Saturday, December 21, 2019

अज्ञात सम्राटाचा लखलखीत इतिहास


प्रकाश खाडे......
१९४७ पूर्वीच्या काश्मीरच्या इतिहासाबद्दल मुख्य प्रवाहातील इतिहासकारांनीही फारसे लिहिलेले नसल्यामुळे सामान्यांनाही त्याची फारशी माहिती नसते. आणि हा इतिहास पहिल्या सहस्रकातील असला तर विश्वसनीय लिखित साधनांच्या अभावात त्याची तर्कशुद्ध मांडणी किती अवघड होऊन जाते हे आपण सातवाहन ते राष्ट्रकुट-शिलाहारांच्या इतिहासाबाबतही पाहू शकतो. असे असले तरी आपल्याल हे राजे-सम्राट किमान माहीत तरी असतात. पण काश्मीरबाबत तसे घडलेले नाही. गंमत म्हणजे विविध राजतरंगिण्यांमधून काश्मीरचा सलग साडेचार हजार वर्षांचा इतिहास दंतकथा-मिश्रित का होईना लिहिला गेला आहे, तरीही अशी अवस्था. याचे कारण एकंदरीतच काश्मीरबाबत असलेल्या अनास्थेत तर दडले नसावे ना असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. अन्यथा तुर्कस्थान, गिलगिट-बाल्टिस्तान, लडाख ते दक्षिणेतील बंगाल ते गुजरातपर्यंतचा भूभाग जिंकून घेणाऱ्या, अशोकानंतर अवाढव्य साम्राज्य उभारणाऱ्या सम्राट ललितादित्य या काश्मिरी सम्राटाचा समग्र इतिहास जरी नाही, तरी त्याचे किमान नाव तरी माहीत असते. पण संजय सोनवणी यांनी कष्टपूर्वक अरब, तुर्कस्तानी, तिबेटी, चिनी व भारतीय सामग्रीतील विखुरलेली माहिती जमा करत ललितादित्याचा अधिकृत इतिहास प्रथमच 'काश्मीरचा सम्राट ललितादित्य' या ग्रंथातून सादर केला आहे. आता हा ग्रंथ इंग्रजीतही अनुवादित झाला असल्याने जगभरच्या अभ्यासकांनाही एक मौलिक संशोधन ग्रंथ उपलब्ध झाला आहे.
सन ७२५ ते ७६१ ही ललितादित्याची कारकीर्द. त्याच्या कारकिर्दीची सुरुवातच अरब आक्रमणांचा आधी प्रतिकार आणि नंतर त्यांना भारतातून हुसकावून लावण्यातून झाली. पळून जाणाऱ्या अरब सुभेदार तामिमचा पाठलाग करत ललितादित्याने काबूल-झाबुल काश्मीरच्या अंकित केले व तुर्कस्तानमध्ये (तत्कालीन तोखारीस्तान) ठाण मांडून बसलेल्या अरबांनाही पराजित करत तोखारीस्तानच्या विजनवासात गेलेल्या तोर्दु या राजाला मांडलिक म्हणून पदासीन केले व त्याच्या कन्येशी विवाहही केला. काश्मीरला परततांना त्याने गिलगिट-बाल्टिस्तानही जिंकून घेतले आणि रेशीममार्गांवर वर्चस्व स्थापन करत तिबेटवरही स्वारी केली. लडाख काश्मीरला जोडला. अरबांबरोबरच्या लढ्यात त्याने कनौजचा सम्राट यशोवर्मनची मदत घेतली होती, पण पश्चिमोत्तर भारतातील अरबांकडून जिंकून घेतलेल्या भूभागाचे वाटप कसे करायचे यावरून त्यांच्यात वाद झाला आणि त्याची परिणती युद्धात झाली. मग ललितादित्याने त्याला हरवले, त्याला मांडलिक केले आणि मग बंगाल, कलिंग, मध्य भारत आणि गुजरात जिंकून घेतला. त्याची शेवटची मोहीम चीनव्याप्त हिमालयापारच्या तारीम खोऱ्यात झाली. त्याचा तेथे अंत कसा झाला याविषयी इतिहास मौन बाळगून आहे.
