भारतीय धर्मांमध्ये अनेक देवी-देवतांची नामे समान असली तरी त्या देवी-देवतांबद्दलच्या कल्पना मात्र सर्वस्वी वेगळ्या आहेत. नावे समान आहेत म्हणून त्या देवता एकच व त्या अन्य धर्मियांकडून स्विकारल्या गेल्या असेही नाही. असे असले तरी समान नावांमुळे अनेकदा धार्मिक व सांस्कृतीक गोंधळ निर्माण करत एक प्रकारचा धार्मिक वर्चस्वतावाद निर्माण केला जातो. सरस्वती देवी जशी जैनांनी वैदिकांकडून स्विकारलेली नाही तशीच लक्ष्मीही स्विकारलेली नाही. लक्ष्मीबाबतच्या वैदिक, हिंदू, बौद्ध आणि जैनांच्या संकल्पना अत्यंत भिन्न असून आपापल्या धर्माच्या मुलभूत तत्वज्ञानाचा वरकरणी समान वाटणा-या दैवतांवर त्या धर्म तत्वज्ञानात्मक संकल्पनेचा प्रभाव पडला असल्याचे आपल्याला दिसून येईल.
भारतीय धर्मांचा उगम वेदांमधुनच झाला या संकल्पनेचा पगडा बराच काळ भारतीय जनमानसावर होता. प्रत्येक देवतेचा उगम वेदात शोधायची एक पद्धत होती. प्ण आधुनिक काळात अनेक विद्वानांनी या समजाला तडा दिला असून उलट वैदिक धर्मियांनीच एतद्देशीय धर्मांतुन अनेक देवता स्विकारत त्यांचे वैदिकीकरण केले हे सिद्ध झाले आहे. लक्ष्मी या देवतेचे तसेच झाले आहे. वैदिक धर्मात मुळात मुर्ती बनवणे व पूजा करणे हा भाग सूत्र काळापर्यंत, म्हणजे इसवी सनपूर्व दुस-या शतकापर्यंत अस्तित्वात नव्हता. यज्ञात आहुती देऊन अमूर्त देवतांचे यजन करणे हेच वैदिक धर्माचे मुख्य कर्मकांड होते. त्यांनी मुर्तीपूजा, प्रतीक पूजा स्विकारली ती एतद्देशिय शिवप्रधान लोकधर्मातून. समण संस्कृती वेदपूर्व काळापासून मुर्तीपूजा करत नव्हती तर योगाद्वारे तप, व्रत, करणे व मोक्ष मिळवणे हेच या संस्कृतीचे मूख्य ध्येय होते.
वैदिक देवतांत लक्ष्मी ही देवता म्हणून उल्लेखली गेलेली नाही. श्री नामक देवतेचा उल्लेख मात्र अनेकदा येतो. "श्री" ही देवता वैदिक ऋचांनुसार क्षमता, कौशल्य आणि शक्तीशी निगडित होती. काही ऋचांमध्ये श्री ही सौंदर्य, तेज आणि उच्च पदाची देवता बनल्याचे आपल्याला दिसते. शेवटी श्री ही राजपद, राजासन व त्याची सत्ता याची अधिष्ठात्री देवता असा या देवतेचा वैदिक धर्मात विकास झाला. ऋग्वेदाची रचना संपली ती भारतात वैदिक धर्मीय आल्यानंतर. ही रचना संपल्यावर ऋग्वेदाला जी परिशिष्टे जोडली गेली त्यात ’श्रीसूक्त’ नामक परिशिष्ट जोडले गेले. यात श्री