Saturday, July 21, 2018

वारी आधुनिक कधी होणार?


कोणत्याही सामाजिक बदलाची सुरुवात चांगली असते. ती सुरुवात चांगली असते म्हणून लोकही त्यात अधिकाधिक सहभाग नोंदवू लागतात. गर्दी पाहिली की तिचा वापर स्वार्थासाठी करण्याचा प्रयत्न करणारेही मग तयार होत जातात. अशा लोकांना झुंडीचं मानसशास्त्र चांगलंच माहीत असतं. मग चांगल्या गोष्टींची वाताहत सुरू व्हायला वेळ लागत नाही. आणि मूळ हेतू चांगला असल्याने विरोध करायलाही सहसा कोणी धजावत नाही. तसंही झुंडींच्या विरोधात जाणं हे अंगलट येतं हा पुरोगामी महाराष्ट्राचा इतिहासच असल्याने वारीचंही अगदी असंच झालं आहे. वरीत संघविचाराचे पारबल्य वाढवण्यचे पद्धतशीर प्रयत्न त्यातून झालेलेच आहेत पण "धारक-यांच्या" नांवाखाली वारीत हिंसात्मक व विषमतामूलक तत्वेही पेरण्याचा प्रयत्न त्यातून होतो आहे. 

श्रीविठ्ठल हा मुळचा धनगर-कुरुबांचा दैवत प्रतिष्ठा प्राप्त करून बसलेला एक पुरातन पूर्वज. पौंड्र वंशातील म्हणून पौंड्रंक विठ्ठल… ज्याचा कालौघात झाला पांडुरंग विठ्ठल. या पौंड्र लोकांचा आराध्य देव म्हणजे पौंड्रिकेश्वर शिव… आणि पौंड्रांची राजधानी पौंड्रपूरचं कालौघात झालं पंढरपूर. म्हणजे हे स्थान पुरातन कालापासून शैवस्थान होतं. पुराऐतिहासिक धनगर-कुरुबांचं सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय केंद्र होतं. आजही पुंड्रिकेशचं जे मंदिर आहे ते शिवमंदिरच आहे. धनगर-कुरुबांची वारी प्राचीन काळापासून शेळ्या-मेंढ्या घेऊन होतच असे… पण तिचं स्वरूप सर्वस्वी वेगळं होतं… हेतुही वेगळे होते.

पण चवथ्या शतकात वैदिक धर्मियांनी बौद्ध आणि शैवांना शह देण्यासाठी एक जबरदस्त युक्ती शोधली. त्यांनी ऋग्वेदातील एक दुय्यम देवता शोधून काढली. त्या देवतेचं नाव विष्णू. त्यांनी अवैदिक वासुदेवभक्तिच्या पांचरात्र संप्रदायातून भक्तिची संकल्पना उचलली. विष्णुच्या अवतारकथांतून हिंदुंचे वैदिकीकरण करण्याचे प्रयत्न सुरु झाले. कृष्ण, रामादि अवैदिक देवतांना विष्णुचे अवतार बनवून टाकलंच, पण गौतम बुद्धालाही चक्क विष्णुचा अवतार बनवून टाकलं. बौद्ध धर्मातील मांसाहार-निषेध, अहिंसादि तत्त्वं उचलली गेली. ‘हर’ या पुरातन शिववाचक शब्दाला गाडण्यासाठी ‘हरी’ हा नवाच शब्द शोधला गेला. वैदिकजनांनी एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला. त्यात ते बौद्ध धर्माला शह देण्यात यशस्वी झाले. वैदिक धर्मातील विषमतेची तत्वे हिंदुंमध्ये झपाट्याने त्यामुळेच पसरली. अनेक बौद्ध आणि शैवस्थानं वैष्णव बनवण्यात त्यांना यश लाभलं.पंढरपूरचा विठ्ठल आणि तिरूपतीचा बालाजी ही दोन स्थानं त्यात महत्त्वाची आहेत. दहाव्या अकराव्या शतकापर्यंत ही शैवस्थानं वैष्णव कशी बदलवली गेली हा धर्मेतिहासातील अत्यंत कळीचा प्रश्न आहे. वारीची दिशा आणि दशा बदलायला तिथूनच सुरुवात झाली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 

