Wednesday, August 1, 2018

धनगर-धनगड एकच!



"धनगर आरक्षणः वस्तुस्थिती व राजकारण" हा दहा जुलै रोजी म.टा.मद्ध्ये प्रसिद्ध झालेला डॉ. भौमिक देशमुख व रवींद्र तळपे यांचा लेख वाचला. वास्तवाचा विपर्यास करणारा हा लेख असल्याने त्याबाबत थोडक्यात स्पष्टीकरण दिले आहे. "धनगर" छापण्याऐवजी "धनगड" छापले गेल्याने मुद्रणछपाईच्या चुकीचा मुद्दा उपस्थित केला जातो आहे हे त्यांचे म्हणनेच चूक आहे. ती मुद्रण छपाईतील चूक नसून "र" चा उच्चार अनेकदा इंग्रजीत "ड" असा होत असल्याने ती झालेली भाषिक उच्चार-चूक आहे. ही चूक केंद्रीय मागासवर्ग आयोगाने दि. ३.१२.१२ रोजी उत्तर प्रदेशातील एका तक्रारीसंदर्भात मान्य केली असून "धनगड" ऐवजी "धनगर" हा शब्द वापरण्यास यावा असे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्रातही अशीच दुरुस्ती करण्यात यावी अशी धनगर समाजाची न्याय्य मागणी आहे. तसेच मिनिस्ट्री ओफ़ ट्रायबल अफेयर्सच्या २००८-९ च्या वार्षिक अहवालात महाराष्ट्रातील अनुसुचित जमातींच्या यादीत ३६ व्या क्रमांकावर इंग्रजी आवृत्तीत "Oraon and Dhangad" असे छापले असून याच अहवालाच्या हिंदी अनुवादात "ओरान, धनगर" असे छापले आहे. याचाच अर्थ आदिवासी मंत्रालयालाही धनगड (धांगड नव्हे) व धनगर एकच असल्याचे मान्य आहे. यामुळे ही छपाईतील चुक आहे असा मुलात दावाच नसून भाषिक उच्चारपद्धतील फरकामुळे झालेला हा गोंधळ आहे. उत्तर प्रदेश उच्च न्यायालयाने २००९ साली दिलेल्या निर्णयातही "धनगर/धनगड" ही जात बिहार, उत्तर प्रदेश आणि पस्चिम बंगालमद्ध्ये अनुसुचीत जातींमद्ध्ये मोडत असून मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात अनुसुचित जमातींमद्ध्ये मोडत असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. आर. व्ही रसेल सारख्या मानववंश शास्त्रज्ञानेही Tribes and Castes of Central Provinces of India (Vol.I) या ग्रंथात धनगर ही जमात आदिवासी असल्याचे सविस्तर नमूद केले आहे. २२/१२/१९८९ रोजी सुर्यकांता पाटील यांनी संसदेत धनगरांची अनुसुचित जमातींत नोंद आहे काय असा प्रश्न विचारला असता तत्कालीन केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी "महाराष्ट्रातील धनगरांचा समावेश अनुसुचित जमातींत आधीच केला असून धनगड व धनगर एकच आहेत" असे विधान केले होते. अशा रितीने धनगर व धनगड एकच असल्याचे असंख्य पुरावे देता येतील, पण विस्तारभयास्तव येथेच थांबतो.

प्रश्न असा आहे कि महाराष्ट्र शासनाने जाणीवपुर्वक धनगरांना अनुसुचित जमातीत असलेले आरक्षण न देता "भटक्या जमाती" म्हणून आरक्षण का दिले हा. धनगर ही निमभटकी, आदिम काळाप्पासून पशुपालनाचा व्यवसाय करणारी, आदिम जीवनशैली, संस्कृती व धर्मकल्पना असणारी जमात असुनही त्यंना "भटक्या जमाती" ठरवणे हेच मुळात चुकीचे होते. वारंवार धनगड/धनगर हे एकच असल्याचे केंद्रीय मागासवर्ग आयोग, केंद्रीय आदिवासी कल्याण मंत्रालय व विविध उच्च न्यायालयांनी मान्य केले असतांनाही महाराष्ट्रातील धनगरांच्या अज्ञानाचा आणि राजकीय बळ नसल्याचा गैरफायदा शासनाने घेतलेला आहे. डा. देशमुख व तळपे यांना वाटते तसे अन्य आदिवासींच्या हक्कांवर घाला घालण्याचा हा प्रयत्न नसून धनगरांचे न्याय्य हक्क प्राप्त करण्याचा आहे. उलट त्यांनीच यासाठी धनगर बांधवांना साथ दिली पाहिजे. केंद्रीय मागासवर्ग आयोगाने "धनगर/धनगड" (धांगड नव्हे) एकच असल्याचा निर्वाळा दिला असल्याने राज्य सरकार आयोगाकडे शिफारस करून महाराष्ट्रातील धनगरांना न्याय देवू शकते व तो द्यावा हीच राज्य सरकारकडून अपेक्षा आहे.

