Sunday, October 21, 2018

आत्मा...पुनर्जन्म...मोक्ष...प्रेतात्मे आणि आपण!


Image result for soul ghosts incarnation


आत्मा, पुनर्जन्म, अवतार आणि मोक्ष या संकल्पनांनी भारतीय समाजावर गेली काही सहस्त्रके गारुड माजवले आहे. या संकल्पनांची मुळावस्था आणि त्यांत होत गेलेला विविधांगी विस्तार यामुळे तत्वज्ञानाच्या क्षेत्रात तर प्रचंड धमासान वादळे झालेली आहेत. पुनर्जन्म होतो आणि त्याची उदाहरणेही आहेत असे दावे अनेक वेळा होत असतात. त्यावर चर्चाही होत असते. साधारणपणे सामान्य ते उच्चशिक्षित पुनर्जन्माच्या अथवा आत्म्याच्या संकल्पनेवर विश्वास ठेवतांना आढळतात. सामान्यांत असा विश्वास निर्माण झाल्यानंतर ढोघी लोक तिचा गैरफायदाही घ्यायला धावतात. नास्तिक मात्र हिरीरीने या संकल्पना तर नाकारतातच पण धार्मिक कट्टरतावाद्यांप्रमाणे या संकल्पनांवर हल्ले चढवतात. या दोन्ही गटांच्या अधुन मधुन उसळणा-या चर्चेच्या वादळातुन साध्य मात्र काहीच होत नाही. मुळात या संकल्पना आल्या कोठुन आणि त्यांचा विकास कसा झाला हे पाहिल्याशिवाय आज आपण कोठे आहोत आणि कोठे जायचे आहे हे समजणार नाही.

आत्म्याच्या अस्तित्वावर जगभरच्या संस्कृतींचा पुरातन काळापासुन विश्वास आहे. अर्थात आत्मा या शब्दाला वेगवेगळ्या अर्थछटा प्रत्येक संस्कृतीने दिलेल्या आहेत. मुळात या संकल्पनेमागे माणसाची मृत्युबद्दल असलेली अनावर भिती कारणीभुत आहे. आदिम काळी जगण्याचा अविरत संघर्ष करतांना आणि हरघडी इतरांना मरतांना पाहतांना व स्वत:ही मरणाच्या छायेत वावरत असतांना त्याच्या सुप्त मानसिकतेने मृत्युभयावर मात करण्यासाठी माणुस मेला तर पुरता नष्ट होत नाही तर त्याचे अस्तित्व प्रेतात्म्याच्या रुपाने आपल्या अवती-भवती असते ही आदिमानवाने केलेली आद्य कल्पना. त्यातुनच दफन संस्कृती उदयाला आली. या दफन संस्कृतीचा जगभर विस्फोट झाला तो सनपुर्व चाळीस हजार वर्षांच्या काळापासून. मृताचे दफन अत्यंत शिस्तीत आणि समारंभपुर्वक केले जाऊ लागले. दफन स्थाने व्यवस्थित बनवली तर जाऊ लागलीच पण मृतात्म्याला मरणोत्तर काळातील गरजा भागवण्यासाठे त्याच्या प्रिय वस्तु, प्राणी तर कधी त्याच्या नोकरांनाही जीवंतपणे गाडण्याची प्रथा काही संस्कृतींत निर्माण झाली. 

इजिप्तमध्ये तर मृत फराओ ते सरदार भव्य पिरामिड्सच्या रुपात मृतांची स्मारके निर्माण केली गेली. फराओसोबत त्याचे नोकरचाकरही दफन केले जात. फराओचे शरीर जसेच्या तसे जतन करण्यासाठी त्यांच्या ममीज बनवण्यात येत. मयताचा आत्मा मेल्यानंतर सर्वप्रथम पाताळात जातो आणि आपल्या शक्ती पुन्हा मिळवतो, नंतर तो दिवसा आकाशात ओसिरिसला (सुर्य) प्रदक्षिणा घालुन रात्री पुन्हा पाताळात असे चक्र सुरु होते. नंतर त्याचे देवात रुपांतर होते. 

