Wednesday, July 24, 2019

काश्मीर सम्राट ललितादित्याच्या इतिहासावर प्रकाश!

काश्मीर सम्राट ललितादित्याच्या इतिहासावर प्रकाश!

प्रसिद्ध लेखक आणि संशोधक संजय सोनवणी यांच्या पुस्तकाला महाराज्य राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी दिलेली प्रस्तावना.
भारतीय राज्यघटनेच्या विशिष्ट तरतुदीमुळे काश्मीर हा प्रांत भारताचा एक भाग असूनही इतर प्रांतांपेक्षा वेगळा वाटतो. हा झाला राज्यशास्त्रीय किंवा राज्यघटनाशास्त्रीय मुद्दा. त्याची इतिहासशास्त्रीय चर्चाही नेहमी होत असते, पण एरवी सुद्धा काश्मीर आणि उर्वरित भारत यांच्यात पुरेसे वैचारिक दळणवळण किंवा संवाद असतो असे म्हणता येत नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे काश्मीरचा इतिहास भारताच्या इतिहासाला नीटपणे जोडण्यात इतिहासकार यशस्वी झाले नाहीत. ही जोडणी मुद्दाम करायची अशातला भाग नाही. जोडणी मुळचीच आहे. ती फक्त दाखवून द्यायची आणि लिखित इतिहासाच भाग बनवायची हा मुद्दा आहे.
वरील वाक्यात ‘फक्त’ हा शब्द वापरण्यात आला असला तरी ते काम सोपे नाही. त्यासाठी सखोल अभ्यास आणि सूक्ष्म दृष्टी यांची गरज असते. पारंपरिक समजुतींच्या विरोधात जाऊन वेगळी मांडणी करण्याचे धैर्य लागते. प्रतिवाद करणाऱ्या संभाव्य विद्वानांना अंगावर घेण्याची तयारी लागते.
या सर्व गुणसमुच्चयाने युक्त असलेले ताज्या दमाचे इतिहासकार म्हणजे संजय सोनवणी. सोनवणींचे काश्मिरी सम्राट ललितादित्य चरित्र म्हणजे ही जोडणी करणारे महत्त्वाचे पुस्तक आहे.
अर्थात अशा प्रकारची चाकोरीबाहेरील मांडणी करणारा अभ्यासक अस्तित्वात असला तरी त्याची अशी मांडणी ग्रंथरूपाने प्रसिद्ध करण्याची वैचारिक आणि आर्थिक हिंमत करणारा प्रकाशकही लागतो. सुदैवाने सोनवणींच्या प्रस्तुत पुस्तकासाठी संजय नहार यांच्या रूपाने असा प्रकाशक मिळाला आहे.
संजय नहार हे रूढ अर्थाने व्यावसायिक प्रकाशक नाहीत. म्हणजे चिनार प्रकाशन ही केवळ आर्थिक लाभासाठी कार्यरत असणारी पेढी नसून एका विशिष्ट ध्येयात्मक उद्दिष्टासाठी धडपडणारी आणि त्यामुळे लाभालाभाचे हिशेब न मांडणारी संस्था आहे. भारत जोडणे, धर्माधर्मांमधील, जातीजातींमधील, प्रांताप्रांतामधील भेद आणि दुरावा संपुष्टात आणून देशाला ‘एकमय’ लोकांचे (हा महात्मा फुले यांचा शब्द) राष्ट्र बनवणे यासाठी ही धडपड चालू आहे. त्यासाठी जे समूह वा प्रदेश मुख्य प्रवाहात नाहीत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची तसेच मुख्य प्रवाहातील घटकांना या समूहांशिवाय, प्रदेशांशिवाय, मुख्य प्रवाह खऱ्या अर्थाने ‘मुख्य’ होत नाही याची जाणीव करून देण्याचीही आवश्यकता आहे. चिनार प्रकाशनाची भावंडसंस्था ‘सरहद’मार्फत नहार यांचे हे कार्यही चालू आहे.
