Wednesday, December 25, 2019

मनुस्मृती कोणासाठी?


MANUSMRITI (Hindi Edition) by [SHASTRI, TIKAKAR - DR. RAMCHANDRA VERMA]


मनुस्मृती हा वैदिक धर्मशास्त्रावरील प्रमुख ग्रंथ आहे. स्मृत्यांची संख्या जवळपास शंभरावर असली तरी मनुस्मृतीचे माहात्म्य व प्रामाण्य सर्वात मोठे मानले जाते. वेदांच्या खालोखाल भारतीय हिंदुंचा हा अत्यंत पूज्य आणि प्रमाणभूत ग्रंथ असून तो आपल्या संस्कृतीचा, आचाराचा आणि व्यवहाराचा आधारस्तंभ ठरला आहे. भारताच्या ऐहिक व पारलौकीक जीवनाचे नियमन शतकानुशतके हा ग्रंथच करत आला आहे असेही मानण्याची पद्धत आहे. (भारतीय संस्कृतिकोश, खंड ६, पृ. ७३३). एकीकडे मनुस्मृतीबद्दल एवढा पूज्यभाव असतांना डा. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी काही ब्राह्मण सहका-यांची मदत घेत मनुस्मृतीचे दहन केले. त्यानंतर प्रतिवर्षी हा मनुस्मृती दहन कार्यक्रम धार्मिक कर्मकांडाप्रमाणे दरवर्षी साजरा होत असतो. मनुस्मृती ही विषमता, अस्पृष्यता आणि स्त्री-स्वातंत्र्याच्या विरोधात असल्याने स्त्रीया व शूद्रातिशूद्र यांना हिंदु धर्मात गुलामीचे अन्याय्य जीवन जगावे लागले, म्हणून समता आणायची त्यर मनुस्मृती जाळली पाहिजे, म्हणजेच तिच्यातील विषमतामुलक तत्वांना तिलांजली दिली पाहिजे, यासाठी ते प्रतीकात्मक दहन होते. अर्थात ही प्रतिकात्मकता नंतर अनुयायांच्या दृष्टीतून अदृष्य होत जात नंतर मनुस्मृती जाळण्याला एक कर्मकांडाचे स्वरुप आले.

पण येथे पडनारा प्रश्न म्हणजे एकाच स्मृतीच्या बाबतीत एवढ्या टोकाची मते का असावीत? मनूस्मृती समस्त हिंदुंची पुज्य आचारसंहिता आहे असे मत व्यक्त करतांना नेमका काय आधार घेतला गेला? मनुस्मुतीचे संपुर्ण परिशिलन केले असता दिसणारे वास्तव वेगळेच आहे. किंबहुना संजय क्षीरसागरांचा या स्मृतीची संपुर्ण चिकित्सा करण्याचा हा आज्वरचा पहिलाच प्रयत्न आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. खरे म्हणजे आजवर, मनुस्मृतीची प्रशंसा करणारे व तिचे दहन करणारे अशा उभय पक्षांनी मनुस्मृतीचा नीट अभ्यास न केल्याने व ती नेमकी कोणत्या धर्माच्या व्यावहारिक व पारलौकिक तत्वांचे दिग्दर्शन करते हे लक्षात न घेतल्याने हा गोंधळ झाला आहे हे संजय क्षीरसागरांचे प्रस्तूत पुस्तक वाचल्यावर वाचकांच्या लक्षात येईलच. खरे तर ही काही धर्मशास्त्राच्या अभ्यासकांसाठी भुषणास्पद बाब नव्हे. पण आपल्याकडे कोणत्याही बाबीच्या मुळाशी न जाताच मते देण्याची प्रथा आहे. असे मत देतांना आपण मुळ संहितेशी प्रतारणा करत आहोत याचेही भान त्यांना राहत नाही. खरे म्हणजे चिकित्सेचे हे काम खूप पुर्वीच व्हायला हवे होते, पण धर्माभिमानी आणि धर्मविरोधक यांनी मिळून आपापल्या भ्रमांतच राहने पसंत केल्याने मनुस्मृतीची वास्तव चिकित्सा झाली नाही. मी जानेवारी २०१६ मध्ये दै. पूण्यनगरीच्या रविवार पुरवणीत मनुस्मृतीविषयक दोन लेख लिहिले होते. संतप्त वाचकांचा येणारा पहिला प्रश्न असा असे कि, "बाबासाहेबांनी मग मनुस्मृती उगाचच जाळली का?" खरे म्हणजे हा प्रश्नच औद्धत्याचा आहे. वास्तव समजावून न घेता केलेली कोंणतीही कृती समाजाला योग्य दिशा देत नाही. उलट आजकाल "मनूवाद, मनुवादी" या संज्ञांचा एवढा विस्फोट झाला आहे कि काही राजकीय पक्षही त्यातून सुटलेले नाहीत. मनुवादाचे वास्तव काय आहे हे समजावून घेतले असते तर आजच्या अनेक सामाजिक समस्यांचे उत्तर तेंव्हाच सापदले असते. पण राजकीय म्हणा अथवा तत्काळ प्रसिद्धीलोलुपता म्हणा,
एकतर समजुनही सत्यदर्शन तरी केले गेले नाही अथवा घोषणांत रमत केवळ विरोध करत बसणे अनेकांनी पसंत केले. त्यामुळे मुख्य विषय बाजुला पदल्याचे आपल्या लक्षात येईल.

मनुस्मृतीबाबत बोलतांना ही समस्त हिंदू धर्मियांची आचारसंहिता होती असा समज दोन्ही पक्षांचा असतो. भारतीय संस्कृती कोशातुनही हेच मत अभिव्यक्त होते आणि नेमकी येथेच खरी समस्या सुरू होते. आता वेदांखालोखाल या स्मृतीचे प्रामाण्य आहे असेही विद्वानच म्हणतात. विद्वान नेमके येथेच जाळ्यात अडकायला सुरुवात होते.

वेद चार मानायची एक प्रथा आहे. इसपू दुसरे शतक ते इसचे दुसरे शतक या काळात किंवा याही नंतर मनुस्मृतीचे लेखन झाले असावे असेही मानले जाते. परंतू मनुस्मृती चार नव्हे तर फक्त तीनच वेद प्रमाण मानते. अथर्ववेदाला मनुस्मृतीच्या दृष्टीने काही स्थानच नाही. किंबहुना या चवथ्या वेदाचे स्थानच मनुस्मृतीने नाकारले आहे. म्हणजे अथर्ववेद मुलातील वैदिकांचा नव्हे याचे भान मनुस्मृतीकारांना होते काय? तसे असण्याची अधिक शक्यता आहे कारण मुलात अथर्ववेद हा यज्ञयाग करणा-यांसाठी नाहीच,. त्याची मुले शैवागमांत सापडतात हे एक वास्तव आहे. अथर्ववेदाची लोकप्रियता पाहून ऋग्वेदाचा काही भाग जोडत नंतरच्या काळात वैदिकांनी या वेदाचा "चवथा वेद" म्हणून स्विकार केला हे एक वास्तव आहे.

