Sunday, May 6, 2018

भारतात मानसिक अनारोग्याची साथ



बदललेल्या जीवनशैलीमुळे आणि कुटुंबसंस्थेच्या ऱ्हासामुळे मुलं आणि मोठ्यांतही एकाकीपणाच्या भावनेची लागण होते आहे. किंबहुना एकाकीपणा किंवा आपण दुर्लक्षिले जात आहोत या भावनाच संभाव्य मानसिक विकारांची पहिली पायरी असते. या पायरीवरच जर मानसिक सुरक्षा कवच मिळाले नाही तर स्वाभाविकपणेच मूल मनोविकारी बनू शकते. 
भारतीय नागरिकांचे मानसिक आरोग्य दिवसेंदिवस ढासळत चालले आहे. आपल्या देशात मनोविकार असलेल्यांची संख्या जपानच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. ज्यांच्या मानसिक अनारोग्याची लक्षणे सहजासहजी कळून येत नाहीत अशांची संख्या किती असेल हे सांगता येणार नाही. सर्वात जास्त चिंतेची बाब म्हणजे लहान वयातच मानसिक विकारांचा सामना करावा लागण्याचे प्रमाण अवाढव्य आहे. भारतात शेतकऱ्यांच्या दरवर्षी जेवढ्या आत्महत्या होतात तेवढ्याच विद्यार्थ्यांच्याही होतात. देशात सरासरीने प्रत्येक तासाला एक विद्यार्थ्याने आत्महत्या केलेली असते. २०१४ ते २०१६ या काळात एकूण विद्यार्थी आत्महत्यांची संख्या होती २६,४७७! दहावी-बारावीच्या परीक्षेत नापास झाले किंवा अपेक्षेपेक्षा कमी मार्क पडले म्हणून जशा आत्महत्या केल्या गेल्या आहेत तशाच त्या कोवळ्या वयात होणारे प्रेमभंग, किरकोळ अपेक्षा आई-वडिलांनी पूर्ण केल्या नाहीत या नैराश्यातूनही आत्महत्या होत आहेत. यामागे मुळात मानसिक अनारोग्य हे महत्त्वाचे कारण असते आणि असा विकार असलेला कोणीही कधीही आणि कोणत्याही कारणाने आत्महत्या करू शकतो.

हे येथेच थांबत नाही. विद्यार्थ्यांकडून केल्या जाणाऱ्या हत्या आणि अगदी बलात्कारांचे वाढते प्रमाणही लक्षणीय आहे. शिवाय हे मनोविकार व्यक्तीला हिंसकच मार्गाने नेतात असे नाही. मनोविकार काही व्यक्तींना दुभंग व्यक्तिमत्त्वांची शिकार बनवतात. समाजातील वाढती असहिष्णुता ही या सामाजिक मानसिक अनारोग्याचेच एक लक्षण असते. मानसिक विकार एकंदरीत जीवनाकडेच निराशावादी दृष्टीने पाहायला लावतात आणि त्यातून मानसिक अनारोग्याने ग्रस्त समाज तयार होत जातो. आज भारताची त्या दिशेने वेगाने वाटचाल सुरू आहे. हे असे का होते आहे यामागील कारणे आपल्याला पाहायला हवीत.

मानसशास्त्रज्ञ म्हणतात की, जागतिकीकरणानंतर बव्हंशी भारतीयांच्या जीवनशैलीत बदल झाला. सामाजिक व्यक्तिमत्त्वे व्यक्तिवादी बनू लागली. सर्वांना एका जगड्व्याळ स्पर्धेत ढकलले गेल्याने स्वत:पुरताच विचार करण्याची प्रवृत्ती वाढीस लागली. शिक्षणात कधी नव्हे एवढे मार्कांना महत्त्व येऊ लागले. किंबहुना मार्क हेच आपल्या बुद्धिमत्तेचे प्रतीक आहे हे एवढे ठसवले गेले आहे की त्याच्या मानसिक दबावाखालीच प्रत्येक विद्यार्थी वाढत जातो. त्याच्या जन्मजात स्वतंत्र मानसिकतेला पंगू केले जाते. स्पर्धेत टिकायचे तर याला पर्याय नाही म्हणून पालकही मुलांना दडपणाखाली ठेवायचे काम करतात. त्यातून अनेक मानसिक विकार जडायला सुरुवात होते आणि ते मानसिक विकार आहेत हेही अनेकदा भोवतालच्या लोकांच्या लक्षात येत नाही. प्रत्येकाची ताणतणाव सहन करण्याची क्षमता वेगळी असते. ही क्षमतेची पातळी ओलांडली गेली की त्यांचा विस्फोट होणे अटळ होऊन जाते आणि ताणतणाव सहन करण्याचीच क्षमता आता मुळातच कमी कमी होत चालल्यामुळे मानसिक अनारोग्याची जी साथ पसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे ती सत्यात येताना दिसते आहे.

