Thursday, May 3, 2018

गुलामी

प्रत्येकाच्या विचारधारणा त्याच्या त्याच्या अनुभवाने, वाचनाने आणि त्याच्या त्याच्या स्वतंत्र दृष्टीकोनाने बनत असतात. मला जे विषय महत्वाचे वाटतात ते इतरांनाही महत्वाचे वाटलेच पाहिजेत असे जसे नसते तसेच इतरांना जे विषय महत्वाचे वाटतात ते मलाही वाटलेच पाहिजेत असेही नसते.
त्यामुळे कोणाला "तुम्ही अमुकच का म्हणालात किंवा अमुक म्हटलाच का नाहीत?" असे विचारण्यात अर्थ नसतो तसेच तेच प्रश्न कोणी आपल्या स्वत:लाही विचारले तर तेही बिनडोकपणाचेच लक्षण असते. तुम्ही जे म्हटले गेले त्याचीच फक्त चिकित्सा करु शकता...पण अमुकच का बोलला नाहीत त्या बोलल्याच न गेलेल्या बाबींबाबत जाब कसे विचारु शकता?
प्रत्येकाच्या प्राथमिकता वेगळ्या असतात. त्यावर नियंत्रण केवळ आणि केवळ स्वत:चेच असते. कोणी आपली प्रार्थमिकता सांगणे ही वेगळी गोष्ट झाली आणि लादणे ही वेगळी गोष्ट झाली.
सत्तर वर्षात तुम्ही अमुकवर का बोलला नाहीत मग आताच का बोलता असे आजकाल विचारणारे नवगुंड जेवढे घातकी आहेत तेवढेच आणि तेवढेच "संविधान आमच्या बापाने लिहिले आहे आणि लोकशाही केवळ आम्हालाच कळते" या मुजोरीतुन बोलणारे अविचारगुंडही घातकी होत आहेत.
आणि नेमके हेच लोकशाहीचे लक्षण नाही! एकचालकानुवर्ती विचारधारांना विरोध करत असतांनाच लोकशाही देशाच्या संविधानाबाबत असले "एकलेखकानुवर्ती" विचार पसरवु पाहणा-यांनाही विरोध करावाच लागतो.
अमुकची जयंती झाली...का नाही अभिवादन केले? असे जसे मुजोर प्रश्न येतात तसेच "अमुकच का लिहिले? उपकार विसरलात काय?" असेही बेमुर्वत प्रश्नही विचारले जातात. एखाद्याचे आराध्य सर्वांचेच आराध्य असेलच असे नाही. आणि तशी कोणी जबरी केली तर ते कधी होऊही शकणार नाही. अनुयायी अनेकदा आपल्या नायकांना छोटे करतात. त्यांना आपला नायक नीट समजलेलाच असतो असे नाही. पण सर्वत्र "भक्तांची" रेलचेल असते एवढे मात्र दिसते.
लोकशाहीत कोणी कोणावर उपकार करत नसते तर जो-तो आपले नियत कार्य करत असतो आणि त्या कार्यावर टीका होणे यात काही वावगे नसते. ही ना कोणाची वैचारिक सरंजामदारशाही आहे ना राजकीय. पण हे दोन्ही सरंजामदार आपल्याच मस्तीत जात गर्वाचे शिखर गाठताहेत...त्यांचा पाया ठोस नसुनही.
दोघांनाही आपापल्या अस्मितांचे गुलाम हवे आहेत....
आणि मी ही गुलामी कधीच नाकारली आहे.

1 comment:

  1. अगदी बरोबर,भावनेच्या गैरवापर होतोय की काय याबाबत नेहमी सावध रहावे,समतावादी म्हणवणाऱ्यांचेही 60 वर्षे झाली तरी तेच चालले आहे, तेच ते समतेचे दिखावू, बाजारु कार्यकर्तयांचे पोकळ ढोल, यांना कोणीतरी चापलं पाहिजे,बरोबर आहे सामाजिक समानतेचया या संरंजामदारांना मी बऱ्याचदा भारतीय कुटूंब व्यवस्थेच्या अवस्थेबाबत,शिक्षण बदलाबाबत, विचारतो तर तेवहा ते चकक blank आढळून आले,बाबा वाकयं प्रमाणंम , पण जागे करत असले पाहिजे.अत्त दीप भव होणे आवश्यकच आहे,

    ReplyDelete

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...