Sunday, August 25, 2019

मानवतावादी धर्मा"चे प्रभावी भाष्यकार



१८९३ मध्ये शिकागो येथे भरवण्यात आलेली विश्व धर्म संसद ही एकोणिसाव्या शतकातील सर्वात मोठ्या जागतीक धर्म-संस्कृतीच्या चळवळीची सुरुवात होती. परस्पर धर्मांबद्दलचे अज्ञान, समज-गैरसमज, अहंकार, अन्यधर्मियांबद्दलचा तुच्छतावाद किमान सौम्य व्हावा आणि अखिल मानवजातीत बंधुभाव निर्माण व्हावा यासाठी कोणती तत्वे उपयुक्त ठरतील यावर चर्चा करण्यासाठी जगभरातून प्रत्येक धर्मातील विद्वानांना तेथे पाचारण करण्यात आले होते. असे असले तरी या संसदेतील काही वक्त्यांनी औचित्यभंग करत विशेषत: हिंदू धर्मावर टीका करण्यात धन्यता मानली. स्वामी विवेकानंदांचे भाषण आधीच होऊन गेले होते. जैन धर्माचे प्रतिनिधी म्हणून तेथे जैन धर्म व तत्वज्ञानाचे प्रकांड विद्वान बॅरिस्टर वीरचंद गांधी उपस्थित होते. २५ सप्टेंबर १८९३ रोजी त्यांचे जैन धर्मावर भाषण होते. पण त्यांनी जैन धर्मावर बोलायला सुरुवात करण्याआधी प्रथम हिंदू धर्मावर केल्या गेलेल्या टीकेचा विद्वत्तापुर्वक समाचार घेतला. धर्म-संसदेच्या इतिवृत्तात लिहिले आहे की त्यांच्या प्रत्येक वाक्याला टाळ्या पडत होत्या आणि टीकाकार खजिल होऊन गेले होते. “अन्य धर्मांबद्दलचा तुच्छताभाव कमी व्हावा हे धर्मसंसदेचे ध्येय असतांनाही आपलीच धर्मतत्वे विसरत काही विद्वानांनी औचित्यभंग केला पण बॅरिस्टर वीरचंद गांधी या तरुण विद्वानाने धर्मसंसदेला आपल्या मुळ ध्येयाकडे परत खेचून आणण्याचे अपार मानवतावादी बुद्धीकौशल्य दाखवले” असे गौरवोद्गार धर्मसंसदेचे आयोजक असलेले रेव्हरंड जॉन बॅरोज यांनी काढले. इतकेच नव्हे तर त्यांनी गांधींचे जैन धर्मावरील भाषण प्रस्तावनेसहित प्रसिद्ध केले. या भाषणाने प्रभावित झाल्याने धर्मसंसदेच्या समारोप समारंभात वीरचंद गांधींना पुन्हा भाषण देण्यासाठी पाचारण केले गेले. हे उत्स्फुर्त भाषण एवढे गाजले की अमेरिकेत त्यांना शेकडो भाषणे द्यावी लागली.
धर्मसंसदेत त्यांनी भाषण दिले तेंव्हा त्यांचे वय होते अवघे २९ वर्षांचे. त्यांचा जन्म २५ ऑगस्ट १८६४ रोजी गुजराथमधील महुआ गांवी झाला. जैन धर्मियांतील ते पहिले बॅरिस्टर. त्यांनी चवदा भाषा आत्मसात केल्या त्या जैन, हिंदू, बौद्ध धर्मांव्यतिरिक्त जगातील अन्य धर्म व प्राचीन तत्वज्ञान प्रवाहांचे मर्म मूळ भाषेतुनच समजावून घेण्यासाठी. विपूल लेखनही केले. जैन धर्मातील अनेकांतवादी तत्वज्ञान हा त्यांच्या चिंतन आणि मननाचा विषय राहिला. त्यामुळेच ते अन्य धर्मांतील मुलभूत तत्वज्ञानाकडे स्नेहार्द पण परखड चिकित्सकाच्या भूमिकेतून पाहू शकले. सम्राट अकबराच्या सर्व धर्मांना समभावनेने पाहण्याच्या वृत्तीचा त्यांना प्रचंड आदर होता. धर्मसंसदेत स्वत: जैन असुनही त्यांनी सर्वात आधी हिंदू धर्माची बाजू मांडली यामुळे स्वामी विवेकानंद त्यांचे स्नेही बनले. महात्मा गांधीही त्यांच्या तत्वज्ञानामुळे प्रभावित झाले होते. याचे कारण म्ह्णजे वीरचंद गांधींच्या तत्वज्ञानातील जैन पाया असलेले पण वैश्विक मानवतावादी तत्वज्ञान. त्यांनी आपल्या लेखनात किंवा भाषणात कधीही अभिनिवेश आणला नाही. त्यामुळे विश्व धर्म संसदेचे ध्येय पूर्ण होण्यास मोलाची मदत झाली. आणि त्यामुळेच शिकागो येथे त्यांचा पुर्णाकृती पुतळाही नंतर उभारला गेला. हा एका भारतीय ज्ञानमुर्तीचा गौरवच होय.
