Sunday, October 21, 2018

सत्य ना आवडे कोणाला!


Image result for truth


सत्याबद्दल आम्हा भारतीयांच्या भावना खुपच तीव्र आहेत. "सत्यमेव जयते" हे तर आमच्या देशाचे महान ब्रीदवाक्य आहे. सत्याबद्दल बोलतांता सत्यवचनी राम ते राजा हरिश्चंद्राची उदाहरणे पदोपदी दिली जातात व स्वत:ची तुलना नकळत त्या पुराणपुरुषांशी बिनदिक्कतपणे केली जाते. "सत्य असत्याशी मन केले ग्वाही...मानीयले नाही बहुमता" हे तुकोबारायांचे वचन तर बव्हंशी सत्यवचनी पुरोगामी मित्रांच्याही लेखणात अभिमानाने डोकावत असते. भारतीय तत्वज्ञानात सत्याचा उहापोह एवढा केला गेला आहे की महावीराच्या काळातील अज्ञानवादीही आपल्या अज्ञानाची कीव करतील. मुळात सत्य सत्यातच अस्तित्वात आहे की तो केवळ "ब्रह्मं सत्य: : सत्यं मिथ्या" असा भ्रम आहे एवढा संभ्रम उत्पन्न व्हावा एवढी सत्याची अनेकांगाने चर्चा या देशात झालेली आहे. 

पण वास्तव काय आहे? वास्तव त्या सत्यांच्या चर्चेशी मेळ घालतांना आपल्याला क्वचितच आढळेल. आपला राजकीय इतिहास असो की सामाजिक इतिहास सत्याशी मेळ घालतांना दिसत नाही. हे सत्य आहे की पुरते सत्य कोणाच्याच हाती लागू शकत नाही. आपल्या हाती लागतात ते सत्याचे तुकडे असतात, संपुर्ण सत्य नसते. खरे म्हणजे आपल्याला तथ्ये माहित होतात पण सत्य नाही असेम्हणता येईल. पण तथ्यांनाच आपण लौकीक सत्य मानले तरी मुलात आपली तथ्येतरी शेवटी काय असतात? अनेकदा आपली तथ्येही भ्रामक मिथकांत लडबडलेली असतात म्हणूनच तथ्येही सत्य असत नाहीत. किंबहुना आमचा शोध तथ्यांच्या नसुन स्वप्रिय मिथकांचा शोध असतो आणि ती मिथकेच आपल्याला एवढी प्रिय होऊन जातात की सत्याची...तथ्यांची मातब्बरीच रहात नाही आणि असेच आम्ही मिथकांच्या दाटीत जगत जातो. बरे ती मिथके तरी एकमेकांशी सुसंगत आहेत काय? तर नाही. खरे तर आपसी सामाजिक संघर्षासाठी थ्या मिथकांचा बिनदिक्कत वापर केला जातो.

अलीकडचेच मिथकांपायी घडलेली समाजविघातक घटना म्हणजे वढू आणि भिमा-कोरेगांव. शंभुराजांच्या क्रुर हत्येतून मिथक बनवले गेले ते त्यांच्या प्रेतांचे तुकडे शिवत त्यांचे अंत्यसंस्कार केल्याचे. बरे, यातही तीन दावेदार होते. पहिले म्हणजे शिवले आडनांवाची वढूतील माणसे, गोविंद ढगोजी मेघोजी हे मुळ नांव असलेल्या गोविंदाचे आजचे वंशज आणि परीट समाज. जो समाज मोठा व प्रबळ त्यांचीच मिथके अर्थात जास्त डोक्यावर घेतली जातात. येथे तर एक वंचित तर एक वरिष्ठ समाज या दोघांत टक्कर होती. यात तेल ओतायला हिंदुत्ववादी म्हणवून घेणारी टालकी होती तसेच विरोधाला उभे ठाकलेला वंचित समाजही होता. यातुन संघर्ष पेटायला सुरुवात झाली.