किंबहुना आमची आजची सामाजिक व्यवस्था ही व्यक्तीचे मानसिक आरोग्य सुदृढ करेल अशी नाही. बदललेल्या जीवनशैलीमुळे आणि कुटुंबसंस्थेच्या ऱ्हासामुळे मुलं आणि मोठ्यांतही एकाकीपणाच्या भावनेची लागण होते आहे. किंबहुना एकाकीपणा किंवा आपण दुर्लक्षिले जात आहोत या भावनाच संभाव्य मानसिक विकारांची पहिली पायरी असते. या पायरीवरच जर मानसिक सुरक्षा कवच मिळाले नाही तर स्वाभाविकपणेच मूल मनोविकारी बनू शकते. कोणत्या मनोविकाराचे प्रस्फुटन नेमके कधी होईल हे परिस्थितीवर अवलंबून असते आणि आपल्या सामाजिक स्थितीने अशी परिस्थिती निर्माण केली आहे की त्यातून कोणाचेही मनोबल वाढण्याऐवजी ते ढासळवण्याचीच सोय लावली आहे.

मानसिक अनारोग्यात भर घालणारा अजून एक घटक म्हणजे आजचे व्हर्च्युअल तंत्रज्ञान व त्याधारित खेळ. या व्हर्च्युअल तंत्रज्ञानामुळे मुलेही वास्तव नव्हे, तर व्हर्च्युअल म्हणजेच मायावी जगण्यात रमतात. वास्तवाशी नाळ तुटायची तेथेच सुरुवात होते. प्रश्न सोडवण्यासाठीची जी नैसर्गिक तर्कबुद्धी असते ती वेगळेच वळण घेते. त्यामुळे जीवनातले प्रश्न सोडवण्यासाठी लागणारा संयम, सोशीकता आणि वास्तवदर्शीपणा कमी होत होत तो अधिकाधिक चुकाच करत जाण्याची संभावना त्यामुळे वाढत जाते. बदललेल्या आणि त्यातही चुकीच्या आहार पद्धतीही मानसिक अनारोग्यात भर घालत असतात हे आमच्या अजून लक्षात आलेले नाही.

 आपला आहार आणि आपले मानसशास्त्र यात अतूट नाते आहे हेही आपण लक्षात घेत नाही. मानसिक समस्या असली तर मानसशास्त्रज्ञाकडे किंवा मनोविकारतज्ञाकडे जावे आणि समुपदेशन किंवा उपचारांच्या मार्गाने आपले आरोग्य परत मिळवावे अशी पद्धत आपल्याकडे अजून रूढ झाली नाही. मानसोपचारतज्ञांकडे जाणे म्हणजे आपल्याला काहीतरी वेड लागले आहे असे लोक समजतील या अकारण भयाचाही पगडा असतो. आपल्याकडे दहावी झाल्यावर मानसशास्त्रज्ञांची मदत घेतली जाते ती कलचाचण्यांसाठी. म्हणजे केवळ करिअरसाठी. विद्यार्थ्याचे मानसिक आरोग्य तपासणे हा भाग त्यात अजूनही आलेला नाही. त्याच वेळी चिंता करावी अशी बाब म्हणजे आपल्या देशात केवळ दोन हजार मानसशास्त्रज्ञ आणि पाच हजार मनोविकारतज्ञ आहेत! आपल्या देशातील सध्या मनोविकारांनी गाठलेल्यांची संख्या पाहता हे तज्ञ अपुरेच आहेत.

येथे पालकांनीच महत्त्वाची भूमिका बजावयाची असते हे पालकच विसरतात. मुलांवर काही लादणे म्हणजे त्याचे मानसशास्त्र बिघडवणे आहे. मार्क हे बुद्धिमत्तेचे मुळीच लक्षण नाही तर त्याचे आकलन हे अधिक महत्त्वाचे आहे हे त्यांनी समजावून घेतले पाहिजे. मुलांच्या स्वतंत्र विकासाला वाव देणे व त्यात साहाय्य करणे एवढेच त्यांचे कर्तव्य आहे. आपली शिक्षण पद्धतीच मुळात चुकीची असल्याने ती मुलांवर ताणच वाढवते, नैराश्यही आणते आणि अकारण स्पर्धेत लोटत त्याच्या व्यक्तित्वाचाच अंत करते हे लक्षात घ्यायला हवे. मुलांना आपापल्या नैसर्गिक क्षमतेनुसार व कलानुसार पुढे जाण्याचे स्वातंत्र्य पालकांनीच दिले तर अनेक समस्या कमी व्हायला मदत होऊ शकते. आपले मूल व्यक्तिवादी बनत असतानाच त्याला सामाजिकही बनवणे महत्त्वाचे ठरते. असे असतानाही समजा मुलांत नैराश्य, अति उत्तेजना किंवा निरसपणा अशी लक्षणे दिसलीच तर मानसशास्त्रज्ञाकडे अथवा मनोविकारतज्ञाकडे नेण्यास किंचितही अनमान करू नये. भारतात आज मनोविकारग्रस्तांची पसरलेली साथ पाहता आम्हाला ती नुसती रोखून चालणार नाही तर आपले नागरिक मानसिकदृष्ट्या अधिकाधिक सकारात्मक सुदृढ कसे होतील हे पाहावे लागेल. त्यासाठी राष्ट्रीय अभियानाची आवश्यकता आहे. त्याखेरीज देशाची ज्ञानात्मक व आर्थिक प्रगतीही शक्य नाही हे लक्षात घेतले पाहिजे!

मुलांना आपापल्या नैसर्गिक क्षमतेनुसार व कलानुसार पुढे जाण्याचे स्वातंत्र्य पालकांनीच दिले तर अनेक समस्या कमी व्हायला मदत होऊ शकते. आपले मूल व्यक्तिवादी बनत असतानाच त्याला सामाजिकही बनवणे महत्त्वाचे ठरते. 

No comments:

Post a Comment

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...