मनुस्मृती खुद्द त्या तीन वेदांचे प्रामाण्य तरी मानते काय, या प्रश्नाचे उत्तर स्पष्तपणे "नाही" असे आहे. कारण ऋग्वेदातील एक अत्यंत महत्वाचे युद्ध म्हणजे दाशराज्ञ युद्ध. या युद्धाचा महानायक होता तो पैजवन सुदास. या युद्धात सुदास हा वेद व यज्ञांचे विरोधक असलेल्या शत्रु-टोळ्यांशी लढला व जिंकलाही. वशिष्ठ हा त्याचा प्रमुख पुरोहित. आधीचा पुरोहित विश्वामित्राला काढून वशिष्ठाला नेमले म्हणून रागावलेला विश्वामित्र शत्रुपक्षाला जाऊन मिळाला असेही नंतरच्या वैदिक साहित्यात म्हटले गेलेले आहे. असे असतांना या वैदिक धर्माची पताका उंचावणा-या सुदासाची अवनती केवळ ब्राह्मणांचा कोप झाल्याने झाली असे मनुस्मृती सांगते. मुळात कोणत्याही वेदात या कथेला कसलाही आधारच नाही. किंबहुना वेदात वर्णव्यवस्थाही नाही. मग वेदप्रामाण्य या संज्ञेला काय आधार राहतो? एक प्रकारे ही वैदिक इतिहासाशी प्रतारणा आहे. निमी वगैरे राजांच्या अवनतीलाही ब्राह्मण-कोप हेच कारण दिले आहे. ब्रह्मपुराणातील निमीची मुळची कथा पाहता मनुस्मृतीने सोयिस्कर फेरबदल केलेले दिसतात. वेदाभ्यासकांना हे माहित नव्हते कि काय कि त्यांनी मुद्दाम याकडे दुर्लक्ष केले? या व अशा अनेक बाबी आहेत जेथे मनुने खुद्द वेदांनाही धाब्यावर बसवलेले आहे. ही गरज मनुला कोणत्या काळात वाटली असावी हे पाहणे गरजेचे होते जे झाले नाही. मनुस्मृतीतील विश्वोत्पत्तीची कथाही अशाच भोंगळ कथांचे असंबब्ध कथांचे मिश्रण आहे. मनुस्मृतीत परस्पर विसंगत विधानांची रेलचेल आहे. ते कसे हे पुस्तकात सविस्तर दिलेले आहेच. पण त्याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे मनुस्मृतीच्व्ह्या हिंदी व मराठी अनुवादकांनी, विशेषत: विष्णूशास्त्री बापटांनी, सध्या उपलब्ध असलेल्या स्मृतीतील श्लोकांत जे शब्दच नाहीत ते पदरचे घालून अब्यासकांची गैरसोय तर केली आहेच मण मनुस्मृतीला सांप्रदायिक रुप आल्याने तिच्याबाबतचे गैरसमजही वाढवायची सोय केली आहे.

मनुस्मृती कोणत्यातरी विशिष्ट धर्माचे नियमन करणारी स्मृती आहे हे तर नक्कीच. या स्मृतीत "वेद हेच धर्माचा मुख्य स्त्रोत असून वेदविरोधी जेही काही आहे ते त्याज्ज्य आहे." असे वारंवार सांगितले आहे. किंबहुना या स्मृतीने धर्माची केलेली व्याख्या "वेद, स्मृती, सज्जनांचा आचार आणि स्वत:च्या आत्म्याचे समाधान या चतुर्विध बाबी साध्य करतो तो धर्म" अशी आहे. (मनू: २:१२). म्हणजेच वेद हा या धर्माचा प्रमुख आधार असल्याने त्याला आपण "वैदिक धर्म" असे म्हणणे जास्त संयुक्तिक आहे. म्हणजे वेद मानणा-यांचा धर्म अस्तित्वात होता त्याच वेळीस वेदांशी कसलाही संबंध नसलेल्यांचाही धर्म होताच. नसता तर वेदमान्यतेचे प्रस्थ माजायचे काही कारणच नव्हते. मनुस्मृतीतही वारंवार वेदविरोधी तत्वज्ञाने व आचारसंहिता याबाबत विरोध दाखवला आहेच. म्हणजे वैदिक धर्माच्या समांतर वेद मान्य नसलेला एक (किंवा अनेक) धर्म सहास्तित्वात होता. शिवशक्तीप्रधान धर्म अगदी वेदांचीही निर्मिती झाली नव्हती त्या काळापासून, म्हणजे सिंधू काळापासून, भारतात अस्तित्वात होता हे प्रत्यक्ष पुराव्यांनीच सिद्ध झाले आहे. असे असतांना संपुर्ण भारतियांचे ऐहिक व पारलौकिक नियमन ही स्मृती कशी करेल? वेद न माननारे अथवा जे धर्म वेदांच्या आधारावर उभेच नव्हते ते धर्म या स्मृतींच्या आज्ञा मुळात का पाळतील? बरे, तसे सामाजिक वास्तव असल्याचेही इतिहासात दिसुन येत नाही. असे असतांना जेंव्हा विद्वान मनुस्मृतीला "आपल्या संस्कृतीचा, आचाराचा आणि व्यवहाराचा आधारस्तंभ" म्हणतात तेंव्हा या विधानाची सत्यता पाहिली पाहिजेच अन्यथा आपल्याला आपल्या संस्कृतीचेच यथास्थित आकलन होणार नाही.

बरे, वैदिक धर्माची निर्मिती नेमकी कधी झाली? कोठे झाली? वैदिक धर्माची सुरुवात होण्याआधी वैदिक धर्म निर्मात्यांचा धर्म कोणता होता अशा प्रश्नांकडेही मनुस्मृतीचे टीकाकार अथवा समर्थक लक्ष देत नाहीत. वैदिक धर्म आक्रमक आर्यांद्वारे भारतात आला असे मत आताआता पर्यंत प्रबळ होते. समजा हे मत ग्राह्य धरले तर आर्यांनी उत्तरेपासून दक्षीणेपर्यंत व पुर्वेपासून पश्चिमेपर्यंत संपुर्ण भारत वैदिक धर्माच्या छत्रछायेत आणला व एतद्देशियांना तत्काळ शूद्र बनवत त्यांना गुलाम बनवले असेही आपल्याला गृहित धरावे लागते. खरे म्हणजे आर्य सिद्धांताचा हेतूही मुळात आक्रमक प्रबळ आर्य व एतद्देशिय दुर्बळ रानटी लोक यांच्यातील संघर्ष दाखवत अंती प्रबळ आर्यांचा विजय दाखवणे हा होता. या रानटी लोकांतील काही लोकांना क्षत्रीय व वैश्य वर्णात घेतले गेले व बाकीच्यांना चवथ्या वर्णात, म्हणजे शूद्रत्वात ढकलत त्यांच्यावर सेवेची जबाबदारी टाकली गेली. अशा रितीने चातुर्वर्ण्य आस्तित्वात आला असे मानले जाते. य शुद्रांच्या शिवादि देवतांना आर्यांनी पावन करुन घेतले हे मत अर्थातच जोडून येते. (वैदिक संस्कृतीचा इतिहास-तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी).