देवतेची कार्यकक्षा बरीच वाढवण्यात आली. श्रीसुक्ताची रचना ही महावीर-बुद्ध काळापुर्वीची, म्हणजे सरासरी सनपूर्व सातव्या शतकातील रचना मानण्यात येते. श्रीसूक्तानुसार श्री ही देवता कीर्ती अणि वैभवाची देवता बनली. श्रीचे यजन विपूल धनसंपत्ती प्राप्त करण्यासाठी, पशुधन आणि अन्न प्राप्तीसाठी करत अलक्ष्मी, म्हणजे दारिद्र्य, वंचना व दुर्भाग्य दूर ठेवण्यासाठी करावे असेही श्रीसुक्तात म्हटले आहे. या सुक्तात अलक्ष्मी ही श्री देवतेची बहीण मानली असली तरी श्रीचे नाव लक्ष्मी असल्याचे कोठेही सूचन नाही. श्री ही रथात बसली असून त्या रथांना उत्कृष्ठ अश्व जोडलेले असून ती हत्तींच्या चित्कारांनी उत्साहित होते असे श्रीसुक्ताचे म्हणणे आहे. एका अर्थाने श्री ही देवता राजसत्तेची अधिष्ठात्री देवता असल्याचे ऋग्वैदिक मंत्रकर्त्यांचे मत होते. तिचे चार पूत्र असून कर्दम, आनंद, श्रीद्र व चिक्लित ही त्यांही नावे होत. यावरुन ही देवी सुफलनतेची देवताही मानली जाऊ लागली होती असे विद्वानांचे मत आहे.
श्री ही विष्णुपत्नी असल्याचा मात्र निर्देश नाही. विष्णुला ऋग्वेदात साडेतीन सुक्ते अर्पण केली गेली असली तरी तो ऋग्वेदात इंद्राचा सोबती व दुय्यम देवता आहे. पण त्याला पत्नी असल्याचा कोठेही उल्लेख येत नाही. ऋग्वेदातील श्री ही देवता कशी विकसित झाली हे आपण पाहिले. लक्ष्मीचा उल्लेख ’अलक्ष्मी’ म्हणुन आलेला आहे. पण श्री देवतेला लक्ष्मी म्हटले गेले नाही. याचाच दुसरा अर्थ असा की, वैदिक लोक भारतात आल्यानंतर त्यांना एतद्देशिय लक्ष्मी या देवतेचा परिचय झाला पण तिचे नाव सरळ स्विकारण्याऐवजी प्रथम विरोधार्थाने (अलक्ष्मी म्हंणत) स्विकारत आपल्याच श्री या देवतेला लक्ष्मी या लोकधर्मातून आलेल्या देवतेचे गुण चिकटवले. भारतात वेदपूर्व काळापासून लक्ष्मी ही देवता गजलक्ष्मी या स्वरुपात पुजली जात होती आणि ती सुफलनतेची (धनधान्याच्या समृद्धीची) देवता होती. गज (हत्ती) हे मेघांचे प्रतीक मानले जात असल्याने हत्तीच आपल्या सोंडांतून जलवर्षा करत आहेत या समजुतीला लक्ष्मीसोबत गजांनाही स्थान मिळणे सुफलनता प्रक्रियेत आवश्यकच होते. ही देवता मुळात यक्षिणीच्या रुपात पुजली जात होती हे तेर येथील उत्खननात सापडलेल्या हस्तीदंती मूर्ती आणि अमरावती येथील कोरीव शिल्पावरून सहज लक्षात येण्यासारखे आहे.
