आजवर संजय सोनवणी यांच्या गुणांचेच मी वर्णन केल्याचे आपल्या स्मरणात – परिचयाचे आहे. परंतु आज मी सोनवणींच्या अवगुणांचे येथे मी वर्णन करणार आहे.
सोनवणी हा एक नंबरचा पूर्वग्रहदुषित, उपद्व्यापी मनुष्य आहे. संपूर्ण समाज अज्ञानी असून ज्ञान म्हणजे काय हे फक्त आपल्यालाच ठाऊक असल्याच्या थाटात तो सर्वांनाच उपदेश करण्याच्या उपद्व्यापात व्यस्त असतो.
मी म्हणतो सोनवणी महाशय, तुम्ही तुमच्यापुरतं बघा कि. जर तुम्हांला माहिती आहे सत्य काय, मिथ्या काय तर ते आपल्यापुरतं ठेवा. जगाला कशाला ओरडून सांगता ? आपल्या पूर्वसुरींनी आजवर चोखळलेली वाट सोडून अनवट वाटेने का फिरता ?
स्वतःच स्वतःचे उद्धारक होण्याचा कानमंत्र देऊन तुम्ही सर्व विचारवंत, राजकारणी, स्वयंघोषित महापुरुषांची दुकानं का बंद करताय ? दुसऱ्याच्या पोटावर पाय देण्याची आपली संस्कृती जरी असली तरी तिचे इतके कठोर पालन करण्याची काही आवश्यकता आहे का ?
विविध जातींच्या उठठेवीची या माणसाला अतिशय वाईट सवय आहे. प्रत्येक जातीचा वस्तुनिष्ठ पूर्वेतिहास शोधून जातीव्यवस्थेचा उदय, रचना, स्थिती इ. चे स्पष्टीकरण करण्याची याला भयंकर खोड आहे. अहो मिष्टर सोनवणी, आमच्या जाती कशा निर्माण झाल्या हे पूर्वी पुराण – स्मृत्यांनी सांगितलंय. तसंच गेला बाजार आमच्या विचारवंत महापुरुषांनीही त्याचे समाधानकारक उत्तर दिलंय व जे आम्हांला पटलंय. तर मग तुम्ही हा उपद्व्याप का करता ? आमच्या जातीला इतरांनी नेहमी दुर्लक्षित, उपेक्षित, वंचित ठेवलं असा आमचा प्रामाणिक समज असून त्यांस तुम्ही छेद देणारी प्रमेयं का मांडता ? काय मिळतं तुम्हांला त्यातून ?
चार – दोन प्रेमप्रकरणं, खून, भूत – प्रेत, राजकीय थरार इ. विषयांवर दोनचारशे पाणी कादंबऱ्या लिहून प्रथितयश, प्रसिद्ध कादंबरीकार बनायच्या ऐवजी सूर – बेसूर – असुर अशा फालतू शाब्दिक कोलांटउड्यांची ‘ असुरवेद ‘ तुम्ही का लिहिली ? असुर व वेद यांचा परस्पर तरी संबंध आहे का ? जरी तो असला तरी कादंबरीचा नायक कां ..ब ..ळे.. ? का बळे ? सॉरी .. का बरे ? दुसरा कोणी म्हणजे शिंदे, पवार, माने किंवा गेला बाजार जोशी, भिडे सापडला नाही ? निदान झुंजार, चतुर अशी तरी नावं द्यायची.
बरं ते देखील झालं. त्यात ‘ आणि पानिपत ‘ नावाची भानगड का जन्माला घातलीत ? सरळसोट सदाशिवराव उत्तरेत गेला व मेला किंवा पळाला हे लिहायचं सोडून एका महाराने त्याला वाचवायला त्याची शेंडी कापली हे लिहून तुम्ही काय मिळवलंत ? त्यातही आणखी कथानकाचे केंद्रबिंदू कोण, तर महार ! या महारांचा व पेशवाईचा काही संबंध आहे का ? यांचा इतिहास गौतमबुद्धापासून चालू होत अशोकपर्यंत येतो व तेथून डायरेक्ट बाबासाहेब आंबेडकर ! अधलं – मधलं काही नाही.