आक्रमण सिद्धांत प्रत्यक्ष पुराव्यांअभावी अडचणीचा ठरू लागल्यानंतर पाश्चात्य विद्वानांनी "आर्य स्थलांतर" सिद्धांताला जन्म दिला. हाही गृहित धरला तर मुळात आर्यांनी स्थलांतर का केले याचे उत्तर हा सिद्धांत देत्य नाही. स्थलांतरित आर्यांची संख्या किती हेही विद्वान सांगत नाहीत. स्थलांतरित आर्यांनी एतद्देशिय विशाल भुभागावर धर्म लादायचा तर त्यासाठी वैदिकांची संख्याही तेवढीच अवाढव्य असली पाहिजे. बरे, ते महापराक्रमी होते, म्हणून कमी संख्या असली तरी ते देशभर पसरले, हेही समजा मान्य केले तर तशा एक तरी युद्धाचे वर्णन, किमान सूचन, वैदिक साहित्यात आढळायला हवे. खुद्द मनुस्मृतीतही ते येत नाही. शिवाय देशभर पसरण्यासाठी व तेथे स्थायिक होण्यासाठी त्यांना येथील भुगोलही चांगला माहित पाहिजे. समजा आक्रमक अथवा स्थलांतरितांची संख्या तेवढी नसेल तर धर्मांतराच्या राजमार्गाने आपली संख्या वाढवावी लागेल. मग धर्मांतर करणारे कोण होते? धर्मांतर करण्यापुर्वी त्यांचा धर्म कोणता होता? या धर्मांतरितांना नवीन धर्माचे प्रशिक्षण त्यांनी कसे दिले असेल? समजा वैदिक धर्माचा जन्म येथेच झाला हे गृहित धरले तरीही हेच प्रश्न कायम राहतात कारण कोठेतरी (कुरु-पांचाल परिसरात) या धर्माची निर्मिती झालीच व तो अन्यत्र पसरवण्यासाठी खटाटोप हा करावाच लागला हे तर नक्कीच आहे. (The Quest for the Origins of Vedic Culture- The Indo-Aryan Migration Debate : EDWIN BRYANT, OXFORD UNIVERSITY PRESS 2001) भारतातील बव्हंशी वैदिक हे धर्मांतरित आहेत हे उघड आहे. ते धर्मांतर घडवण्यसाठे कोणते २७ धर्मप्रसारक वेदव्यासांनी नेमले याची कथा विष्णू पुराणातच येते. पण या धर्मांतराचे प्रमाण मोठ्या स्वरुपात नव्हते. जे धर्मांतरित नव्हते त्यांना सरसकट शूद्र असे संबोधले गेले हे प्राकृत साहित्यावरुनही स्पष्ट होते. उदा. जैन माहाराष्ट्री भाषेतील "अंगविज्जा" या इसवी सनाच्या दुस-या शतकातील ग्रंथातही अनेक व्यवसायिक जाती तसेच तत्कालीन कुशाण व शक यांनाही शूद्र्च म्हटले गेलेले आहे. असे असतांनाही शुद्रांबाबत एवढा गोंधळ विद्वानांनी का घातला हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. 

बरे, आक्रमण सिद्धांत गृहित धरला (किंवा अगदी पर्यायी मानला जानारा आर्य स्थलांतर सिद्धांत गृहित धरला तरीही) तर मनुस्मृतीच या सिद्धांतकांच्या पायात खोडा घालते, कारण मनुस्मृतीच्याही पहिल्या पर्वातील भुगोल दक्षीण अफगाणिस्तान आहे तर दुस-या पर्वातील भूगोल कुरु-पांचाल परिसरातील आहे. नंतर महत्वाचा मुख्य टप्पा मगध प्रांतातील वैदिकांचे अस्तित्व व प्राबल्यही दाखवते. शरणार्थी ते मगधात स्थैर्य प्राप्त केलेल्या व स्थैर्यातुनच ज्या सामाजिक समस्या कोणत्याही अल्प समाजात उद्भवतात त्या सोडवण्याच्या प्रयत्नांचे चित्रणाने याने मनुस्मृतीचा अधिकांश भाग व्यापलेला आहे. पुस्तकात यावर सखोल चर्चा असल्याने मी येथे अधिक लिहित नाही. पण मगध, कुरु-पांचाल व काही फुटकळ प्रदेश वगळता उरलेला देश तिला माहितच नाही. विंध्याच्या दक्षीनेला कोण राहतात याबद्दल तर अज्ञानच आहे. मग जे लोक माहित नाहीत त्यांच्यासाठी कोण नियम लिहिल आणि कोण पाळेल हा साधा विचार या विद्वानांना ते धर्म-गौरव-भ्रमात असल्यानेच सुचला नाही हे उघड आहे. इसवी सनाच्या दुस-या शतकापर्यंत या देशात ग्रीक, शक, हुण, कुशाणांसारख्या राजसत्ता प्रस्थापित झालेल्या होत्या. त्यांचे उल्लेख मनुस्मृतीत आहेतच. त्यांच्या धर्माचा उल्लेख मनुस्मृती करत नाही, पण त्यांना शूद्र, म्लेंच्छ अथवा कधी कधी यवन, चीन असे संबोधते, पण त्यांच्या सामाजिक जीवनाचे व श्रद्धांचे कसलेही उल्लेख करत नाही कारण त्यांच्या धर्माच्या नियमनासाठी मुळात स्मृती नाहीच.

 बरे, ही स्मृती समग्र हिंदुंच्या नियमनासाठी लिहिली गेली म्हणावी तर मनुस्मृतीच त्यात मोठा खोडा घालते. म्हणजे बघा, या स्मृतीत यज्ञ व तत्संबंधी कर्मकांड आहे. तीन वर्णांचे वेदोक्त संस्कार अत्यंत काळजीपुर्वक लिहिलेले आहेत. अगदी कोणत्या वर्णाच्या माणसाने काय गुन्हा केला तर काय शिक्षा द्यावी याबाबतही निर्देश दिले आहेत. त्याबाबत तथाकथित शूद्रांना वाटणारा संताप आपण जरा दूर ठेवुयात. प्रत्यक्षात स्मृतीच काय सांगते?

मनूस्मृतीच सांगते कि शुद्रांची राज्ये आहेत. काही शूद्र यज्ञही करवून घेतात व असे शुद्रांसाठी यज्ञ करनारे ब्राह्मण श्राद्धविधीत निषिद्ध आहेत.  देवपुजा करनारेही पुजारीही श्राद्धात निषिद्ध आहेत. मनुस्मृतीच्या सुरुवातीच्याच अध्यायांत हे सारे येत असता या व नंतरच्या अध्यायांत येणारी शूद्रविरोधी वचनेच तेवढी अवमानास्पद मानायची, मग या वचनांचे काय करायचे हाही प्रश्न उभयपक्षांना पडला नाही हेही एक नवलच होय. खरे म्हणजे वैदिक धर्मियांनी नियमन केले आणि न केलेले असे शूद्र नेमके कोण व हिंदू धर्माची वैदिकेतर व्याप्ती न समजल्याचा हा परिपाक आहे. मनुस्मृतीच्या आज्ञा ज्यांसाठी आहेत ते शूद्र कोण याचाही नीट अभ्यास झाला नाही. शूद्र म्हणजे समस्त भारतातील वैदिकेतर गुलाम लोक असाच साधारभ्ण समज सर्वांनी करुन घेतला हे एक दुर्दैवी वास्तव आहे. पण मनुस्मृतीच जे सांगते त्या राजांचे व धनाढ्यांचे काय करायचे? त्यांना मनुस्मृतीचे नियम का लागू नव्हते हा विचार न केल्याचा परिपाक म्हणजे आजचा हिंदू धर्मातील सावळा गोंधळ आहे.

प्रत्यक्षात इतिहासही सांगतो कि शिशूनाग वंशापासून भारतात शूद्र राजांची परंपरा सुरु होते. अगदी पहिला ज्ञात सम्राट चंद्रगुप्त मौर्यही शूद्र होता. सातवाहन, यादवादी असंख्य सत्ताही शुद्रांच्या होत्या. त्यामुळे मनू जर "शूद्रांच्या राज्यात निवास करु नये" अशा आज्ञा देत असेल तर त्यांचा ऐतिहासिक अन्वयार्थही समजावून घ्यायला हवा होता. ऐतिहासिक राजकुळांत एकही क्षत्रीय अथवा राजन्य नाही हे येथे लक्षात घेतले पाहिजे. शृंगांना तेवढे वैदिक ब्राह्मण समजायचा प्रघात आहे. त्याआधीच्या ज्ञानत इतिहासात एकही ब्राह्मण अथवा वैदिक राजा असल्याचे उल्लेख नाहीत. त्यामुळे पुराणे म्हणतात म्हणून हैहय, यदू, इक्ष्वाकू आदि घराणी क्षत्रीय होती असे समजायची प्रथा आहे. परंतू प्रत्यक्षात या घराण्यांचे ऐतिहासिकत्वच मुळात अजून नक्की नाही. महाकाव्ये व पुराणे यांना ऐतिहासिक मूल्य काय हा नेहमीच वादाचा विषय राहिला आहे. कारण या सर्वच साहित्यात घालघुसड, कल्पनाविलास व अनैतिहासिक अद्भुत गोष्टींची रेलचेल आहे. तरीही समजा पौराणिक व महाकाव्यांतील कथा ख-या मानायच्या झाल्या तर कृष्ण स्वत: असूर व असुरेतर संकरातून जन्माला आलेला आहे. कृष्णाच्या नातवानेही बाणासुराच्या कन्येशी विवाह करुन संकरच केला आहे. महाभारतातील व्यासापसुन ते सर्व कौरव व पांडव संकरीतच रक्ताचे आहेत. मनुस्मृतीप्रमाणे ते पाहिले तर कोणत्याही वर्णाच्या चौकटीत बसू शकत नाहीत. म्हणजेच ते वैदिक नाहीत. परंतू हे सत्य समोर असतांना त्याबाबत विद्वानांनी मौन पाळावे हे आश्चर्यकारक आहे.