भारतातील यक्ष संस्कृती अत्यंत पुरातन असून या संस्कृतीचे उन्नयन मगध, अंग-वंग-कलिंग प्रातात फार मोठ्या प्रमाणावर झाले. त्यामुळेच की काय मगधात विकसित झालेल्या समण परंपरेने यक्षांना आपल्या धर्म व्यवहारात स्थान दिले. जैन व बौद्ध धर्म त्याला अपवाद राहिले नाहीत. लक्ष्मी ही यक्षिणीच होय याबद्दल विद्वानांत दुमत नाही. (आदिमाया, ले. अशोक राणा, प्राजक्त प्रकाशन, पृ. ५३-५४) लक्ष्मी ही एतद्देशिय देवता यक्षिणी स्वरुपातच पूजली जात होती याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. एक परंपरा असे मानते की लक्ष्मी ही कुबेराची (वेस्सवन) सहचारिणी असून दोघेही धन-संपत्तीचे भांडार आहेत. कुबेर हा यक्षांचा अधिपती मानला जातो. शिव आणि समण संस्कृतीत कुबेरालाही महत्वाचे स्थान आहे. प्रगती आणि सुफलनता हा या दोन्ही देवतांचा स्थायीभाव असून जेथे संपत्ती आणि राजशक्ती आहे तेथे या जोडप्यापैकी कोणीतरी एकाचे अधिष्ठान आहे असे मानले जाते. यक्ष हे साधारणतया वृक्ष, वल्लरी, फुले किंवा सरोवरे यांच्या सन्निध्यात असतात व तसे प्राचिन शिल्पांकणही आपल्याला खूप ठिकाणी आढळते. उपनिषदांत यक्ष म्हणजे अद्भूत प्रकाश असा अर्थ होतो. वेदविरोधी तत्ववेत्त्यांनी यक्ष संस्कृतीला गौरवाने मस्तकी घेतले. यक्ष म्हणजे प्रकाशमान असाही अर्थ असल्यामुळे यक्षांचे स्वागत दीप पेटवून केले जाते हा सांस्कृतिक संदर्भ या परिप्रेक्ष्यात आपल्याला लक्षात घ्यावा लागतो.
यक्षांच्या लोकप्रियतेमुळे यक्षमह (जक्खमह) नावाचा एक लोकोत्सवच साजता केला जात असे याचे पुरावे अंगविज्जा तसेच अन्य साहित्यात्यून आपल्याला मिळतात. भगवान महावीर ध्यानस्थ असतांना एका यक्षाने त्यांना वंदना दिली होती असेही उल्लेख जैन साहित्यात मिळतात. जैन धर्मात प्रत्येक तीर्थंकरासोबत संरक्षक यक्ष-यक्षीणींची जोडी दर्शवली जाते. यक्षीणी तीर्थंकरांचे रक्षण करतात अशी श्रद्धा जैनांमध्ये आहे. उदाहणार्थ नेमिनाथांसोबत अंबिका (अथवा अंबा) नांवाची यक्षी असते तर नेमीनाथांसोबत चक्रेश्वरी. जैनांचा यक्षपुजेला विरोध असुनही या यक्षांची अनेकदा पुजा केली जाते. अंबा हे लक्ष्मीचेच एक पर्यायवाची नाव असून लक्ष्मीचे अस्तित्व जैन धर्मियांनी यक्षीणी या स्वरुपातच कायम ठेवले पण तिला धन-संपत्तीची देवता न मानता संरक्षक देवता असे तिचे स्वरूप ठेवले. कोल्हापूर येथील महालक्ष्मीला अंबाबाईही म्हटले जाते हे येथे उल्लेखनीय आहे. जैन पुराकथांनुसार फक्त सरस्वती व लक्ष्मी यांचा निवास उर्ध्वलोकात असून अन्य देवता त्यापेक्षा खालील लोकांत राहतात अशी मान्यता आहे. त्याउलट वैदिक साहित्यात आपल्याला यक्षांची निंदाच अधिक केली गेलेली दिसते.