संतांना विठ्ठल हा शैव आहे याची जाणीव होती. पण हरी-हर ऐक्याच्या संकल्पनेमुळे त्यांनी विठ्ठलाला जे नवं स्वरूप दिलं गेलं होतं त्याच स्वरूपात पाहिलं. शिवावर लादल्या गेलेल्या वैष्णव चरित्रावर त्यांनी आक्षेप घेणं तर दूरच पण ‘विष्णुसहित शिव आणिला पंढरी…’ या जाणिवेसहित विठ्ठलाला कान्हा, विष्णू याच रूपात पाहिलं. प्रश्न असा आहे की संतांना हे वैष्णव चरित्र का रुचलं? विष्णू वैदिक देवता आहे हे त्यांना माहीत नव्हतं काय? विठ्ठल स्वतः अवैदिक आहे आणि विठ्ठल विष्णुच्या २४ अवतारांत अथवा विष्णु-सहस्त्रनामातही सापडत नाही हे संतांना चांगलंच माहीत होतं. त्यांनी आपापल्या अभंगांतही तसे उल्लेख स्पष्टपणे करून ठेवले आहेत. पण तरीही वैष्णव चरित्र स्वीकारल्यामुळे, म्हणजेच थोडक्यात वैदिक चरित्र स्वीकारल्यामुळे चोखामेळा यांच्यासारख्या महान संताला नामदेवांची साथ असतानाही श्रीविठ्ठलाची गळाभेट कधीच घेता आली नाही. म्हणजेच समतेचं महान ध्येय वारकरी पंथाला सुरुवातीपासूनच गाठता आलं नाही.

याचं कारण मुळात संतांनी स्वीकारलेल्या विठ्ठलाच्या वैष्णव… म्हणजे वैदिक रूपात आहे. माधवराव पेशव्यांच्या दैनंदिनीत दोन महत्त्वाचे आदेश आहेत ते या दृष्टीने पाहिले पाहिजेत. एका आदेशानुसार विठ्ठलाला बाट लागू नये म्हणून महारांना चोखामेळांच्या दगडापलीकडे (समाधीपलीकडे) जाऊ देऊ नये तर दुसर्या आदेशानुसार शिवमंदिराच्या रक्षणासाठी दोन महार रक्षक नेमावेत. म्हणजेच शिवाला बाट लागत नव्हता पण विठ्ठल वैष्णव मानला गेल्यामुळे मात्र त्याला बाट लागत होता. ही सांस्कृतिक उलथापालथ समजावून घ्यायला पाहिजे. संतांच्या वारीचं मूळ समतेसाठी होतं. विठ्ठल त्यासाठी आदर्श देव होता कारण तो अवैदिक होता. पण वैष्णव रूपांतरामुळे समतेची गुढी जातीयतेच्या दलदलीत संतचळवळीच्या आरंभकाळापासून फसली ती फसलीच.