ललितादित्य केवळ विजीगीषू सम्राट नव्हता, तर त्याने केलेली अवाढव्य निर्माणकार्ये आजही ध्वस्त स्वरूपात का होईना अस्तित्वात आहेत. त्यातील महत्त्वाचे म्हणजे काश्मीरचा मानबिंदू समजले जाणारे मार्तंड मंदिर आणि परिहासपूर ही त्याने उभारलेली राजधानी. त्याची राजकीय दूरदृष्टी व्यापक होती. रेशीममार्गांवर ज्याचे नियंत्रण तोच खरा सार्वभौम शासक अशी मान्यता ज्या काळात होती, त्या काळात त्याने तुर्कस्थान, गिलगिट-बाल्टिस्तान व तिबेटमधून जाणाऱ्या मार्गांवर नियंत्रण आणून चीन व तिबेटलाही शह दिला. त्याचे धार्मिक धोरण सहिष्णू होते. त्याने हिंदू मंदिरे जशी उभारली, तसे बुद्ध चैत्य व विहारही उभारले. त्याने मध्य भारतातून अत्रीगुप्तासारखे अनेक विद्वान काश्मीरला नेऊन काश्मीरला ज्ञान-भूमी बनवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. त्याच्याच काळात हिचेओ आणि औ कोंगसारख्या चिनी-कोरियन विद्वानांनी काश्मीरला भेट दिली.
सोनवणींना हा ग्रंथ लिहिताना विखुरलेल्या साधनांना एकत्र करत त्यांचा अन्वयार्थ लावण्यात किती अडचणी आल्या असतील हे पुस्तक वाचताना लक्षात येते. ललितादित्य नेमका कोणत्या वर्षी सत्तेत आला येथपासून आधुनिक विद्वानांनीही गोंधळ घालून ठेवला असल्याने त्याची कालनिश्चिती करणे व समकालीन अन्य घटनांची संगती लावणे हे सर्वात मोठे आव्हान. तत्कालीन समाजव्यवस्थेचेही तथ्यपूर्ण चित्रण असल्याखेरीज ललितादित्याच्या कर्कोटक या नागवंशीय घराण्याचे महत्त्व लक्षात आले नसते. आजच्या काश्मिरी मानसिकतेला व काश्मीरच्या ज्ञानासक्त उदार परंपरेला समजून घ्यायलाही हा ग्रंथ मदत करतो. किंबहुना इतिहास कसा लिहिला जावा, याचा एक नवाच वस्तुपाठ या ग्रंथाने घालून दिला आहे.
चीन आज पुरातन रेशीममार्गांचे पुनरुज्जीवन करत आहे. किंबहुना 'ज्याचे व्यापारी मार्गांवर वर्चस्व तोच सार्वभौम शासक' ही ललितादित्याच्या काळात असलेली म्हण आजही वास्तवात येताना दिसत आहे. त्या काळात ललितादित्याने हे महत्त्व ओळखले होते. भारताला आजही ललितादित्याच्या सामरिक व आंतरराष्ट्रीय धोरणाची आवश्यकता आहे. संजय सोनवणींचा हा ग्रंथ केवळ एका अज्ञात सम्राटाला प्रकाशात आणणारा इतिहासच नव्हे तर वर्तमानासाठीही नवी दिशा देणारा आहे, असे म्हणावे लागते ते यामुळेच!
काश्मीरचा सम्राट ललितादित्य
लेखक : संजय सोनवणी
मुखपृष्ठ : के. सय्यद
प्रकाशक : चिनार प्रकाशन
पृष्ठं : २५६
किंमत : २८० रु.
https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/a-brilliant-history-of-the-unknown-emperor/articleshow/72910231.cms

No comments:

Post a Comment

जनानखान्यांचे अद्भुत विश्व!

  जनानखाना, ज्याला अंत:पूर, राणीवसा किंवा हरम असेही म्हटले जाते त्याबाबत समाजामध्ये अनेक समजुती प्रचलित आहेत. शत्रूच्या जिंकलेल्या स्त्रीय...