Saturday, September 22, 2018

धार्मिक इतिहासाची समतोल मांडणी


आपण कोठून आलो? आपला इतिहास काय? आपल्या संस्कृतीचा उगम कसा झाला? आपण आर्य आहोत का? आपल्याला वेदांचा अधिकार होता का? आपली मूळ भाषा कोणती? आपले आद्य पुरुष कोण? असे अनेक प्रश्न मानवी मनाला भेडसावत असतात. प्रत्येक जण आपापल्या परीने या प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न करत असतो. पण प्रत्येकालाच याचं समाधानकारक उत्तर मिळत नाही. प्रसिध्द विचारवंत संजय सोनवणींचा 'हिंदू धर्म आणि वैदिक धर्माचा इतिहास' हा ग्रंथ असे अनेक प्रश्न निर्माण करून त्यांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करतो.

आपल्या मनातील प्रश्नांची उकल करण्याबरोबरच आजवरच्या सर्वच प्रचलित समजांना छेद देण्याचं कामदेखील हा ग्रंथ करतो. हिंदू धर्म हा वैदिक धर्मापासून वेगळा आहे हा या ग्रंथाचा गाभा आहे. मागील बऱ्याच वर्षांपासून सोनवणी समांतर मांडणी करत आहेत. त्यावरून त्यांची बरीच हेटाळणी झाली. हिंदू धर्मात फूट पाडणारा व्हॅटिकनचा एजंट असा गंभीर आरोपदेखील त्यांच्यावर झाला. इतक्या टोकाची टीका होऊनदेखील सोनवणींनी आपलं संशोधन पूर्ण करत हा ग्रंथ सिध्द केला. अपेक्षेप्रमाणे अनेकांनी तो न वाचताच त्यावर टीका करणं पसंत केलं.
आपला इतिहास अनेक तुकडयांमध्ये विभागला आहे. उपलब्ध असलेला तोकडा इतिहासदेखील मिथकांनी आणि आख्यायिकांनी भरलेला आहे. त्यातील सत्यता पडताळण्याचं कोणतंही ठोस परिमाण आपल्यापाशी नाही. काही ठिकाणचे शिलालेख, ताम्रपट, वेद, श्रुती, स्मृती, पुराणं, उपनिषदं इत्यादींच्या आधारे त्याचे काही संदर्भ जुळवता येतात. या कारणांनी साहजिकच त्याचे उलटसुलट अन्वयार्थ लावणं तुलनेने सोपं जातं. या साधनांवर सुरुवातीपासूनच एका विशिष्ट वर्गाचं वर्चस्व राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी लावले ते अर्थ प्रमाण मानले गेले.
परंतु जसा काळ बदलला, तशी या संसाधनांवरची विशिष्ट वर्गाची मक्तेदारी मोडीत निघाली. त्यांनी घालून दिलेल्या मिथकांची उलटतपासणी झाली आणि नवीन सिध्दान्त, नवीन मांडण्या पुढे येऊ लागल्या, ज्या या पूर्वापार चालत आलेल्या समजांच्या पूर्णच विरुध्द जाणाऱ्या होत्या. काही सिध्दान्त तर केवळ त्या विशिष्ट वर्गाप्रतीच्या द्वेषभावनेतून मांडले गेले. आधीच गढूळ असलेला इतिहास आणखीन गढूळ झाला. अशा पार्श्वभूमीवर प्रचलित समजांना छेद देत, परंतु कोणत्याही घटकाविषयी द्वेषभावना निर्माण न करता समतल मांडणी करण्यात संजय सोनवणी बऱ्याच अंशी यशस्वी झाले आहेत.
या ग्रंथात सोनवणींनी इतर विद्रोही मांडण्यांप्रमाणे हवेतून संदर्भ न देता जागोजागी विश्वासार्ह भाषाशास्त्रीय, वंशशास्त्रीय, भौगोलिक, ऐतिहासिक, धर्मशास्त्रीय संदर्भ दिले आहेत.
