Saturday, September 22, 2018

राखीगढीचा रहस्यभेद!


 Image result for rakhigarhi dna


भारतीय संस्कृतीचा पाया वैदिक धर्मियांनी घातला हा गेली अनेक दशके प्रचारात असलेल्या संघीय विद्वानांच्या दाव्याचा पायाच जनुकीय विज्ञानाने उखडून फेकला आहेभारतीय संस्कृतीचे जनकत्व स्वत:कडे घ्यायचे तर सिंधू संस्कृतीवरच मालकी सांगणे त्यांना आवश्यक वाटत होतेत्यासाठी त्यांनी आधी घग्गर नदी  सरस्वतीच असल्याचे सिद्ध करण्याचा घाट घातलाएवढेच करुन ते थांबले नाहीत तर सिंधू संस्कृतीचे नामकरण "सिंधू-सरस्वती संस्कृतीअसे करुन टाकलेभारतात संघ-प्रवर्तीत मोदी सरकार आल्यानंतर तर पुरातत्व खात्याच्या अहवालातही सिद्ध न झालेल्या सरस्वती नदीच्या नांवे सिंधू संस्कृतीचे वर्गीकरण अधिकृत रित्या केले गेलेशासकीय पातळीवर सरस्वतीला (म्हणजेच घग्गर नदीलापुन्हा प्रवाहित करण्यासाठी खर्चीक योजना अतिउत्साहात आखल्या गेल्यासरस्वती नदीकाठी वेद रचले गेले...आणि घग्गरच्या काठावर सिंधू संस्कृतीचे हजारो अवशेष मिलाले आहेतघग्गर नदीला सरस्वती सिद्ध केले की सिंधू संस्कृती ही वैदिक संस्कृती आहे असे सिद्ध करण्यात येणार होते. त्यामुळे हा अट्टाहास केला गेला खरा पण ऋग्वैदिक व अवेस्त्याच्या पुराव्यानुसारच वैदिक सरस्वती नदी दक्षीण अफगांणिस्तानमधलीच प्राचीन हरहवैती आहे हे सिद्ध झालेले आहे याकडे वैदिकवादी विद्वानांनी दुर्लक्ष केले कारण आर्य भारतातीलच व तेच येथील संस्कृतीचे निर्माते आहेत हे छद्मविज्ञान वापरुन का होईना पण ठसवून त्यांना सांस्कृतीक व राजकीय वर्चस्वतावाद टिकवायचा होता.

राखीगढी येथे डेक्कन कॉलेजचे कुलगुरु डॉ. वसंत शिंदेंच्या नेतृत्वाखाली हरियानातील राखीगढी येथे उत्खनन सुरु झाले आणि सिंधू संस्कृतीच्या वैदिकीकरणाचा दुसरा अवैज्ञानिक अध्याय सुरु झाला. राखीगढी येथे साडेचार हजार वर्ष जुने मानवी सांगाडे आढळून आले. त्यांच्या अस्थींमधून जनुके मिळवुन हे लोक कोण होतेकसे दिसत होतेत्यांची आनुवांशिकी काय होती हे शोधण्याचे प्रयत्न सुरु झाले. पुरातत्व खात्याने आपले निष्कर्ष नि:पक्षपातीपणे द्यायचे असतात. त्यात कोणतीही स्वप्रिय राजकीय अथवा सांस्कृतीक पुर्वग्रहांना स्थान द्यायचे नसते. पण डॉ. वसंत शिंदेंच्या ते लक्षात आले नसावे. त्यांनी या सांगाड्यांत मिळालेल्या जनुकांतून मोठी राजकीय हलचल होणार आहे हे जनुकांचे आणि तेथे सापदलेल्या साधनांचे संपुर्ण विश्लेशन हाती येण्याआधीच घोषित करुन टाकले होते.