पण मुळात संभाजी महाराजांच्या शवावर अंत्यसंस्कार केले गेले की नाही याबाबत इतिहास मूक आहे. संभाजी महाराजांचे डोळ्यादेखत हाल हाल करुन देहाची विटंबणा केली गेली. औरंगजेबाची दहशत एवढी होती के जेंव्हा शंभुराजांचे मस्तक भाल्यावर टोचून आसपासच्या गावांत फिरवले गेले तेंव्हाही या नागरिकांने साधा निषध नोंदवल्याचेही इतिहासात दिसून येत नाही. गोविंद ढगोजी मेघोजीला शाहू महाराजांनी वृंदावन बांधल्यावर इनामे जमीन दिली ते वृंदावनाच्या झाडलोटीचे काम पहातो म्हणून, शंभुराजांवर अंत्यसंस्कार केले म्हणून नाही. शिवले हे आडनांव काहींचे आहे ते शंभुराजांच्या प्रेतांचे तुकडे शिवले म्हणून नव्हे तर ते आडनांव त्याही पुर्वी शिवकाळातच नोंदले गेले आहे. म्हनजेच शंभुराजांच्या दुर्दैवी मृत्युतून स्वत:च्या जातीला राजनिष्ठ ठरवण्याच्या प्रयत्नातून खोटी मिथके निर्माण केली गेली. सत्य किंवा हाताशी उपलब्ध असलेल्या इतिहासातील तथ्ये पाहून आपल्या भ्रामक कल्पना दूर करण्याचे साहस हा "सत्यप्रिय" समाज कसा दाखवेल?

तेच कोरेगांव भिमाचे. तेथे इंग्रजी सैन्याची बाजीरावाच्या सैन्याशी अपघाती चमक झाली हे वास्तव आहे. त्यात इंग्रजी सैन्याने यशस्वी बचाव करुन होऊ घातलेली संपुर्ण कत्तल टाळली. बाजीराव पेशवा आपल्या वाटेने पुढे निघून गेला. इंग्रजी सैन्य पुर्वनियोजितपणे पुण्याला न जाता शिरुरकडे मागे फिरले. तेथे नंतर जो जयस्तंभ उभारला गेला तो या यशस्वी बचावासाठी व प्राणांची आहुती पडलेल्या सैनिकांबाबत आदरांजली अर्पण करण्यासाठी. बरे, त्यात महार सैनिकांची संख्या मोठी असली तरी इतर अनेक जाती-धर्माचे सैनिकही त्यात पडले होते. या अत्थ्यातुन उभे राहिलेले नवे मिइथक म्हणजे पाचशे महार सैनिकांनी पेशव्याचे सैन्य कापून काढले आणि पेशवाईचा अंत घडवला. ्तसाच अंत "नव्या पेशवाईचा" घडवावा म्हणून तथाकथित विद्रोही मंडळीने एल्गार परिषद घेतली व या नव्या पेशवाईचा (म्हणजे फडणविस सरकारचा) अंत घडवण्यासाठी आता संघर्ष रस्त्यावर नेला पाहिजे अशा साधारण आशयाचा संदेश दिला गेला. आता हे विरुद्ध पक्षाला कसे आवडनार? तेही प्रतिकारासाठी आपापल्या फौजा व झेंडे घेऊन हजरच होते!

व्हायचे ते झाले. दंगल झाली. एकाचा जीव गेला. कोट्यावधींचे नुकसान झाले. पोलिसांनी बघ्याचे भुमिका घेतली. त्यात हिंदुत्ववादी (पक्षी वैदिकवादी) जसे दगडफेकीत आघाडीवर होते तसेच आंबेडकरवादी व त्यांच्यात घुसलेले माओवादीही आघाडीवर होते. "पाच-पन्नस लोक मेल्याशिवाय क्रांती होणार नाही, तेंव्हा तुम्ही सामंजस्याची भुमिका घेऊ नका" असा सल्ला चक्क मला एका आंबेडकरवादी म्हनवणा-या पण नक्षली विचारसरनीचा स्पष्ट प्रभाव दिसत असलेल्या पंचविशीच्या एका तरुणाने दिला. हे सर्व आपले सोयीचे मिथक जपणारे व त्या मिथकांना कवटाळून नवा अनैसर्गिक सामाजिक संघर्ष पेटवणारे कोणत्या सत्याबद्दल बोलत असतील बरे?  खरे म्हणजे यातील एकाही बाजुकडे ना सत्य आहे ना तथ्य आहे. विखार मात्र ओतप्रोत भरुन वाहिलेला आहे आणि तो शमण्याची शक्यता नाही. अशी ही आमची सत्यप्रियता आहे.

