लेनिनचा पुतळा हा प्रश्न नाही. प्रश्न हा आहे की उद्या ज्यांचीही कोणाची सत्ता येईल तेही विरोधी विचारांच्या नायकांचे पुतळे असेच उध्वस्त करत जातील. (खुद्द रशियात लेनिन-स्ट्यलिन आणि इराकमध्ये सद्दामचे पुतळे उखडले गेले आहेत.)
मुळात द्वेषाची अशी परंपरा असावी का हा खरा प्रश्न आहे आणि त्यासाठी आमच्याकडे काय उत्तर आहे? पुतळेच असू नयेत हा वेगळा युक्तिवाद झाला. पण आज जे सुपात आहेत तेही उद्या जात्यातच असनार आणि ही दीर्घद्वेषी परंपरा सुरुच राहणार ही खरी समस्या आहे. नालंदा, तक्षशिला, अलेक्झांड्रियादिंची ग्रंथालये जाळली गेली. आताही वेगळ्या पद्धतीने तेच होत आहे.
सत्ता ही वारांगनेसारखी असते हे सत्ताधा-यांना समजते असे नाही. उद्या त्यांचेही पुतळे उखडले जातील याचे भान त्यांना असतेच असे नाही. द्वेषातून द्वेष आणि सुडातून सुडच निर्माण होतो हे इतिहासाने वारंवार सिद्ध केलेले सत्य दुर्लक्षिण्यात सत्तेचा मद नेहमीच मोठा वाटा उचलत असतो. आणि हे पुतळ्यांच्या बागा निर्माण करणा-यांच्याही लक्षात येते असे नाही.
मुळात स्मारके/पुतळे हे कोणालाही अजरामर ठेवण्याचे, त्यांचे विचार रुजवण्याचे साधन नाही हेच आपल्याला कळालेले नाही. प्राचीेन काळात नवे धर्म स्थापन झाल्यावर जुन्या धर्मांच्या मुर्तीही उध्वस्त केल्या गेल्या आणि ते देवही विस्मरणात गेले हेही आम्हाला समजत नाही. देवांचीच ही गत तर माणसाची काय हेच माणसाला समजत नाही. समस्या येथे आहे. आणि मदांधांना आपला विनाश अशा प्रवृत्तीतून आपणच निकट ओढतो आहोत हेही समजत नाही.
आपल्याला चिंता करायला हवी ती आपल्याला नेमके काय हवे आहे याची!
No comments:
Post a Comment