Sunday, February 4, 2018

सर्ववादी विचार: आदिवासी धनगर साहित्य संमेलन




गेल्या वर्षी सोलापुरमध्ये पहिले आदिवासी धनगर साहित्य संमेलन झाले. महाराष्ट्रातील संख्येने मोठा असलेला आणि तरीही नागरी जीवनात न रुळलेला, बव्हंशी दुरच राहिलेल्या मूक समाजाला पहिल्यांदाच आवाज फुटला. शिवाय हे संमेलन केवळ धनगर जमातीपुरते मर्यादित नव्हते तर धनगरांनी भरवलेले सर्व समाजांसाठीचे संमेलन असे त्याचे व्यापक रुप असल्याने महाराष्ट्रातील मुख्य प्रवाहांनीही त्याची अत्यंत सकारात्मक दखल घेतली. या संमेलनात विविधांगी चर्चा तर झाल्याच पण भविष्याचे दिग्दर्शनही मिळाले. एका अर्थाने धनगर समाजाचा आत्मविश्वास, मनोबल आणि स्व-वेदनांची जाणीव वाढण्यात मदत तर झालीच पण आपल्यासमोर व्यापक समाजनिर्मितीसाठी कोणत्या जबाबदा-या आहेत याचेही भान आले. यंदाच्या वर्षातच धनगर अणि इतर भटक्या विमुक्त समाजांवर २६ पीएचडीचे संशोधनात्मक प्रबंध लिहिण्याचे प्रस्ताव माझ्या मार्फत गेलेत. स्वत:हुन पाठवले गेलेले अजुन खुप असतील. किंबहुना या समाजावर संशोधन करणे आपले उत्तरदायित्व आहे याचे भान यामुळे मोठ्या प्रमाणात जागृत झाले. समाजांचे सर्वांगीण सर्वेक्षण, अध्ययन केल्याखेरीज या वंचित समाजांसमोरील समस्या सुटणार नाहीत हे उघड आहे. किंबहुना या समाजातुन किंवा या समाजांवर साहित्य निर्मिती करायची तर पार्श्वभुमीची साधने हाताशी येण्यात या संशोधनांची मदत होईल हे नक्कीच.

धनगर समाज हा एक राष्ट्रीय आदिम पशुपालक समाज असल्याने या समाजाची स्वत:ची अशी साहित्य आणि धर्म संस्कृती आहे. देशात प्रांत आणि भाषापरत्वे या समाजाला वेगवेगळ्या नांवांनी ओळखले जात असले तरी पशुपालक संस्कृतीचे अपत्ये हीच त्यांची ओळख आहे. महाराष्ट्र मुलत: चरावू कुरणांचाच प्रदेश असल्याने येथील आद्य वसाहतकार हे धनगरच होत हे पुरातत्वीय पुराव्यांनीही सिद्ध केले आहे. महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाचे आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचे संस्थापक सातवाहन याच समाजातुन आले. हाल सातवाहनाची गाथा सप्तशती हा माहाराष्ट्री प्राकृतातील ग्रंथ जगप्रसिद्ध आहे. गौतमीपुत्र सातकर्णीने आपल्या अतुलनीय पराक्रमाच्या जीवावर शक अधिपती नहपानाचा प्रचंड मोठा पराभव करुन महाराष्ट्राचा आद्य स्वातंत्र्य लढा जिंकला आणि त्या स्वातंत्र्य संग्रामातील जयाच्या स्मरणार्थ आजही महाराष्ट्रासहित जेथे जेथे सातवाहनांचे राज्य होते तेथे "गुढीपाडवा" म्हणून तो साजरा केला जातो. असे असले तरीही धनगर आपल्या रानोमाळ मेंढरे घेऊन फिरण्याच्या पेशामुळे राजसत्ता त्यांचा असल्या तरी नागरी संस्कृतीपसुन व म्हणूनच इतिहासापासुनही दूर राहिले. आपल्या ओव्यांत त्यांने आपला इतिहास जपला खरा पण ओव्यांतही नंतर भर पडत गेल्याने जुने भाग हळु हळू विस्मरणात गेले. किंबहुना वर्तमानाचा वसा ठेवतांना त्यांनी इतिहासाकडे एवढे लक्ष दिले नाही. इतिहासाचा दुराभिमान त्यामुळे या समाजात कधी आलाही नाही. विठोबा, खंडोबा, जोतिबा, बिरोबा इत्यादि दैवते त्यांचीच असली तरी त्यांवरही त्यांनी कधी स्वामित्व अधिकार दाखवला नाही. नागरी समाज हा शेवटी त्यांच्यातुनच व्यवसाय बदलुन आला असल्याने मुळचा एकपनाची जाण असल्याने त्यांनी "आमचा इतिहास आणि आमची दैवते का हिसकावता?" असा उद्दाम प्रश्न त्यांनी कधी विचारला नाही. आणि नागरी समाज मात्र त्यांना क्रमश: विसरत गेला. किंबहुना धनगर समाजाबाबत नागरी समाजात घोर अज्ञान आहे. आधुनिकीकरणाच्या कालात त्यांचा आदिम व्यवसाय, मेंढीपालन’ हिरावला गेला तरी कोणी त्यांना पर्याय द्यायला हवा होता असे म्हणत सामोरा आला नाही. तरीही या समाजाने कधी तक्रार केली नाही. जेंव्हा केली तेंव्हा हा भोळा समाज निव्व्व्ळ आश्वासनांनाही भुलत गेला आणि आशेवर आपला काटेरी मार्ग जगत राहिला हा धनगरांचा वर्तमान आहे.