संभाजी महाराजांच्या बलिदानातुन उभे राहिलेले दुसरे विखारी ब्रिगेडी मिथक म्हणजे गुढी पाडवा! या ब्रिगेडी विद्वानांचा दावा आहे की गुढी पाडव्याचा सण शंभु महाराजांची हत्या ब्राह्मणांच्या सल्ल्याप्रमाणे मनुस्मृतीनुसार केली गेली व त्यांचे मस्तक भाल्यावर टोचले या प्रसंगातुन सुरु झाला. गुढीवर पालथा ठेवलेला तांब्या हे शंभुराजांच्या मस्तकाचे प्रतीक आहे. अन्यथा तांब्या उलटा ठेवणे हिंदू धर्मात अशूभ मानले जाते. एवतेव गुढी पाडवा साजरा करु नये. हे मिथक गेली अनेक वर्ष गुढीपाडवा नजिक आला की उच्च रवात गायले जाते.

कोनताही सण साजरा करावा की न करावा याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे हे प्रथम मान्य करु. पण तथ्य काय आहे? मुळात हा नववर्ष आरंभ दिन आहे व इसवी सन ७८ मध्ये गौतमीपूत्र सातकर्णीने शक नृपती नहपानाच्या तावडीतून महाराष्ट्र मुक्त केला त्या स्वातंत्र्योत्सवाची हा दिवस आठवण आहे. त्यानिमित्त नवा शक सुरु केला आणि आनंदोत्सव म्हणून त्या दिवशी गुढ्या उभारायला सुरुवात केली. या सनाभोवती वैदिकीकरणाच्या नादात अनेक भाकड मिथके उभारली गेली व सातवाहनांची कर्तबगारी विस्मरणात टाकली गेली. सालाहन या मुळ शब्दाचे शालीवाहन हे भ्रष्ट संस्कृत रुप प्रचारात आणले गेले. वैदिकांनी या सनाचा मुळ गाभाच उखडून फेकला हे कटू वास्तव आहेच पण त्या असत्याला उत्तर देण्यासाठी सत्य काय ते सामोरे आनण्याऐवजी नवे असत्य निर्माण केले गेले.

औरंगजेब ब्राह्मणांच्या सल्ल्याने वागत होता याला कोनताही पुरावा नाही. उलट संभाजीमहाराजांची शिक्षा मुस्लिम कायदे व धर्मशास्त्र पाहून ठोठावली गेली याचे पुरावे औंरंगजेबाच्याच इतिहासकारांनी देवून ठेवलेत. शिवाय शंभुराजांच्या हत्येचा एक उत्सवी सण बनला आणि तोही ब्राह्मणांमुळे असे म्हनतांना अन्य मराठी प्रजा महामुर्ख होती हे आपण नकळत उच्च रवाने सांगत आहोत याचेही भान या मुढांना आले नाही. एवढेच नव्हे तर गुढी पाडवा नववर्ष दिन आहे आणि ते शक सुरु होऊन हजारांवर वर्ष उलटून गेली असतील तर गुढी पाडवा आणि शंभुराजांच्या हत्येचा मेळ कसा घालायचा याचाही तार्कीक विचार केला गेला नाही. उलट औरंगजेबाने शंभुराजांना हिंदुंच्या सनाचे निमित्त साधुन मुद्दाम शंभुराजांचे शिर गुढीप्रमाणे मिरवत नेण्याचा दुष्टावा केला असु शकेल हाही विचार त्यांच्या डोक्यात आला नाही. एवढेच नव्हे तर प्रत्यक्षात गुढी उभारण्याचेच नव्हे तर गुढी पाडवा साजरा केला जात असल्याचे अनेक पुरावे संतांपासून ते खुद्द शिवरायांच्या पत्रांत मिळतात. त्याचे काय करायचे हाही प्रश्न शिवला नाही. आणि गुढीवर पालथा तांब्या नव्हे तर गडू किंवा कलश ठेवायची मुळ प्रथा होती व तीही गुढीच्या सुशोभीकरनासाठी हे प्रत्यक्ष व्यावहारिक वास्तवही ते समजु शकलेले नाहीत. पण सत्य-असत्याचा जेंव्हा प्रश्न येतो तेंव्हा असत्यालाच सत्य म्हणून स्विकारायची रीत बनणार असेल तर सत्याचे स्थान काय उरले?...की नाहीच?