(This explanation was published in Daily Maharashtra Times, dated 10 July, 2014)

3 comments:

  1. आदिवासी जमात असण्याच्या किमान अटी कोणत्या?

    स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात राहणाऱया आदिम जमातींच्या यादीत कोणत्या जातींचा समावेश करावा यासाठी त्या जमाती आदिम (primitive) असणे ही मुख्य अट होती. 1931 च्या जनगणनमध्ये तत्कालीन जनगणना आयुक्त डॉ. जे.एच.हटन यांनी आदिम जमात म्हणून ज्या जमातींचा उल्लेख करण्यात येतो त्यांना आदिमपणाच्या खालील तीन कसोट्या लावल्या होत्या 1) अशा जमाती ज्यांचे वास्तव्य परंपरेने डोंगराळ, जंगली, दुर्गम भागात आहे. 2) अशा जमाती ज्या डोंगराळ, जंगली,दुर्गम भागात वास्तव्य करीत नाहीत परंतु ज्या बहुसंख्य समाज समुहापेक्षा वेगळ्या पद्धतीने जीवनयापन करतात. ज्यांच्या परंपरा मुख्य समाज प्रवाहातील लोकांपेक्षा वेगळ्या आहेत.जे मुख्य समाजधारेत एकजीव न होता स्वतंत्र संस्कृतीचे पालन करतात. 3) अशा जमाती ज्या कोणत्याही मान्यताप्राप्त धर्माचे परंपरेने पालन करीत नाहीत. त्यांचा स्वत:चा आदिम धर्म किंवा धार्मिक समजुती आहेत.या कसोट्याच्या आधारे 1931 च्या जनगणनेत आदिम जमात म्हणून समाविष्ट करण्यात आलेल्या लोक समूहांचा समावेश Scheduled Tribes Order 1936 मध्ये करण्यात आला व त्यांच्या उन्नतीसाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या. या यादीत आणखी काही जमातींचा समावेश करून Scheduled Tribes Order 1950 ही अनुसूचित जमातींची यादी तयार करण्यातआली. 1953 साली आंध्र प्रदेश राज्याची  व1956 साली मध्यपदेश राज्याची निर्मिती झाली. राज्य पुनर्रचना आयोगाच्या शिफारशीनुसार 1960 साली महाराष्ट्र, गुजरात व त्यानंतर पंजाब आणि हरियाणा राज्याच्या निर्मितीनंतर अनेक जातीसमुह आपला समावेश अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीमध्ये करावा, अशी मागणी करू लागले. यामुळे या प्रश्नाचा निकाल लावण्यासाठी केंद्र सरकारने 1 जून 1965 च्या आदेशान्वये बी.एन. लोकूर यांच्या अध्यक्षतेखाली एका त्रिसदस्यीय समितीची स्थापना केली.या समितीने अनेक संस्था, सामाजिक संगठना, स्वतंत्र नागरिक, संसद सदस्य, विधिमंडळ सदस्य यांच्याकडून निवेदने मागवून जवळपास 800 जातीसमुहांचे दावे तपासले. यानंतर आपला अहवाल सरकारला सादर केला.महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या संगठनेने अथवा प्रतिनिधींनी त्यांच्याजातीचा समावेश अनुसूचित जाती किंवा जमातींमध्ये व्हावा यासाठी लोकूर समितीला त्यावेळीनिवेदन सादर केलेले नाही. लोकूर समितीने एखाद्या लोकसमूहाला आदिवासी समजण्यासाठी कोणते निकष असावेत यासंदर्भात पुढीलप्रमाणे शिफारस केली आहे.