Friday, March 2, 2018

शिक्षणाचे तत्वज्ञान

मुलाची शिकण्याची प्रक्रिया नेमकी काय असते हे आपण आधी समजावून घ्यायला हवे. प्रत्येक मुलाची ग्रहण क्षमता वेगळी असते हे तर आपण जाणतोच. एवढेच नव्हे तर सारख्या ग्रहणक्षमतेच्या मुलांना समान विषयांत रुची वाटेल असेही नसते. काय शिकावे वाटते याची जाणीव प्रत्येक मुलात अबोध पातळीवर वावरत असते. समाजाला भावी काळात लागणा-या मनुष्यबळाची निकड भागवण्यासाठी समाज अनेकदा आपल्या शिक्षण पद्धतीतून मुलांना विशिष्ठ साच्यातले घडवायचा प्रयत्न करतो हे आपण प्राचीन कालापासुनच्या शिक्षण पद्धतीतुनही पाहु शकतो. लष्करी प्रशिक्षण हे मुलगामी बनले होते ते त्या काळच्या युद्धखोर वातावरणांमुळे. राष्ट्रप्रेम, राज्यनिष्ठा या शिक्षणाच्या मुलभूत बाबी त्यामुळे बनल्या असल्यास नवल नाही. आजही त्याचे अस्तित्व काहे ना काही प्रमांणात आपण कायम ठेवलेले आहे. शाळांत ती सोय अल्प असली तरी काही धर्मवादी अथवा राष्ट्रवादी संघटना मुलांवर असे प्रयोग करतच असतात हेही आपण पाहतो. संघाच्या शाखा हे एक त्याचे भारतातील एक उदाहरण आहे. महाविद्यालयांतील राजकीय संघटनाही स्वानुकूल विचारसरणीचे तरुण घडवायचा प्रयत्न सातत्याने करीतच असतात. या विचारसरण्यांतील संघर्षही अधे-मधे दिसून येतो. 

एकंदरीत मुलांचा कच्चा माल म्हणून राष्ट्र व विविध विचारधारा करण्याचा प्रयत्न करीत असतात. म्हणजेच मुलांच्या नैसर्गिक आवडी-निवडींना त्यात विशेष स्थान नसून त्यांच्या नैसर्गिक गुणांना कोणत्या ना कोणत्या भावी गरजेच्या आपुर्तीसाठी विशिष्ट दिशेला नेण्यासाठी शिक्षण व्यवस्था ते समाजव्यवस्था प्रयत्न करीत असते. यात समाजाचा स्वार्थ निहित असतो हे ओघाने आलेच. शिवाय या समाज-गरजेतुनच रोजगारही निर्माण होणार असल्याने इच्छाधारित शिक्षण नव्हे तर गरजाधारित शिक्षण हे केंद्रीभूत होणे मग अपरिहार्य ठरते. त्यामुळे "भविष्यातील समाजाच्या गरजांची आपूर्ती करण्यासाठी शिक्षण" अशी शिक्षणाची एक व्याख्या नकळतपणे बनून जाते. या गरजापोटींच्या शिक्षणामुळे विद्यार्थ्यांतच एक स्पर्धा लागून जाते आणि ती स्पर्धा नैसर्गिकच राहील याची मात्र खात्री देता येत नाही. 

विद्यार्थ्यांना नैतिक शिक्षण महत्वाचे हे मानण्याचा काळ प्लेटोपासुनच सुरु होतो. पण नीति म्हणजे काय यावर अजवर एवढी चर्चा होऊनही नैतिक प्रश्न व त्यांचे निर्वाह होण्याची सोय अद्याप लागलेली नाही. किंबहुना नीतिनेच मुलांचे मानसीक बळ वाढेल असे मानले जात होते. प्लेटो म्हणत असे की ज्ञान हे उपजत असते आणि अनुभव आणि समजेच्या वाढीबरोबर ते अधिकाधिक प्रकट होऊ लागते. नंतर शैक्षणिक मानसशास्त्रात बरेच काम झाले असले तरी शिक्षण हे वर्तन, समज, समस्यांची उकल करण्यातील प्राविण्य, स्मृती आणि प्रेरणा इत्यादि बाबींभोवतीच घुटमळत राहिल्याचे आपल्या लक्षात येईल. मुलात या सर्वाचा उद्देश एवढाच की अधिकाधिक सुयोग्य नागरिक (समाजाच्या गरजेप्रमाणे) घडवता येतील अशी व्यवस्था निर्माण करणे व शिक्षणपद्धतीत तसा बदल घडवून आणने. कमजोर विद्यार्थ्यांनाही सक्षम कसे बनवता येईल याचाही विचार यात अद्याहृत आहे. 