महाराष्ट्राच्या दक्षीणेला म्हणाल तर इसवी सनाच्या तिस-या शतकापर्यंत तिकडे वैदिक धर्म पसरल्याचे वा गेल्याचे एकही सूचन नाही. यासाठी प्राचीन तमिळमधील संगम साहित्य हाच प्रबळ पुरावा आहे. महाराष्ट्रात हा धर्म पहिल्या शतकापर्यंत पोहोचला होता याचा संदर्भ मिळतो, पण महाराष्ट्रात त्याचा प्रचार-प्रसार झाल्याचे पुरावे मिळत नाहीत. मग या काळात वैदिक धर्म जेथे गेलाच नव्हता तेथील लोक काय धर्माशिवाय जगत होते कि काय? तसेही नाही कारण सातवाहन स्वत:ला "आगमान निलया" असे अभिमानाने म्हणवून घेतात. आगम म्हणजे अवैदिक तंत्रशास्त्रे तर निगम म्हणजे वेद.

सातवाहनांच्या काळात वैदिक धर्म येथे प्रवेशला असला तरी त्याचा प्रसार नव्हता याचे दर्शन हाल सातवाहनाच्या गाथा सप्तशतीतुनच मिळते. गाथा सप्तशतीचे संपादक स. आ. जोगळेकरांना गाथा सप्तशतीत वैदिक देवतांची व यज्ञांचीच काय ती अवहेलना दिसते व शैव आणि भागवत धर्माचे प्राबल्य दिसते. शिवाय गाथ सप्तशतीत ब्राह्मणांचा उल्लेख एकदाही अलेला नसल्याने जोगळेकर असा तर्क काढतात कि त्या काळात ब्राह्मण अत्यल्पसंख्य असले पाहिजेत. (गाथा सप्तशती, प्रस्तावना, स. आ. जोगळेकर, पद्मगंधा प्रकाशन, पृ. २१८-२२०) याचा अर्थ एवढाच कि मगध सोदून हा धर्म अन्यत्र जायचाच होता. तरीही येथे महाबलाढ्य सम्राट-सामंत-जमीनदार व व्यापारी होतेच व त्यांचा धर्म वैदिक नव्हता हे स्वयंस्पष्ट आहे.

इसपू सहाव्या शतकापासून ते इसच्या दुस-या शतकापर्यंतची नाणी व शिलालेख यावर शिव, उमा, कार्तिकेय, बुद्ध यांच्या प्रतिमा व नांवे आढळून येतात. अगदी कनिष्काच्या सुदूर अफगाणिस्तानातील राबटक शिलालेखातही उमा व कुमार कार्तिकेयाचे नांव आढळते, एकाही वैदिक देवतेचे नांव आढळत नाही. Mukherjee, B.N., "The Great Kushana Testament", Indian Museum Bulletin, Calcutta, 1995) या कुशाणही स्मृतींनुसार जर शूद्रच तर इतर एतद्देशियांची काय कथा? मग वैदिक काळ होता तरी कोणता आणि कधी? मगध व आसपासचा काही भाग वगळता हा धर्म अन्यत्र नव्हताच असे स्पष्ट पुरावे दिसत असता हे स्मृती "संपुर्ण देशाचे नियमन करणारी" कशी? मनुस्मृती जर हिंदुंचे नियमन करणारे आहे अशी "श्रद्धा" आहे, तर संपुर्ण स्मृतीत एकाही हिंदू देवतेचे नाव नाही. अगदी शिव-पार्वतीचेही नांव येत नाही. त्यांचे पुजाविधान कोठे येत नाही. किंबहुना मुर्तीपुजेचा अप्रत्यक्ष निषेधच केला आहे कारण "देवपुजा-यांना" श्राद्धात प्रवेशच नाही. असे असतांना मनुस्मृतीला हिंदू धरमाचे नियमन करणारी संहिता कसे मानता येईल?

मनुस्मृती हिंदुंच्या या परमदैवतांबाबत पुर्ण मौन बाळगते. वेद व वेदाचाराबाबत मात्र संपुर्ण मनुस्मृती समस्त आस्थेने बोलते. म्हणजे वेदाधारित वैदिक धर्माचे नियमन करण्यासाठी, प्रसंगी वेद-विधानांनाही उल्लंघत नवीन प्रदेशात तगण्यासाठी व पसरण्यासाठी धर्ममाहात्म्य वाढवण्यासाठी कराव्या लागणा-या सर्व क्लुप्त्या या स्मृतीत आहेत. ही स्मृती हिंदुंसाठी नाही कारण एकही हिंदु (आगमिक) देवतेचे नांव ही स्मृती घेत नाही. स्मृती जसे घेत नाही तसेच वेदही एकाही हिंदू देवतेचे नांव घेत नाही. कारण हे दोन्ही धर्म वेगळे आहेत याचे भान स्मृतीकारांना आहे. स्मृतीकारांनाच नव्हे तर दोन्ही समाजांनाही त्याचे भान आहे. भान नाही ते नंतरच्या सुधारणावादी विद्वानांना. त्यांनीच घोळ घातल्याने हिंदू धर्माचे अक्षम्य असे नुकसान झाले आहे. मनुस्मृती हे नेहमीच वैदिक धर्मियांचे अंतर्गत नियमन करण्यासाठी होती. वर्णाश्रम धर्म हा वैदिक धर्माचा पाया. यातील तीनच वर्णांना वेदाध्ययनाचा अधिकार असल्याने साहजिकच तेच वैदिक ठरतात. याच धर्मात शूद्र हा एक वर्ण आहे. हा वर्ण वैदिक नसल्याने "चतुर्वर्ण्य" हा शब्द तारतम्याने घ्यायला हवा होता. मनुस्मृती अनेकदा तो घेते तर कधी कधी तिचीही गाडी घसरते. यांना वेदांचाच काय संपत्ती संचयनाचाही अधिकार नाही. यांच्यासाठी कायदे वेगळे आहेत. म्हणजेच यांचाही धर्म वेगळाच आहे. पण ते वैदिकाश्रयी शूद्र आहेत हे मनुस्मृतीच स्पष्ट करते. हे असे वेदाश्रयी लोक होते तरी किती आणि किती काळ याबाबत स्मृती मौन आहे. पण गुप्त कालोत्तर समाजात वैदिकाश्रयी शुद्रांचेही प्रमाण क्रमश: संपुष्टात येत गेलेले दिसते. पण वैदिकेतर जेही कोणी आहेत त्यांना शूद्र संबोधण्याची वैदिकांची सवय कायम राहिली. पण म्हणून इतरांनी स्वत:ला शूद्र म्हणवले याची अत्यातिअल्प उदाहरने मिळतात. हिंदू आपली ओळख जातीनामानेच देत राहिले व देतात.