खरे तर काश्मीर आणि महाराष्ट्र यांचे नाते फार प्राचीन आहे. संत ज्ञानेश्वरांच्या तत्त्वज्ञानावर आचार्य अभिनवगुप्त यांचा प्रभाव होता. ते काश्मीरी शैव तत्त्वज्ञानाचे शीर्षस्थ प्रतिनिधी मानले जातात, परंतु काश्मीरी शैव तत्त्वज्ञान हेच मुळात महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर येथे प्रवाहित झाले, असा विख्यात संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांचा दावा आहे. याच त्र्यंबकेश्वरातील ब्रह्मगिरी पर्वतावर निवृत्तीनाथांना गहिनीनाथांकडून नाथपंथीय तत्त्वज्ञानाची दीक्षा मिळाली आणि अर्थातच निवृत्तीनाथांकडून ज्ञानेश्वरांना. याचा अर्थ असा होतो की काश्मीरमधील उपरोक्त प्रत्यभिज्ञा शैव तत्त्वज्ञान आणि महाराष्ट्रातील नाथ शैव व पर्यायाने वारकरी तत्त्वज्ञान एकाच कुळातील आहेत.
पण या तात्त्विक मुद्द्याचीही गरज नाही. ज्ञानेश्वरांनी देवगिरी येथील ज्या यादव राजांच्या काळात ग्रंथसंपत्ती सिद्ध केली त्याच यादवांच्या दरबारात काश्मिरी पंडित शारंगदेव (त्याच्या दोन पिढ्यांपासून) आश्रयाला होता व त्याने भारतीय संगीतावरील आजही प्रमाण मानला जाणरा ‘संगीत रत्नाकर’ हा मूलभूत ग्रंथ लिहिला. या ग्रंथातील तात्त्विक चौकट व परिभाषा प्रत्याभिज्ञा ऊर्फ काश्मीरी शैव तत्त्वज्ञानाचीच आहे.
सोनवणींच्या ग्रंथाचा समावेश चरित्र किंवा इतिहास या वर्गात होतो याची मला कल्पना आहे. तत्त्वज्ञानाचा संदर्भ दिला तो महाराष्ट्र आणि काश्मीर यांच्यामधील संबंध अधोरेखित व्हावा म्हणून. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे घराणे काश्मिरी पंडितांचे होते. त्यांचे मेहुणे (म्हणजे विजयालक्ष्मींचे पती) रणजित पंडित या मराठी माणसानेच काश्मीरच्या आद्य इतिहासकार कल्हण पंडिताने लिहिलेल्या ‘राजतरंगिणी’ या इतिहास ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर केले होते. विशेष म्हणजे नुकतेच संजय नहारांनी या ग्रंथाचे मराठी भाषांतर प्रकाशित करून काश्मीर व महाराष्ट्र यांचे नाते अधिक दृढ केले. ज्येष्ठ लेखिका अरूणा ढेरे आणि प्रशांत तळणीकर यांनी त्याचा अनुवाद केला आहे. कल्हणच्या ‘राजतरंगिणी’ची परंपरा पुढे नेत त्यानंतरच्या राजांचा इतिहास सांगणाऱ्या जोनराजकृत ‘राजतरंगिणी’चा तळटीपांनी केलेला मराठी अनुवादही चिनारतर्फे प्रकाशित झाला आहे.
संजय सोनवणी यांच्या ‘ललितादित्या’चे प्रकाशन हा याच प्रक्रियेचा एक भाग आहे आणि ही प्रक्रिया पुढे अशीच चालू राहील याची मला खात्री आहे. हे चरित्र इतर सर्वच भारतीय भाषांमध्ये पोहोचले तर काश्मीरचे एकूणच भारताशी काय नाते होते याची जाणीव सर्वांनाच होईल. सद्यस्थितीत या प्रकारच्या जाणीवेची किती आवश्यकता आहे हे लक्षात घेतले तर हे एक प्रकारचे राष्ट्रीय कार्य आहे याविषयी शंका राहू नये.