जगातील आद्य धार्मिक वाड्मय इसपू २४००मध्ये मृतांसाठी निर्माण झाले. त्याला पिरामिड टेक्स्टस अथवा बुक ओफ़ डेड म्हणतात आणि ते पिरामिडसच्या भिंतींवर कोरलेले असल्याने त्यात कसलाही बदल झाला नाही. म्हणजेच आत्मा आणि त्याचे मरणोत्तर जीवन याबाबत प्रत्येक संस्कृतीच्या संकल्पना होत्या. त्यांचेही मंत्र-तंत्र असणारच, पण ते लिखित स्वरुपात नसल्याने आज आपल्याला माहित नाहीत. मृतांची नुसती स्मारकेच नव्हेत तर त्यांच्या प्रतिमाही बनवल्या जात. रामायणकाळापासुन ते सातवाहन काळापर्यंत पुर्वजांची प्रतिमागृहे बनवली जात असे पुरावे आपल्याला मिळतात. थोडक्यात आद्य धार्मिक वाड्मय व मुर्तीपुजा आली ती मृतांचे स्मरण ठेवण्यासाठी व मरणोत्तर गती उत्तम मिळावी म्हणून. 

पुनर्जन्माचे मात्र तसे नाही. आत्मा नव्या रुपात जन्म घेतो ही संकल्पना अस्सल भारतीय. त्या संकल्पनेचा प्रभाव आपल्याला प्लेटो, पायथागोरस ते सोक्रेटिसवरही पडलेला दिसतो, पण अर्थात त्यांचे स्पष्टीकरण थोडे वेगळे आहे. वैदिक धर्मात पुर्वज पुजा केली जात असे. साध्यस हे सर्व पुर्वजांच्या आत्म्यांना दिले गेलेले नांव. श्राद्धविधीही त्यामुळेच फार तपशीलवार असे. पण पुनर्जन्माची संकल्पना मात्र वैदिकांतही नव्हती. ती त्यांच्यात आली ती भारतातील सांख्य आणि औपनिषदिक तत्वज्ञानाशी परिचय झाल्यावर. पण ही संकल्पना स्विकारायला त्यांनाही बराच वेळ लागला.

आत्मा अमर आहे आणि तो वेगवेगळ्या योनींत जन्म घेत रहातो आणि शेवटी मोक्षाप्रत पोहोचतो. पण हे चक्र थांबवायचे असेल तर योगमार्गाने साधना करुन हे चक्र चुकवत मोक्ष मिळवता येतो असे योगदर्शन हिरीरीने प्रतिपादित करत राहीले. आत्म्याचे अमरत्व आणि पुनर्जन्म या आधी प्राथमिक संकल्पना होत्या. मृत्युनंतर काय या भयापासुन मुक्ती मिळवण्यासाठी माणसाने शोधलेली ही क्लुप्ती होती. आत्मा अमर आहे हे मान्य केले की मग काळजीपुर्वक केल्या जाण-या दफनांची गरज राहिली नाही. मध्य-सिंधुयुगातच प्रेते जाळण्याची प्रथा सुरु झाली आणि नंतर सर्वत्र ती कायम झाली. संकल्पना कशा विकसित होत जातात हे पाहणे मनोरंजक आणि उद्बोधक ठरते ते यामुळेच.