शूद्र नामक पश्चिमोत्तर भारतात एक टोळीच होती. अभीरांसमवेत या टोळीचे नांव महाभारतात खुपदा येते तसेच पुराणांतही येते. अलेक्झांडरचे या टोळीशी युद्धही झाल्याचे उल्लेख ग्रीक इतिहासकारांनी करुन ठेवले आहेत. (The Invasion of India by Alexander the Great-As described by Arrian, Q Curtis, Diodoros, Plutarch and Justin, edited by J. W. Mcrindle, page 354) भारतात आश्रयार्थ व धर्मप्रचारार्थ वैदिकांचा संबंध प्रथम आला तो या टोळीशी. या देशातील वैदिकेतर टोळ्यांना त्यांनी सरसकट शूद्र असेच संबोधले. मनुस्मृतीच्या शुद्रांविषयीच्या आज्ञा या वैदिकांच्या सेवेत असलेल्या शूद्र वर्गासाठी आहेत, देशात राहना-या अन्य समाजांसाठी नाहीत. समजा असत्या तरी अन्य धर्मीय त्या का म्हणून मान्य करतील? केलेल्याही नाहीत अन्यथा शूद्र राजे झाले नसते. वैदिकांना क्षत्रीय व वैश्य प्रकरण नंतरच्या काळात गुंडाळून ठेवावे लागले नसते, कारंण वैदिकांतला हाही वर्ग नंतर वैदिक धर्मातून बाहेर पडला हे नंद राजांच्या उदाहरणावरुनच स्पष्ट होते. परशुरामाची कथाही त्यासाठीच बनवण्यात आली.

मनुस्मृतीही कंबोज, यवन, शक, पारद, चीन या विदेशी समाजांना "पतीत क्षत्रीय" म्हणते (ते तसे नव्हते कारण मुळात त्यांचे धर्म वेगळे होते हे इतिहासानेच नोंदवुन ठेवले आहे.) तसेच औंड्र, दरद, किरात व द्रविड जातींनाही ती "पतीत क्षत्रीय" म्हणते. (मनू:- १०.४४) याच जमातींना ऐतरेय ब्राह्मण "शूद्र" म्हणते. पण मुळात औंड्रजातींच्या प्रदेशात पहिल्या शतकानंतर व द्रविड जातीच्या प्रदेशात तिस-या शतकानंतर जेथे प्रवेश व्हायला सुरुवात झाली तेथे तत्पुर्वीच काय नंतरही पतीत व्हायला का होईना क्षत्रीय असायला हवेत कि नकोत? हा केवळ अतिशयोक्ति व बढाईचा भाग होता एवढेच म्हणता येते. येथे मनुस्मृतीला पतीत क्षत्रीय म्हनजे "वैदिक धर्मीय नसलेले योद्ध्ये" असे म्हणायचे असेल असे दिसते, नाहीतर यवन, शकांसारख्या परकीय जमातींनाही पतीत क्षत्रीय म्हणण्याचे धाडस मनुस्मृती करने शक्य नाही हे उघड आहे. संदिग्धता व वैदिक माहात्म्य याची रेलचेल मनुस्मृतीत असने स्वाभाविक आहे. मुस्लिमही सारे जग ही आदमचीच प्रजा मानते तसेच हे. पण ते ऐतिहासिक वास्तव नव्हे. तसेच वैदिक धर्मियांनी सारे जग म्हणजे त्यांच्या वर्णव्यवस्थेत बांधल्याप्रमाने चालते असा समज असणे शक्य असले तरी ते ऐतिहासिक वास्तव नव्हे.

मी वैदिक धर्म व हिंदू धर्म याचे स्पष्ट वेगळे उल्लेख करतो याचे अनेकांना आश्चर्य वाटते. खरे तर तसे वाटायचे काहीएक कारण नाही. कारण अगदी एकोणिसाव्या शतकातील विद्वानही वैदिक धर्म वेगळा आहे असे स्पष्टपने नमूद करतात. एकोणिसाव्या शतकातील समाजसुधारक बहुविध हिंदू समाजाला वैदिक धर्मीय धारेशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत होते असे वसुधा दाल्मिया आपल्या "The Nationalism of Hindu Traditions" (१९९७, पृ. ३८३) या ग्रंथात म्हणतात. आर्य समाजाची स्थापना सर्वांनाच वैदिक धर्मात सामावून घ्यावे यासाठीच झाली होती असे नंदिनी गुप्ता म्हणतात. (The Urban Poor and Militant Hinduism in Early Twentieth Century, पृ. ८९५) महाराष्ट्रात लोकमान्य टिळक हे मात्र वैदिक धर्मात अन्यांना स्थान देण्याच्या विरोधात होते. उलट ते चित्पावन ब्राह्मणाचे वर्चस्व अन्यही ब्राह्म्णांवर कसे राहील याच प्रयत्नांत होते. ते लोकहितवादी आणि महात्मा फुलेंना "वैदिक धर्म-संस्कृती विध्वंसक" मानत तर प्रार्थना समाज व न्या. रानडे यांना "वैदिक धर्माचे" उद्धारक मानत. (Foundation of Tilak's Nationalism, प्रमिला व्ही. राव, पृ. १९) थो्डक्यात अनेक ब्राह्मण पुनरुज्जीवनवादी विद्वान वैदिक धर्माचाच आधार घेत होते. याचाच अर्थ असा कि सुधारणावादी असोत कि पुनरुज्जीवनवादी, सर्वच वैदिकवादी विद्वानांचा भर वैदिक धर्मावरच होता तर वैदिक व्यवस्थेलाच विरोध असना-या तत्कालीन बहुजनवादी विद्वानांचा भर वैदिक व्यवस्थेवर प्रहार करण्याचा होता. म्हणजेच वैदिक धर्म वेगळा आहे व बहुजनांचा धर्म वेगळा आहे याची जाण ते जरी ब्रिटिशांकरवी कागदोपत्री "हिंदू" म्हणुनच संबोधले जात असले तरी, बाळगून होते.

डा. सुधाकर देशमूख म्हंणतात कि वैदिक धर्म हा स्वतंत्र असून आगमिक तंत्रमार्गी धर्म सिंधुकाळापासून अस्तित्वात आहे. दोन परंपरा सर्वस्वी पथक असून उलट अथर्ववेदावर तंत्रांची उघड छाप आहे. आजचा हिंदू धर्म ८५% तंत्रप्रभावित आहे. मध्ययुगात (निबंधकाळात) वैदिक धर्मियांनी पुन्हा उचल खात मुलतत्ववादाचा आश्रय घेत तंत्र व नाथसंप्रदायाने जी समतेचे झुळूक आणली होती तोला बाध आली. (मध्ययुगीन धर्मसंकल्पनांचा इतिहास : तंत्र, योग, आणि भक्ती-डा. सुधाकर देशमूख.) थोडक्यात वैदिक धर्म व आगमिक अथवा तंत्रोक्त धर्म वेगळे आहेत याची जाण विद्वानांना होती व आहे. वैदिक धर्म वेगळा उल्लेखन्यात काही अकल्मित आहे असे नाही. या दोन धर्मात समन्वयाचे प्रयत्न झाले नाहीत असे नाही पण वैदिक धुरिणांनी आपले लक्ष केवळ वैदिक अधिसत्ता टिकवण्याचे प्रयत्न केले त्यामुळे हे प्रयत्न अयशस्वी झाले असेच म्हणवे लागेल. त्यात आर्य सिद्धांताने धार्मिक विभेद हा वांशिक विभेदात बदलला गेला होता हाही इतिहास आहे. टिळकांचे आर्क्टिक होम इन वेदाज" या ग्रंथाने त्यात भरच घातली असे म्हणावे लागते.