कल्हणच्याच इतिहासावरून आणि त्यापूर्वीच्या ‘नीलमतपुराण’ या ग्रंथावरून असे म्हणता येते की काश्मीरच्या इतिहासाचा संबंध भारताच्या इतिहासाशी महाभारत युद्धाच्या पूर्वीच्या काळापासून संबंध आहे. जरासंध, गोनंद (पहिला) आणि दामोदराच्या मृत्यूनंतर दामोदराची पत्नी यशोमतीचा राज्याभिषेक आणि राज्य स्थापना खुद्द श्रीकृष्णाने केली होती. त्यानंतरचा प्रसिद्ध राजवंश म्हणजे कर्कोटक होय. या वंशातील सर्वात प्रसिद्ध राजा म्हणजे सोनवणींच्या चरित्र ग्रंथाचा नायक मुक्तापीड अर्थात ललितादित्य. सोनवणींच्या ग्रंथाची सुरूवात या कर्कोटक वंशाच्या विवेचनापासून होते आणि ते उचितच आहे. पुराणकारांनुसार कर्कोटक वंश हा एक नागवंश मानला जातो. त्याची ऐतिहासिक संगती लावायचा प्रयत्नही सोनवणींनी केला आहे. ती लावताना त्यांना अनुषंगाने वर्ण-जातीव्यवस्था, आर्य-अनार्य समस्या, संस्कृत-प्राकृत भाषेचा संबंध अशा विषयांना हात घालावा लागला आहे. हे सर्व विषय स्वरूपत:च वादग्रस्त म्हणता येतील अशा प्रकारचे आहेत. त्यांच्यावर चर्चा होत असते व होत राहील. (उदा. ‘शूद्र’ शब्दाची व्युत्पत्ती, जी शंकराचार्चांनी ‘ब्रह्मसूत्रभाष्य’ मध्ये दिली आहे.) पण या चर्चेत सोनवणींच्या मतांचीही दखल घ्यावी लागेल, इतकी ती महत्त्वाची आहेत. या संदर्भात आलेल्या ‘एकांग/एकंग’ शब्दाचा उल्लेख करायला हरकत नाही. ही संकल्पना सर्वत्र आढळते. तुकारामांच्या अभंगात वैष्णवांना अलंकारिकपणे ‘एकंग वीर’ असे म्हटले आहे.
कर्कोटक वंशाचा पहिला राजा दुर्लभवर्धन प्रज्ञादित्य म्हणजे कनौजचा राजा हर्षवर्धन यांचा समकालीन होय. दुर्लभवर्धन हा हर्षाचा मांडलिक असल्याचा विद्वानांचा दावा सोनवणींना मान्य नाही. दुर्लभवर्धनानंतर त्याचा पुत्र प्रतापादित्य सत्तेवर आला. त्याला चंद्रापीड, तारापीड आणि मुक्तापीड (म्हणजे ललितादित्य) असे तीन पुत्र होते. प्रतापादित्याच्या पश्चात अर्थातच चंद्रापीड गादीवर आला. चंद्रापीडाच्याच काळात पश्चिमेकडून अरबांच्या स्वाऱ्या सुरू झाल्या. मोहंमद बिन कासीम याने सिंधचा राजा दाहिर याला पराभूत करून त्याचे राज्य बळकावले.
मोहंमद बिन कासीमने केलेल्या सिंधवरील आक्रमणाचे पडसाद भारताच्या इतिहासात सतत उमटत राहिले आहेत, पण इतिहासकारांचे विवेचन या दोन सत्तांपुरतेच मर्यादित राहिले आहे. सोनवणी इतिहासाच्या कक्षा रूंदावतात आणि समकालीन चिनी तसेच तिबेटी सत्ताधीशांना आपल्या इतिहासाचा भाग बनवतात. वायव्येकडील छोट्या-मोठ्या सत्ताही त्यांच्या नजरेतून सुटत नाहीत. कासीमने दाहिरचा पराभव केल्यानंतर दाहिरचा मुलगा जयसिंह चंद्रापीडाच्या आश्रयाला काश्मीरमध्ये आला असल्याचे ते निदर्शनास आणतात. (हा जयसिंह परत सिंधमध्ये गेला व त्याने इस्लामचा स्वीकार करून सत्ता टिकवून धरण्यात कसेबसे यश मिळवले हा भाग वेगळा.) अर्थात सोनवणींनीच दाखवून दिल्याप्रमाणे चंद्रापीडाचे कार्य जयसिंहाला आश्रय देण्यापुरते मर्यादित नव्हते. तो अरबी आक्रमणाचा प्रतिकार करण्यासाठी तयार झालेल्या आसपासच्या हिंदू व बौद्ध सत्ताधीशांच्या आघाडीचा घटक होता. या सर्वांनी केलेल्या प्रतिकारामुळेच कासिमला मुलतानमध्येच थोपवता आले, असे प्रतिपादन आहे. या प्रतिकारात सामील होण्याचे आवाहन चंद्रापीडाने चीनच्या सम्राटालाही  केले होते, हे ते चिनी साधनांवरून सांगतात. चीनच्या हितसंबंधांशी निगडीत असलेले व्यापारी मार्ग आक्रमकाच्या कक्षेत येत असल्याने हे आवाहन संयुक्तिकही होते. या मार्गांवर कब्जा मिळवण्याचा तिबेटच्या राजाचाही इरादा होता. अशा वेळी चंद्रापीडाने चीनच्या राजाला रसद व कुमक पाठवून मदत केली.
