Wednesday, July 25, 2018

कुंभार समाजाचा इतिहास : मृत्तिका-शिल्पे ते शब्दशिल्पे


Image result for pottery indus valley civilization

पाषाणांतुन जी संस्कृती उगवली तिला अश्मयुग असे म्हटले जाते. दगडाची हत्यारे, तासण्या, टोचण्या ते रंगीबेरंगी दगड-गारगोट्यांचे अलंकार या काळात बनवले जात होते. या कालात माणूस शिकारी व पशुपालक अवस्थेत होता. सभोवतालच्या उपलब्ध नैसर्गिक संसाधनांना कल्पकतेने आणि कष्टाने जीवनोपयोगी बनवण्याची कला ही मानवी बुद्धीची एक झेपच होती. पण याच कालात माणूस केवळ पत्थर नव्हे तर मातीचाही कल्पकतेने उपयोग करायला शिकला. त्या कलेलाच आपण कुंभारकाम म्हणतो. आज मानवाचा पुरातन इतिहास कळण्याची दोनच साधने आहेत. दगडी हत्यारे व वस्तु तसेच उत्खननांत मिळणारी खापरे. भारतात या कलेची सुरुवात तीस हजार वर्षांपुर्वी झाली. सिंधुपुर्व कालापासुनचे कुंभारकामाचे नमुने आपलयाला मिळून येतात. त्या खापरांवरुन त्या कालातील पर्यावरण ते पीके याचीही माहिती मिळते. कुंभारकामाचा प्रवास हाताने घडवलेली मडकी व वस्तुंपासुन सुरुवात होत चाकाचा आणि आव्यांचा कसा कल्पकतेने आणि विज्ञानदृष्टीने केला गेला याचा सलग आलेख आपल्याला मिळतो. किंबहुना एके काळी या उद्योगाने भारताच्या आर्थिक समृद्धीत प्रचंड भर घातली होती हे आपल्याला जातककथ ते कौटिल्याच्या अर्थशास्त्रातुन समजते. म्हणजे जेंव्हा सिंधु संस्कृतीही निर्माण झाली नव्हती आणि वेदही लिहिले गेले नव्हते तेंव्हापासुन अश्म संस्कृतीसोबतच ही मृत्तिका संस्कृती अस्तित्वात होती. मानवी जीवन सुखमय करण्यात या संस्कृतीने मोठा वाटा उचलला. आता नवनवीन शोधांनी पर्याय दिले असले तरी हा उद्योग अत्यंत महत्वाचा आहे. या व्यवसायाशी निगडित असलेल्या समाजाला आज आपण कुंभार म्हणतो. हे निर्माणकर्ते. देशाच्या आर्थिक उत्थानात मोठा वाटा उचलणारे. विविध प्रकारच्या कलात्मक कुंभांतून त्या त्य्या कालच्या सौंदर्य दृष्टीचे लोक. मातीपासुन तिला तयार करत, कौशल्याने घडवत आव्यांत विशिष्टच प्रकारची धग देत हव्या त्या रंगाची मृद्भांडी बनवणारे हे आद्य वैज्ञानिक लोक. आज कुंभार समाज आपले मानवी सम्स्कृतीच्या उत्थानातील स्थान विसरला असला तरी पुरातत्व खाते विसरलेले नाही. याच समाजात संत गोरोबा कुंभार झाले. ऐहिक संस्कृतीबरोबरच आध्यात्मिक संस्कृतीचाही त्यांनी जागर केला. कुंभार कामातील विविध अवस्था त्यांनी रुपकांच्या रुपाने पुढे आणल्या. ते त्या दृष्टीने महाकवी होते असेच म्हणावे लागेल.