सुरुवातीला प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेल्या काही सांगाड्यांतील जनुके मानवी संसर्गाने दुषित झाली असल्याने दुस-या सांगाड्यांमधून अधिक शास्त्रीय पद्धतीने जनुके घेण्यात येतील आणि ती तपासण्यासाठी पाठवण्यात येतील असे या टीमने नंतर जाहीर केले. किंबहुना जनुकीय सम्शोधनाचे निष्कर्ष जाहीर करायला वेळ का लागतो आहे हे स्पष्ट करण्यासाठी हे कारण दिले गेले. पण हार्वर्डच्या संशोधकांचा आरोप आहे की हे नमुने दुषित नव्हते तर त्यातून हाती येणारे निष्कर्ष डॉ. वसंत शिंदेंच्या व त्यांच्या सहका-यांच्या पुर्व-ग्रहदुषित मतांशी जुळत नव्हतेम्हणून ते निष्कर्ष जाहीर करण्याचे टाळले गेले. सिंधु संस्कृतीत घोडा होता हे दाखवण्यासाठी एन. एस. राजाराम व एन. झा यांनी मागे चक्क सिंधू मुद्रेत छेडछाड करुन फोर्जरी केली होती व सिंधू संस्कृतीत वैदिक आर्यांना प्रिय असलेला घोडा अस्तित्वात होता हे दाखवण्याचा प्रयत्न केला होता.

राखीगढीलाच सापडलेल्या एका मानवी सांगाड्याचा कवटीतुन कानाच्या आतल्या भागातील हाडातुन संशोधकांना पुरेशा प्रमाणात जनुके मिळाली. त्याचे परिक्षण झाले असून निष्कर्षही हाती आले आहेत. ही जनुके तपासली गेलेल्या डीएनए प्रयोगशाळेचे प्रमुख निरज राय यांनी हे निष्कर्ष जाहीर केले आहेत. हे निष्कर्ष वैदिकवाद्यांच्या आजवरच्या "सिंधू संस्कृती वैदिकच" या दाव्यांना उध्वस्त करतात.

पहिला आणि संघवाद्यांच्या पचनी न पडनारा निष्कर्ष असा की वैदिक संस्कृतीचा सिंधू संस्कृतीशी कसलाही संबंध नाही. उलट ही जनुके अन्य मानवी संस्कृत्यांतील जनुकप्रवाहांपेक्षा अत्यंत स्वतंत्र आणि प्रभावी आहेत. मध्य आशियातील कोणताही जनुक-प्रवाह सिंधू संस्कृतीत झिरपला असल्याचेही दिसत नाही. म्हणजेच "आर १ ए १" ही जनुकेज्याला स्थुलमानाने आर्यन जनुके म्हटली जातात त्यांचा सिंधू संस्कृतीत पुर्णतया अभाव आहे. याचाच दुसरा अर्थ असा की सिंधू संस्कृती संपुर्णतया एतद्देशियांचीच निर्मिती आहे. संघवादी या संस्कृतीचे पितृत्व वैदिक आर्यांना देवू पहात होते ते सर्वस्वी गैर आहे. सिंधू संस्कृतीवर कसलाही वैदिक प्रभाव नव्हता. ती संस्कृती स्वतंत्रपणे बहरली. त्यानंतरच्या हजारो वर्षांत भारतीयांच्या जनुकीय रचनेत काही फरक पडला असला तरी आजच्या भारतीयांत मुख्यत्वेकरुन सिंधुकालीन मानवी जनुकांचाच प्रभाव मोठा आहे. म्हणजेच आजच्या भारतीयांत बव्हंशी तोच जनुकीय व म्हणून सांस्कृतीक वारसा आहे. पण त्यातही महत्वाची बाब म्हणजे सिंधू संस्कृतीत मिळालेया जनुकांचे अधिक जवळचे साधर्म्य आहे ते दाक्षिणात्यांचे...म्हणजेच द्रविडांचे.