तेच वाघ्या कुत्र्याच्या स्मारकानिमित्त घडले. माझा बराच काळ या तशा निरर्थक वादात नष्ट झाला. शिवरायांच्या जीवनात एक इमानी कुत्रा होता, लाडका होता व शिवरायांच्या समाधीसमोर त्याचेही स्मारक बांधले. शिवस्मारकाची मध्यंतरीच्या काळात दुर्दशा झाल्याने लो. टिळकांच्या पुढाकाराने त्याचा जिर्णोद्धार करण्याचे ठरले. पुढे पैसे कमी पडल्याने स्मारक समितीचे लोक तुकोजी होळकरांकडे गेले. त्यांनी पाच हजार रुपयांची देणगी दिली आणि उरलेल्या पैशांत वाघ्याचे स्मारक बांधा असे समितीच्या न. चिं. केळकरांना सांगितले. तसे केले गेलेही. पण गेली आठ-नऊ वर्ष ब्रिगेडने नवाच वाद ब्रिगेडने सुरु केला. ब्राह्मणांनी शिवरायांचा अपमान करण्यासाठी पुतळाबाईंच्या समाधीवर मुद्दाम कुत्र्याचा पुतळा उभारला अशी हाकाटी केली. वातावरण गंभीर झाले. मी २०१० सालीच या वादात ओढला गेलो. इतिहास तपासता वाघ्याबद्दल लेखी नों<दी नसल्या तरी यादवाड येथील शिल्पात शिवाजी महाराजांसोबर असलेल्या एका कुत्र्याचे शिल्प पाहण्यात आले. मी ब्रिगेडच्या विरुद्ध रान उठवले. नवनवे पुरावे शोधत देत राहिलो. तरी वाघ्याचा पुर्तळा उखदला गेला. मी सपत्नीक उपोषंणाला बसलो. दुस-याच दिवशी दुपारपर्यंत वाघ्याला त्याच्या मूळ स्थानी विराजमान करण्यात आले. तरीही नष्टचर्य संपत नव्हते. पुरावा द्या ही मागणी कसलाही पुरावा नसता आपला दावा रेटनारे करत होते हेही एक नवलच. पण माझ्या कष्टांना फळ मिलाले. वाघ्याचा पुरावा, अगदे त्याच्या नांवासकट मला मिळाला तो एका जर्मन पुस्तकात. 

तो पुरावा असा- .पुस्तकाचे नांव- "Negotiations: authors and subjects of books I-X (1834-1852) " प्रकाशित झल्याचे वर्ष...१९३०. 
या पुस्तकातील मुळ जर्मन भाषेतील मजकुर येणेप्रमाणे...

1680 starb Shivaji auf Raigad eines natürlichen Todes. Über der Kremationsstätte ist ein Schrein errichtet worden. Ein aus Stein gemeisselter Hund blickt von einem Podest aus zu diesem hin: es ist Vaghya, Shivajis Lieblingshund, der in den brennenden Scheiterhaufen gesprungen sein...(Page No. 76) 

या जर्मन मजकुराचा इंग्रजीतील अनुवाद खालीलप्रमाणे...

Shivaji died in 1680 at Raigad a natural death. About the cremation, a shrine has beenerected. A chiseled in stone on a pedestal made of dog looks down to this: it is Vaghya,Shivaji's favorite dog, which have jumped into the burning pyre...(Page 76)

हे पुस्तक म्हणजे १८३४ ते १८५२ या काळात प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांची १२६ पानी सुची असुन त्यात लेखक व पुस्तकांच्या विषयांबाबत माहिती आहे. याच पुस्तकात जे लिहिले आहे त्याचा मराठी अनुवाद असा...