कुंभारकामाचा शोध अपघाताने लागलेला नाही. वस्तु ठेवण्यासाठी वेली, बांबुच्या कामट्या यांचा उपयोग करुन बुरुडकाम जरी समांतर अस्तित्वात असले तरी द्रव पदार्थांचे काय करायचे हा प्रश्न होताच. आद्य मानवाने चिखल बनवुन हाताने त्यांना विविध आकार देऊन वाळवत काही प्रमाणात प्रश्न सोडवला असला तरी त्या तेवढ्या उपयुक्त नव्हत्या. त्या वस्तु भाजल्याने अधिक टनक व टिकाऊ होतात हे लक्षात आले असले तरी सर्व प्रकारची माती त्यासाठी उपयुक्त नसते तर त्यावर प्रक्रिया करणे आवस्घ्यक असते असे काही बुद्धीवंतांच्या लक्षात आले. यातुनच माती बनवण्याचे प्रक्रिया-विज्ञान विकसित केले गेले. उघड्या जागेत त्यांना हवे तसे भाजता येत नाही, हवी तेवढी उष्णता निर्माण करता येत नाही हे लक्षात आल्यावर आव्यांचा अत्यंत महत्वपुर्ण शोध लावण्यात आला. खरे तर या शोधाला थर्मोडायनामिक्समधील (उष्मागतीशास्त्र) पहिला शोध म्हणता येईल. याच शोधातुन पुढे धातु गाळणा-या भट्ट्यांचा शोध लागला हे लक्षात घेतले गेले पाहिजे. चाकाचा शोध लागला असला तरी त्याचाच उपयोग वेगाने हव्या त्या आकाराच्या वस्तु बनवता येतात हाही त्याच संशोधनातील अत्यंत महत्वाचा टप्पा.
Image result for pottery kilns Inamgaon excavation
कुंभार कामाचे महत्व आता आपल्या लक्षत येईल,. सिंधु संस्कृतीत असंख्य कलात्मक मृद्भांडी सापडलेली आहेत. महाराष्ट्रातही दहा हजार वर्षांपुर्वीचे कुंभार कामाचे अवशेष खापरांच्या रुपात पाचाड येथील गुहांत मध्याष्मयुगातील (इसपू ९०००) दगडी हत्यारे जशी मिळालीत तशीच खापरेही मिळालेली आहेत. हा आजवर हाती आलेल सर्वात जुना पुरावा. पुढे जसजशी उत्खनने होत जातील तसतसे त्याहुनही जुने पुरावे हाती येण्याची शक्यता आहेच!

म्हणजे हा महाराष्ट्र कुंभारकामात आजपासुन किमान अकरा हजार वर्षांपुर्वीपासून कुंभारकामात प्रवीण होऊ लागला होता. माणूस जसा स्थिर झाला तशी या व्यवसायाची व्याप्ती अजुन वाढत गेली व या कामात कुशल असनारे लोक या व्यवसायात शिरले. भारतात सर्वत्र या अशा पुरातन कुंभारांच्या कलेचे नमुने मिळालेले आहेत व माणसाच्या इतिहास शोधण्यातही या समाजाने हातभार लावला आहे.

सिंधु काळात या व्यवसायाची भरभराट मोठी होती. या काळात कुंभांवर नुसते नक्षीकाम नव्हे तर लोककथाही चितारुन चिरंतन केल्या गेल्या. एका हुशार कावळ्याने पाणी तळाला गेलेल्या माठात खडे टाकुन पाण्याचा स्तर कसा उंचावला आणि मग आपली तहान भागवली ही आजही लोकप्रिय असलेली कथा सिंधु संस्कृतीतील गुजरातमधील एका पुरातन स्थळावरील माठावरच चितारलेली आपल्याला पहायला मिळते. अर्थात ही कथाही तत्कालीन कुंभारांनीच निर्माण केली असनार व आपल्या प्रतिभेचे दर्शन घडवले असणार हे उघड आहे. एवढेच नव्हे तर तत्कालीन शिव-शक्तीप्रधान धर्मकल्पना, पिंपळाचे असलेले महत्व इत्यादि बाबी कुंभारांनी मृद्भांड्यांवर चित्रित केलेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला तत्काली न धर्मसंकल्पनांचाही परिचय होतो. त्या अर्थाने कुंभार हे इतिहासाचे वाहक असल्याचे आपल्या लक्षात येईल

 महाराष्ट्रात जोर्वे, इनामगांव अशा ठिकाणांवर प्राचीन आव्यांचेही अवशेष मिळालेले आहेत. विशेष म्हणजे सनपुर्व दोन हजारमधील आव्यांची रचना आणि आजही प्रचलित असलेल्या पारंपारिक आव्यांच्या रचनेत फरक मिलत नाही. त्याचाच अर्थ असा की उष्मागतीकी शास्त्रात तेंव्हाच जी उंची गाठली गेली होती ती नंतरही परंपरेने आजच्या कुंभारांनी जपली. जरी त्यांनी त्याचे शास्त्रीय नियम लिहुन ठेवले नसले तरी ते ज्ञात असल्याखेरीज हे होणे शक्य नाही हे पुरातत्वविदांनी मान्य केले आहे.

