Friday, December 27, 2019

शैक्षणिक मानसशास्त्र (२)



एखाद्या मुलाला का शिकावे वाटते आणि एखाद्याला का शिकावे वाटत नाही? एखाद्या विद्यार्थ्याला एका विषयात गती असते तर अन्य विषयांत प्रयत्नपुर्वक का खुरडावे लागते? एखादा विद्यार्थी सर्वच विषयांत प्रवीण का होतो? एखाद्या वर्षातील सर्व-विषय प्राविण्यात सातत्य का राहत नाही? विशिष्ट विद्याशाखा निवडण्यामागे नेमक्या कोणत्या प्रेरणा कार्यरत असतात? आवड, सामाजिक लाट की कौटुंबिक दबाव? प्रतिभासंपन्न (म्हणजे आपल्या ज्ञानविषयात अधिकची भर घालण्याची क्षमता असणारे) नेहमीच अल्प का असतात? यात काही उपजत अथवा श्रद्धाळू समजतात तशा दैवी प्रेरणा कार्यरत असतात काय? 

या सर्व प्रश्नांचा एकत्रीत विचार केला तर असे लक्षात येईल की विद्यार्थ्याचे व्यक्तिगत मानसशास्त्र आणि सामाजिक मानसशास्त्र यांच्या परस्पर प्रभावांतून वरील बाबी जन्माला येतात. मुळात कशासाठी शिकायचे आणि काय शिकायचे याची आपंण अत्यंत ढोबळ मांडणी केलेली असल्याने आपले अभ्यासक्रमही ढोबळ असतात. त्यात बाल, किशोर आणि युवा मानसशास्त्राचा विचार केला गेलेला असतोच असे नाही. एका अर्थाने सामाजिक मानसशास्त्रातुन अभ्यासक्रम जन्माला येत असल्याने ते ढोबळ असणे स्वाभाविक होऊन जाते. व्यक्तिगत मानसशास्त्र मात्र वेगवेगळे कल दाखवत असते. शिक्षणात आस्था असणे आणि नसणे याचा संबंधही थेट मानसशास्त्राशी येऊन पोहोचतो.  एखाद्याला शिक्षणात आस्था नाही याचे कारण अनेकदा दिलेल्या अभ्यासक्रमात आकर्षित करेल असे काहीच नाही असे असण्यात असू शकते. अभासक्रमात/शालेय वातावरणात रस नाही म्हणजे त्याला काहीच शिकण्याची आवड नाही असे असू शकत नाही कारण मुळात शिकणे हीच एक उपजत व निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. व्यवहारातुनही शिक्षण मिळतच असते. शाळा-महाविद्यालये शिस्तबद्ध शिक्षण देतात एवढेच पण त्यातही शास्त्रशुद्धपणा व मानसशास्त्राचा विचार केला जात नसल्याने शिस्तबद्ध शिक्षण हे मुलांन खुले आकाश देत ज्ञानाच्या कक्षा वाढवण्याची संधी देण्यापेक्षा त्याला विचारबंदिस्त करते असे आपल्या लक्षात येइल. 

नैसर्गिक कल असलेल्या विषयात विद्यार्थी चमक दाखवू शकतो पण अन्य विषयही सक्तीचे असल्याने तो त्यात रखडती वाटचाल करतो. एखादा विद्यार्थी सर्व विषयात विशिष्ट काळापर्यंत प्रवीण आहे असे दिसत असले व त्याला हुशारांच्या यादीत टाकले जात असले तरी ते सातत्य टिकून राहतेच असे नाही. शिक्षण प्रेरणा बदलत गेल्या तर असे होतांना आपल्याला अनेकदा दिसते पण समजत नाही. विद्यशाखा निवडत असतांना अनेकदा त्या क्षेत्रातील आपल्या कलापेक्षा किंवा आवडीपेक्षा त्या क्षेत्रात उपलब्ध असणा-या संधी महत्वाचा प्रभाव टाकतात आणि त्या विद्यार्थ्याची अवस्था प्रवाहपतीतासारखी होत जाते. यात सामाजिक मानसशास्त्र व्यक्तीगत मानसशास्त्रावर मात करते. पंण यातुनच विद्यार्थ्याची मानसिकता अस्थिर होत जाते हे आपण लक्षात घ्यायला हवे.

ज्ञानप्रेरणा उपजत किंवा दैवी असतात व त्यामुळेच प्रतिभावंत घडतात असा एक सार्वत्रिक समज आहे. प्रतिभावंतांची संख्या कमी दिसत असल्याने हा समज बळावला असणे स्वाभाविक आहे. पण आपण त्यावर पुढील भागात चर्चा करुयात.

(क्रमश:)

No comments:

Post a Comment

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...