Monday, January 8, 2018

हरीहर-बुक्क


Image result for harihara bukka


विजयानगरचे साम्राज्याची स्थापना चवदाव्या शतकात झाली. हरीहर आणि बुक्क या साम्राज्याचे संस्थापक होत याबद्दल कोणा विद्वानाचे दुमत नाही. दुमत मात्र भलतेच आहे कि हे दोन बंधू होते तरी कोठले आणि कोण? ते कन्नडिगा होते कि तेलगू मुळाचे हा वाद तर आहेच पण हरीहर व बुक्क हे कोणत्या कुळाचे होते याबाबत तीन वेगवेगळ्या थिय-या आहेत आणि प्रत्येक थियरीचे वेगवेगळे तीस-चाळीस समर्थकही आहेत. चवदाव्या शतकात झालेल्या महान नृपती व साम्राज्य संस्थापकांबाबत एवढा मोठा घोळ घातला जातोय तर त्याहीपुर्वी हजारो वर्ष आधी झालेल्या मौर्य आणि सातवाहनांबाबत तर किती घातला जाणार हे उघड आहे. खरे तर या वादाची मुळेच आपल्या सामाजिक व्यवस्थेत आहेत. हे वाद निवारायचे तर आपल्याला तथ्यपुर्ण पुराव्यांच्या प्रकाशातच व जेथे पुरावेच शिल्लक ठेवले गेलेले नाहीत तेथे तर्काच्या आधारावरच त्यांचे निराकरण करावे लागते. आणि जी राजघराणी वैदिकांच्या दृष्टीने शूद्र मुळाची होती तेथेच नेमका एवढा गोंधळ घातला गेला आहे कि संशोधकही उद्विग्न व्हावा. असो.
सर्व विद्वानांची मते पाहता व पुराव्यांची छाननी करता हरिहर-बुक्क हे मुळचे आंध्र प्रदेशातील असावेत या म्हंणण्याला बळकटी मिळते. ते मुळचे कर्नाटकातील व होयसळांचे सेनानी नव्हते. "विद्यारण्य सिक्का" या संस्कृत पुस्तकातून (लेखक रमप्पा वर्मिक)  व शिलालेखांतुन हेही सिद्ध होते कि हे दोघे बंधू कुरुबा-गौडा (धनगर) समाजातील होते व त्यांच्या पित्याचे नांव संगम होते. सुरुवातीला वरंगळ येथील काकतिय राजा प्रतापरुद्र (दुसरा) याच्या खजिन्याचे रक्षण करण्याचे कार्य हे दोघे बंधू करत असत. इतिहासकार राबर्ट सेवेल यांनीही सर्व पुराव्यांची छाननी करुन हे मत मान्य केलेले आहे.
वरंगळ हे सध्याच्या तेलंगना राज्यात आहे. काकतिय राजांनी येथे साम्राज्य प्रस्थापित केले होते. सन ११७५ ते सन १३२४ पर्यंत काकतियांनी मोठ्या भुप्रदेशावर सत्ता गाजवली. काकतिय काळचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे जात-जमातींच्या उच्च-नीच भावनेला त्यांनी स्थान दिले नाही. वर्णव्यवस्थेला तत्कालिन भारतात प्रबळ स्थान लाभले असले तरी त्यांनी ती व्यवस्था ठोकरुन लावत कोणत्याही जातीतील योध्यांना उच्च पदे दिली. काकतीय राजे वैदिक नव्हते. हरिहर-बुक्काला खजिन्याचे रक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्या पराक्रमाकडे पासून दुस-या प्रतापरुद्राने दिली असल्यास नवल नाही. अल्लाउद्दिन खिलजीने १३२३ मद्ध्ये बुडवेपर्यंत राज्य केले. महाराष्ट्रातील देवगिरीच्या यादव राज्यावर जशी त्याने धाड घातली होती तशीच वरंगळवरही १३०३ पासून त्याचे धाडसत्र चालु होते. काकतियांनी आपल्या सेनानींच्या सहाय्याने कडवा प्रतिकार केला होता. १३१० मधील युद्धात खिलजीचा सेनानी मलिक काफुरबरोबर प्रतापरुद्राला तह करावा लागला व त्याने दिल्ली सल्तनतीचे मांडलिकत्व मान्य केले. १३१८ मधे त्याने खिलजीला खंडणी देण्याचे नाकारले. त्यामुळे खिलजीने खुश्रुखान या त्यच्या सेनानीला प्रतापरुद्रावर चालुन जायला सांगितले. हा खुश्रुखान मुळचा हिंदू असून दलित जातीत जन्माला आला होता व त्याने पुढे दिल्लीची सत्ता ताब्यात घेऊन सहा महिने सत्ता सुलतान म्हणून चालवली हे येथे लक्षात घ्यायचे आहे. असो. प्रतापरुद्राने त्याला वाढीव खंडणी देऊन युद्ध टाळले व आपल्या स्वातंत्र्याचे प्रयोग सुरुच ठेवले, पण त्याला त्यात यश आले नाही.
