Wednesday, August 8, 2018

अखेरचा टायटन...करुणानिधी


Image result for karunanidhi



एम. करुणानिधींच्या निधनाने अनार्य चळवळीचा शेवटचे शिखर ढासळले असे म्हटले तर वावगे होणार नाही. पेरियारांच्या आर्यभाषाविरोधी चळवळीतुन उदयाला आलेले हे "कलैगनर" व्यक्तित्व द्रविड अस्मितेच्या उद्गार बनले. लेखक, कवी, पटकथाकार असे सर्जनशील व्यक्तित्व जपत ते तमिळ राजकारणाचेही अध्वर्यु बनले. या सर्व काळात निरिश्वरवादी राहुनही त्यांनी जनभावनेवर जे राज्य केले त्याला तोड नाही. खरे तर संपुर्ण भारतीय राजकारणात एवढा प्रदिर्घ काळ आपला ठसा कोणी उमटवु शकले नाही. आधुनिक तमिळनाडुचीच नव्हे तर द्रविडभाषक राज्यांची मानसिकता घडवणारे ते अनोखे शिल्पकार होते. त्यामुळे ते अनेकदा वादग्रस्तही राहिले. ज्याविरुद्ध त्यांनी सातत्याने लढा दिला त्या आर्यवादाची नव्याने वैदिक वर्चस्वतावादी मांडणी होत असल्याच्या काळातच त्यांचे जाणे धक्का देणारे व चटकाही लावणारे आहे.

३ जुन १९२४ साली निम्न समाजातील परिवारात जन्मलेले करुणानिधी आसपासची सामाजिक विषमता, जातीभेद आणि वैदिक धार्मिक वर्चस्वाच्या वातावरणातुनच आपल्या सामाजिक जाणीवा विस्तारत राहिले. त्यांच्या वयाच्या चवदाव्या वर्षीच ते पेरियारांच्या सामाजिक आणि भाषिक आंदोलनात उतरले. १९३७ साली गैर-हिंदी भाषिक राज्यांतही शिक्षणात हिंदी सक्तीची करण्यात आली. अहिंदी भाषक राज्यांतुनही विरोध उसळला असला तरी पेरियारांनी या लढ्याचे समर्थपणे नेतृत्व केले. करुणानिधींनी या आंदोलनाच्या काळातच विद्यार्थी संघटनेची स्थापना केली. द्रविड राजकारणातील ही पहिली विद्यार्थी संघटना मानली जाते.

त्या काळात आर्य आक्रमणवाद लोकप्रियतेच्या शिखरावर होता. आक्रमक आर्यांनी द्रविडांना दक्षीणेत हुसकावले असा हा सिद्धांत सांगत होता. उत्तरेतील आर्यभाषिक दाक्षिणात्यांवर आर्य भाषा (हिंदी) लादत आहेत, म्हनजे ही द्रविडांवर लादण्यात येणारी दुसरी सांस्कृतीक व भाषिक गुलामगिरी आहे ही भावना पेरियारांनी समर्थपणे व्यक्त केली आणि करुणानिधींनी या वर्चस्वतावादी धोरणाच्या लढ्याचे नायकत्व पेरियार व अण्णादुराईनंतर समर्थपणे केले. सामाजिक समता माननारे करुणानिधी भाषिक बाबतीत का भेदभाव मानतात असे अनेकदा त्यांना कुत्सितपणे म्हटलेही गेले. पण भाषा लादण्यामागील हेतु वर्चस्वतावादी असल्यामुळे विरोधकांच्या या टीकेला कोणी किंमत दिली नाही. तमिळांनी त्यांना आपल्या हृदयात एवढे स्थान दिले की ते राजकारणात आल्यानंतर एकदाही निवडणूक हरले नाहीत. पाच वेळा ते मुख्यमंत्रीही राहिले.

रामसेतुच्या संकल्पनेलाही त्यांनी कडाडून विरोध केला. हा विरोध त्यांच्या केवळ निरिश्वरवादातुन आलेला नव्हता. राम हा दक्षीण भारतावरचा आद्य आक्रमक व आर्य संस्कृती पसरवणारा आक्रमक आहे असे असंख्य द्रविड आजही मानतात. मग भले ते काव्य काल्पनिक का असेना. अशा स्थितीत सेतुसमुद्रम प्रकल्पाबाबत निर्माण झालेल्या विवादात त्यांनी रामाच्याच अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सेतु जर रामाने बांधला म्हणता तर तो कोणत्या अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकला होता असा प्रश्न विचारुन खळबळ उडवुन दिली. करुणानिधी यांचा कडवा विरोध हा या वर्चस्वतावादी व सामाजिक विषमता पसरवणा-या वैदिक वर्चस्वतावादाविरुद्ध होता. जनसामान्यांतील भेदभाव मिटावेत आणि सामाजिक समता प्रस्थापित व्हावी या पेरियार व शाहु-फुले-आंबेडकरवादी विचारधारेचे ते नुसते प्रखर प्रवक्ते नव्हते तर कृतीशिल उत्तुंग नेतृत्व होते.

राजकीय कारकीर्द बहरात असतांनाही त्यांचे लेखन चालुच होते. त्यांच्या सर्व लेखनावर द्रविड अस्मिता आणि सामाजिक समता या तत्वांचाच प्रभाव राहिला. स्वातंत्र्यानंतर जेंव्हा १९६० साली हिंदी राष्ट्रभाषा करण्याचे सुतोवाच होऊ लागले त्यावेळीस करुणानिधी सपरिवार कडवा विरोध करण्यास सज्ज झाले. या आंदोलनात हिंसाचारही झाला. करुणानिधींवर टीकेचा भडिमारही झाला. एकटे पाडण्याचेही प्रयत्न झाले. पण या योद्ध्याने कसलीही तडजोड केली नाही. नंतरही जेंव्हाही संधी मिळेल तेंव्हा ते हिंदीचा विरोध करतच राहिले. त्यांचा हिंदीला विरोध हा केवळ भाषिक नव्हता तर त्यी आक्रमकांची भाषा व संस्कृती नको या भावनेतुन होता हे लक्षात घेतले की त्यांचा विरोध अनाठायी होता असे म्हणता येणार नाही.

राजीव गांधी हत्याप्रकरणात त्यामागेही त्यांचा हात असल्याचे आरोप झाले होते. तमिळ लिबरेशन संघटनेला (लिट्टे) त्यांचा छुपा पाठिंबा आहे असे आरोप होतच होते. पण तपास यंत्रणांना करुणानिधींविरुद्ध कसलाही पुरावा मिळाला नाही. त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप झाले. आणीबाणीचे कडवे विरोधक म्हणून त्यांना मिसाखाली अटक करण्यात आली. तुरुंगात त्यांना एवढी अमानुष मारहाण झाली की त्यांचा सहकैदीच ते पाहुनच धक्का बसुन मृत झाला. अनेक आरोपांनी त्यांची कारकीर्द अनेकदा वादळी झाली असली तरी सामाजिक समतेसाठी वर्त्चस्वतावादाविरुद्धच्या युद्धाचे सैनापत्य केलेला अखेरचा महायोद्धा म्हणून ते नेहमीच स्मरणात राहतील.

No comments:

Post a Comment

शेरशहा सुरी: एक कुशल प्रशासक

  शेरशहा सुरीने हुमायूनचा पराभव केला आणि त्याला भारताबाहेर हाकलले. दिल्लीत आता कोणी शासक उरला नसल्याने शेरशहाने स्वत:ला दिल्लीचा सम्राट घोषि...