पण मरणोत्तर गती म्हणून पुढचा जन्म कधी, कोठे आणि कोणत्या योनीत होईल याबाबतही धर्मचर्चा आणि तत्वचर्चा होत राहणे स्वाभाविक होते आणि त्याबाबत वेगवेगळ्या मतांचा गलबला होता. बुद्ध आत्मा मानत नाही पण पुनर्जन्म मानतो. कर्म सिद्धांताचा जन्म जरी सनपुर्व हजार-पंधराशे वर्षांपुर्वीच झाला असला तरी तो साधा आणि नैतीक आचरण करण्यास प्रेरणा देनारा होता. म्हणजे, तु जर चांगला वागशील तर तुला पुढचा जन्म चांगल्या योनीत मिळेल. तो मनुष्याचाच जन्म असेल असे काही नव्हते. पण मानवी मन अजब आहे. मनुष्य जन्म भोगणा-यांना तोच जन्म चांगला वातनार आणि फारच सुकर्म केले तर देवयोनीतच सरळ जन्म मिळनार आणि अजुन भाग्य असले तर मग काय...मोक्षच...पुन्हा पुन्हा जन्मायचे आणि मरायचे काही कारणच रहात नाही!

या विचाराने पुनर्जन्म या संकल्पनेत अजुन विकास झाला. अगदी जेंव्हाही धरातलावर अराजक माजते, वाईटाचा विस्फोट होतो तेंव्हा देवही मानवी रुपात जन्म घेतात, म्हणजे अवतार धारण करतात आणि वाईटाचा नाश करतात या संकल्पनेचा परिपोष इसवी सनाच्या चवथ्या शतकानंतर झाला. किंबहुना आधी अवतार संकल्पना अस्तित्वात आली, पुरातन महापुरुषांना विष्णुचे अवतार ठरवले गेले. यामागेही सश्रद्ध मनाला आधार देणारी संकल्पना होती असे म्हणता येईल. किंबहुना अजरामर आत्मा आणि पुनर्जन्म या आदिम मानवाच्या मानसिकतेला आधार देणा-या उदात्त संकल्पना होत्या असे मान्य करावे लागेल. पण होत्या त्या संकल्पनाच! 

या संकल्पनांनी अनेक तर्कदोष आणि विसंगती उत्पन्न केल्या. उदा. आत्म्याला काहीच चिकटत नाही, तो निर्गुण आहे तर आत्म्याला कर्मे कशी चिकटतात, कर्मबंध कसा निर्माण होतो  आणि मग त्याचे स्मरण ठेवुन अथवा कर्मांप्रमाने आत्मा वेगवेगळ्या योनींत कसा प्रविष्ट होतो याबाबत तत्वज्ञांत प्रचंड गोंधळ आहे. शिवाय कर्माला "माया" म्हणजेच मिथ्या म्हणण्याचीही रीत आहेच. कर्म जर मिथ्या आहे तर कर्मचक्राच्या फे-यात आत्मा कसा अडकतो याचेही स्पष्टीकरण दिले जात नाही. किंबहुना तत्वज्ञही येथे धर्मवादी बनतात आणि म्हणतात, कर्माच्या फे-यांत मनुष्य प्रथम कसा गोवला गेला हे सांगता येत नाही. (महाभारत शांतीपर्व) तर गीता म्हणते "गहना कर्मणो गती..." म्हणजेच कर्माची गती गहन आहे. या तत्वचर्चेत जाण्याचे सध्या कारण नाही पण ती तर्कविसंगतच अधिक आहे एवढे मात्र खरे.