पण हा झाला इतिहास. आधुनिक काळात वारी ही आधुनिकतेची गुढी उभारेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. कोणीही न बोलावता लाखो लोक एकत्र येत हरीनामाचा गजर करत पायी पंढरीची वाट तुडवतात ही घटनाच अनोखी आहे यात शंका नाही. देशी-विदेशी विद्वानांनाही हे गूढ उलगडण्यासाठी सायास करावं वाटणं हेही स्वाभाविकच होतं. पण ही वारी भावभक्तिची आहे की पलायनवादी लोकांनी शोधलेली ही पंढरीवाट आहे यावर प्रश्न उठणंही तेवढंच स्वाभाविक होतं. वारकरी खरंच समतेचे पाईक आहेत की केवळ समतेचं सोंग घेतलेले वैदिक बुरखे आहेत हेही प्रश्न वारंवार उठत आले आहेत. कारण वारकरी आणि त्याहीपेक्षा त्यांचे फडकरी आजवर जे वर्तन करत आले आहेत ते नक्कीच समतेचे, स्वातंत्र्याचे आणि बंधुतेचे द्योतक नाहीत. कारण काही वर्षांपुर्वीच आनंद यादव यांच्यावर घटनाबाह्य दबाव आणत त्यांना त्यांची ‘संतसूर्य तुकाराम’ ही कादंबरीच माफी मागुन मागे घ्यावी लागली. ह.भ.प. देगलुरकर महाराजांनी एक ‘फतवा’ जारी केला आणि त्यात म्हटलं, ‘संतांबद्दल श्रद्धायुक्त अंतःकरणानेच लिहिलं पाहिजे. अन्यथा लिहू नये.’ म्हणजेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं संतांनीच गायलेल्या मुल्याचं विस्मरण या महंतांना झालं असं नाही का? डाऊ केमिकलविरुद्धच्या आंदोलनात वारकर्यांनी पुढाकार घेऊन वारकरी ही एक सामाजिक शक्ती आहे असं दर्शवण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न केला असं म्हणण्यापेक्षा राजकीय शक्तिंनी वारकरी शक्तिला वापरून घेतलं असे जे आरोप झालेत त्याकडेही पहावं लागतं. 

वारकरी चळवळ ही सामाजिक चळवळ व्हावी अशी मतं मांडली गेली आणि तसे प्रयत्न झालेले नाहीत अशातला भाग नाही. टिळकांनाही वारकरी संप्रदायाला राष्ट्रकार्यासाठी वापरता येईल असं सुरुवातीला वाटत होतं, पण त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. किंबहुना वारकरी संप्रदाय हा शाहु-फुले-आंबेडकरप्रणित प्रबोधनाच्या मार्गात सहाय्यक न बनता अडसरच बनून बसल्याचं आजवरचा इतिहास पाहता लक्षात येतं. अंधश्रद्धा निर्मुलनाच्या कायद्याला वारक-यांनीच केलेला विरोध हेही एक उदाहरण आहे. विठ्ठलाच्या नित्यपुजेत विषमतेचे वैदिक तत्वज्ञान सर्वप्रथम मांडना-या पुरुषसुक्ताचे पठण होत असते. खरे तर वेदांचा, वैदिक धर्माचा श्री विठ्ठलाशी काहीएक संबंध नाही. हे विद्वानांनी वेळोवेळी पुराव्यानिशी सिद्ध केले आहे. या पुरुषसुक्त पठनाला भारत पाटनकर आणि मी जाहीर विरोध केला असला तरी त्याला विरोधच झाला. असे का? पण एकीकडे विठ्ठलाला समतेचा, दीन-दुबळ्यांचा देव म्हनायचे आणि त्याच्यावरच वैदिक विषमतेच्या तत्वज्ञानाची पेरणी करायची आणि ते मान्यही करायचे हा प्रकार आज आधुनिक झालेल्या वारक-यांनी करावा हे अनाकलनीय आहे. 

"संतांपेक्षा मनू श्रेष्ठ" अशी वल्गना वारीच्घ्या प्रसंगीच संभाजी भिडेंनी केली. महाराष्ट्रातील सुज्ञ जनतेने त्याविरुद्ध आवाज उठवला असला तरी वारकरी मात्र तेथे शांत राहिले. समता नकोच आहे की काय? की वारीचे पुर्ण वैदिक्वीकरण करण्याचा कट शिजतो आहे आणि भावभक्तीच्या कोषात दंगलेल्या सामान्य वारक-यांना त्यात पद्धतशीर अडकावले जाते आहे? विठ्ठलाचे वैदिकीकरण हाच मुळात अधर्म आहे, धर्मबाह्य आहे हे स्वत:ला धार्मिक समजणा-या वारक-यांच्या लक्षात येवू नये काय? म्हणजे समताही नाही आणि स्वधर्मही नाही...(वैदिक धर्म वेगळा आभ्णि स्वतंत्र आहे!) हे या हिंदू वारक-यांकडुनच घडावे हे दुर्दैव नाही काय?

