या कवितेचा
कोणी अनुवाद करणार नाही
कारण स्वाभाविक आहे
यात अर्थगर्भ हव्याशा शब्दांची,
प्रतिमांची
नि प्रसिद्धीची सोय नाही
ही फक्त निखळ कविता आहे
जी मी अनवरत कोलाहलातील
नीरव शांतीत बसून
शापग्रस्त त्रस्त संत्रस्त आत्म्यांच्या
सांत्वनासाठी लिहिली आहे
माझे हात चिंब भिजलेत त्यांच्या अश्रुंनी
नि कान कुंद
त्यांच्या अनावर हुंदक्यांनी
एवढे सांगायचे सोडले तर
या कवितेत बाकी काहीच नाही!
No comments:
Post a Comment