`1931 ची जनगणना व 1935 चा कायदा व त्यानुसार तयार करण्यात आलेली आदिम जमातींची यादी यामध्ये मुख्यत: जमातीचे आदिमत्व यावर भर देण्यात आला आहे. 1950 चा अनुसूचित जमाती अध्यादेश व त्यात 1956 साली केलेली सुधारणा यामध्ये आदिमपणा सोबतच जमातीचे मागासलेपण विचारात घेण्यात आले आहे. ही समिती एखाद्या लोकसमूहाला आदिवासी समजण्यासाठी त्यांचे आदिमत्व, पृथगात्म संस्कृती, वास्तव्याचा भौगोलिक वेगळेपणा, प्रगत समाजामध्ये मिसळण्या विषयीचा बुजरेपणा आणि मागासलेपणा या बाबींचा प्रामुख्याने विचार करावा अशी शिफारस करते.' ज्या जमाती प्रगत समाजाच्या सतत संपर्कात येउन या समाजाची संस्कृती स्वीकृत केली आहे अशा जमातींना अनुसूचित जमातींच्या यादीत समाविष्ट करू नये अशी शिफारस लोकूर समितीने केली आहे. (पृ.क्र.7 लोकूर समिती अहवाल)लोकूर समितीने अनेक राज्यातील काही जाती व जमातींना यादीतून वगळण्याची शिफारस कारणासहित केली आहे. महाराष्ट्रात अनुसूचित जमातीच्या यादीत अनुक्रमांक 36 वर नमूद असलेल्या ओरान/ओरांव,धनगड जमातीची लोकसंख्या 1961 च्या जनगणनेत केवळ 1 इतकी आहे. यामुळे या जमातीचे अस्तित्व महाराष्ट्रात नाही. या कारणास्तव ओरान/ओरांव, धनगड जमातीला महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या यादीतून वगळण्याची शिफारस केली होती. लोकूर समितीच्या बहुतांश शिफारशी सरकारने स्वीकारल्या. त्यानुसार Scheduled castes order 1950 व Scheduled Tribes order 1950 मधून काही जाती व जमातींना वगळण्यात आले व काही जाती जमातींचा नव्याने समावेश करण्यात आला.महाराष्ट्राच्या पूर्व भागाला (तत्कालीन भंडारा,चंद्रपूर व नागपूर जिल्हा) लागून असलेल्या मध्यप्रदेश व त्यालगतच्या ओरिसा राज्यातओरान/ओरांव, धनगड जमातींची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. ओरान/ओरांव, धनगड जमातीचा मुख्य व्यवसाय सालकरी किंवा सालगडी म्हणून शेतावर राबणे हा असल्यामुळे या राज्यातून या जमातीचे लोक लगतच्या महाराष्ट्र राज्यात स्थलांतरित होऊन महाराष्ट्राच्या सदर सीमा भागात स्थायिक होत असतात. हे लक्षात घेऊन महाराष्ट्राच्या यादीतून ओरान/ओरांव, धनगड या जमातीला वगळण्यात येऊ नये, अशी मागणी काही खासदारांनी संसदेत केली. यामुळे या जमातीला महाराष्ट्राच्या अनुसूचित जमातीच्या यादीतून त्यावेळी वगळण्यात आले नाही.

    (Sunil khobragade)

    ReplyDelete
  2. धनगर जात ओरान/ओरांव, धनगड जमातीचा भाग आहे काय?