सामरिक शास्त्राच्या दृष्टीने पाहता काश्मीरचे स्थान या सत्ताव्यूहात केंद्रवर्ती दिसते. चीन, आक्रमक महासत्ता होऊ पाहणारा तिबेट, वायव्येकडील छोटीमोठी राज्ये व तेथपर्यंत चाल करून आलेले अरबी आक्रमक आणि दक्षिणेस कनोजचे साम्राज्य असा हा पट आहे. सोनवणींच्या विवेचनावरून असे निश्चित म्हणता येते की, काश्मीरच्या कर्कोटक राजांनी काश्मीरचे हे स्थान ओळखून व विचारात घेऊनच राजनीतीची आखणी केली व त्यात ते लक्षणीयरित्या यशस्वीही झाले. कासीम काश्मीरच्या (पंजाबमधील) सीमेपर्यंत म्हणजे जालंदरपर्यंत पोहोचला खरा, परंतु चंद्रापीडाच्या कडव्या प्रतिकारामुळे त्याला ती मोहीम अर्धवट सोडून हिमाचल प्रदेशातील कांगराकडे मोर्चा वळवावा लागला. सोनवणींच्या हकीगतीला मूळ अरबी साधनांचा आधार आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. अरबांच्या या संकटाला तोंड देण्यासाठीच कनोजचा राजा यशोवर्मा याच्याबरोबर युती करायची कल्पना चंद्रापीडाला सुचली असण्याची शक्यता सोनवणी व्यक्त करतात. तिला निराधार म्हणता येणार नाही.
दुर्दैवाने चंद्रापीडाचा भाऊ तारापीड कपटी व स्वार्थी निघाला. चंद्रापीडाचा मृत्यू घातपाताने घडवून आणून तो गादीवर आला. पण अर्थात त्याने परराष्ट्र नीतीत चंद्रापीडाचेच धोरण पुढे चालवले. चीन व तिबेट यांच्या संघर्षात त्याने चीनला सहकार्य केले.
यासंदर्भात चीन म्हणजे या काळातील महासत्ता मानून त्यानुसार इतिहास लिहिण्याची पद्धत चुकीची असल्याचे सोनवणी, तानसेन सेन यांच्या मताचा प्रतिवाद करीत दाखवून देतात. कल्हणाने तारापीडाचे जणू खलनायक असे चित्रीकरण केले आहे. त्याच्याशी ते तार्किक मुद्दे व चिनी-तिबेटी पुरावे उपस्थित करून असहमती प्रगट करतात.
तारापीडाचा मृत्यू आकस्मिक आणि गूढ रीतीने झाला आणि चरित्रनायक मुक्तापीड ललितादित्याने राज्यारोहण केले. हे वर्ष इ. स. ७२४-२५ असल्याचे सोनवणी मानतात. यासंदर्भात ते राज्यारोहण वर्ष इ. स. ६९५ आसपासचे असल्याचा शंकर पांडुरंग पंडित यांच्या मताचा प्रतिवादही करतात. योगायोगाने शंकर पांडुरंग पंडित हे राजतरंगिणीचा इंग्रजी अनुवाद करणाऱ्या रणजित पंडितांचे चुलते होते. त्यांनी ‘वाक्पतीच्या गौडवहो’ या प्राकृत काव्याचे संपादन केले असून त्याच्याच प्रस्तावनेत ललितादित्य इ. स. ६९५ मध्ये गादीवर आल्याचे म्हटले आहे. चिनी दरबारातील नोंदी अप्रमाण मानूण कल्हणाने दिलेल्या कालगणनेवर विसंबण्याकडे पंडितांचा कल दिसतो. याउलट सोनवणी चिनी दरबारातील नोदींना महत्त्व देताना दिसतात. या नोंदीप्रमाणे चंद्रापीड हा किमान ७२०  इसवीपर्यंत राज्यावर होता. त्यानंरची तारापीडाची अल्प कारकीर्द जमेस धरून ललितादित्याचे राज्यारोहणवर्ष इ. स. ७२४/७२५ असल्याचे सोनवणी प्रतिपादन करतात. इतकेच नव्हे तर कल्हणावर सर्वस्वी अवलंबून न राहता समकालीन अन्य पुरावे विचारात घेऊन ललितादित्याच्याच नव्हे तर एकूणच कर्कोटक घराण्याच्या इतिहासाची पुनर्रचना केली पाहिजे, असे ते सुचवतात. त्यांचे स्वत:चे लेखन हे याच दिशेने टाकलेले पाऊल आहे हे वेगळे सांगायची गरज नाही.
