Thursday, December 26, 2019

येशुचरित्रातील हरवलेली वर्ष आणि काश्मीर


येशू ख्रिस्ताच्या आयुष्यातील अज्ञात कालखंडाबाबत बिब्लिकल आणि अन्य अकेडमिक संशोधकांत एक प्रकारचे अनावर कुतुहल आहे. त्यातूनच अनेक सिद्धांत जन्माला आलेले आहेत. येशुचा मृत्यू क्रॉसवर झाला की नाही याबाबतही अनेक विवाद उत्पन्न झालेले आहेत. येशुचा मृत्यू क्रॉसवर झाला नसेल तर मग त्यानंतर येशू कोठे गेला याबाबतही वेगवेगळ्या थिय-या मांडल्या गेल्या आहेत. त्यांना कल्पोपकल्पित म्हणून सहज उडवता येणे शक्य असले तरी त्यातील शक्याशक्यतांची तपासणी करणे आवश्यक आहे.

नव्या करारानुसार येशू ख्रिस्ताचा जन्म इसपू सहामद्ध्ये गॅलिलीमध्ये मेरी या कुमारी मातेच्या पोटी झाला. त्याचे पालन-पोषण जोसेफ नामक सुताराच्या घरी झाले. त्याची वय वर्ष बारापर्यंतचीच थोडीफार माहिती मिळते. पण वय वर्ष १२ ते एकोणतीस या काळाबद्दल नवा करार मौन आहे. इतर विद्वानांच्या मते येशु या काळात सुतारकामच करत राहिला. पण त्याचेही पुरावे संदिग्ध आणि ओढून-ताणून लावल्यासारखे वाटतात. उदाहणार्थ, मार्क-. मधील विधान , "हा तो सुतार तर नव्हे ना?" या विधानावरून येशू त्या प्रांतात ओळखला जात असला पाहिजे अन्यथा अशी ओळख दाखवली गेली नसती. पण ही ओळखही संदिग्ध आहे हे उघड आहे. यावरुन येशू त्याच प्रांतात स्थायिक होता हे सिद्ध होत नाही. वयाच्या २९ वर्षानंतरच त्याने धर्मोपदेश करायला सुरुवात केली. त्याआधी त्याने ज्ञानप्राप्तीसाठी कोठे प्रवासच केला नसेल असाही तर्क लावता येत नाही. सुतारकाम हा त्याच्या पित्याचा व्यवसायच होता त्यामुळे त्याचाही सुतार म्हणून उल्लेख होत असणे स्वाभाविक आहे. यामुळे अजुन तर्कांना उधान आले येशुच्या हरवलेल्या वर्षांत नेमके काय झाले हे शोधण्याचे एक स्पर्धाच सुरु झाली असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

चवथ्या-पाचव्या शतकात राजा आर्थरच्या काळातील अर्थुरियन दंतकथांत तरुण वयात येशू इंग्लंडमध्ये येऊन गेला होता आणि तो उत्कृष्ठ बांधकामतज्ञ होता असे आपल्याला पहायला मिळते. येशुची आई विधवा झाल्यानंतर जोसेफने आपल्या येशुला आपल्या पंखांखाली घेतले अशा काही दंतकथा स्चवतात. अर्थात या दंतकथा बायबलमधील कथांशी विसंगत आहेत. त्यामुळे पुढेही अनेक दावे होत राहिले. येशुच्या या हरवलेल्या वर्षांबाबत १२व्या शतकात दावा केला गेला की येशू मृत्युनंतर पवित्र आत्म्याच्या स्वरुपात इंग्लंडमध्ये येऊन गेला होता. पण हे झाले क्रॉसवरील मृत्युनंतर. या दाव्याला त्या काळात जरी अद्भुतरम्यतेच्या मोहात प्रसिद्धी मिळाली असली तरी या दाव्यावर विश्वास मात्र ठेवला गेलेला दिसत नाही.

पण एकोणिसाव्या शतकात रेनेसांनंतर युरोपियन विद्वान बायबलवर अंधविश्वास ठेवता या काळाबद्दल गांभिर्याने विचार करू लागले. कथा-कादंबरीकारांना आपली कल्पनाशक्ती स्वैर सोडता आली. त्यातून मजेशीर तर्क मांडले गेले. १८६९ मध्ये लुइस जेकोलियट या लेखकाने कृष्ण आणि येशुत साम्य पाहिले आणि बायबल हे मुळचे नसून भारतीय पुराणकथांचा तो नवा अवतार आहे असा दावा केला. कृष्णकथा आणि येशुच्या कथेत त्याने अनेक साम्यस्थळे शोधली होती. भारत आणि येशू ख्रिस्ताची सांगड घालायला येथून सुरुवात झाली असे म्हटले तरी वावगे होणार नाही.