हा कर्म सिद्धांत निर्माण झाला तो माणसाला या जन्मी चांगली कर्मे करण्यास प्रेरीत करण्यासाठी. त्याचा हेतु माणसाला नैतीक आचरण करण्यास प्रवृत्त करणे एवढाच होता पण या सिद्धांताने भारतात प्रचंड आक्रस्ताळी वळने घेतली. म्हणजे य जन्मात तु ज्या वर्णात अथवा जातीत जन्मास आला ते गेल्या जन्मातील तुझ्या कर्मांमुळे आणि पुढच्या जन्मात उच्च जात अथवा वर्ण मिळवायचा असेल तर या जन्मात कसलीही तक्रार न करता वर्ण अथवा जातनिहाय कर्मे केलीच पाहिजेत असा हा सिद्धांत बनत गेला. गीतेने त्या सिद्धांताला धार्मिक अधिष्ठानाचे बळ पुरवले. पण एक मोठी विसंगती अशी की माणसाला स्वेच्छेने कर्म करण्याचा अधिकारच नाही तर त्याने काय कर्म करायचे आणि त्याचे फळही काय द्यायचे हे परमात्म्यानेच ठरवलेले आहे असे गीताच उच्च रवात सांगते. "लभते च तत: कामान मयैव विहितान हि तान" (गीता ७.२२) असे कृष्णच गीतेत म्हणतो. म्हणजे कर्म करण्याचे स्वातंत्र्य येथे बाधित तर होतेच पण कर्मफळ काय मिलनार हेही माणसाच्या हाती नाही. थोडक्यात मानवी स्वातंत्र्याचा संकोच करणारे हे तत्वज्ञानच गीतेतुन आल्याने त्याचा प्रभाव अधिक पडला. नकळत झालेल्या पुजेतुनही मोक्ष मिळु शकतो असे हिंदु तंत्रशास्त्रे ओरडून सांगत राहिली असली तरी तो विचर दहाव्या शतकापर्यंत मागे फेकला गेला. 

अवतार संकल्पनेने तर अनेक विसंगती निर्माण केल्या. श्रद्धाळू लोकांना अशा विसंगती दिसत नाहीत. उदाहणार्थ रामावताराच्या वेळीस आधीचा अवतार परशुराम हजर आहेच! कृष्णाच्या अवताराच्या वेळेसही परशुराम् हजर आहेच. मग दोन अवतारांच्या वेळेस एक अवतार हजरच आहे तर धर्मसंस्थापनेचे आणि दुष्ट निर्दालनाचे काम त्याच अवताराने कसे केले नाही किंवा विष्णू एकाच वेळीस दोन अवतारांच्या स्वरुपात कसा हजर असेल हे साधे प्रश्नही धार्मिकांना पडले नाहीत. किंबहुना तर्कबुद्धी गहान ठेवणे हेच धार्मिकांचे अव्यवच्छेदक लक्षण झाल्याने ते स्वाभाविकच म्हणावे लागेल. 

नंतर तर अवतारांचे पेवच फुटले असे म्हनायला हरकत नाही. साधु-संत ते गुरु-बापु कोना ना कोणा गतकाळातील गुरुंचे, देवांचे पुनर्जन्म तर कधी चक्क अवतारांचे अवतार घोषित केले जाऊ लागले. यामागे आपापल्या महनीयांची स्थाने जनमानसात उंचावण्याची हौस होती हे उघड आहे आणि येथेही श्रद्धाशील लोकांनी आपल्या विवेकाचा बळी दिला. 

शिवाय गतजन्माच्या स्मृती असल्याखेरीज पुनर्जन्म शक्य नाही. आत्मा जर निर्गुण अविकारी असेल तर तो बंधनात अडकणे शक्य नाही. जरी आत्मा अजरामर असेल व तो कोणतेही जन्म समजा घेऊ शकत असेल तर त्याला इच्छा आहे आणि इच्छा असलेला आत्मा आत्म्याच्या व्याख्यांना पु्रा पडत नाही. किंबहुना तंत्रांचा देहात्मवाद हा आत्मा व देह यांना एकच मानतो व ते संयुक्तिकही होते. पण तोही विचार वाहुन गेला. आणि इच्छा असलेला आणि पुनर्जन्म घेणारा आत्मा ही संकल्पना प्रबळ झाली. त्यात धर्मवाद्यांची सोय तर होतीच पण या जन्मातील अवहेलनंना सहन करायची अप्रयत्नवादी सोय या सिद्धांताने लावली. 