आर्य बाहेरून - म्हणजेच युरेशिया नामक कुठल्यातरी प्रांतातून आले आणि त्यांनी आमच्यावर त्यांची मनुस्मृती, जातिव्यवस्था लादली आणि राज्य केलं ही मूलनिवासी चळवळीची आवडती थियरी सोनवणी सप्रमाण खोडून काढतात.
त्याचबरोबर जातिव्यवस्था ही जन्माधारित नसून ती व्यवसायाधारित होती. कोणताही व्यक्ती मुक्तपणे व्यवसाय बदल करू शकत असे, तसेच वरचेवर नवीन जाती/व्यवसायदेखील बनत असत. परंतु दहाव्या शतकानंतरच्या सततच्या दुष्काळामुळे उत्पन्नात घट झाली आणि पुढे हीच मुक्त व्यवसाय पध्दती पुढे बंदिस्त झाली. पुढे याचं पर्यवसान बंदिस्त जातिव्यवस्थेमध्ये झालं हेदेखील पुराव्यानिशी दाखवून देत 'ब्राह्मणांनी जातिव्यवस्था लादली' या आरोपातून ब्राह्मणांना मुक्त करतात.
हिंदू धर्म हा वेदांवर आधारित नसून तो शिव-शक्तिपूजक आणि तांत्रिक आहे, हे सोनवणी ठासून सांगतात. एकूणच आपल्या जीवनावर तंत्रांचा असलेला प्रभाव पाहता त्यांचा हा दावा सत्य वाटतो. हिंदू देवता शिव ही वेदबाह्य असून वेदात अनेक ठिकाणी शिवाला यज्ञाचा विनाशक असंही संबोधल्याचे ते दाखले देतात. त्याच्याही पुढे जाऊन आद्य शंकराचार्यदेखील वैदिक नसून हिंदू आहेत हे सांगतात. ॠग्वेद आणि अवेस्ता या दोन धार्मिक ग्रंथांतील अनेक श्लोकांतून आणि भौगोलिक साधर्म्यातून या दोन धार्मिक ग्रंथांतील साधर्म्य दाखवून दिलं आहे. त्यातून ॠग्वेदाची रचना भारतात झाली नसून ती मध्य आशियात कुठेतरी झाली असावी, असा ते दावा करतात.
रामायण व महाभारत ही दोन्ही महाकाव्यं वेदपूर्व आहेत आणि त्यांचा वैदिकांशी काहीही संबंध नाही, याचे अनेक पुरावे त्यांनी या ग्रंथात उद्धृत केले आहेत. तसेच उपनिषदं हे वेदांचं सार अथवा शेवट नसून वेदांचा अंत आहेत. म्हणजेच उपनिषदं ही वेदानुकूल नसून ते वेदविरोधी आहेत या बाबासाहेबांच्या आणि मॅक्स मुल्लरच्या मांडणीशी सहमती दर्शवतात.
बळी, नरकासुर, रुद्र, कौटिल्य, तंत्र, सांख्य, मनुस्मृती, संस्कृत भाषा या अशा अनेक विषयांबद्दलच्या आजवर ऐकलेल्या-वाचलेल्या पूर्वकल्पनांना हा ग्रंथ धक्का देत तथ्यांच्या आणि पुराव्यांच्या आधारे संपूर्ण नवीन मांडणी करतो. आपल्या संस्कृतीची, इतिहासाची पाळंमुळं शोधू इच्छिणाऱ्या, चिकित्सक वृत्तीच्या सर्व वाचकांनी हा ग्रंथ आवर्जून वाचावा असा आहे.
अक्षय बिक्कड        
8975332523
पुस्तकाचे नाव - हिंदू धर्म आणि
वैदिक धर्माचा इतिहास
लेखक - संजय सोनवणी
प्रकाशक - प्राजक्त प्रकाशन 
पृष्ठसंख्या - 331
मूल्य - रु. 320/-



1 comment:

  1. सर, खुप छान मांडणी, पुस्तक वाचयला नक्की आवडेल.

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...