वारकरी संप्रदायाचं गेल्या काही शतकांत सावकाश वैदिकीकरण होत गेलं...आता त्याची गती वाढली आहे. उच्चनीचतेचे संदर्भ तंतोतंत पाळणं, इतिहासाला भक्तिच्या नावाखाली गाडून टाकत नवेच संदर्भ देत जाणं हा धंदा महंतांनी सुरू केला आणि तो त्यांच्या अनुयायांनी पाळला. याचा फायदा राजकीय लोक न घेत तरच नवल होतं. आजकाल संघशक्तिच्या आहारी वारकरी संप्रदाय जात आहे असं जे अधून-मधून उद्गार का उठतात ही बाबही विचारणीय आहे.

यामागील मतितार्थ नीट समजावून घ्यायला हवा. लोक एकत्र येतात त्याची झुंड बनते. झुंडीचं कोणतंही तत्त्वज्ञान नसतं. त्यात एकात्मता नसते. परंपरेचं ओझं आणि व्यक्तिगत भावनिकता यातून वारी होते पण त्यात सामाजिक भान नसतं. वारी वर्षातून दोनदा होत असली तरी सप्त्यांच्या रूपाने ती अष्टौप्रहर महाराष्ट्रभूमीवर अस्तित्वात असते. या सप्त्यांचे प्रायोजक स्थानिक राजकारणी आणि गांवगुंड असतात हा योगायोग नसतो. किर्तनकार आज सर्व समाजातून आहेत, पण त्यांना त्याच्याशी घेणंदेणं नसतं. आपापल्या समाजातील किर्तनकार बोलवायचा प्रघात आहे. याला जर कोणी समतेची चळवळ म्हणजे वारकरी संप्रदाय असं म्हणत असतील तर ते मूर्खांच्या नंदनवनात वावरत आहेत असंच म्हणायला पाहिजे. किर्तनकारी हा आजचा क्लासवाल्यांसारखाच मोठा धंदा बनला आहे. गाडगेबाबा, तुकडोजी महाराज कधीच अस्तंगत झालेले आहेत.

महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून एक विचित्र प्रथा पडली आणि ती म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पहिली महापूजा. भारत देश हा धर्म-निरपेक्ष आहे अशी आपली समजूत आहे. सत्ताधार्यांनी आपापला धर्म व्यक्तिगत पातळीवर पाळायला कोणाचीही हरकत असण्याचं कारण नाही. मात्र शासकीय इतमामात पहिली महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत असेल तर पुढचा प्रश्न अपरिहार्यपणे असा उपस्थित होतो की आपण धर्मनिरपेक्ष राज्यात राहतो काय? महाराष्ट्र धर्मसापेक्ष राज्य कधीपासून झालं? घटनेची या कृत्याला मान्यता आहे काय? पुढची बाब म्हणजे मुख्यमंत्र्यांची आजवरची महापूजेनंतरची विधानं पाहिली तर ती अशीच असतात… ‘पाऊसपाणी चांगला होऊ दे, असं साकडं विठ्ठलाला घातलं…’ आता हेच मुख्यमंत्री (कोणत्याही पक्षाचे असोत) अंधश्रद्धेच्या विरोधातही बोलणार, विधेयकं आणणार आणि पुरेपूर अंधश्रद्धाळू विधानंही करणार. महाराष्ट्रभू टाळ्या वाजवणार. वारकर्यांच्या अंतःकरणात श्रद्धेचं तेज उमलणार…

वारी हा भक्तिचा व्यवहार आहे, उपचार आहे की भक्तिचा व्यभिचार आहे यावर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. मी होणारी गर्दी, त्यातून निर्माण होऊ शकणार्या (आणि झालेल्या) समस्या, अस्वच्छता, वारकर्यांच्या पंथोपपंथांचे आपापसातील मानपान याबद्दल लिहित नाही. वारकरी संप्रदाय आणि वारी केवढी भरकटली आहे हे आपल्या लक्षात आलं तरी पुरेसं आहे. या संप्रदायात परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता असतानाही वारीला राजकीय हालचालींचं आणि वैदिक सांस्कृतिक ढवळाढवळीचं प्यादं बनू दिलं आणि शेवटी नामदेव महाराज ते तुकोबारायांची समतेची जी संकल्पना होती तिला विकसित तर केलं नाहीच पण विषमतेच्या जंजाळात तिला कसं ढकलून दिलं आहे ही खरी चिंतेची बाब आहे.