मोहंमद बिन कासीमनंतर जुनैद नामक अधिकाऱ्याची नेमणूक बगदादच्या खलिफाने सिंध प्राताचा गव्हर्नर म्हणून केली होती. तो स्थानिक सत्ताधाऱ्यांकडून खंडणी मागू लागला. ललितादित्याने गादीवर आल्यानंतर सर्वप्रथम जुनैदवर चाल करून त्याचा पराभव केला व या खंडणी प्रकाराला आळा घातला. या घटनेची नोंद इतिहासाने नीट घेतली नाही ही सोनवणींची  खंत आहे. अशा प्रसंगी अरबी साधने लढाया झाल्याचे सांगतात, पण त्याचा नेमका अंत काय झाला हे सांगत नाहीत. याचा अर्थ त्यांनी पराभव झाला असल्याचे मान्य केले आहे, असे सोनवणींचे म्हणणे आहे. सोनवणी हे इतिहास लेखनाचे एक वेगळेच प्रमाणशास्त्र घडवीत असल्याचे म्हणता येईल. (असा प्रयत्न पूर्वी कॉ. शरद पाटील यांनी केला होता.) ‘‘शिवाय नंतरचा इतिहास पाहिला तर हे समजले की मोकळ्या जागांमध्ये नेमके काय भरायचे आणि इतिहास कसा पूर्ण करायचा,’’ हे त्यांचे विधान पुरेसे स्पष्ट आहे. या पराभवामुळेच खलिफाने जुनैदला परत बोलावून तामिम नावाच्या अधिकाऱ्याला त्याच्या जागी नियुक्त केले. ललितादित्याने कनोजचा सम्राट यशोवर्मा याच्याशी आघाडी करून अरबांना यशस्वी तोंड दिले, असे सोनवणींचे विवेचन आहे. जुनैदनंतरचा गव्हर्नर तामिम पळून गेला आणि त्याच्यानंतर आलेल्या अल हकम याच्या वाट्यालाही पराभवांची मालिकाच आली, असे सोनवणींचे प्रतिपादन आहे.
ललितादित्य आणि यशोवर्मा यांच्या संयुक्त आघाडीने तिबेटवर हल्ला करून तिबेटने बळकावलेले महत्त्वाचे पाच व्यापारी मार्ग सोडवले आणि तिबेटच्या आक्रमक वर्चस्ववादाला आळा घातला. ललितादित्याने चीनच्या राजाकडे पाठविलेल्या शिष्टमंडळाकडे सोपवलेल्या पत्रात याचा उल्लेख आहे. चिनी सम्राटाने ललितादित्याला राजा म्हणून मान्यता दिली. याचा अर्थ तानसेन सेन यांनी ललितादित्य चीनचा मांडलिक होता असा लावला आहे. तो सोनवणींनी पूर्णपणे त्याज्य ठरविला.
सोनवणी आणखीही एका महत्त्वाच्या घटनेकडे लक्ष वेधतात. अल्बेरूनी या अरब लेखकाने लिहिलेल्या ‘किताब अल् हिंद’ या ग्रंथानुसार राजा मुत्ताई याने तुर्कांवर मिळविलेल्या विजयाप्रित्यर्थ काश्मिरी लोक दरवर्षी एक उत्सव साजरा करीत असत.
हा मुत्ताई म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून काश्मिरी सम्राट मुक्तापीड म्हणजेच ललितादित्य होता हे स्पष्ट आहे. अल्बेरूनीचा हा उल्लेख ललितादित्याने तोखारीस्तानवर मिळवलेल्या विजयाचा आहे.
या संदर्भातील सोनवणींचे विधान विषादपूर्ण असले तरी सत्य म्हणावे लागते ‘‘मधल्या काळाबद्दल इतिहास पूर्णतया व आश्चर्यकारकरित्या मौन आहे.’’
चिनी, तिबेटी आणि अरबी साधनांचा वेळ घालत सोनवणींनी इतिहासाला आपले मौन सोडायला लावले आहे, असे वाचक नक्कीच म्हणतील. सोनवणींच्या या लेखनाने इतिहासाचे चीनकेंद्रीत प्रारूप मागे पडून काश्मीरकेंद्रित प्रारूत विकसित होईल, अशी शक्यता आपण वर्तवू शकतो.