त्यामुळे लक्ष्मी ही मुळात भारतीय कृषी संस्कृतीतून उदयाला आलेली, यक्ष परंपरेतील देवता होती. सिंधू संस्कृतीत मातृका देवतांचे पूजन होत असे याचे मुद्रांकित पुरावे मिळतात. जसे वैदिक भारतात आले तेंव्हा त्यांनी लक्ष्मीला जरी आधी स्विकारले असले तरी ते ’श्री’ स्वरुपात तिला लक्ष्मीचे गुण चिकटवत स्विकारल्याचे आपल्याला स्पष्ट दिसते. पण पुढे एतद्देशिय लक्ष्मीच्या लोकप्रियतेमुळे श्री चे नामांतर "श्रीलक्ष्मी" असे करत वैदिकांनी समतोल साधायचा प्रयत्न केला. त्याच वेळी माया या पुरातन देवतेलाही त्यांनी श्रीलक्ष्मीमध्ये विलीन केले. माया ही देवता प्राचीन असून ही असूरांची वैभवदात्री देवता होती. किंबहुना लक्ष्मीचेच ते पर्यायवाची नाव होते. लक्ष्मीचे एक नाव ’मा’ हे आहे. माया शब्दाचा हा संक्षेप आहे. प्राकृत भाषांत मा हे लक्ष्मीचेच पर्यायी नाव आहे. शतपथ ब्राह्मणानुसार माया हा असुरविद्येचा पर्याय मानला गेला होता. (श.ब्रा. ११.४.३.११) वैदिकेतर संस्कृतील जनसमुहांना वैदिक यांनी असुर या नावानेच संबोधले असून त्यांचे प्रदेश मगध, अंग, वंग, कलिंग हे असल्याचेही शतपथ ब्राह्मणाने नोंदवले असून तेथील लोक वैदिकांना त्या प्रांतात प्रवेशू देत नाहीत म्हणून आरंभीच्या काळात वैदिकांनी हा प्रदेश त्याज्ज्य मानला होता असेही शतपथ ब्राह्मणावरून कळते. पण पुढे वैदिकेतरांत शिरकाव करुन घेण्यासाठी वैदिकांनी अनेक एतद्देशिय देवता स्विकारल्या. त्यातच लक्ष्मीही स्विकारली.
"आर्य आणि एतद्देशिय जेंव्हा एकमेकांच्या संपर्कात आले आणि कल्पनांची देवघेव सुरु झाली त्या कोणत्यातरी काळात या माया देवतेला आर्यांची मान्यता प्राप्त झाली असली पाहिजे. ही देवी तेज, कांती, ऐश्वर्य यांची देवता असल्यामुळे आर्यांच्या अंतरात तिने प्रतिष्ठेचे स्थान मिळवले. लक्ष्मीचे एक नाव मा असे आहे. हे नाव माया या शब्दाचेच सूचन करते." (भा.सं.को. खंड ८, पृ. ३३२)
थोडक्यात वैदिक धर्मियांनी श्री या देवतेत मा किंवा लक्ष्मी या देवतेला विलीन करण्याचा प्रयत्न केला. भरहूत येथील एका देवीप्रतिमेच्या खाली ’सिरिमा देवता’ असे अक्षरांकण असून ही देवता म्हणजे वैदिकांची श्री आणि लक्ष्मी यांचे वैदिकांनी एकीकरण केल्यानंतरचे मा अथवा माया देवीचे हे नवरुप होय असे अनेक विद्वानांचे मत आहे. येथवर हे लक्षात आलेच असेल की लक्ष्मी ही देवता मुळात वैदिक धर्मातून जन्माला आलेली नसून वैदिकांनी या देवतेचा एतद्देशियांकडून आधी श्री या नांवाने व नंतर श्रीलक्ष्मी या नावाने स्विकार केला.
असे असले तरी तोवर वैदिक देवता विष्णू व श्री किंवा लक्ष्मी पती-पत्नी असल्याचे उल्लेख वैदिक साहित्यात येत नाहीत. ते येतात ते तिस-या शतकानंतर लिहिल्या गेलेल्या पौराणिक साहित्यात जेंव्हा विष्णू ही वेदांतील दुय्यम देवता पुढे आणत तिला वैदिक धर्मियांनी मुख्य स्थान दिल्यानंतर. ऋग्वेदात विष्णू ही देवता उपेंद्र या दुय्यम स्वरुपात येत असून ती इंद्राची सहायक आहे. ऋग्वेदात विष्णुला अर्पण केलेली केवळ साडेतीन सूक्त असून विष्णू हा सुर्याचेच प्रतिरुप मानला गेला आहे व विष्णू हा तीन पावलांत पृथ्वी, अंतरिक्ष आणि पाताळ आक्रमित करतो असे म्ह्टले आहे. (ऋ. १.१५५, ५) थोडक्यात सुर्याच्या उदयापासून अस्तापर्यंतच्या तीन अवस्थांचे हे रुपक होते. त्याला पत्नी असल्याचे सूचन ऋग्वेदात नाही. श्रीसुक्तातही विष्णू हा श्रीचा पती असल्याचे उल्लेख नाहीत.