    धनगर जात ओरान/ओरांव,धनगड जमातीचेच दुसरे नाव आहे किंवा धनगड आणि धनगर यात फक्त उच्चाराचाच फरक आहे या धनगरांच्या दाव्याला कोणताही ऐतिहासिक, संशोधनात्मक अथवा भौगोलिक परिस्थितीजन्य आधार नाही.धनगर जातीचा हा दावा म्हणजे अनुसूचित जातीच्या सवलती मिळविण्यासाठी ओढून-ताणून केलेली शुद्ध बनवाबनवी आहे. धनगर जात परंपरेने मेंढपाळ व्यवसाय करणारी जात आहे.भारतामध्ये मेंढपाळाचा व्यवसाय करणाऱया जातींचे प्रादेशिकत्वानुसार तीन भागात वर्गीकरण केलेले आहे. 1) उत्तर भारतातील मेंढपाळ जाती (गडरीया, पाल, नाबर, कंचन, गैरी, गैरा,गायरा) यांच्या एकूण 84 उपजाती आहेत 2) तत्कालीन मुंबई प्रांत, वऱहाड व पश्चिम भारतातील मेंढपाळ जाती (अहिर, धनगर, धेनुगर, गावडा इत्यादी) 3) द्रविडी किंवा दक्षिण भारतातील मेंढपाळ जाती (कुरुमवार, कुरमार, कुरुबा, कुरुंबा) यापैकी महाराष्ट्रातील मेंढपाळ जातीना धनगर या नावाने संबोधले जाते. महाराष्ट्रातील धनगरांचे त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणानुसार 1) अस्सल धनगर (पुणे व पश्चिम महाराष्ट्र ) 2) मराठे धनगर (पश्चिम महाराष्ट्र, खानदेश,मराठवाडा व पश्चिम विदर्भाचा पदेश) 3) डांगे धनगर (गुजरातमधील डांग विभाग व सह्याद्रीघाट आणि कोकण विभाग) असे मुख्य पोटभेद आहेत. व्यवसायाच्या आधारे त्यांच्या साडेबारा पोटजाती अशा ः- हाटकर, शेगर, सनगर, थिलारी/खिलारी, अहिर, बारगे/बारगीर/बांडे धनगर,गाडगे, कनगर, खुटेकर, लाड धनगर, मेंढे धनगर, उतेगर, खाटिक (अर्धी जात). (The Tribes and Castes of Bombay, Volume 1 By Reginald E. Enthoven he.314-315 ) या साडेबारा जातींमध्ये कोठेही ओरान /ओरांव /धांगड यानावाचा उल्लेख नाही.

    अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट असलेल्या ओरान/ओरांव/धांगड जमातीच्या चालीरीती, संस्कृती, बोलीभाषा व महाराष्ट्रातील धनगर जातीची चालीरीती, संस्कृती, बोलीभाषा यामध्ये कोणतेही साम्य नाही.ओरान/ओरांव /धांगड जमात इंडो-द्रविडीयन समूहातील जमात आहे.या समूहातील मुंडा,संथाल,हो,खारीया या आदिवासी जमातींशी ओरान /ओरांव /धांगड या जमातीचे साधर्म्य आहे.या जमातीचे मूळ वसतीस्थान छोटा नागपूरचे पठार व दंडकारण्याचा भाग होय.या जमातीची `कुरुख'नावाची स्वतंत्र बोलीभाषा आहे. ओरान /ओरांव /धांगड या जमातीचा स्वतंत्र धर्म आहे. ज्याला ते सरण धर्म म्हणतात.याचे सर्वोच्च दैवत धरमेश (महादेव) आहे. तर सर्वोच्च देवता छालापाचोदेवी आहे.ओरान /ओरांव /धांगड जमात पांढरा रंग पवित्र मानते. ते साल वृक्षाची पूजा करतात.यांच्या पुजास्थानाला सरण स्थळ किंवा जाहेर या नावाने ओळखले जाते.यांच्या युवागृहाला`धुम्कुडिया/धुमकुटीया/धांगडिया' असे नाव आहे ( Tribes and castes of central India,volume 4  पृष्ठ. 299-321)यांच्या सर्व धार्मिक समारंभ व पूजाविधीमध्ये पांढऱया रंगाची फुले, पांढऱया बोकडाचा बळी देणे, पांढऱया वस्तूचा पसाद वाटणे अशा पथा पाळल्या जातात. या जमातीचा पुजारी पांढरी वस्त्र धारण करतो.त्यास मुंडा असे नाव आहे.या जमातीचा मुख्य व्यवसाय सालकरी किंवा सालगडी म्हणून वर्षभराच्या कराराने शेतीमध्ये राबणे,शेतमजूरी करणे हा आहे. वर्षभराच्या कराराने काम करणाऱया शेतमजुरांना रोख रक्कमेऐवजी `धान' (कोंडा न काढलेला भात) मजुरी म्हणून देण्याची पथा आहे.त्यामुळे धानासाठी काम करणारे ते `धांगड' या अर्थाने या जमातीला`धानगड/धांगड' असे नाव देण्यात आले आहे. (Tribes & Castes Of North Western India - W.Crooke - पृष्ठ. 263-264) ओरान/ओरांव/धनगर/धांगड जमात मध्यपदेश, छत्तीसगड, झारखंड, महाराष्ट्र,पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये समाविष्ट आहे. या राज्यांमध्ये असलेली जमात मुलत: छोटा नागपूरच्या पठारावरुन इतर राज्यांमध्ये स्थलांतरीत झाली असल्याचा निष्कर्ष अनेक मानववंश शास्त्रज्ञांनी तसेच आदिम जाती अभ्यासकांनी संशोधनातून काढला आहे.