भयभीत मानवी मनाला सांत्वना देण्यासाठी उदय पावलेल्या आत्मा आणि पुनर्जन्म या संकल्पनेने असे विद्रुप स्वरुप धारण केले. आधुनिक काळात या संकल्पनेचा पगडा कमी होईल असे वाटत होते पण प्रत्यक्षात तसे झालेले नाही. मृत्यु हा जीवनाचा अंत नाही त्यामुळे मृत्युचे भय बाळगण्याचे कारण नाही हे व्यक्तीला व मृतांच्या आप्तेष्टांना सांगत दिलासा देण्याचा तो एक उत्कृष्ठ मानसशास्त्रीय प्रयत्न होता. शिवाय जगतांना नैतीक आचरण करण्यास प्रवृत्त करणे हाही त्या सिद्धांताचा मुळचा हेतू होता. पण सिद्धांतापासुन ढळल्यामुले या सिद्धांताने सामाजिक व व्यक्तीगतही अहितच केले. नैष्कर्म्यवादी बनवण्याचे कार्य त्यातुन तर घडलेच पण वैचारिक प्रवाहांचेही पतन होत एक डबके बनले. 

आणि आताही पुनर्जन्म सिद्धांत नुसता खरा नाही तर कोण कोणाचा पुनर्जन्म आहे अशी पुस्तके लिहुन सामाजिक मानसिकता किती खालावलेली आहे याचेही दर्शन घडते आहे. पुर्वीच्या मरुन गेलेल्या व्यक्तीच्या आठवणी असने, त्या सारखाच दिसने अथवा शरेरावर जन्मत: काही खुण असणे यावरुन आजोबा, पणजोबा पुन्हा पोटी जन्माला आला ते हा कोणी सत्पुरुषाचा अवतार आहे अशा बातम्या समाजात अनेकदा चर्चेतही असतात. अनेकदा अशी उदाहरने इतकी ठळक असतात की पुनर्जन्म (आणि भुत-खेत) या कल्पना नसुन सत्यच असावे असे वातु लागते. जगभर अशी उदाहरणे झळकत असतात. उडत्या तबकड्या ते एलियंसही  दिसले अशाही वार्ता मध्यंतरी खुप ौगवत होत्या. पण दृष्टीब्रम अथवा मनुष्याचा उपजत थापाड्या स्वभाव अशा वार्तांमागे आहे हे लक्षात आल्यानंतर या अशा बातम्या मागे पडल्या. पण आपण मात्र अजुनही पुनर्जन्म ते प्रेतात्मे या संकल्पनांच्या गुढ जाळ्यात अडकुन पडलेलो आहोत.

आत्मा म्हणजे काय हे आपण आधी समजाऊन घेण्याचा प्रयत्न करु. आत्मा म्हणजे अन्य काही नसुन जीवित राहण्यासाठी अत्यावश्यक असलेली उर्जा. ही उर्जा गेली की माणुस मरतो. ही उर्जा शरीर सातत्याने अन्नातुन उत्पन्न करत असते व जैवरासायनिक तत्वे मिळून बनलेल्या शरीराला जीवित ठेवत असते. शरीरातील (विशेषत: हृदय आणि मेंदू) कार्ये जैवविद्युत व जैवचुंबकीय प्रारणांतुन चालतात. मनुष्याच्या कल्पना-विचारादि सुप्त क्रियांना जैव-विद्युत (म्हणजेच उर्जा) कारण असते. विचार, भावनादिंचा उद्रेक प्रसंगानुसार कमी-अधिक तीव्र होत असतो. मेंदुतील कोनती केंद्रे आणि किती सक्रीय अत्य्हवा उत्तेजित आहेत यानुसार व्यक्तीचा मानसीक कारभार चालु असतो. बाह्य घटक (म्हणजे भुशास्त्रीय घडामोडी, सौर वादळे ते औषधे ते मद्यादि सेवनेही या तीव्रतांवर व मनोदिशेंवर परिणाम करत असतात.

