहे हे महाराष्ट्राचे दुर्दैव तर आह्वेच पण फडनवीस सरकारचे "जाणीवपुर्वक अपयश" आहे असे म्हणावे लागते.   

हे दंगल भडकावनारे, सोयीच्या राष्ट्रभक्तीच्या व्याख्या करनारे आणि नसलेल्या इतिहासात अस्मिता शोधनारे असे संम्मिश्रण झाले की जो अनर्थ व्हायचा तो झाला आणि महाराष्ट्र एका जातीविद्वेषाच्या कचाट्यात आपसुक सापडला. यात वाईट बाब ही की पोलिसांनी या प्रकरणी अत्यंत संशयास्पद भुमिका घेतली. खोट्या राष्ट्रवादी हिंदुत्ववाद्यांकडून दगडफेक, तोडफोड होत असतांनाही साधी लाठीही उचलली गेली नाही. आंबेडकरवादीही या प्रकरणात फार सुजाण वागले असे म्हणता येणार नाही. अभिनिवेशाच्या ज्वर दोन्ही पक्षांना काही काळ तरी चढल्याचे चित्र दिसले. पण असे होणार हे वढूच्या प्रकरणापासुनच लक्षात घेत राज्य सरकारने आधीच प्रतिबंधात्मक उपाययोजना केली नाही हे वास्तव आहे. खरे तर ही दंगल व्हावी, लोक भडकावेत व भडकतच रहावेत अशा पद्धतीनेच या संपुर्ण प्रकरणाची हाताळणी झाली. त्यात बंदची दिली गेलेली हाकही शहाणपनाची होती असे नाही. थोडक्यात शहाणपनाचे मुलभुत तत्व धाब्यावर बसवले गेले. कोपर्डीपासून सुरु झालेला समाज विखंडणाचा प्रवास कोरेगांव भीमापर्यंत येवून पोहोचला. यात अस्मितांचे काय झाले हा प्रश्न कोनाला सुचेल असे नाही. आता या क्षणी तरी प्रत्येक जण कोनाच्या न कोणाच्या बाजुने आहे. खरे काय होते आणि त्यानुसार सामाजिक वर्तन कसे बदलले जायला हवे होते याच विचार करण्याच्या मानसिकतेत कोणे आहे असे दिसत नाही. किंबहुना या मानसिकतेत आपण भारतीय कधी येवू याचे शक्यता दिसत नाही. 

मिथकप्रियतेने आमचा आजतागायत सामाजिक बळी घेतलेला आहे. आमच्य बुद्धीवादाचे मातेरे करत आम्हाला नृशंस बनवले आहे. इतिहासाचे आमचे आकलन अत्यंत बालीश आहे. मिथकांवरून सामाजिक संघर्ष व्हावेत ही काही कोणत्या समाजाच्या सुजाणतेची चिन्हे नव्हेत! आम्ही सुजाण नाही. मिथकांत जन्माला आलोत आणि त्यातच मरणार हेच आमचे अटळ प्राक्तन आहे! हा संघर्ष त्या प्राक्तनाचे जयघोष करीत आहे! राजकारणी मात्र आपापली नवी फेरमांडनी करत या स्थितीचा लाभ घेण्यासाठी सरसावलेही आहेत! 

-संजय सोनवणी
(Published in Saptahik Chaprak)

4 comments:

  1. We all should be wise, thanks for blogger's clear views on this topic

    ReplyDelete
  2. सर, अत्यंत वस्तुनिष्ठ, तर्कसंगत व संतुलित मांडणी. याची मोठी गरज आहे... पण लक्षात कोण घेतो? शेवटी प्रश्न 'तथाकथित' अस्मितांचा आहे...

    ReplyDelete
  3. गोविंद महार यांबद्दल मिथक निर्माण होण्यास
    विश्वास पाटील यांना जबाबदार ठरवता का....?

    ReplyDelete

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...