"शिवाजी नैसर्गिक मृत्युने रायगड येथे १६८० साली मरण पावला. त्याच्या दहनस्थळी स्मारक बांधण्यात आले. त्याबाजुलाच एका पाषाणस्तंभ असुन त्यावर दगडात ताशीवपणे बनवलेला कुत्रा (शिवस्मारकाकडे) पहात आहे. हाच वाघ्या...शिवाजीचा लाडका कुत्रा, ज्याने जळत्या चितेत उडी घेतली होती..."

आताचा वाघ्याचा पुतळा १९३६ साली बसवला गेला होता हे ध्यानात घेतले म्हणजे त्या पुराव्याचे महत्व लक्षात येईल. यानंतर मात्र काही काळ ब्रिगेडने वाघ्याचा नाद सोडला असला तरी अजुनही अधून मधून तो वाद पेटवला जातोच आहे. किंबहुना केवळ ब्राह्मणांचा द्वेष करायचा म्हणून असली नवी खोटी मिथके तयार करण्याचा धंदा गेला काही काळ तेजीत आला आहे. खरे म्हणज्वे कोणत्याही सुज्ञ माणसाने विचार केला असता की ब्राह्मणांना शिवरायांचा अवमानच करायचा असता तर मुळात शिवसमाधीचा जिर्णोद्धार त्यांने कशाला केला असता? पण तारतम्याचाच दुष्काळ असेल तर दुसरे काय होनार? सत्याची हत्याच होणार की नाही?

आणि हे अनुत्पादक कामासाठी समाजाला दावनीला धरले जाते ते कशासाठी? तुम्ही अकेडमिक पद्धतीने इतिहासाची अवश्य चर्चा करा, नवीन सत्ये उजेडात आणा. पण द्वेष हाच जर इतिहास संशोधनाचा पाया बनणार असेल तर ते संशोधन तथ्यपूर्ण कसे बनणार. हीच बाब वर्चस्वतावादी सांस्कृतीक भूमिका घेणा-या संस्थांना लागू पडते.

ब्रिगेडला सत्याची जेवढी चाड तेवढीच रा. स्व. संघालाही आहे हे ओघाने आलेच! त्यामुले अस्तित्वात नसलेली वैदिक विमाने उडतात, प्राचीन भारतीय (म्हणजेच वैदिक) विज्ञानाबद्दल जगात हसे होईल एवढे तारे तोडले जातात. सिंधू संस्कृती वैदिकांनीच निर्माण केली हे त्यांचे एक लाडके मिथक! सिंधू संस्कृतीवर मालकी सांगितल्याखेरीज वैदिक श्रेष्ठत्वतावाद कसा बरे जपता येणार? बरे सिंधू संस्कृती वैदिकांचीच निर्मिती घोषित करायची असेल तर काहीतरी वैदिक अंश तिच्यात सापडायला नको काय? सापडत नाही म्हणता? मग आम्ही घग्गर नदीलाच वैदिक सरस्वती ठरवू आणि तिच्याच काठी वेद रचले गेल्याने घग्गरच्या काठचे सर्व सिंधू संस्कृतीचे पुरावे आमचेच होतात की नाही हे बघा! वा! अफगाणिस्तानातील सरस्वती नदी चक्क भारतातुन वहायला लावायचा "सत्यप्रिय" चमत्कार वैदिकांनीही घडवलाच ना! आता भुगर्भशास्त्रीय सर्वेक्षणे "घग्गर ही वेदातली सरस्वती असुच शकत नाही हे सांगतात ती बाब अलाहीदा. आम्ही लगेच त्यांना हिरीरीने चुकीचे ठरवण्याचा प्रयत्न करत नवी असत्ये सांगायला सुरुवात करतो. आता ही नवी असत्ये आमच्याच जुन्या असत्यांच्या मुळावर येताहेत हे कोण लक्षात घेणार? त्यासाठी असत्यप्रिय बेभानच व्हावे लागते.