    (Sunil khobragade)

    ReplyDelete
  3. इतर राज्यातील धनगर/धनगड व महाराष्ट्रातील धनगर यांच्यातील फरक

    धनगर अथवा धनगड ही जात अनेक राज्यांमध्ये अनुसूचित जातींच्या यादीमध्ये समाविष्ट आहे. बिहार,झारखंड, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये ही जात डोम जातीच्या समानार्थी जात समजली जाते.डोम जातीचा मुख्य व्यवसाय मृत व्यक्तीला जाळण्यासाठी लागणारी लाकडे फोडणे व स्मशानातील व्यवस्था पाहणे हा आहे.या राज्यांमध्ये असलेली धनगड जात मृताचा सांगावा सांगणे, शेताची राखण करणे,शेतामध्ये सालगडी म्हणून राबणे हा मुख्य व्यवसाय करते. उत्तर पदेश तसेच उत्तराखंड राज्यात धनगर जमात अनुसूचित जातींमध्ये समाविष्ट आहे.या राज्यातील मेंढपाळाचा व्यवसाय करणाऱया गडरीया जातीच्या लोकांनी धनगर ही गडरीया/पाल जातीची पोटजात आहे, असा दावा करुन अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली होती.धनगर या इंग्रजीतील शब्दाचा हिंदी अनुवाद धनगड असा करण्यात येत असल्यामुळे धनगर आणि धनगड हे एकच जातीसमुह आहेत.यासाठी जातीचा उल्लेख धनगड म्हणून असला तरी त्यांना अनुसूचित जातीचे पमाणपत्र देण्यात यावे,अशीही मागणी गडरीया/पाल जातींनी केला होता. यासंदर्भात अखिल भारतीय धनगर समाज महासंघाने अल्हाबाद उच्च न्यायालयात रिट याचिका क. 40462/2009 दाखल केली होती.या याचिकेचा निकाल 14 मार्च, 2012 रोजी लागला. या निकालात अनुसूचित जातीत समाविष्ट असलेले धनगर व महाराष्ट्रातील धनगर हे एकमेकांपासून भिन्न जातीसमुह असल्याचे स्पष्ट केले आहे. बिहार, झारखंड, प.बंगाल, उत्तर पदेश, उत्तराखंड या राज्यांमध्ये वास्तव्य करणाऱया धनगर जातींना अस्पृश्य समजण्यात येते. या राज्यातील धनगर जातींचा मुख्य व्यवसाय शेळी-मेंढी पालन करणे हा नाही. महाराष्ट्रातील धनगर जातीला अस्पृश्य समजण्यात येत नाही.हे पहाता इतर राज्यातील अनुसूचित जातींमध्ये समाविष्ट असलेले धनगर व महाराष्ट्रातील धनगर या जाती एकमेकांपासून पूर्णत: वेगळ्या असल्याचे सिद्ध होते.

    (Sunil khobragade)

    ReplyDelete

जनानखान्यांचे अद्भुत विश्व!

  जनानखाना, ज्याला अंत:पूर, राणीवसा किंवा हरम असेही म्हटले जाते त्याबाबत समाजामध्ये अनेक समजुती प्रचलित आहेत. शत्रूच्या जिंकलेल्या स्त्रीय...