अखेर खुश्रुखानाने पुन्हा केलेल्या स्वारीत वरंगळ पुर्ण कोलमडले. प्रतापरुद्राला अटक करण्यात आले. त्याला दिल्लीकडे नेतांना नर्मदेजवळ खुश्रुखानाची फौज आली असता प्रतापरुद्राने आत्महत्या केली असे काही दाखले मिळतात. खुश्रुखानाने अटक केलेल्या योद्ध्यांत हरिहर-बुक्क हे सेनानीही होते.
या दोघा बंधुंना मुस्लिम बनवण्यात आले व पुन्हा दक्षीणेला दिल्लीचे प्रतिनिधी म्हणून पाठवण्यात आले असेही काही इतिहासकार म्हणतात. विद्यारण्याने त्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेऊन विजयानगरचे राज्य स्थापण्याची प्रेरणा दिली असेही मानले जाते. परंतू अनेक इतिहासकार हे मान्य करत नाहीत. त्यांच्या मते धर्मांतरित व पुनर्धर्मांतरित माणसांना काकतिय व अन्य शासकांच्या अधिका-यांनी कसलीही मदत केली नसती. त्यामुळे हरिहर-बुक्काचे धर्मांतर झाले होते या मतात, तत्कालीन सर्व करारनामे, ग्रंथ पडताळून पाहता, अर्थ दिसत नाही.
दिल्ली सल्तनतीने हरिहर-बुक्काला सोडले, दोहोंनी पलायन केले कि दक्षीणेत दिल्ली सत्तेला मदत होईल असे आचरण करेल अशा बहान्याने सुटका करुन घेतली याबद्दल निश्चयाने सांगता येणार नाही. काही इतोहासकारांच्या मते हरिहर-बुक्क खुश्रुखानाच्या तावडीत साप्डले नाहीत तर ते युद्धात झालेल्या पराजयानंतर उरलेल्या सैन्यासह कांपिल येथे निघून गेले. हे मत अधिक ग्राह्य वाटते.
काकतियांची व यादवांची सत्ता कोलमडल्यामुळे दक्षीण भारतात राजकीय विस्कळीतपण आला होता. सल्तनतीच्या वारंवार पडणा-या धाडींमुळे अर्थव्यवस्थाही गदगडलेली होती. अशा स्थितीत इस्लामे सत्तेला रोखत जनतेला स्थिर शासन देण्याची गरज हरिहर-बुक्काच्या लक्षात आली नसल्यासच नवल. काकतियांप्रमाणेच होयसळ साम्राज्यही कोसळतच आले होते. त्यामुळे स्वातंत्र्यप्रिय नायक, रेड्डी, कुरुब यासारख्या समाजांची मदत घेत विजयानगर साम्राज्याची पायाभरणीच नव्हे तर विस्तार करत दक्षीण भारतात सुवर्ण काळ तर आणलाच पण दिल्ली सल्तनतीला द्क्षीणेत पाय ठेवू दिला नाही. हे राज्य सन १३४६ पर्यंत हरिहराने पुर्व ते पश्चिम समुद्रांपर्यंत भिडलेले राज्य स्थापन केले ही नोंद शृंगेरी मठाच्या ताम्रपटात आहे. हरीहराचा मृत्यू १३५६ मद्ध्ये झाल्यावर त्याचा भाऊ बुक्क सत्तेवर आला.
हे साम्राज्य १३३६ ते १६४६, म्हणजे तब्बल ३१० वर्ष टिकले. दक्षीण भारताच्या कला-संस्कृतीवरही या घराण्याने फार मोठा ठसा सोडला आहे. हंपीची जगप्रसिद्ध व नेत्रदिपक वास्तुशिल्पे याच घराण्याची देणगी. या साम्राज्याची संपत्ती आणि शक्तीची कल्पना विजयानगरच्या अवशेषांतुन आजही येते. यांच्या काळात तेलगू व संस्कृतमद्ध्ये अजरामर रचनाही घडल्या. वेंकट (तिसरा) हा या साम्राज्याचा शेवटचा शासक. नंतर हे राज्य विजापुर व गोवळकोंडा सल्तनतींनी गिळंकृत केले.

* * *

1 comment:

पांडुरंग बलकवडॆ एवढ्या खालच्या थराला गेले कसे?

  पांडुरंग बलकवडॆ एवढ्या खालच्या थराला गेले कसे? Sanjay Sonawani    ·  Pune    ·  Shared with Public 10 janewari 2013 पांडुरंग बलकवडे यांच्य...