भाजप सरकार सत्तेत आले आणि घग्गरचे नांव सरस्वती करुन टाकले. एवढेच नव्हे तर मृय्तप्राय घग्गरच्या पुनरुज्जीवनाचे काम सरकारी पातळीवर हाताशी घेतले गेले./ राख्वीगढी येथे उत्ज्खनन सुरु केले गेले. ते उत्खनन पुर्ण व्हायच्या आधीच आम्ही या उत्खननातून काय सिद्ध करणार आहोत हे अवैज्ञानिक दावे डा. शिंदेंसारख्या पुरातत्वविदाने सुरु केले. त्यात तेथे काही मानवी सांगाडे सापडले. त्यातुन जनुके मिळवंण्यात आली. ती तपासायला कोरीयातील जनुकीय प्रयोगशाळेतही पाठवली गेली. पण पुर्वघोषित तारीख उलटली तरी निष्कर्ष काही जाहीर होईनात! मग त्यांनी सांगायला सुरुवात केली की प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेल्या काही सांगाड्यांतील जनुके मानवी संसर्गाने दुषित झाली असल्याने दुस-या सांगाड्यांमधून अधिक शास्त्रीय पद्धतीने जनुके घेण्यात येतील आणि ती तपासण्यासाठी पाठवण्यात येतील. पण हार्वर्डच्या संशोधकांचा आरोप आहे की हे नमुने दुषित नव्हते तर त्यातून हाती येणारे निष्कर्ष डॉ. वसंत शिंदेंच्या व त्यांच्या सहका-यांच्या पुर्व-ग्रहदुषित मतांशी जुळत नव्हते, म्हणून ते निष्कर्ष जाहीर करण्याचे टाळले गेले. सिंधु संस्कृतीत घोडा होता हे दाखवण्यासाठी एन. एस. राजाराम व एन. झा यांनी मागे चक्क सिंधू मुद्रेत छेडछाड करुन फोर्जरी केली होती व सिंधू संस्कृतीत वैदिक आर्यांना प्रिय असलेला घोडा अस्तित्वात होता हे दाखवण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे लबाडीचा इतिहास जुना आहे. 

पुढे राखीगढीलाच सापडलेल्या एका मानवी सांगाड्याचा कवटीतुन कानाच्या आतल्या भागातील हाडातुन संशोधकांना पुरेशा प्रमाणात जनुके मिळाली. त्याचे परिक्षण झाले असून निष्कर्षही हाती आले व ही जनुके तपासली गेलेल्या डीएनए प्रयोगशाळेचे प्रमुख निरज राय यांनी हे निष्कर्ष जाहीर केले. काय होते हे निष्कर्ष?  

पहिला आणि संघवाद्यांच्या पचनी न पडनारा निष्कर्ष असा की वैदिक संस्कृतीचा सिंधू संस्कृतीशी कसलाही संबंध नाही. उलट ही सिंधू संस्कृतीत मिलालेली जनुके अन्य मानवी संस्कृत्यांतील जनुकप्रवाहांपेक्षा अत्यंत स्वतंत्र आहेत. मध्य आशियातील कोणताही जनुक-प्रवाह सिंधू संस्कृतीत झिरपला असल्याचेही दिसत नाही. म्हणजेच "आर १ ए १" ही जनुके, ज्याला स्थुलमानाने आर्यन जनुके म्हटली जातात त्यांचा सिंधू संस्कृतीत पुर्णतया अभाव आहे. याचाच दुसरा अर्थ असा की सिंधू संस्कृती संपुर्णतया एतद्देशियांचीच निर्मिती आहे. संघवादी या संस्कृतीचे पितृत्व वैदिक आर्यांना देवू पहात होते ते सर्वस्वी गैर आहे. सिंधू संस्कृतीवर कसलाही वैदिक प्रभाव नव्हता. ती संस्कृती स्वतंत्रपणे बहरली. त्यानंतरच्या हजारो वर्षांत भारतीयांच्या जनुकीय रचनेत काही फरक पडला असला तरी आजच्या भारतीयांत मुख्यत्वेकरुन सिंधुकालीन मानवी जनुकांचाच प्रभाव मोठा आहे. म्हणजेच आजच्या भारतीयांत बव्हंशी तोच जनुकीय व म्हणून सांस्कृतीक वारसा आहे. मध्य आशियातील जनुकांचा प्रभाव (१७.५%), तोही इसपू १२०० नंतर केवळ उत्तर भारतातील उच्च वर्णीयांत आढळू लागतो. या संशोधनामुळे संघाला जे भारतीय इतिहासाचे पुनर्लेखन करायचे होते त्यात केवढा मोठा अडथळा आला असेल हे आपण समजु शकत असलो तरी वैदिक वर्चस्वाच्या निकडीपोटी पुराव्यांची मोडतोड करुन नवे असत्य पुढे रेटले जानार नाही असे नाही. 