असे असुनही धनगरांनी आपली व्यापक भुमिका सोडली नाही. सर्वसमावेशकता आणि आपल्या हिताबरोबरच सर्वांचे कल्याण हीच भुमिका कायम ठेवली. साहित्य संमेलन करीत असतांना संमेलनातुन साहित्य, समाज व्यवहार आणि भविष्याची आव्हाने हेच विषय प्राधान्याने चर्चीले जातात. यंदा लातूर येथे आदिवासी धनगर साहित्य परिषदेचे जयसिंग तात्या शेंडगे व अभिमन्यु टकले आणि लातूर येथील अण्णाराव पाटील आणि संभाजी सूळ यांच्या सहयोगातुन गेल्या वर्षीपेक्षाही भव्य संमेलन १० व ११ फेब्रुवारीला भरवले जात आहे. ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर या संमेलनाचे उद्घाटक असतील तर प्रसिद्ध लेखिका सौ. संगीता धायगुडे संमेलनाध्यक्ष असतील. अहिल्यादेवींची स्फुर्ती असल्याने महिलाशक्तीची जाण या संमेलनात आवर्जुन ठेवण्यात आली आहे. संमेलनात इतिहास, साहित्य, वर्तमानातील समस्या-आव्हाने, माध्यमे इत्यादि अनेक विषयांवर व्याख्याने होणार असून प्रसिद्ध अभ्यासक यशपाल भिंगे, रामहरी रुपनर, प्रसिद्ध पत्रकार राजेंद्र हुंजे, घनशाम पाटील, अक्षय बिक्कड, राजा कांदळगांवकर, आनंद कोकरे, सौ. विद्या बयास, उज्वला हाके, डॉ. संगीता चित्रकोटी असे अनेक दिग्गज बोलणार आहेत. कवी संमेलनही आहेच.

आज वास्तव हे आहे की धनगरांवर अथवा धनगरांनी लिहिलेले साहित्य आज अत्यंत कमी आहे. साहित्यिक तयार करणे हा हेतू ठेवून धनगर साहित्य परिषदेची यंदा सुरुवात झाली. कोणत्याही समाजात किती निकोप साहित्यिक-विचारवंत आणि तत्वज्ञ-संशोधक आहेत त्यावरुन कोणत्याही समाजाच्या प्रगतीचा अंदाज बांधता येतो. हे साहित्यिक तयार व्हावेत यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करणे, प्रेरणा देणे हा सध्या साहित्य संमेलनाचा हेतू आहे आणि तो सफलही होतांना दिसतो आहे. आज अनेक कवी, कादंबरीकार, पत्रकार, संशोधक या मूक समाजातुन धडपड करत अभिव्यक्त होत आहेत. या अभिव्यक्तीचा एक दिवस मोठा विस्फोट होईल आणि प्रत्येक मूक देशवासी बोलायला सुरुवात करील याची मला खात्री आहे.

किंबहुना मानवी संस्कृतीचे जे संस्थापक होते त्यांनाच पुन्हा नवी मानवतावादी संस्कृती उभारण्यासाठी पुढे यावे लागेल आणि ती जबाबदारी धनगर खुषीने घेण्याचा प्रयत्न करीत आहेत ही समाधानाची बाब आहे. आज महाराष्ट्रात (किंवा देशात) जातीय अस्मितांचा विस्फोट झाला आहे आणि त्या खोट्या अस्मितांतून नवा उज्ज्वल इतिहास घडण्याऐवजी द्वेषाचा, हिंसेचा आणि तिरस्काराचा इतिहास घडवला जातो आहे. मानवी संस्कृतीच्या उत्थानास हे सारे हानीकारक आहे. धनगर मात्र समाज जोडण्याची भुमिका घेत वैचारिक, साहित्यिक आणि प्रबोधनाची क्रांती करायला पुढे सरसावला आहे. त्याला सर्व समाजांचा नुसता पाठिंबा नव्हे तर सहकार्यही अभिप्रेत आहे.