एकंदरीत आपण आजचा शिक्षण विचार पाहिला तर आपल्या लक्षात येईल की मुलांना स्वत: जगण्यासाठी, समाजाची गरजही भागवण्यासाठी आणि समाजालाही सुरक्षित ठेवण्यासाठी शिक्षणाची रचना केली जाते. हे योग्य आहे काय याबद्दल मला शंका आहे. कारण यात मुलांचे नैसर्गिक कल व त्यांना हवे असनारे शिक्षण मात्र दुर्लक्षित राहते. शिवाय कोनते शिक्षण भविष्यात समाजाची गरज भागवू शकेल आणि कोणते कालबाह्य होईल याचा आगावू आदमास लावता आलेला असतोच असे नाही. त्यामुळे बरेच शिक्षण वाया गेलेले असते. अभ्यासक्रमातून शिकावे लागणारे अनेक विषय विद्यार्थ्याला खरेच उपयुक्त आहेत की तो किती बौद्धिक ओझे वाहू शकतो याची चाचपणी करण्यासाठी आहेत याचे उत्तर शिकवणा-यांकडेही असतातच असे नाही. किंबहुना नसतातच. उपयुक्ततावाद शिक्षणात अनाठायी आहे हे मान्य केले तरी मुलाला काय हवे आहे याची तपासनी न करता त्याच्यावर अनेक व तेही आम्हाला ते आवश्यक वाटतात म्हणून, विषय लादणे हे ज्ञानार्जनाच्या प्रक्रियेत अडथळा ठरू शकतात हे उघड आहे. 

शिक्षणाचा उद्देश माहिती गोळा करने हा आहे की ज्ञान मिळवणे हा आहे याचे उत्तर "ज्ञान" असे दिले जाते. पण भारतातील शिक्षणपद्धतीत मुळात ज्ञान म्हणजे नेमके काय आणि ते कसे मिळवले जाते आणि त्यातून अधिक प्रगल्भ ज्ञानाची निर्मिती करावी लागते हेच शिकवण्याचा पुरेपूर अभाव आहे असे आपल्या लक्षात येईल. शिक्षणाचे मानसशास्त्र जसे आहे त्यापेक्षा शिक्षणाचे तत्वज्ञान महत्वाचे आहे. आमच्याकडे असे काही तत्वज्ञान कधीही अस्तित्वात नव्हते. आताही ते तयार करण्याची गरज आहे याची जानीव आमच्या शिक्षण धुरीणांना आहे असे दिसत नाही. आम्ही आमच्या शिक्षण पद्धतीतून मुलांच्या स्मरणशक्तीचीच काय ती चाचणी घेत आहोत, आकलन व अभिव्यक्तीची नाही ही बाब माझ्या मते चिंता करावी अशीच आहे. आकलन समृद्धता वाढेल, आकलित ज्ञान/माहितीचे स्वतंत्र प्रकटीकरण होईल अशी संधी आम्ही नाकारतो. पाश्चात्य शिक्षण पद्धतीही या बाबतीत परिपुर्ण आहेत असा दावा करता येत नाही. पण शिक्षण पद्धतीचा उद्देश मात्र बदलण्याची गरज आहे यावर किमान एकमत व्हायला हरकत नाही.