या पोंटियाक स्टेपे आनुवांशीकीच्या मंडळीचा (म्हणजे ज्यांना तथाकथित आर्य मानले जाते त्यांचा) भारत प्रवेश होण्यापुर्वीच पाचशे वर्ष आधी (इसपू १७००) सिंधू संस्कृतीचा पर्यावरणीय कारणांनी -हास झालेला होता आणि ती नव्या स्वरुपात बहरु लागलेली होती. त्याहीपुर्वीच्या सिंधू संस्कृतीवर या आगंतुक वैदिक संस्कृतीच्या लोकांनी त्या काळातील संस्कृतीच्या जनकत्वावर दावा सांगणे हास्यास्पद असले तरी संघवादी विद्वानांनी मात्र आपला हेका सोडलेला नाही. भारतातील मध्य आशियायी जनुकांचा प्रवाह यायला केवळ वैदिक आनुवांशिकीच्या लोकांचे सनपुर्व १२०० मधील विस्थापन हेच एकमेव कारण नसून त्यानंतरही सनपुर्व चारशेपर्यंत ग्रीक ते मध्य आशियायी लोक सातत्याने भारतात येत राहिल्यानेही भारतात प्रवाहित झालेली आहेत. केवळ बाहेरुन आलेले मुठभर वैदिक हे त्याचे एकमेव कारण नाही. या मंडळीचा भारतीय उपखंडातील शरणार्थी म्हणून प्रवेशाचा एक ग्रांथिक पुरावा उपलब्ध आहे. तो शतपथ ब्राह्मणातील असून त्यानुसार विदेघ माथवाच्या नेतृत्वाखाली हे लोक शरणार्थी म्हणून भारतात प्रवेशले असे दिसते. पण वैदिक धर्म व वैदिक संस्कृतीचा प्रचंड अभिमान बाळगणा-यांत अर्थात याच आनुवांशिकीचा वर्ग मोठा आहे. त्यातुनच इतिहासाशी अक्षम्य असा खेळ केला जातो आहे. सिंधू संस्कृती (म्हणजेच हिंदू संस्कृती) ही वैदिक आर्यांचीच निर्मिती आहे असे ठसवण्याचा प्रयत्न करत सांस्कृतीक वर्चस्वतावादाला जीवंत ठेवण्यासाठी प्रसंगी फोर्ज-या करायलाही हा वर्ग कसा चुकत नाही याचे हे विदारक उदाहरण आहे.

हे झाले सामाजिक-सांस्कृतीक असत्य व लबाडीचे प्रयोग. अर्थव्यवस्थेतही आम्ही भारतीय याच लबाड्या करत राहिलेलो आहोत. अगदी विकासदराचे आकडेवारी विश्वसनीय नसते. नोटबंदीचा सर्वात मोठा फायदा म्हनजे आयकर विवरणपत्रके भरणा-यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली हे एक हास्यास्पद उदाहरण दिले जाते. पण हे उदाहरण देणारे हे सांगत नाहीत की आयकराच्या रुपाने आलेल्या उत्पन्नात किती वाढ झाली? सरकारला उत्पन्न मिळाले तरच त्या विवरणपत्रांचा उपयोग. वास्तव असे आहे की या वाढीव विवरणपत्रांत करपात्र उत्पन्न शून्य अथवा नगण्य दाखवले गेलेले आहे. 