जातिप्रथा व मनू

जातीव्यवस्था मनुने निर्माण केलेली नाही. जाती म्हणजे व्यवसाय. व्यवसाय बदलाचे स्वातंत्र्य किमान दहाव्या शतकापर्यंत होते हे मी माझ्या "जातिसंस्थेचा इतिहास" या पुस्तकात दाखवून दिले आहे. विषमता जी निर्माण झाली तिचे मुलकारण नंतर निर्माण झालेल्या अर्थव्यवस्थेतील विषम बलुते पद्धतीत आहे हेही मी स्पष्ट केले आहे. मनुस्मृतीचा त्याशी काही संबंध नाही. जाती या वर्ण-संकराने निर्माण झाल्या असे मानायची एक पद्धत आहे. पण वैदिक वर्ण संकराने निर्माण झालेल्या जाती कोणत्या हे पाहिले तर "वर्णसंकर भ्रम"ही दूर होतो. खरे तर वर्ण संकराची भिती वैदिकांतच किती होती हे मनुस्मृतीच नव्हे तर भग्वद्गीतेवरुनही स्पष्ट दिसते. आजही काही वैदिक विद्वान वर्णव्यवस्था कशी उत्तम व वर्णसंकर कसा वाईट हे अगदी भाविकतेने सांगत असतात.

मनुनुसार अनुलोम-प्रतिलोम स्वरुपाचे विवाह अथवा शरीरसंबंधातून निर्माण झालेल्या प्रजेला संकरज मानत वेगवेगळ्या संकरापासून आयोगव, धिग्वन, अंत्यज, पारशव, सूत, मागध इत्यादि जाती निर्माण होतात. पण या उल्लेखिलेल्या सर्वच संकरित जाती भारतात आजच काय पण गुप्तकालापासुनही प्रत्यक्षात अस्तित्वात असल्याचे दिसत नाही. संकरज व्यक्ती असल्या तरे "जाती" बनण्याएवढी त्यांची संख्या असणे शक्य नाही. फार फार तर अशा काही व्यक्तींना त्या त्या संकरज जातीनामाने संबोधले जात असेल.

आणि ज्या जाती आज शूद्र मानल्या जातात त्यातील एकही जात "शूद्र" म्हणून मनुस्मृतीत उल्लेखलेली नाही. उदाहरणार्थ, देव-पितरांच्या कार्यात व श्राद्धात कोणाला प्रवेश नको याबाबत तिस-या अध्यायात आज्ञा असून शूद्र, मंदिरात पूजा करुन अर्जन करणारे, वैद्य, पशुपालक, मेंढपाळ, अभिनेते, नर्तक,  द्यूतगृहे चालवणारे, मांस व मद्य विक्रेते, सूत, तेली, शेतकरी, शिल्पी, दूतकार्य करणारे, शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देणारे वगैरे व्यवसाय करणारे त्याज्ज्य म्हटले आहेत. (अध्याय ३. १५२-१६६) . यात उल्लेखिलेल्या सर्व जाती व्यवसायाधिश्घ्ठित आहेत व त्यांना शूद्र म्हणलेले नाही. उलट शूद्र या संज्ञेचा स्वतंत्र उल्लेख आहे. या सर्वच जाती शूद्र असत्या तर त्यांना एकत्रीतपणे शूद्र असे उल्लेखिले असते. पण ते वास्तव नाही हे मनुस्मुतीवरुनच दिसते. डा. अजय मित्र शास्त्रीही म्हणतात कि "जाती अस्तित्वात येण्याचे महत्वाचे कारण म्हणजे व्यवसाय हेच होय. परंतू जातींना पारंपारिक सामाजिक संरचनेत कसे सामावून घ्यायचे या प्रश्नापोटी जातींच्या उत्पत्तीची वेगवेगळी स्पष्टिकरने तयार केली गेली."  येथे पारंपारिक संरचना म्हणजे वर्णव्यवस्था असा अर्थ अहे. ते पुढे म्हणतात, "धर्मशास्त्रकारांनी आंतरवर्णीय अनुलोम व प्रतिलोम असे विवाहाचे प्रकार गृहित धरुन त्यांना वर्ण सिद्धांताच्या चौकटीत सामावून घेण्याचा प्रयत्न केला. पण या व्यावसायिक जातींनी स्वत:च आपले तत्कालीन कोरीव लेखांत केलेले उल्लेख पाहता हा प्रयत्न यशस्वी झाला नाही हेच स्पष्ट होते. (महाराष्ट्र ग्यझेटियर-इतिहास:प्राचीन काळ, खंड १) म्हणजेच त्या जाती संकरातून निर्मण झाक्लेल्याच नव्हत्या. तसेच एकाही जातीने आपल्याला कोठेही शूद्र म्हनवून घेतलेले नाही हेही येथे उल्लेखनिय आहे. पण प्रतिपाद्य मुद्दा असा कि अनुलोम-प्रतिलोम संततीमुळे निर्माण होना-या समस्या हे वास्तव असले व त्या संततींना वेगवेगळ्या जातीनांवांनी ओळखले जात असले तरी  या जाती समाज बनण्याएवढ्या संख्येच्या नव्हत्या हे उघड आहे. ज्याअर्थी या जातीच नंतर नाहिशा झाल्या त्याअर्थी ही व्यवस्था वैदिक धर्मातही टिकू शकली नाही. पुढे क्षत्रीय व वैश्य हे वर्णच वैदिक धर्मातून वजा झाल्यानंतर व वैदिकंच्या सेवेतील शूद्र वर्णही निघून गेल्यानंतर आंतरधर्मीय संकर झाले तरी त्याचे काय करायचे हाही प्रश्नच होता. थोडक्यात आज आहे त्या जातिसंस्थेचे कर्तुत्व मनुस्मृतीला देता येत नाही. संकरज वैदिक जाती कधीच नष्ट झाल्या असून आजच्या जाती या संकरज नव्हेत हे येथे पक्के लक्षात ठेवले पाहिजे.

म्हणजे, शूद्रांसाठीची बंधने ही नेमक्या कोणासाठी, कोणत्या धर्मासाठी हेच समजावून न घेतल्याने, विशेषत: ब्रिटिश काळात, मनुस्मृती (व अन्यही मिताक्षरासारख्या स्मृतींमुळे) नुसता सामाजिकच नव्हे तर राजकीय गोंधळ सुरु झाला. ते कसे हे समजावून घेणे गरजेचे आहे. तत्पुर्वी स्मृतीनुसार घातली गेलेली शुद्रांवरची बंधने अगदी मध्यकालातही कोणी पाळलेली दिसत नाहीत. मुळात हिंदुंसाठी ही स्मृती नव्हतीच याचे भान राज्यकर्त्याना, धर्मपंडितांना व समाजांना होतेच. भारतातील अवैदिक हिंदू समाज हे नेहमीच आपापल्या कुल (जाती)धर्मानुसार नियंत्रित झालेले आपल्याला दिसतात. त्यांचे नियमन केले ते त्यांच्या-त्यांच्या जातींनी, जात पंचायतींनी. जाती जोवर सैल होत्या (किमान दहाव्या शतकापर्यंत) त्यांचे नियमन त्या-त्या व्यवसायांच्या श्रेण्या करीत. श्रेणी व्यवस्था सर्वात पुरातन असून श्रेंणी धर्माचा उल्लेख मनुस्मृतीही करते. हा धर्म स्वतंत्र आहे असाच मनुस्मृतीचा अभिप्राय आहे. अवैदिक (म्हणजे हिंदुंच्या) स्मृत्या होत्या असाही उल्लेख मनुस्मृती करते, म्हणजे जातीनियम लिखित स्वरुपात असण्याचीही शक्यता आहेच. पण आज तरी आपल्याला लिखित स्वरुपात त्या आपल्याला उपलब्ध नाहीत.