श्रेणी अथवा निगम संस्थेचा जन्म सिंधु काळातच झाला. श्रेणी संस्था म्हणजे समान व्यावसायिकांच्या आजच्या कमर्शियल चेंबर्ससारख्या संस्था. कुंभारांच्या श्रेण्या त्या काळापासुन अस्तित्वात असल्याचे संकेत आपल्याला तेथे मिळालेल्या मुद्रांवर कुंभांशी जवळीक साधणा-या चित्रांवरुन मिळतात. कुंभारांच्याही अशा देशभर श्रेण्या होत्या. श्रेण्यांना ठेवी घेण्याचे व कर्ज देण्याचे जसे अधिकार होते तसेच चलनी नाणी पाडण्याचेही अधिकार असत. भारतात दहाव्या शतकापर्यंत प्रत्येक व्यवसायाच्या अशा स्वतंत्र श्रेण्या असत. प्रसंगी राजाला कर्जही देण्याचे काम या श्रेण्या करत इतका धनाचा पूर त्यांच्याकडे वाहत असे. गुप्त सम्राटांनी श्रेण्यांचे अनेक अधिकार काढून घ्यायला सुरुवात केल्याने आणि नंतर सरंजामदारशाही युगाचा उदय झाल्याने श्रेंण्या कमजोर झाल्या. त्या श्रेण्यांचेच पुढे जात पंचायतींत रुपांतर झाले. कुंभार जातीचा उदय या कुंभार श्रेण्यांतुनच झाला.

कुंभार समाजाला पुर्वी प्राकृतात कुलाल असे नांव होते. ते तिस-या शतकानंतर संस्कृतच्या परिचयाने कुंभार असे झाले. कुंभार त्या काळातही रांजण, सुरया, गाडगी-मडकी, खापराचे तवे, मद्यपात्रे, मद्यकुंभ, मृण्मय मुर्ती, खेलणी ते फुलदान्या निर्मितीचे काम करत असत. धातुच्या वस्तु पुर्वी तशा दुर्मीळ व म्हणून महाग असल्याने मृत्तिकापात्रे हीच सामान्यांची मोलाची सोय होती. त्यामुळे या व्यवसायाला बरकत होती.

बौद्ध जातककथांतही आपल्याला या व्यावसायिक श्रेण्यांचे असंख्य संदर्भ मिळतात. या श्रेण्यांना राजदरबारी मोठा मान असे. श्रेणीच्या अनुमतीखेरीज कोणताही राजा कर किंवा व्यापार नि कोणत्याही प्रकारचे नियंत्रण लादु शकत नसत. एका अर्थाने ही व्यवसायांना स्वातंत्र्य देणारी व्यवस्था होती. नवीन करागिर घडवण्यासाठी या श्रेणी प्रशिक्षण देण्याचेही काम तर करतच पण मालाचा दर्जा ते किंमती ठरवण्याचेही काम करत. श्रेण्यांचा कारभार लोकशाही पद्धतीने चाले. श्रेणी प्रमुखास ज्येट्ठी अशी संज्ञा होती व तो निवडून आलेला असे. प्रत्येक श्रेणीचे नियम असत व ते पाळणे श्रेणी सदस्यांना बंधनकारक असे.

त्या काळात साखर, मध आणि विविध प्रकारचे तेल रांजन भरुन भरुन शेकडो गाड्यांतुन दुर दुरच्या बाजार पेठांत नेले जात. अशा शेकडो गाड्यांच्या एकेक तांड्यांचे वर्णनही आपल्याला जातककथांत मिळते. कुंभार त्या काळी किती श्रीमंत  असावेत हे सद्दलीपुत या एका कुंभाराच्या वर्णनावरुन लक्षात येते. या सद्दलीपुताचे पाचशे आवे (भट्ट्या) होते आणि तो विविध प्रकारची मृद्भांडी गंगेच्या काठच्या बंदरांवरुन ठिकठिकाणी नेत व्यापार करीत असे. कुंभारांनी व त्यांच्या श्रेण्यांनी मंदिरे, जलाशय ते विहारांना आर्थिक देणग्या दिल्याचे तर अनेक शिलालेख भारतभर उपलब्ध आहेत. सातवाहन कालातील शिलालेख त्या दृष्टीने उल्लेखनीय आहेत. हालाच्या गाथा सप्तशतीतही कुलालांचे (म्हणजे कुंभारांचे) अत्यंत आस्थामय चित्रण काही गाथांतून आलेले आहे.

