चतुरस्र साहित्यिक आणि विद्वान संजय सोनवणी यांची "मी मृत्युंजय मी संभाजी" ही कादंबरी वाचून पूर्ण केली. मनात अनेक भावतरंग उठले आणि विचारांचेही कल्लोळ उसळले. अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली तसेच अनेक प्रश्न नव्यानेच उद्भवले. खरेतर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर किंवा एकंदरीत इतिहासावरच लिहिणे हे कमालीचे संवेदनशील झाले आहे. आणि या विषयावर ही कादंबरी लिहून सोनवणी यांनी एक धाडसच केले आहे.
मुळात संजय सोनवणी हे एक बहुप्रतिभ व्यकिमत्व आहे. ते जसे थोर कादंबरीकार आहेत तसेच हाडाचे इतिहास संशोधकही आहेत. तरीही त्यांच्या काही कादंबर्या इतिहासावर बेतलेल्या असल्या तरी तो निखळ इतिहास नव्हे! उदा. अखेरचा सम्राट, असूरवेद, आणि पानिपत, हिरण्यदुर्ग वगैरे. पण "मी संभाजी" या कादंबरीबाबत असे म्हणता येणार नाही. यातून लेखकाला इतिहासही सांगायचा आहे! आणि तो ही उघडा नागडा! त्यामुळे ऐतिहासिक दृष्टीने विचार करताही ही कादंबरी दुर्लक्षित करता येणार नाही.
तसे पाहता काही वर्षांपूर्वी सोनवणी यांनी ब्लॉगवर संभाजी महाराजांच्या संदर्भात प्रदीर्घ लेख लिहिला होता. मला वाटते तो कुठल्यातरी पत्रकात छापूनही आला असेल. या कादंबरीला त्या लेखाची पार्श्वभूमी नक्कीच आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत त्यांनी काही नवीन मते मांडली आहेत. ती खूपच संवेदनशील आहेत. वाचकांनी ती मुळातूनच वाचावीत.
ही कादंबरी सोनवणी यांनी संभाजी राजांच्या मुखातून कवी कलशाला उद्देशून वदवली आहे. कादंबरी केवळ एकशे पंचवीस पानांची असून तिच्यात संभाजी राजे पकडले गेल्यापासून त्यांची क्रूर हत्या होईपर्यंतचा प्रवास फक्त वर्णिलेला आहे. तो ही तपशीलात जाऊन किंवा प्रचंड वर्णनांनी शब्दबंबाळ करून नव्हे. तरीही या कादंबरीत संभाजी राजांच्या जीवनाचा अर्क उतरलेला आहे. भाषा अत्यंत प्रवाही आणि काव्यमय आहे. हे एक मुक्तछंदातले गद्य काव्यच आहे. मात्र ही कादंबरी पूर्ण आकलन होण्यासाठी संभाजी महाराजांच चरित्र आणि इतिहासाची थोडीतरी पूर्वजाण असणे गरजेचे आहे. अन्यथा कलश, अकबर, काझी हैदर, प्रल्हाद निराजी, अगदी मुकबर्र खान यांचे संदर्भ काहीच कळणार नाहीत. मुळात कोणतीही ऐतिहासिक कादंबरी वाचायला किमान ऐतिहासिक ज्ञान आणि आवड ही पूर्वअटच असते.
- प्रा. दादासाहेब मारकड
No comments:
Post a Comment