पण साहित्य व ताम्रपटीय पुराव्यावरून दिसते कि समाज जीवन खुपच मोकळे होते. जातीभेद फारसा अस्तित्वात नव्हता. हिंदू स्त्रीयांना पुरेसे स्वातंत्र्य होते. विवाह मुले वयात आल्यानंतरच होत. ब्रिटिश राज्य आल्यावर संमती वयाचा जो प्रश्न उद्भवला तो वैदिकांबाबत, हिंदुंबद्दल नव्हे. वैदिक अनुकरणाने काही हिंदू जातींतही बालविवाह घुसला असला तरी त्याचे प्रमाण अल्प होते असेच आपल्याला दिसते. घटस्फोट, पुनर्विवाह, विधवा विवाह या बाबतीत प्रत्येक जातीचे स्वत:चे नियम असले तरी असे विवाह आता आता पर्यंत सर्रास होत असत. सैन्यदलांत व शासकीय सेवांत सर्वच जातीघटकांना प्रवेश होता. विविध जातींची आर्थिक स्थिती मंदिरे व बौद्ध विहारांना दान देण्याइतपत सुदृढ होती हेही कोरीव लेखांवरून स्पष्ट दिसते. मनुस्मृती त्यांना लागू असती तर त्यांना मुळात संपत्तीसंचयाचाच अधिकार नव्हता तर ते दान कोठून देणार? आणि अभिमानाने आपापल्या जातीचा (व्यवसायाचा) उल्लेख कसा करणार? आज अस्पृष्य मानले गेलेल्या समाजांतील काही पुरेसे धनाढ्य होते. पाटील, किल्लेदार ते सेनानी बनत होते याचे पुरेसे पुरावे उपलब्ध आहेत. क्षीरसागरांनी प्रस्तूत पुस्तकात यावर पुरेसा प्रकाश टाकलेला आहेच.

मनुस्मृतीला सर्वच हिंदू समाजाची संहिता समजण्याची चूक भारतियांची नसून ब्रिटिशांची आहे हे आपण आधी लक्षात घ्यायला हवे. पाश्चात्य विद्वान संस्कृत भाषा व त्यातील साहित्याकडे आकृष्ठ झाले ते दोन कारणांनी. पहिले कारण निखळ स्वार्थाचे होते. वंशवादाने पिडलेल्या पाश्चिमात्यांनी संस्कृत भाषेला पुरा-इंडो-युरोपियन भाषा ठरवत आपला इतिहास मागे न्यायला सुरुवात केली. आर्य वंश वादाची सुरुवात तेथेच झाली. विल्यम जोन्सने सर्वात आधी, म्हणजे १७६४ मध्येच मनुस्मृतीचा इंग्रजीत अनुवाद केला. संस्कृतात जेही काही आहे ते ब्राह्मणांचे व ब्राह्मण हेच समग्र हिंदू धर्माचे नियामक असल्याच्या समजुतीतून सर्व स्मृतीही हिंदुंच्या नियमनासाठी लिहिल्या गेल्या हा त्यांचा समज झाला. प्रत्यक्षात वैष्णव वगळता शिव (व अन्य) मंदिरांचे पुजारी गुरव अथवा स्थानिक कोणत्याही जातीचे हिंदू असत. वैदिक समाजात मंदिर पुजा-यांना वैदिक धर्मव्यवस्थेत अत्यंत गौण स्थान आहे हेही येथे लक्षात घ्यावे लागते.

आर्य आक्रमणवाद ब्रिटिशांच्या हाताशी असल्याने स्मृतींतील शूद्र हे आक्रमक आर्यांने हरवलेले दास-दस्य़ु होत असा त्यांचा समज झाला. त्यांच्या दृष्टीने स्मृती या सर्व हिंदुंची धर्मशास्त्रे होत. वर्ण व जाती या दोन अत्यंत वेगळ्या संकल्पना असतांनाही त्यांनी वर्ण व जातींना एकच समजत त्याचा अनुवाद सरसकट "कास्ट" (caste) असा केला. येथील कायदे बनवतांनाही त्यांनी मनुस्मृतीचाच विशेषकरुन आधार घेतला. म्ह्णजे जे हिंदू या स्मृतींच्या कक्षेबाहेर होते तेही कारण नसतांना त्या कक्षेत आणले गेले. भारतातील एवढ्या जाती व प्रत्येक जातीच्या प्रथा अभ्यासण्याएवढा वेळही त्यांच्याकडे नव्हता. "The Sanskrit pandits were hired to translate and sanction a new interpretation of customary laws created a curious Anglo-Brahmanical hybrid ...in which the pandits dutifullyu followed the demands made by their paymasters." असे मधु किश्वर म्हणतात ते योग्यच आहे. (मानुषी, भाग-१२०, ) वारेन हास्टिंग्जने १७७२ मध्येच काही ब्राह्मण पंडितांना नियुक्त करुन त्यांची हिंदू कायदे बनवण्यासाठी मदत घेतली. हे असे होऊ देणे त्यांच्याही राजकीय सोयीचे होते. हिंदू व्यक्तिगत कायदा या पद्धतीने बनवला गेला व स्वातंत्र्यानंतरही कही बदल करुन तोच चालू राहिला. त्याचा मुलाधार मनुस्मृतीच असल्याने व त्यातील सामाजिक विषमतेचे तत्वज्ञान, जे आधी वैदिक वगळता हिंदू धर्मात अस्तित्वात नव्हते, ते अस्तित्वात आणुन इंग्रजांना येथे राज्य करणे सोपे गेले. एतद्देशिय अडाणी जनतेच्या हे लक्षात आले नाही. "शास्त्रांमध्ये जे लिहिले आहे ते विवेकावर आधारित नसेल तर स्विकारता येणार नाही." व "वैश्विक नीति व सत्याशी द्रोह करणारे शास्त्रवचन स्विकारार्ह असू शकत नाही." असे महात्मा गांधी स्मृतींबद्दल म्हणाले होते. (The Collected Work of Mahatma Gandhi, Vol. LXII, p. 121).अर्थात त्यांचाही समज स्मृती या समग्र हिंदुंसाठीच अहेत असा गैरसमज होताच. स्वातंत्र्योत्तर काळात हिंदू कोड बिलानेही वादळ उठवले. परंतू ब्रिटिश राजवटीत भारतीय जातींचे परस्पर संबंध बदलले एवढे नक्की. जातींचे निर्मितीचे श्रेय बिनदिक्कतपणे स्मृत्यांना देण्यात आले. जवळपास दोनशे वर्षांच्या या काळात नवशिक्षित हिंदुंनाही जातींची निर्मिती मनुस्मृतीनेच केली असे वाटु लागले. ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाचे बीज ब-यापैकी या समजुतीकडे जाते. मुळात वादाचा विषय दोन धर्मांना एक समजणे हा होता पण तिकडे मात्र सुधारणावाद्यांचे लक्ष गेले नाही हे भारताचे दुर्दैव होय

थोडक्यात, मनुस्मृती व त्याआधारित सर्वच स्मृत्या, ज्या केवळ आणि केवळ वैदिक धर्माच्या नियमनासाठी होत्या, त्याच सुधारित व आधुनिक स्वरुपात समग्र हिंदुंसाठी गृहित धरण्यात आल्या. ब्रिटिश काळातच मनुस्मृतीविरुद्ध आवाज उठू लागले कारण ब्रिटिश कायदेही हिंदुंना माहितही नसलेल्या स्मृती कायद्यांवर आधारित होते. सामाजिक चळवळींचा स्मृती हा एक आधार बनला असे म्हटले तरी वावगे हो्णार नाही. हिंदू कोड बिलावरही स्मृत्यांचा प्रभाव आहे हे अमान्य करता येत नाही. ब्रिटिशकाळाने लयाला गेलेल्या स्मृत्यांचे माहात्म्य अपरंपार वाढवले. तत्पुर्वी अगदी पेशवाईतही अन्य जातींचे निवाडे करतांना कधीही स्मृतींचा वापर करण्यात आला नाही असे क्षीरसागरांनी पुढे स्पष्ट केलेच आहे. मला वाटते ते विवेचन मुख्य मुद्दा स्पष्ट करायला पुरेसे आहे.