समाजाच्या भावी गरजांचा विचार समाज नेहमी स्वार्थीपनातून करीत असतो. सरकारे त्याच दृष्टीने आपल्याला हवे तशा विचारांचे नागरिक घडवायचा प्रयत्न करीत असतात. म्हणजेच आम्ही मुलांचा मेंदू आम्हाला हवा तसा घडवत नेण्याच्या प्रयत्नात असतो. पण त्यातही हवे तेवढे यश लाभत नाही हे आपण पाहतोच. कारण विद्यार्थ्याचे शिक्षण फक्त शाळा-महाविद्यालयांत होत नसून भवतालच्या व्यवस्थेतुनही होत असते. या दोन पद्धतींत सुसंगती नसते आणि त्यामुळे मुले आपापले मार्ग या प्रभावांच्या रेट्यात कोणत्या ना कोणत्या बाजुला झुकत चालत जातात आणि या झुकण्यातही प्रत्येक मुल हे स्वतंत्र व्यक्तित्व असल्यामुळे एकवाक्यता नसते. 

पण यातून राहुन जाणारी बाब म्हणजे ज्ञान. कौशल्यांबद्दल आपण कितीही चर्चा केली तरी शिकवली जाणारी कौशल्ये कालसुसंगत असतात असे नाही. त्यामुळे तीही पास होण्याच्या प्रेरणेतून शिकली गेली तरी त्यांचाहे उपयोग लगोलग समाजासाठी (आणि त्याच्या जगण्यासाठीही) होईलच असे नाही. आज आपण शिकतो ते अनुकरनाच्या प्रेरणांतून व शिकले नाही तर काळामागे जाऊ किंवा भविष्यात प्रगती नाही या भितीमुळे. शिकवले जाते ते सरधोपट. ज्ञानप्राप्तीसाठी जी जिज्ञासा लागते त्याची वृद्धी करण्याची आमच्व्ह्याकडे सोय तर नाहीच पण आहे तीही जिज्ञासा कशी मारली जाईल याचीच काटेकोर काळजी व्यवस्था घेते. यातुन ज्ञानप्रेरणा वाढणे शक्य नाही हे उघड आहे. शिवाय यात व्यक्तीस्वातंत्र्यही संकुचित केले जाते. म्हणजेच समाजाच्या (किंवा राष्ट्राच्या) भावी गरजांची पुर्ती करण्यासाठी वाढवले गेलेले मशीन असे स्वरुप मुलांना दिले जाते. ही मानवीयता आहे असे कोणीही म्हणू शकणार नाही. आपल्याला आधी शिक्षणाचे तत्वज्ञानच बनवावे लागेल व ते  मानवी प्रेरणांचे वैभव वाढवणारे असायला हवे.  

3 comments:

  1. नककीच, रोजगाराभिमुख शिक्षण आणि शिक्षणाचै
    तत्वज्ञान पाहिजे,

    ReplyDelete
  2. ज्ञान खूप लांब राहिले काँग्रेस ने विनाअनुदानितचा भस्मासुर
    उभा केला राजकारणी शिक्षणसम्राट झाले. नफेखोरी ला
    सुसंगत कायदे बनवले गेले शिक्षणाची संपूर्ण वाट लागली
    आज विनाअनुदानित मध्ये 6 - 16 महिने पगारच नाहीयेत
    कसले ज्ञान अन कसले पान. लेखक साहेब आपण रियालिटी
    पासून खूप दूर आहात

    ReplyDelete
  3. ज्ञान खूप लांब राहिले काँग्रेस ने विनाअनुदानितचा भस्मासुर
    उभा केला राजकारणी शिक्षणसम्राट झाले. नफेखोरी ला
    सुसंगत कायदे बनवले गेले शिक्षणाची संपूर्ण वाट लागली
    आज विनाअनुदानित मध्ये 6 - 16 महिने पगारच नाहीयेत
    कसले ज्ञान अन कसले पान. लेखक साहेब आपण रियालिटी
    पासून खूप दूर आहात

    ReplyDelete

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...