भविष्यात या मुक समाजातुन श्रेष्ठ कवी-लेखक, चिंतक व संशोधक यांचे मोहळ उठेल हा नुसता आशावाद नाही तर तसे परिश्रमपुर्वक प्रयत्नही होत आहेत. धनगरांचा सांस्कृतिक इतिहास लिहिण्याची जेवढी गरज आहे तेवढाच राजकीय इतिहासही. सातवाहनांच्या अभ्यासाकडे तर सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे. अहिल्यादेवी होळकर देशाला वंदनीय असल्या तरी त्यांचेही साधार असे एकही चरित्र आजवर कोणी लिहिलेले नाही. त्यामुळे अहिल्यादेवींचे अनेक पैलु जसे अज्ञात आहेत तसेच मल्हारराव, यशवंतराव, तुकोजीराजे, तुळसाबाई व भिमाबाईचा साद्यंत इतिहास सर्व पैलुंवर अभ्यास करीत लिहिला जाण्याची गरज आहे. अभिनिवेश नसलेला प्रामाणिक इतिहास जगासमोर येण्याची गरज आहे. त्यासाठी कोणी पुढे नाहीच आले (येण्याची शक्यता तशी कमीच आणि जे येतात ते इतिहासाच्या नांवाखाली गांवगप्पाच लिहितात किंवा विद्रुपीकरण करतात हा अनुभव आहे.) तर स्वत:च धनगरांनाच पुढे यावे लागेल.

कोणत्याही महान कादंबरीकाराला आव्हान असे धनगरांचे जीवन आहे. त्यावर कादंब-या मात्र अभावानेच आहेत. ज्या आहेत त्यात धनगर दुय्यमच असतात. त्यामुख्ळे त्यांचे जीवन, व्यथा, वेदना, आकांक्षा आणि स्वप्ने आजवर चित्रितच झालेली नाहीत. हे जीवन जगणारे मेंढपाळ आनंद कोकरेंसारखे उमेदीचे लेखक मला दिसतात. असे जेही आहेत त्यांनी पुढे यायला हवे. लिहायला हवे. जगाला आपले जगणे सांगायला हवे. यशपाल भिंगे, शिवाजी दळनर यांसारखे अनेक विद्वान वक्तेही आहेत. समाजाला नवी दिशा देण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. जयसिंग तात्या शेंडगे आणि अभिमन्यु टकले पायाला भिंग-या बांधुन महाराष्ट्रभर जागृती करत आहेत. खरे तर त्यांचे प्रयत्न नसते तर धनगरांचे साहित्य संमेलन कदापि झाले नसते. आण्णाराव पाटील व संभाजी सुळांनी यंदा लातुरचे यजमानपद घेतले आहे. अमोल पांढरे यांनी या दोन्ही संमेलनांसाठी जे कष्ट उपसलेत त्यांनाही तोड नाही. अखेर असंख्य हात लागुन हे संमेलन होतेय. पुढील वर्षासाठीही काही आमंत्रणे आताच येवू लागलीत. "इवलेसे रोप लावियेले दारी..." भविष्यात याचा वेलू गगनावरी जाईल, मुक समाज बोलका होईल...एवढेच नव्हे तर सामंजस्य, मानवता आणि जातवादी न होता "सर्ववादी" विचारांची पायाभरणी करीत तो आदर्श भारतीय समाजाला देतील याचा मला विश्वास आहे.

-संजय सोनवणी

2 comments:

  1. Sir you are miracle, without your pen without your pen no one can understand how wonderful we are. You are great sir ad we proud of you,

    ReplyDelete
  2. धनगर समाजाला नेमकी कशाची गरज आहे यावर आजपर्यत जो गोंधळ माझ्या मनात होता.तो आज आपला लेख वाचून दूर झाला.खरोखरच समाजातिल प्रतिभावान नवयुवकांनी हे आव्हान लिलया पेलायला हव .आपल्या जिवनशैलीचा ,ईतिहासाचा ,आपल्या महाषुरूषांच्या सामाजीक राजकीय जिवनातील योगदानाचा,साहीत्यरूपी ऊहापोह व्हायलाच हवा तेंव्हाच ऊर्वरीत जगासमोर आपले प्रश्न येतील.
    ����जय मल्हार

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...