वारक-यांनी अधिक आधुनिक होत वारीचे स्वरुप बदलायला तर हवेच पण श्री विठ्ठलाला वैदिक दंतकथांच्या जंजाळातून डोळसपणे सोडवत मुळच्या ख-या समतेचा उद्घोष करत तो आचरणातही आणला पाहिजे. महाराष्ट्राच्या सांस्कृतीक वैभवात नवी भर घालण्याचे नितांत गरजेचे काम वारकरी संप्रदाय करु शकतो. पण परंपरेच्या नांवाखाली जी परंपरा नव्हतीच तिचीच पताका खांद्यावरुन मिरवत राहिले तर वारीला अवकळा येईल. इतिहासात वारीने अनेक परिवर्तने पचवली. आघात झेलले पण वारी पुन्हा पुन्हा उभी राहिली. आता वैदिक वर्चस्वाचा जो आघात वारीवर होतो आहे त्यालाही तोंड देत सामाजिक समतेच्या महाकाशाखाली श्री विठठलाला आणने आवश्यक झाले आहे. तेच वारीचे आधुनिक आणि मानवतावादी होणे असेल. विचारी किर्तनकारांनी, वारक-यांनी आणि फडक-यांनीही यावर आत्मचिंतन करावे आणि क्रांतीच्या नव्या पर्वाची सुरुवात करावी ही अपेक्षा आहे.

श्रद्धा-भक्ती यांना आक्षेप असू शकत नाही. असूही नये. पण तिची फळं सामाजिक आहेत की असामाजिक याचा ताळेबंद मात्र मांडावा लागतो. ‘आहे म्हणून आहे वारी’ यात कोणी सांस्कृतिक उत्सव शोधू नये. सांस्कृतिक विकसनाची तर क्षमता दिसलेली नाही याची मात्र खंत असलीच पाहिजे. 

- संजय सोनवणी
(daily janshakti)

1 comment:

  1. संजय सोनवणी सर ,
    परवा पंढरपूरच्या महापूजेत दिसत होते की पांडुरंग ब्राह्मणी जानवे घालून उभा आहे !
    आपण खूप काही लिहीत असता , पण आपण यावर निषेध का नाही व्यक्त केला ?तसेच वारी बद्दल पूर्वापार शिवाजी ,पेशवे आणि त्याहीपूर्वी कोणी सरकारी मदत देत असल्यास त्याची माहिती कोणीच कशी देत नाही ?परंपरांबद्दल बोलत असताना ही माहिती सर्व सामान्यांना माहीत असणे महत्वाचे ठरेल .आज वारकरी आणि समाज यांच्यात अनेक वेळा धक्कादायक माहिती समजते अनेक वेळा वारकरी मिळालेल्या भेटवस्तू भिरकावून दितात ते अगदी ओंगळ दिसते
    अनेक वारकरी केळी ,आणि इतर जिन्नस भक्तांकडून घेतात (विशेषतः गुजराथी लोक )असा वाटप जागोजागी करत असतात - चहा पाजणे हाही कार्यक्रम लोकप्रिय होतो आहे
    काही दिवसांनी गणेश उत्सवा सारखे प्रकार वारीत शिरायला वेळ लागणार नाही असे दिसते . त्यासाठी वारकरी संप्रदायांच्या मुख्य नेत्यांना खिशात टाकायला जाहिरातदार एका पायावर तयार आहेत !!!अजून १०-२० वर्षांनी गणेश उत्सवा सारखे डिस्को लीगत घाटातून जाताना , आणि ढोल ताशे संगतीला येऊ लागले तर ?

    ReplyDelete

शेरशहा सुरी: एक कुशल प्रशासक

  शेरशहा सुरीने हुमायूनचा पराभव केला आणि त्याला भारताबाहेर हाकलले. दिल्लीत आता कोणी शासक उरला नसल्याने शेरशहाने स्वत:ला दिल्लीचा सम्राट घोषि...