उर्जेला शाश्वत अस्तित्व आहेच. पण ती या शरीर व मनोव्यापारांची कारण ठरते. ती स्वत: विचार अथवा भावना नसते. त्या अर्थाने आत्म्याला जसे निर्गुण व अविकारी मानले जाते तशीच उर्जाही निर्गुण व अविकारी आहे. ती स्वेच्छ नाही. मेंदुंतील विचार, भावनादि क्रिया या तरंग स्वरुपात असतात. त्यांना भौतीक अस्तित्व असते. किंबहुना उर्जेचेच ते नव्य रुपांतर असते. उर्जा अक्षय्यतेच्या तत्वानुसार या तरंगांचेही अस्तित्व भौतीक स्वरुपात बदल घडवत अथवा स्थितीनुसार बदल न घडवता क्षीणातीक्षीण ते तीव्रतेने अस्तित्वात राहतेच. किंबहुना मनाचे कारणच ही जैवविद्युत क्रिया आहे. 

"मन म्हणजे जैव-विद्युत-चुंबकीय तरंगांची मेंदुतील सातत्याने अंतर्गत व बाह्य कारणांनी क्रिया-प्रतिक्रियास्वरुपी सातत्याने सुरू असलेल्या प्रक्रियांचा र्कुणातील समुच्चय होय, जी व्यक्तिला "स्व" ची जाणीव देते." मानसशास्त्र, शरीरशास्त्र मनाचा वेगवेगळ्या पद्धतीने अर्थ लावायचा प्रयत्न करते. परंतू माझ्या मते, मनाची मी वर केलेली व्याख्या अधिक सत्याच्या जवळ जावू शकेल अशी आहे. मन आणि विचार हे समानर्थी घ्यावेत असे मानले जाते जे मला मान्य नाही. मन जरी विचारांचे वहन करणारे महत्वाचे कारक असले तरी दोहोंचे भौतीक स्वरूप वेगळे आहे. किंबहुना "स्व" विषयकची जाणीवच या क्रियांतुन होत असते आणि त्यात सातत्याने बदल होत असल्याने आपल्या स्वविषयकच्या जानीवा वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या होत जातात त्या यामुळेच.  

विचार हे मनाने स्मृतिकेंद्रांत साठवलेल्या माहितींचे अंतर्गत वा बाह्य घटनांना दिलेले प्राथमिक प्रतिसादात्मक भौतिक विद्युत-चुंबकीय प्रक्षेपण असते. ते मन अभिव्यक्त करण्याची सुचना देत नाही तोवर भौतिक तरंगस्वरुपातच असून ते तुलनेने मनापेक्षा क्षीण शक्तीचे असतात व मेंदुत साठवले जात असतात. एका अर्थाने मनाचे दुय्यम स्वरुप म्हनजे विचार होत. या विचारांच्या तुलनात्मक क्षीणतेमुळे विचारांचे सापेक्ष अस्तित्व अल्पायू असते. पण काही स्थिती अशा असतात की या तरंगांची सापेक्ष तीव्रता ही अत्यधिक असते आणि बाह्य परिस्थिती ते तरंग शोष्ण्यास सक्षम असेल तर हे तरंग स्थायी स्वरुपात शोषले तरी जातात किंवा पिरिअडिकली उत्सर्जित तरी होत राहतात.

माणसांवर बाह्य चुंबकीय क्षेत्रांचा परिणाम होतोच, पण तो सर्वांवर सारखा नसतो. कोणावर किती आणि कसा परिणाम होनार हे त्या त्या व्यक्तीच्या जैवरसायनी संरचनेवर अवलंबुन असते. विचार-भावनांनाही जैव-विद्युत चुंबकलहरींचे अधिष्ठाण असल्यामुळे विशिष्ट परिस्थितीत, विशिष्ट लोकांवर रेझोनांसच्या (समगतीस्पंदन) तत्वावर त्यांचा परिणाम होऊ शकतो. त्यातुन भुते दिसने ते त्या भावना/विचार दुस-यात संक्रमीत होणे शक्य असते. कोणा अज्ञाताच्या भावना आपल्याच असल्याचा आभास त्यातुन निर्माण होऊ शकतो. असे असले तरी अशा परिस्थिती क्वचित निर्माण तर होतातच पण त्यांना बाह्य साठवणूक झालेल्या जैव-विद्युत तरंगांना उत्सर्जन होत राहिल्याने कालरेखेचेही मर्यादा असते. त्यामुळे हजार वर्षापुर्वी होऊन गेलेल्याचा पुनर्जन्म वाटावा अशी अफवाही पसरत नाही. दोन-तीन पिढ्यांपार हे संकल्पना अगदी श्रद्धाळू लोकांनीही मानलेली नाही. 