अस्पृश्यतेचा प्रश्न

अस्पृष्यतेचा प्रश्न हा अत्यंत जटिल आहे हे येथे मान्य केलेच पाहिजे. या प्रश्नावर मी व संजय क्षीरसागर गेली अनेक वर्ष डोकेफोड करत आहोत. मनुस्मृतीत काही संकरज जाती (उदा. अंत्यज, चांडाळ, श्व[अच, धिग्वन) अस्पृष्य मानल्या गेलेल्या आहेत. प्राकृत साहित्यावरुनही काही जातींना गांवात येतांना काही चिन्हे बाळगांवी लागत, गांवात राहणारे असले तर घरांवर काही चिन्हात्मक खुणा कराव्या लागत असे मोघम उल्लेख आढळतात. अस्पृष्यतेची कारणमिमांसा अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने केली असली तरी अद्याप तिचा समाधानकारक उलगडा झालेला नाही. आज अस्पृष्य मानल्या जातींपैकी एकाही जातीचा उल्लेख मनु व अन्य स्मृत्यांतंच काय पण पुराणंतही आढळत नाही. फक्त जैनांचा आदिपुराणात धोबी, सुतार व लोहारांना अस्पृष्य वर्गात घातलेले आढलते. पण यांना प्रत्यक्षात हिंदू अस्पृष्य मानत नाहीत. परंतू अस्पृष्यता वास्तवात होती हे एक वास्तव आहे.

उदा. महार समाज हा मुळचा ग्रामरक्षण, व्यापारी तांड्यांचे रक्षण करनारा समाज. वेशीचे रक्षण करणे, चोरी झाली तर चोरांना पकडणे, जन्म-मृत्युची नोंद ठेवणे, शेतीतील-गांवातील तंटे उद्भवले तर साक्ष देणे (त्याचीच साक्ष अंतिम मानली जाई), राजे-सरदारांचे व्यक्तीगर अंगरक्षक म्हनून कामे करणे इत्यादि अत्यंत महत्वाची कामे त्यांच्यावर सोपवलेली असायची. ही प्रथा ब्रिटिशकाळापर्यंत चालू असल्याचे दिसते. या कामांत कालौघात काही हीणकस कामांचा, म्हणजे मृत जनावर ओश्ढून नेणे, गांवातील स्वच्छता राखणे ई. समावेश झाला. असे असले तरी महारांना अस्पृष्य़ का मानले गेले याचा समाधानकारक उलगडा होत नाही.

बरे ही अस्पृष्यता गांवपातळीवरील काम करणा-यांबाबत पाळली जात होती का सर्वत्र हा विचार केला तरी गोंधळाचे चित्र सामोरे येते. उदा. सतराव्या शतकातील काही दस्तावेजांवरून दिसते कि सैन्यातील महारांबाबत अस्पृष्यता पाळली जात नव्हती. इतकेच नव्हे तर त्यांचे वेतन व इतरांच्या वेतनातही फरक नसे. त्यांना पराक्रम गाजवल्याबद्दल जमीनी इनाम दिल्या जात. अगदी शनिवारवाड्यातही महार रक्षकांचे पथक होते. शिवकाळात ते अनेक किल्ल्यांचे किल्लेदार असल्याचे दिसते. या व अशा अस्पृष्य मानलेल्य गेलेल्या जाती व मनुस्मृती यांत काही संबंध आहे काय हे तपासता लक्षात येते कि अस्पृष्यतेची भावना मनुस्मृतीत दिसत असली तरी हिंदुंत अनुकरणाने आली कि तिची निर्मिती स्वतंत्रपणे झाली याचा उलगडा होत नाही. खरे तर तंत्र मार्गात, विशेषत: नाथ पंथात अस्पृश्यता हा प्रकारच अस्तित्वात नसल्याचेही आपल्याला दिसते. पण वैदिक धर्माचे निकटचे साहचर्य एकमेकांत काही अनिष्ट प्रथा निर्माण व्हायला कारण ठरल्या हे निश्चित आहे. जैन धर्मात अन्यथा अस्पृष्य जातींचा उल्लेख येण्याचे अन्य कारण दिसत नाही. वैदिक धर्मात नसलेल्या जाती या हिंदुंमुळे जशा निर्माण झाल्या तसेच वर्णांतील उच्च-नीचतेच्या भावना उत्तर युगात हिंदू धर्मात प्रवेशल्याचेही आपल्याला दिसते. यावर अजुनही खूप संशोधन व्हायची गरज आहे हे मात्र निश्चित.

मनुस्मृतीतून प्रकट होनारी महत्वाची बाब म्हणजे एका समाजाच्या कालौघात झालेल्या स्थित्यंतरांचा, बदललेल्या विचारांचा, त्यांच्यासमोर आलेल्या समस्या व त्यासाठी त्यांनी शोधलेल्या मार्गांचा एक व्यापक आलेख यातून मिळतो. या दृष्टीने आजवर मनुस्मृतीचे परिशिलन झालेले नव्हते. या निमित्ताने ते व्हायला मदत होईल अशी आशा मला आहे.
संजय क्षीरसागरांच्या या अमोलिक ग्रंथामुळे भारतीय समाजावर अकारण पडलेले सावट दूर होत हिंदुंनी नकळत गेली काहिशे वर्ष जोपासलेली न्य़ुनगंडाची भावना दूर होण्यात नि:संशय मदत होणार आहे. आजवर मनुस्मृतीचा दुरुपयोग करत त्यातील समाजव्यवस्थेचे निर्देशन नेमके कोणासाठी आहे हे स्पष्ट केले गेले नव्हते. ब्रिटिश व एतद्देशिय तत्कालीन विद्वानांनी आपापली लौकिक सोय पाहिल्यामुळे समाजात एक तंणाव तर निर्माण झालाच पण शूद्र नसतांनाही अनेकांना शूद्र समजत व त्यांनाही ते शूद्रच आहेत असा समज निर्माण करवून देत जो न्युनगंड निर्माण केला गेला याची सामाजिक परिणती विकासशील न राहता परस्परविरोधाची, संघर्षाची होण्यात झाली. खरे तर बाबासाहेबांनंतर हे काम दुस-या पिढीच्या विद्वानांनी निकोपपणे पुढे न्यायला हवे होते. तसे न करता ते ब्राह्मणद्वेषाच्याच गर्तेत अडकल्याने त्यांच्याकडून मनुस्मृतीची समग्र चिकित्सा झाली नाही. संजय क्षीरसागरांनी ख-या संशोधकाच्या भुमिकेत जात तटस्थपणे मनुस्मृतीची जी चिकित्सा केली आहे ती मनुस्मृतीचे विरोधक व समर्थक या दोन्ही पक्षांना नवा दृष्टीकोण देण्यास समर्थ आहे याबाबत माझ्या मनात शंका नाही.

पुस्तकात मनुस्मृतीतील श्लोकांचे संगतवार विश्लेशन आपल्याला मिळेल. खुद्द स्मृतीकारांनी कोठेकोठे विसंगत घोळ घातला आहे याचेही दर्शन आपल्याला होईल  व एका प्राचीन समाजाचे नियमन कसे करंण्याचे प्रयत्न होत होते, कशा अडचणी येत होत्या याचेही दिग्दर्शन होईल. आज "मनुवाद" हा कळीचा शब्द बनला आहे या काळात अशा पद्धतीने मनुस्मृतीची तटस्थ चिकित्सा होणे ही अपल्या एकंदरित समाजजीवनासाठी निश्चितच उपकारक आहे यात शंका नसावी. मनुस्मृती अथवा अन्य स्मृतींमुळे आमची अवनती झाली असे असंख्य सामाजिक चलवळींचे धुरीण गेले दीड शतक ओरडत आहेत, त्यांनाही या पुस्तकामुळे पुनर्विचार करणे भाग पडेल. मनुस्मृतीचे पाखंड निर्माण करण्यात या स्वत:ला "बहुजनीय" म्हनवणा-या विचारवंतांचा मोठा वाटा आहे हे नमूद करण्यात मला कसलाही संकोच वाटत नाही.

धन्यवाद.

-संजय सोनवणी

No comments:

Post a Comment

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...