पण एतद्देशिय धर्मपरंपरांतून लक्ष्मीला घेत तिला वैदिकीकरण करत विष्णूची पत्नी बनवण्यात आले. ती धनसंपत्तीचे स्वामिनी असली तरी तिचे स्थान विष्णुच्या बरोबरीने नाही तर त्याच्या पायाशी दाखवण्यात आले. लक्ष्मी समुद्र्मंथनातून प्राप्त झाली अशाही पुराणकथा बनवण्यात आल्या. असे असले तरी हिंदू, जैन आणि बौद्धांनी लक्ष्मीपूजन अथवा तिचे महत्व आपापल्या पारंपारिक पद्धतीने सुरु ठेवले. गुप्त काळात वैदिक धर्माला मोठ्या प्रमाणात राजाश्रय मिळाल्यानंतर चवथ्या शतकापासून लक्ष्मीच्या प्रतिमा नाण्यांवर आढळायला सुरुवात होते. याच काळात विष्णू ही अत्यंत महत्वाची देवता बनत अवतार कथा निर्माण करत वैदिक धर्माने प्राबल्य मिळवायला सुरुवात केली. हा काळ भारतातील धार्मिक व तत्वविचारातील उलथापालथीचा काळ मानण्यात येतो.
जैनांत मात्र नेमीनाथांची संरक्षक यक्षिणी म्हणून अंबिकेचे स्थान राहिले तर बौद्ध धर्मीयांनी भारहूतसारख्या स्तुपांच्या तोरणांवर गजलक्ष्मीचे अस्तित्व स्वतंत्र स्वरुपात कायम ठेवले. जैन धर्मीयांनीही गजलक्ष्मीची परंपरा अव्याहत ठेवली. श्रवणबेळगोळ येथील बाहुबली मुतीच्या प्रवेशद्वारावर सन ९१० मधील गजलक्ष्मीची प्रतीमा कोरलेली दिसते. थोडक्यात समण संस्कृतीत यक्षांचे स्थान मुर्तीपूजा मान्य नसतांनाही कायम राहिले. असे का झाले याचा आढावा आपण घेऊयात.
भगवान महावीरानंतर जैन धर्माचा प्रसार वेगाने होऊ लागल्यानंतर या धर्मात आलेल्या नवांगतांनी आपापल्या श्रद्धाही सोबत आणल्या. ज्या मगधादी भागात जैन व बौद्ध धर्म अस्तित्वात आले तेथे यक्ष संस्कृतीचा मोठा प्रभाव असल्याने त्याला झिडकारणे सोपे नव्हते. जैन विद्वानांनी लक्ष्मीचा आपल्या धर्म-तत्वज्ञानात समावेश होऊ दिला नाही. यक्षांना स्थान दिले असले तरी ते दुय्यम देवता म्हणून ठेवण्यात आले. तिच्या पूजनाला सुरुवातीला विरोधच करण्यात आला. लक्ष्मी म्हणजे जैन धर्मानूसार "निर्वाण" असा नवा अर्थ लक्ष्मीला देण्याचा प्रयत्न झाला. जैन धर्मानुसार दीपावलीच्या दिवशी तीर्थंकर भगवान महावीरांना निर्वाणाची प्राप्ती झाली तर त्यांचे प्रमूख शिष्य गौतम गणधरांना केवलज्ञानाची प्राप्ती झाली. निर्वाण म्हणजे लक्ष्मी तर केवलज्ञान (श्रूतज्ञान) म्हणजे सरस्वती. त्यामुळे दीपावलीच्या दिवशी जैन लक्ष्मी व सरस्वतीपूजन करतात असे मूनी पुलकसागर यांनी आग्रहाने प्रतिपादित केले आहे आणि जैन तत्वज्ञानाशी ते सुसंगतही आहे. समण संस्कृतीत अपरिग्रहाला सर्वोच्च महत्व असतांना धनदायिनी या स्वरूपात जैनांनी लक्ष्मीला स्विकारले असण्याची शक्यता नाही. यक्ष-यक्षिणींचे स्थान जैन धर्मात संरक्षक देवता म्हणून दुय्यम स्वरूपात कायम राहिले.