पण सर्वात अधिक गाजला तो १८८७ मधील निकोलस नोटोविच या युद्ध-पत्रकाराचा यांचा दावा. त्याने भारताला भेट दिली होती. काश्मीरमार्गे लडाखला गेल्यानंतर हर्मीस मठात त्याला म्हणे "लाइफ ऑफ सेंट इसा" नामक तिबेटियन भाषेतील एक जुने हस्तलिखित मिळाले. इसा हे येशुचे अरेबिकमध्ये होणारे रुपांतर आहे हे सर्वांना माहितच आहे. नोटोविचने या हस्तलिखिताचा अनुवाद केला आणि १८९४ मध्ये प्रथम फ्रेंचमध्ये प्रसिद्ध केला तर त्याचा अनुवाद भारतीय जैन विद्वान वीरचंद गांधी यांनी प्रदिर्घ प्रस्तावना लिहून "अननोन लाईफ ऑफ जिजस क्राईस्ट" या नावाने प्रसिद्ध झाला. नोटोविचच्या पुस्तकाला प्रचंड प्रसिद्धी तर मिळाली पण हे पुस्तक म्हणजे एक थापांचे पोतडे आहे असे टीकाकार उच्च रवात सिद्ध करण्याचा प्रयत्न करु लागले.

वीरचंद गांधी हे बहुभाषिक आणि जैन धर्मासहित अनेक धर्मतत्वज्ञानाचे विद्वान होते. शिकागो येथे भरलेल्या पहिल्या धर्मसंसदेत त्यांची भाषणे एवढी गाजली की नंतर त्यांना अमेरिकेतच पाचशेहून अधिक व्याख्याने द्यावी लागली. बायबलवर त्यांची हुकुमत होती. बायबलवरीत जैन बौद्ध तत्वज्ञानाचा प्रभाव आहे हे त्यांनी ओळखलेच होते, पण येशुपर्यंत ही धर्मतत्वे कशी पोहोचली या गुढाचे उत्तर त्यांना नोटोविचच्या पुस्तकात सापडले. यातील हस्तलिखिताच्या अनुवादातील माहितीत काही विसंगती अवश्य आहेत. असे असले तरी तो भाग नंतर कोणाची घुलघासड (जे भारतीय प्राचीन साहित्यात नित्यश: होत आलेले आहे.) मानली तरी आरंभीचा भाग अगदीच दुर्लक्षणीय नाही.

यातील माहितीनुसार येशू वयाच्या तेराव्या वर्षी तत्कालीन रिवाजानुसार आपल्या विवाहाच्या चर्चा सुरु होताहेत हे लक्षात आल्यानंतर घरातून सटकला आणि व्यापारी तांड्यासोबत सिंधकडे जायला निघाला. तेंव्हा भारत, विशेषत: काश्मीर हे विविध धर्म-तत्वज्ञानांचे केंद्र होते. त्याने पुढे पंजाब ओलांडून जगन्नाथ पुरीपर्यंत प्रवास केला. जैन बुद्धिस्ट विद्वानांशीही त्याने धर्मचर्चा केल्या. वेदांचा अभ्यास केला. त्याने ब्राह्मण क्षत्रियांवर विषमतायुक्त वागणुकीसाठी प्रहार केले आणि वैश्य आणि शुंद्रांत तो अधिक रमला आणि त्यांना समतेचा उपदेश करु लागला. मुर्तीपुजेलाही त्याने विरोध केला. यामुळे चिडलेल्या ब्राह्मण क्षत्रियांनी येशुची हत्या करायचे ठरवले. येशूला शुद्रांकरवी ही माहिती मिळताच तो नेपाळमध्ये सटकला. तेथे पालीचा अभ्यास केला. बुधाचे तत्वज्ञान समजाऊन घेतले. मग हिमालयीन प्रदेशात (काश्मीर) काही काळ वास्तव्य केल्यानंतर तो पुन्हा परतीच्या वाटेला लागुन पर्शियात आला. या सातव्या अध्यायापर्यंत जो भाग येतो त्यात बिब्लिकल विचारांची बीजे दिसतात. नंतरचा भाग तो इझ्राएलमध्ये गेल्यानंतर काय झाले ते त्याचे क्रुसिफ़िकेशन कसे झाले याचा वृत्तांत देतो. या नंतरच्या वृत्तांतामुळे नोटोविचवर लबाडीचा आरोप झाला. याचे कारण असे कि भारतातून येशू निघुन गेल्यानंतरचा वृत्तांत लडाखमध्ये लिहिल्या गेलेल्या हस्तलिखितात येणे शक्य नाही हे सर्वांचेच मत पडले. यात एकच शक्यता होती ती म्हणजे येशुसोबत एखादा भारतीय शिष्य असण्याची ज्याने येशुला क्रॉसवर मारल्यानंतर परत येवून हा समग्र वृत्तांत लिहिला. पण ही एक शक्यता आहे जी अगदीच अविश्वसनीय मानता येत नाही.