त्यामुळे आपण पुनर्जन्म म्हणतो ते नेमके कशाला हे समजाऊन घेतले पाहिजे. आत्मा हे स्वतंत्र एकक नाही. प्रत्येकाचा आत्मा वेगळा नसतो, असुही शकत नाही. वेगळ्या असतात त्या भावना आणि स्वविषयकच्या जाणीवा, ज्या उर्जेमुळे निर्माण होतात. जर असे आहे तर व्यक्तीचाच पुनर्जन्म होणे शक्य नाही. त्याच्या काही भावनोत्कट विचारांचा मात्र अल्पांश स्वरुपात का होईना पुनर्जन्म शक्य आहे तो असा. आणि दुसरे असे की वैज्ञानिक दृष्टीनेही मरणाने काही संपत नाही. आपले समस्त शरीर, मन हे भौतीक अस्तित्व असल्याने उर्जा अक्षय्यतेचा नियम तेही पाळते. त्या अर्थाने आपण अमरच असतो. 

मानवी सत्य हे भविष्याकडे क्रमाक्रमाने जात असते....कालच्या सत्याचे अनेक तुकडे आज असत्य म्हणुन नव्या सत्याच्या प्रकाशात फेकून द्यावे लागतात. आजच्या परिप्रेक्षात जुन्या काळातील सत्ये आजही सत्य मानणे हे धर्मवाद्यांसाठी ठीक आहे...तत्वज्ञानात त्याला स्थान नाही. मुळात ज्याला आपण भविष्य म्हणतो तो काळ किती आहे...सांत आहे कि अनंत आहे हेच मुळात आपल्याला माहित नाही. आज तो सांतही असु शकेल किंवा अनंतही असु शकेल किंवा त्याच्या वेगळ्या अजुनही अनेक मिती असतील एवढेच आपण म्हणु शकतो...अंतिम सत्य म्हणावे अशी स्थिती असु शकत नाही....कारण ते नेमके काय हेच माहित नाही. आधीच स्पष्ट केल्याप्रमाणे मनुष्य (व समस्त जीवसृष्टी) विश्वाचे जैवरासायनिक उत्पादन आहे. त्याला त्याच्या मर्यादा आहेत. कमी कि जास्त याबाबत बदल होऊ शकतो पण तो व्यक्तीपरत्वे बदलेल हे ओघाने आलेच!

माणुस इंद्रियांमुळे अनुभव घेतो. कोण घेतो? इंद्रिये विशिष्ट संरचनेची व जाणण्याची माध्यमे असतात. पण जाणनेही भौतिक असते. कारण जाणनारे इंद्रियही भौतिक संरचनेने बनलेले असते. ती संरचना उध्वस्त होणे म्हणजे आपण मृत्यु मानतो. पण संरचनेतील सामील एकुण घटकांचे काय? ते तर मरत नाहीत. फारतर विखंडित होतात आणि स्वतंत्र वाटचाल करु लागतात. ती वाटचालही बाह्य तसे घटकपरत्वे संरचनेनुसार नैसर्गिक आयुष्मानाशी निगडित असते. मग आपण "काळ" या राशीशी येतो. प्रश्न हा आहे कि अनुभव घेणारा एक बायालोजिकल उत्पादन आहे तर अनुभव घेनारे इंद्रियही बायालोजिकल उत्पादन...म्हणुणच सारे काही भौतिक नाही काय?