असे असले तरी वैदिक व हिंदू धर्मीयांच्या सहवासाने जैनांत सरस्वती (जी मुळची श्रुतदेवता होती) आणि लक्ष्मी (जी मुळची संरक्षक यक्षिणी होती) त्यांचे स्वरूप काही अंशी बदलले आणि त्यांचे पूजनही होऊ लागले. इतकेच नव्हे तर लक्ष्मी ही विष्णूची पत्नी आहे ही वैदिक संकल्पनाही स्विकारली गेली व तिचा "निर्वाण" हा जैन तत्वज्ञानातील अर्थ हरपला. अनेक जैन मंदिरांत लक्ष्मी ही धनदेवतेच्या स्वरूपात प्रतिमांकित केली जाऊ लागली. खजुराओ येथील भगवान पार्श्वनाथांच्या मंदिरात तर लक्ष्मी ही विष्णुसोबत दाखवली गेली आहे. यावरुन या काळात जैनांनी हिंदू धर्मसंकल्पना स्विकारल्या असल्याचे दिसून येते असे विद्या देहेजिया यांचे प्रतिपादन आहे. (The Body Adorned: Sacred and Profane in Indian Art, Vidya Dehejia, Columbia University Press, २००९, page 151) विष्णूपत्नी लक्ष्मी ही वैदिक संकल्पना असली तरी तिला येथे हिंदू संबोधले गेले असले तरी हा गुप्तकालातील धार्मिक संघर्ष व देवान-घेवाणीचा परिपाक आहे हे उघड आहे. खजुराओ येथील भगवान पार्श्वनाथांच्या मंदिराचा काळ इसवी सनाचे दहावे शतक मानण्यात येतो. हे मुळचे आदिनाथाचे मंदिर होते असे प्रसिद्ध पुरातत्वविद अलेक्झांडर कनिंगह्याम यांचे प्रतिपादन आहे. (Studies in Jaina History and Culture: Disputes and Dialogues. Julia A. B. Hegewald (2006). Peter Flügel (ed.). Routledge, २००६, पृ. ४१०)
थोडक्यात लक्ष्मी ही देवता जैन धर्मवेत्त्यांनी अथवा तत्वज्ञांनी मानलेली, प्रवर्तीत केलेली देवता नसून संसारी जैनांनी अन्य समाजांच्या साहचर्याने आपल्या मूळ लक्ष्मी या संकल्पनेवर काही नवी तत्वे चिकटवत भावनिक दृष्ट्या पुजनीय मानलेली देवता आहे. जैन विद्वांनांनी नंतर या देवतेला जैन तत्वज्ञानाशीसुद्धा जुळवून घेत लक्ष्मी ही निर्वाणाची देवता आहे असे मानायला सुरुवात केली असली तरी आता मुळचा तत्वार्थ हरपला आहे असे दिसते. वैदिकांनी जशी ही मुळची यक्ष देवता वैदिकीकरण स्विकारली आणि पुन्हा नव्या स्वरुपात प्रवर्तीत केली त्याचा झालेला हा परिणाम आहे असे म्हणावे लागते.