ज्याला आर्यन जीन म्हटले जाते त्याचा उदय मध्य आशियातील पोंटियाक स्टेपे प्रांतात चार हजार वर्षांपुर्वी झाला असे मानले जाते. हे पशुपालकघोडे पाळनारे निमभटके लोक होते. यातीलच एका गटाने दक्षीण अफगाणिस्तानात आल्यानंतर तेथील सरस्वती (अवेस्तन नांव हरहवैती) वैदिक धर्माची स्थापना केली. ऋग्वेदरचनेचा काळ कसल्याही स्थितीत सनपुर्व १५००च्या पलीकडे जात नाही. भारतात या जनुकांचा प्रादुर्भाव इसपू १२०० नंतरच्या काळात आढळून येतो व तोही विशेष करुन उत्तर भारतीयांत. वैदिक धर्माची वाढही याच भागात आधी झालेली दिसते.

या पोंटियाक स्टेपे आनुवांशीकीच्या मंडळीचा भार प्रवेश होण्यापुर्वीच पाचशे वर्ष आधी (इसपू १७००) सिंधू संस्कृतीचा पर्यावरणीय कारणांनी -हास झालेला होता आणि ती नव्या स्वरुपात बहरु लागलेली होती. त्याहीपुर्वीच्या सिंधू संस्कृतीवर या आगंतुक वैदिक संस्कृतीच्या लोकांनी त्या काळातील संस्कृतीच्या जनकत्वावर दावा सांगणे हास्यास्पद असले तरी संघवादी विद्वानांनी मात्र आपला हेका सोडलेला नव्हता. भारतात जेही काही पुरातन ते वैदिक मुळाचेच कसे याचा प्रचार-प्रसार करण्याचा उद्योग प्रदिर्घ काळ चालला होता. आताच्या या संशोधनाने त्या प्रयत्नांना चाप बसवला आहे.

मी माझ्या "वैदिक धर्म आणि हिंदू धर्माचा इतिहास" या पुस्तकात स्पष्ट केल्याप्रमाणे सनपुर्व १२०० याच काळात भारतीय वैदिक धर्माशी परिचित झाले. या मध्य आशियायी आनुवांशिकीच्या लोकांनी भारतावर आक्रमण केले किंवा फार मोठ्या प्रमानात विस्थापन केले असेही आता सिद्ध होत नाही. आक्रमण झाले असते तर त्याचे पुरातत्वीय अवशेष मिळाले असते. पण तसा आक्रमणाचा पुरातत्वीय अथवा ग्रांथिकी पुरावाही उपलब्ध नाही. उलट या मंडळीचा भारतीय उपखंडातील शरणार्थी म्हणून प्रवेशाचा एक ग्रांथिक पुरावा उपलब्ध आहे. तो शतपथ ब्राह्मणातील असून त्यानुसार विदेघ माथवाच्या नेतृत्वाखाली हे लोक शरणार्थी म्हणून भारतात प्रवेशले असे दिसते. 

पण उत्तर भारतातील उच्च वैदिक वर्णीयांत ही तथाकथित आर्य जनुके आजही सरासरी १७.५% एवढ्या प्रमाणात अवशिष्ट आहेत. पण याला वैदिक आनुवांशिकीच्या लोकांचे सनपुर्व १२०० मधील विस्थापन हेच एकमेव कारण नसून त्यानंतरही सनपुर्व चारशेपर्यंत ग्रीक ते मध्य आशियायी लोक सातत्याने भारतात येत राहिल्यानेही भारतात प्रवाहित झालेली आहेत. केवळ बाहेरुन आलेले मुठभर वैदिक हे त्याचे एकमेव कारण नाही. पण वैदिक धर्म व वैदिक संस्कृतीचा प्रचंड अभिमान बाळगणा-यांत अर्थात याच आनुवांशिकीचा वर्ग मोठा आहे. त्यातुनच इतिहासाशी अक्षम्य असा खेळ केला जातो आहे. सिंधू संस्कृती (म्हणजेच हिंदू संस्कृती) ही वैदिक आर्यांचीच निर्मिती आहे असे ठसवण्याचा प्रयत्न करत सांस्कृतीक वर्चस्वतावादाला जीवंत ठेवण्यासाठी प्रसंगी फोर्ज-या करायलाही हा वर्ग कसा चुकत नाही याचे हे विदारक उदाहरण आहे.