अमेरिकेतील त्यांच्या अन्यत्र झालेल्या व्याख्यानांमुळे अनेक अमेरिकन जैन धर्माच्या अभ्यासाकडे वळाले. भगवान महावीरांचा अहिंसावाद आजच्या जगाच्या शांततामय सौहार्दासाठी कसा उपयुक्त आहे हे त्यांनी अमेरिकेत दिलेल्या ५३५ व्याख्यानांतून सांगितले. त्यांचे चाहते हर्बर्ट वॉरेन यांनी जैन धर्म तर स्विकारलाच पण वीरचंद गांधींच्या भाषणांचे संकलन करून त्याचे पुस्तकही प्रकाशित केले.
येशू ख्रिस्ताचे जीवन आणि तत्वज्ञान हाही त्यांच्या आकर्षणाचा विषय होता. येशू ख्रिस्ताच्या सुरुवातीचा काळ बायबलच्या इतिहासातून गायब आहे. येशू ख्रिस्ताने हा काळ कोठे व्यतीत केला असावा यावर तेंव्हा खूप तर्क-वितर्क काढले जात होते. त्यात निकोलाय नोटोविच या रशियन विद्वानाला तिबेटमध्ये एक प्राचीन हस्तलिखित मिळाले. या हस्तालिखिताचा अनुवाद करत वीरचंद गांधींनी एक प्रदिर्घ विद्वत्तापूर्ण प्रस्तावना लिहिली. या प्रस्तावनेत त्यांनी येशू ख्रिस्त खरेच भारतात येत शेवटी काश्मीरमध्ये एतद्देशीय विद्वानांशी चर्चा करत आपले तत्वज्ञान बनवले असणे कसे संभाव्य आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. येशूचे तत्वज्ञान आणि नंतर ख्रिस्ती धर्मात निर्माण झालेली मिशनरी संस्था यावर जैन तत्वांचा कसा प्रभाव आहे हेही त्यांनी दाखवून दिले. या पुस्तकाने त्या काळात खूप खळबळ माजली होती. अजुनही त्याबद्दलच्या चर्चा सुरुच असतात.
त्यांचे कार्य केवळ धर्म-तत्वज्ञानापुरते मर्यादित नव्हते. स्त्रीयांबद्दलचा त्यांचा दृष्टीकोण उदार होता. त्यांना आधुनिक शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी सोसायटी फॉर द एज्युकेशन ऑफ वुमेन इन इंडिया ही संस्थाही स्थापन केली आणि देशभर स्त्री-शिक्षणासाठी प्रयत्न केले. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतही ते उतरले. काँग्रेसच्या १८९५ च्या पुणे अधिवेशनात त्यांनी मुंबई राज्याचे प्रतिनिधी म्हणून भाग घेतला. गांधी तत्वज्ञान परिषदही स्थापन केली. अत्यंत चौफेर ज्ञानविश्वे असणा-या या तत्वज्ञाचा वयाच्या अवघ्या सदतिसाव्या वर्षी मृत्यू झाला. पण त्यांच्या कार्याची आणि तात्विक दृष्टीकोणाची भुरळ अजुनही आहे. त्यांच्या जीवनावर "गांधी बिफ़ोर गांधी" हे नाटकही प्रसिद्ध झाले. या नाटकाचे देशभर दोनशेहून अधिक प्रयोग झाले.
२५ ऑगस्ट ही त्यांची १५५ वी जयंती. अहिंसा आणि वैश्विक शांततेचे महत्व अनेकांतवादाला आधुनिक रुप देत जागतीक तत्वज्ञानात व समाजविचारात मोलाची भर घातलेल्या या भारताच्या थोर सुपुत्राला विनम्र अभिवादन!
-संजय सोनवणी

No comments:

Post a Comment

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...