अरब आणि तिबेट या दोन शत्रूंवर मात करण्यासाठी ललितादित्य आणि यशोवर्मा एकत्र आले असले व त्यांना त्या काळात यश मिळाले असले तरी त्या दोघांमध्येच संघर्षाची ठिणगी पडायला वेळ लागला नाही. या संघर्षाची परिणिती यशोवर्माच्या पराभवात व त्याने काश्मीरचे मांडलिकत्व स्वीकारण्यात झाली. या सर्व प्रकारचे वर्णन सोनवणी वाक्पतीचे ‘गौडवहो’ तसेच ‘प्रभावकचरित्र’, ‘प्रबंधकोश’ आणि बाप्पाभट्टी सुचरिते या जैन साधनांच्या आधारे केले आहे
यशोवर्माच्या पराभवानंतर ललितादित्याचे राज्य हे भारतातील सर्वात मोठे राज्य बनले, याकडे सोनवणी लक्ष वेधतात. याचा अर्थ असा होतो की, चंद्रगुप्त, अशोक, विक्रमादित्य, हर्ष अशा सम्राटांच्या बरोबरीने ललितादित्याची गणना करायला हवी.
कल्हणाने दिलेल्या माहितीनुसार उत्तरकाळात ललितादित्याने सर्व भारतभर मोहिमा करून चारी दिशांकडील राज्यांवर विजय संपादन केला. तो दिग्विजयी सम्राट ठरला. इतकेच नव्हे तर भारताबाहेरील वायव्य दिशांकडील (ज्याला उत्तरापथ म्हणत) राज्यांनाही त्याने जिंकले. कल्हणाने दिलेली हकीगत सोनवणींनी उद्धृत केली आहेच, परंतु ती शब्दश: सत्य मानावी असा त्यांचा आग्रह नाही. किंबहुना तिच्यात सांकेतिकता व अतिशयोक्ती असल्याचे  त्यांनाही मान्य आहे. अर्थात या वर्णनातील ७५ टक्के भाग अतिशयोक्त मानला तरी उरलेल्या भागाच्या आधारे ललितादित्य हा अशा प्रकारचा शेवटचा दिग्विजयी सम्राट होता, असे निश्चित म्हणता येते. ‘‘ललितादित्याने अरबांना भारतातून तर हुसकावलेच पण तत्कालीन सामर्थ्यशाली असलेली सत्ता तिबेटलाही रोखण्यात त्याने यश मिळवले, ही त्याची अद्वितीय कामगिरी होय. जागतिक राजकीय अंदाधुंदीच्या काळात ललितादित्याने जे यश मिळवले ते पाहता त्याला भारतातील अशोकानंतरचा दुसरा महान सम्राट म्हणायला प्रत्यवाय नसावा.’’ हे सोनवणीकृत ललितादित्याचे मूल्यमापन यथार्थ व यथोचित म्हणावे लागेल.
सम्राट ललितादित्य लढवय्या सेनानी आणि मुत्सद्दी राजकारणी तर होताच, परंतु एक शासक म्हणूनही त्याची कामगिरी महत्त्वाची आहे. त्याने प्रजेचे पालन केले. धर्माधर्मामध्ये भेदभाव केला नाही. अनेक मंदिरे, स्तूप, उद्याने निर्मिली. हे त्याचे रचनात्मक कार्यही उपेक्षणीय नाही. सोनवणींनी त्याचा यथायोग्य परामर्श घेतला आहे. ललितादित्याच्या पर्याला ते ‘सुवर्णपर्व’ म्हणतात हेही योग्यच आहे.
संजय सोनवणींच्या या पुस्तकामुळे आणि संजय नहारांच्या प्रकाशन कार्यामुळे काश्मीर भारताच्या मुख्य प्रवाहातील प्रदेश होता ही वस्तुस्थिती प्रकर्षाने पुढे येत आहे. याचा परत एकदा निर्देश करीत आणि त्यांना शुभेच्छा देत प्रस्तावनेला पूर्णविराम देतो.
डॉ. सदानंद मोरे, अध्यक्ष, महाराज्य राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ
…..
काश्मीरचा सम्राट ललितादित्यसंजय सोनवणीचिनार पब्लिशर्स, सरहद रिसर्च सेंटरमूल्य २८० रु.

No comments:

Post a Comment

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...