आणि जर सारेच भौतिक असेल तर अविनाशित्वाच्या नियमाप्रमाने ज्याला कायमचा मृत्यू म्हणता येईल तसा मृत्यू कसा अस्तित्वात असेल? काळ सांत असेल तर मग सर्वच गोष्टीना अंत आहे असे म्हनता येईल...आणि तो जर अनंत असेल तर अस्तित्वही अनंत आहे असे म्हनावे लागेल....नाही काय?

तेंव्हा मरणाची चिंता करण्यात काय अर्थ आहे? आणि पुनर्जन्म ही संकल्पना व्यक्तीच्या पुनर्जन्माशी न जोडता विखंडित स्वरुपात एकाच माणसाचे असंख्य जैवघटकांत पुनर्जन्म होतातच. ते असंख्यपण असणे हे मानसिक समाधानासाठी एकचपण असण्यापेक्षा अधिक चांगले आहे. मृत्यु हा जीवनाचा शेवट नाही. ती सुरुवातही नाही. ही समग्र वैश्विक सृष्टीच्या निरंतर चालनारी प्रक्रिया आहे. सृष्टीत नवी उर्जा निर्माण होत नाही आणि जी आहे ती कधी नाशही पावत नाही. त्यामुळे अजरामरता ही प्रत्येकाच्या भाळी अटळपणे चिकटलेलीच आहे. पण ती चांगला जन्म की वाइट जन्म याच्याशी कसलाही संबंध नसलेली आहे. मोक्ष नांवाची गोष्ट विश्व आहे तोवर अशक्य प्राय आहे कारण मुळात असण्यातच वैश्विक सत्य सामावलेले आहे. त्या अर्थाने आपला मृत्यु हा आपल्यापुरता मोक्षच आहे कारण आपल्या शरीरातील सारे भौतीक व अर्धभौतीक घटक विखंडीत होत नवे रुप धारण करणार आहेत. उलट त्याचाच आपल्याला आनंद असायला हवा आहे. 

पुनर्जन्म ते भुतेखेते यांचे अनुभव यांना मी असत्य मानत नाही पण त्याचे स्पष्टीकरण विज्ञानातुनच होते. सत्याचे तुकडे हळूहलू हाती येतात. आदिम काळी माणसाने स्वत:च्या मानसिक समाधानासाठी काही संकल्पना शोधल्या आणि त्यांचा आपल्याला अभिमानच असला पाहिजे. किंबहुना प्रतिकूल स्थितीतुन टिकत त्यांनी आपल्यासाठी महामार्ग बनवायचे काम केले ते अशाच काही संकल्पनांतुन. त्याबद्दल आदर ठेवत पुढची विवेकवादी वाटचाल मात्र आपण करणार नसु तर आपल्यासारखे महामुर्ख आपणच याबाबत कसलीही शंका बाळगायचे कारण नाही!

-संजय सोनवणी

5 comments:

  1. आत्मा...पुनर्जन्म...मोक्ष...प्रेतात्मे यावर तुम्ही खूप चांगल्या रीतीने प्रकाश टाकला,आज जनमानसात ज्या काही अंधश्रद्धा चिकटून आहेत, त्याच निर्मूलन करण्याचं श्रेय फक्त तुमच्या संशोधकाला देऊ इच्छितो.खूप छान सुंदर आर्टिकल आहे सर...����������अशीच उपयुक्त माहिती तुम्ही पुढेही आमच्या पर्यंत पोचवत रहाल हीच आशा करतो.

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. उत्तम विवेचन 👌

    ReplyDelete

ऐतिहासिक तथ्यांची तोडमोड

  ऐतिहासिक तथ्यांची तोडमोड करणे आणि लोकांची दिशाभूल करणे हा भाजपाचा पूर्वीपासून उद्योग राहिलेला आहे. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी नुकतेच नेह...