राखीगढीचा प्रकल्प हाती घेतला गेला होता तेंव्हा तेथील उत्खनन भारताच्या इतिहासाचे पुनर्लेखन करायला भाग पाडेल असे केंद्रीय सांस्कृतीक मंत्री महेश शर्मा म्हनाले होते. डॉ. वसंत शिंदेंसारख्या पुरातत्वविदानेही संघविचारालाच प्रवर्तीत करण्यासाठी जणू राखीगढी उत्खनन प्रकल्पाचा वापर केला. परंतू नव्या संशोधनामुळे हे प्रत्यत्न यशस्वी होऊ शकलेले नाहीत. इतिहासाचे पुनर्लेखन म्हणजे रा. स्व. संघाच्या दृष्टीने हिंदुंवरील वैदिक वर्चस्व कायम ठेवण्यासाठीच्या अविरत प्रयत्नांचा एक भाग आहे. म्हणूनच सिंधू संस्कृती ही त्यांच्या दृष्टीने हिंदू संस्कृती नसते तर वैदिक संस्कृती असते. हिंदुपणाशी संघाचा किंचितही संबंध असता तर ते सिंधू संस्कृतीला "हिंदू संस्कृती" म्हटले असते कारण मुळात हिंदू हा शब्दच सिंधुवरुन आलेला आहे. पण या संस्कृतीला ’वैदिक संस्कृती’ किंवा ’सरस्वती संस्कृती’ ही नांवे सिंधू संस्कृतीला वर्चस्ववादी प्रवृत्तीतुन बहाल करत वेदपुर्व संस्कृतीचे अपहरण करत तो जनुकीयही वारसा चालवणा-यांना दुय्यम लेखण्याचा हा प्रयत्न होता.

साडेचार हजार वर्षांपुर्वीच्या राखीगढीतील सांगाड्यांनी भारतीय संस्कृतीच्या इतिहासावर नवा लख्ख प्रकाशझोत टाकला आहे. आर्य आक्रमण सिद्धांताने भारतात स्वातंत्र्यपूर्व काळापासुनच एक मोठी प्रादेशिकराजकीय व सांस्कृतीक फूट निर्माण केली होती. महात्मा फुले ते पेरियार व करुणानिधी यांनी मुलनिवासी ते द्रविड विरुद्ध आर्य हा संघर्ष पेटवला. भारतीय समाजकारण व राजकारण या सिद्धांताने ढवळून टाकले होते. असे असुनही संघाचे राजकारण ’हिंदू संस्कृतीचे आद्य स्रोत वेदच’ या मुलतत्वाभोवती गुंफलेले राहिलेले आहे.

राखीगढीतील साडेचार हजार वर्षांपुर्वीच्या मृत माणसाची जनुकेच आता बोलली असून त्याने संघीय दाव्यावर पाणी फिरवले आहे. वैदिकतेच्या सोसातून वैदिकाश्रयी हिंदू समाज बनवण्याचा संघाचा व म्हणूनच भाजपाचा अविरत प्रयत्न सुरु आहेच. पण आतातरी इतिहासाशी छेडछाड करणे ते थांबवणार आहेत की अजुन एखादी असांस्कृतीक पुडी सोडून देत इतिहासाचे विकृतीकरण करत रहात सांस्कृतीक वर्चस्वतावाद जपतच राहणार आहेत हे पाहणे महत्वाचे ठरेल.

-संजय सोनवणी

(Publishd in Rasik, Divya Marathi)

No comments:

Post a Comment

पांडुरंग बलकवडॆ एवढ्या खालच्या थराला गेले कसे?

  पांडुरंग बलकवडॆ एवढ्या खालच्या थराला गेले कसे? Sanjay Sonawani    ·  Pune    ·  Shared with Public 10 janewari 2013 पांडुरंग बलकवडे यांच्य...