विदेशी बाजारपेठांत भारतीय मुळाच्या उत्पादनांवर कोणाचा विश्वास नाही. अपवाद असले तरी बव्हंशी भारतीय उत्पादकांकडे लबाड म्हणूनच पाहिले जाते. ज्या देशात दुधापासुन पेट्रोल भेसळीचे मिळते, अगदी उपाहारगृहांतही दर्जा सांभाळला जात नाही, बव्हंशी कामगार/कर्मचारी शक्यतो चुकारपणा करतात व मालकाशी लबाडी करतात अशा देशात अर्थोत्पादन वाढेलच कसे?

पण आम्हाला सत्याची आणि तथ्यांची पर्वा नाही. किंबहुना सत्याशी आमचा कधीच संबंध नव्हता. असत्याची निर्मिती करण्यातच आम्ही आमची प्रतिभा खर्च केली की काय असे वाटावे अशी स्थिती आहे. सत्य कोणी सांगायचा प्रयत्न केला की तो लगेच याचा किंवा त्याचा द्वेष्टा ठरवण्याची अहमाहिका लागते. अगदी आमच्या चीनशी झालेल्या पराजयाची अथवा पाक युद्धांची आमची विश्लेशने स्वत:ला शहाणा समजत नेहरु, मेनन, इंदिरा गांधी किंवा अजुन कोणाला तरी आरोपी ठरवण्यासाठी असतात. पण तटस्थ विश्लेशने करत भविष्याची फेरआखणी करावी असे आम्हाला वातत नाही. किंबहुना अर्थशास्त्र आणि राजकीय शास्त्रात आम्ही अत्यंत मागासलेले आहोत. त्यामुळे अर्थव्यवस्थेतील घडामोडी राजकीय समजुन मगच त्यावर आगडोंब उसळवने वा स्वप्रियांचे वाटोळे होत असले तरी भलामन करण्यात आमची बुद्धी खर्च होत असते. ती सृजनात्मक बनवावी, नवे सिद्धांतन करत भविष्याला दिशा द्यावी असे मात्र काही केल्या आमच्या मस्तकात घुसत नाही. उलट आम्ही आम्हाला हवे ते असत्य असले तरी सत्य म्हणून रेटायचा अनिवार प्रयत्न करतो. 

अशी ही आमची असत्याची लालसा अपार आहे. सत्य आम्हाला आवडत नाही. "सत्य बोला...पण प्रिय वाटणारेच सत्य बोला" असे आमचीच संस्कृती सांगते. हे प्रिय वाटणारे सत्य बव्हंशी असत्यच असनार हे उघडच आहे. आम्हाला सत्य आवडत नाही. सत्याचा प्रखर प्रकाश पहायची आमच्यात हिंमत नाही. आम्ही असत्याच्या अम्धाराला पुरेपूर सरावलेलो आहोत. त्यामुळे आमच्या संस्कृतीचे, इतिहासाचे आणि म्हणूनच वर्तमानाचे आकलन तथ्यपुर्ण नाही. असुही शकत नाही. ज्या संस्कृतीचे गुणगान गायले जाते ती संस्कृतीचे आमचे आकलनच तथ्याधारित नसून भ्रामक असल्याने हा संस्कृती नसलेला देश बनून गेला आहे. 

सत्य किंवा तथ्य समजावून घेत आपली भुमिका ठरवणे महत्वाचे असते. पण आम्ही असत्यातच रमणार असू तर आमचा भविष्यकाळही अंधारलेलाच राहनार हे उघड आहे!

-संजय सोनवणी

(Published in Sahitya Chaprak, Diwali issue)

2 comments:

  1. किती वेळा तेच तेच दळण दळता. काहीतरी नवीन घेऊन या.

    ReplyDelete
  2. सोनवणी सर,महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार टिळकांनी केला याला काही पुरावा आहे का? कारण यासाठी काही लोक टिळकांचे तर काही फुलेंचे नाव घेतात. यातील खर काय मानायच?

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...