Monday, March 5, 2018

गुलामी की स्वातंत्र्य?


Image result for freedom or slavery


किमान विचारवंतांनी तरी कोणत्याही गोटात जाऊ नये. गेले तर तो गोटच त्यांच्या विचारपद्धतीवर नकळत बंधने घालतो. ही बंधने अनेकदा क्रूर असतात. त्या बंधनाबाहेर पडले की हेत्वारोप सुरु होतात. काहींना तर संपवण्यात येते. थोडक्यात विचारवंताला परतंत्र करणे हेच काम प्रत्येक गोटाचे असते (मग त्या गोटाची विचारधारा कोणतीही का असेना.) मग विचारवंतांसाठी गोट (छावण्या) की छावण्यांसाठी विचारवंत हा प्रश्न निर्माण होत अंततोगत्वा विचारवंत हा त्या छावणीचाच गुलाम बनुन जातो. तेथे विचारच संपतात हे ओघाने आलेच.
खरे तर प्रत्येकाने स्वतंत्र विचारवंत (फ्री थिंकर) रहायला हवे. कोणत्याही गोटासाठी आपली बुद्धी खर्च करण्यापेक्षा आपापल्या स्वतंत्र विचारांत वृद्धी करण्यासाठी आणि एकुणातीलच मानवजातीच्या हितासाठी ती खर्च करावी. कोणतेही "गोट" हे शेवटी आपल्यातीलच ’माणुस’ बदलला, छावनी-विचाराला छेद देऊ लागला की आपले सुळे काढून नृशंसत्व दाखवतातच. मी अशी अनेक उदाहरणे पाहिली आहेत. तरीही अशा विचारवंतांना शहाणपण येते असे नाही. या छावणीतुन त्या छावणीत जाणारे दिसतच असतात. मग "झुंडीचे गुलाम विचारवंत" असे एकुणात त्यांना स्वरुप येते आणि यात हत्या होत असेल तर ती विचारप्रक्रियेची, नव तत्वज्ञानाची. छावण्यांचे काही बिघडत नाही कारण नवनवे विचारक बकरे त्यांना लाभतच जात असतात.
छावण्यांना नवे असे काहीही नकोच असते, मग ती छावणी प्रतिगामी असो की पुरोगामी. त्यांना प्रत्येक विचार त्यांच्याच पुर्वनिर्धारीत चौकटीतच छाटुन बसवायचा असतो. त्यांना विचार हवा असतो पण त्यांच्या ठरवलेल्या तत्वज्ञानाच्या मर्यादेत. विचारवंतांना ते दास्य स्विकारावे लागते आणि हे दास्य प्रसिद्धी अथवा पैशांच्या मोहाने ज्यांना हवे आहे त्यांना मग विचारवंत कसे म्हणता येईल?
गुलामांकडून नववैचारिकता कशी अपेक्षिता येईल? आणि मग त्यांच्यामुळे कोणतीही छावणी जिंकली तरी ती स्वतंत्र समाजाची निर्मिती कशी करू शकेल? कोणत्याही छावणीला मानवतेशी फार घेणेदेणे असते असे नाही. फार तर तोंडी लावायला शोषित, वंचित, मानवता हे शब्द कामाला येतात पण त्यांचे हित हा त्यांचा अंतिम उदेश्य असतो असे दिसलेले नाही.
पण ज्याला त्याला त्याच्या छावण्या लखलाभ असे म्हणतांना किमान विचारवंतांनी तरी गोट/छावण्यांचा मोह सोडला पाहिजे आणि आपले विचार स्वतंत्र आणि दबावविरहित ठेवायला हवेत. आणि सर्व प्रकारच्या छावण्यांच्या त्यागातुनच ते होऊ शकेल. भारतीयांना नवविचारांची गरज आहे. छावण्यांच्या मोहात न पडता सर्वच क्षेत्रांत स्वतंत्र विचारांचा परिपोष कसा होईल हे पाहणे आमचे कर्तव्य आहे. छावण्या म्हणजे शेवटी रानटी झुंडीच असतात हे प्रत्येक नव-विचारकांनी लक्षात घेतले पाहिजे.
गुलामी की स्वातंत्र्य हा निर्णय त्यांनीच करायचा आहे.

2 comments:

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...