यावरही वरताण म्हणजे महारांचा इतिहास लिहून ‘ महारक्ख ‘ चे महार अशी व्युत्पत्ती निर्माण केलीत. काय हे ? अहो, जिथे बाबासाहेबांनी महारांसहित शुद्र – अस्पृश्यांचा इतिहास लिहिला तिथे फक्त महारांवरच लिहिणारे तुम्ही कोण ? मुळात तुमची जातच कोणती ?
ज्या जातीचा माणूस, त्याच जातीचा त्याने इतिहास, ललित लेखनात उपयोग करायचा हि आमची पूर्वप्राचीन परंपरा मोडण्याचा अधिकार तुम्हांला कोणी दिला ?
जैन, बौद्ध, शीख इ. च्या जोडीने वैदिक नावाचा एक पंथ प्राचीन काळी प्रचलित होता व तो नंतर इतरांप्रमाणेच धर्म बनला याचा शोध घेण्याचा सल्ला तुम्हांला कोणी दिला ? जे भेद आम्हांला माहिती आहेत पण मान्य न करता त्यावरच आमचा धंदा, चरितार्थ चालवायचा आहे ते उघड करण्याची गरजच काय ?
त्याहीपलीकडे ज्ञानेश्वर एक कि दोन ? दादोजी कोंडदेव नेमके किती ? सातवाहन – शातवाहन – शालिवाहन यातला फरक काय, पंढरपूरचा विठोबा नेमका कोण ? काय गरज काय आहे या सर्वांची ?
चार सरळसध्या कथा – कादंबऱ्या खरडायच्या, चार - दोन गाण्यांचे अल्बम काढायचे, एखाद – दुसरा चित्रपट बनवून उद्योग – धंद्याचा साईड बिझनेस करायचा सोडून या बाकीच्या लफड्यांत पडायची गरजच काय ? मिस्टर सोनवणी, ज्या प्रबोधनकाराने महाराष्ट्राचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला त्याचेच विचार त्याच्या वंशजांनी कसे खुंटीला टांगून ठेवले हे काय तुम्हांला माहिती नाही ? तरीही हा व्याप करत आहात. कोणासाठी ? कशासाठी ?
खेडेकर & कंपनीच्या विरोधात लिहिलं कि ब्राम्हणवादी.
पुरंदरे प्रकरणी पुरंदरेचा बचाव केला कि संघाचे हस्तक. संघाचं पाकीट आलं कि काय अशी विचारणा.
वाघ्या कुत्र्याचे स्मारक हटवण्यास विरोध केला कि मराठा द्वेष्टा.
वैदिक – अवैदिक तसेच पुरुषसूक्तातील क्षत्रिय ऐवजी राजन्य उल्लेख आणि शुद्रविषयक उल्लेखाची चिकित्सा केली कि ब्राम्हणद्वेष्टा. ब्रिगेडचा हस्तक.
धनगर तसेच आदिवासी व भटक्या – विमुक्तांचे प्रश्न हाती घेतले कि धनगर समाजाचा असल्याने धनगरांसाठीच कार्य करणारा मनुष्य म्हणून मिरवण्यासाठी.
कोणत्याही मुद्द्यावर निर्वाणीचे शस्त्र म्हणून उपोषण केलं कि, लगेच त्याची टिंगल टवाळकी. इथे आम्हांला सकाळचा नाष्टा चुकला तर बेचैनी होते. सबंध दिवसाचं तर सोडून द्या.
तुमच्या कित्येक पुस्तकांवर अघोषित बंदी.
या आणि अशा इतर अनेक टोमण्यांनी, प्रसंगी शिवीगाळ – जीवे मारण्याच्या धमकीपलीकडे काय साध्य झालंय ?
समाजाला आत्मभान आलंय का ? वैचारिक पात्रता, कुवत त्याच्या अंगी आहे का ? जात – धर्म अथवा प्रचलित राजकारण सोडून इतर विषयांवर केलेल्या लेखनाची, कार्याची कोणी दखल घेतंय का ? उत्तरं नकारार्थी आहेत. आशेचा किरण तर मला अजिबात दिसत नाही. तरीही तू कार्यरत आहेस. ठीक. तसाच कार्य करत राहा. आम्ही मात्र असेच तुझ्या अवगुणांचे वारंवार, न चुकता तिन्हीत्रिकाळ वर्णन करत राहू !
-
-
No comments:
Post a Comment