सन १२६७ ते सन १३१७ हा संत गोरोबांचा काळ मानला जातो. ते महाराष्ट्रातील पुरातत्वीय वैभवाने नटलेले तेर या उस्मानाबाद जवळील गांवचे. या काळापर्यंत श्रेणी संस्था लयाला गेली होती. सतत पडनारे दुष्काळ आणि राजकीय अस्थिरतेमुळे सर्वच समाजांवर आर्थिक आरिष्ट कोसळलेले होते. जाती व्यवस्थेने कठोर रुप धारण केले होते. असे असले तरी कुंभार कामाचा व्यवसाय तग धरुनच होता याचे कारण म्हणजे मानवी जीवनातील त्याची अपरिहार्यता. धार्मिक कामाला लागणा-या पणत्यांपासुन, देवमुर्तींपासुन ते पाणी साठवण्यासाठी लागणारे माठ ते रांजन कुंभारच पुरवत होते. असे असले तरी श्रेणी काळात उत्पादित मालाच्या किंमती ठरवायचे अधिकार जवळपास नष्ट झाले होते. थोडक्यात उत्पन्नावर मर्यादा आलेल्या होत्याच. शिवाय करांतही वाढ झालेली होती. यादव साम्राज्याचीही पडझड सुरु झाली होती. एका अर्थाने हा महाराष्ट्राच्या धार्मिक, सामाजिक व राजकीय उलथापालथीचा काळ मानला जातो. याच काळात श्री विठ्ठलाच्या भोवती संतांची मांदियाळी तयार झाली व वारीचे परंपरा सुरु झाली हा योगायोग नाही. निर्गुण मातीला आकार देवुन सगुण करत मानवसेवा करणा-या कुंभारांच्या नसानसांत ते अध्यात्म होतेच. ते अध्यात्म अत्यंत उत्कटतेने गोरोबा काकांच्या अभंगांत उतरलेले दिसते.

कुंभार हा मानवी संस्कृतीला आकार देणारा पुरातन घटक. एक महत्वाचा लाभदायक व्यवसाय. पण परिस्थितीची चक्रे फिरतात. चांगल्यामागून वाईट काळ येतो. कुंभारांची नुसती कला नव्हे तर प्रक्रिया-ज्ञान व विज्ञान हजारो वर्ष अबाधित राहिले असले तरी अन्य व्यावसायिक जातींप्रमाणे याही जातीवर अवनती आली. किंबहुना त्या काळाची सुरुवात झाली तेंव्हाच नामदेव,  चोखोबा, विसोबा खेचर, नरहरी सोनार, सावता माळी ते गोरोबा हे निर्मानकर्ते व सेवा आदात्या समाजांतून मोठ्या प्रमाणात संत झाले हेही एक वास्तव आहे. परिस्थितीने त्यांना श्री विठ्ठलालाच साकडे घालायला लावले असले तरी मानवजाती आणि त्यासाठी कराव्या लागणा-या श्रमांना त्यांनी सोडले नाही. किंबहुना हा भक्तीवाद पलायनवादी नव्हता. गोरोबांच्य संदर्भातील ज्या काही कथा अहेत त्या त्यांच्या कामावरील निष्ठा व प्रेम दाखवतात. चमत्कारांची पुटे दूर केली की वास्तव दिसू लागते.

आदिम काळापासुन मातीतुन शिल्पे घडवणारा समाज समस्त मानवजातीला उपयुक्त व देशाची अर्थ व कला संस्कृती घडवत राहिला. या समाजातून अनेक तत्वज्ञ व महापुरुष घडले असल्याची शक्यता आहे. संत गोरोबांच्याच जीवन चरित्राबाबत फारशी विश्वसनीय अशी माहिती मिलत नाही तर तत्पुर्वीच्या श्रेष्ठांची कशी माहिती मिळणार. पण सर्व समाजाच्या हिताचे काम करुनही कुंभारांचे सामाजिक व आर्त्घिक स्थान घटवले गेले हे एक वास्तव जसे आहे तसेच संत गोरोबांचे स्मरण केवळ कुंभार समाजानेच करावे असा काहीतरे असामाजिक दंडक पडला आहे कि काय असे वाटावे हीही एक वस्तुस्थिती आहे. पण कुंभार नसते तर मानवजातीचाही इतिहास अज्ञात राहिला असता हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. आणि याच मृत्तिका शिल्पे घडवना-या समाजानेच भाव-भक्तीचे शब्दशिल्पे घडवनारा गोरोबा काकांसारखा महान संत दिला याचे स्मरणही ठेवले पाहिजे!

-संजय सोनवणी

2 comments:

  1. अतिशय उत्तम respectfully लेख.

    ReplyDelete
  2. छान माहिती दिली

    ReplyDelete

शेरशहा सुरी: एक कुशल प्रशासक

  शेरशहा सुरीने हुमायूनचा पराभव केला आणि त्याला भारताबाहेर हाकलले. दिल्लीत आता कोणी शासक उरला नसल्याने शेरशहाने स्वत:ला दिल्लीचा सम्राट घोषि...