वीरचंद गांधींनी त्यांच्या प्रस्तावनेत बायबलमध्ये डोकावणा-या भारतीय तत्वज्ञानाबरोबरच भारतीय उपखंडतच आढळणा-या असंख्य भारतीय वृक्ष, पक्षी, धातूंचे वर्णन आधाराला घेतले आहे. भारत ते इजिप्तपर्यंत सिंधु काळापासुन व्यापार होत होता. असंख्य व्यापारी तांडे या मार्गाने तर जातच पण समुद्र मार्गही वापरला जाई हे एक ऐतिहसिक वास्तव आहे. इझ्राएल आणि भारतात त्यामुळे अर्थातच पुर्वापार व्यापारी संबंध होतेच. एवढेच नव्हे तर बायबलमध्ये नव्या जुन्या करारात बुद्धिस्ट, हिंदू जैन तत्वज्ञानाची छाप दिसून येते. असे असताना, उन्नोन लाइफ ऑफ जिजस क्राईस्ट या पुस्तकात प्रसिद्ध झालेल्या लडाखी ग्रंथाला अगदीच फेटाळून लावता येणार नाही असे वीरचंद गांधी म्हणतात.

शिवाय जैन आणि बौद्ध हे दोन जगातील आद्य मिशनरी पद्धतीने धर्मप्रचार करणारे धर्म अहेत. मठ ही संकल्पना याह दोन धर्मांनी जन्माला घातली. साध्वी, भिक्षुणी आणि नन या संकल्पनांतही साम्य आहे. यामुळे येशू ख्रिस्त भारतात येऊन गेल्याची निश्चिती होऊ शकते असे वीरचंद गांधी आपल्या प्रस्तावनेत म्हणतात.

दुसरी बाब अशी की कॅथॉलिक विद्वानांनी येशुवर अन्य कोणाचाही प्रभाव असण्याची शक्यताच नाकारली असल्याने बायबलमधील बराच मूळ भाग एक तर संपादित केला आहे किंवा वगळला तरी आहे. डेड सी स्क्रोल्स सापडल्यानंतर या शंकेला बळकटी आली. आजचे बायबल पुर्ण नाही या दाव्यांना पुष्टी मिळाली. चर्चने अद्याप त्यांना अधिकृत मान्यता दिली नसली तरी ते लिखित स्वरुपात सापडल्याने विद्वत्जग चर्चच्या मान्यतेची अर्थातच पर्वा करत नाही. डेड सी स्क्रोल्समध्येही १३ ते २९ या गायब वर्षांत येशुने काय केले याचा वृत्तांत मिळत नाही हे विशेष. त्यामुळे येशू या काळात इझ्राएलमध्ये किमान काही वर्ष तरी नव्हता या दाव्याला पुष्टी मिळते.

दुसरे असे की भारतात, विशेषत: काश्मीरमध्ये येऊन ज्ञानार्जन करावे यासाठी चीन, कोरिया, तिबेट ते मध्य आशियातील विद्वान सातत्याने येत राहिले आहेत. चीन तिबेटमध्ये जो वज्रयानी बुद्धिझम गेला तो काश्मीरमध्येच जन्माला आलेला तेथूनच पसरलेला. असंख्य बौद्ध भिक्षू काश्मीरमधुन तिबेट चीनला नुसते गेले नाहीत तर चीनमध्ये मठ स्थापले. रत्नचिंता, कुमारजीव हे ते महत्वाचे भिक्षू. मध्य अशियातही इराणपर्यंतचे विद्वान येथे येऊन गेल्याच्या नोंदी मिळतात. त्यामुळे येशुसारख्या बुद्धीमान तरुणाने ही किर्ती ऐकून भारत काश्मीरला भेट देण्याचा विचार केला नसेल असे म्हणता येणार नाही. येशुच्या बायबलमध्ये झळकणा-या सिद्धांतांची जन्मभुमी भारत हेही नाकारता येत नाही.

नोटोविच यांचे पुस्तक हे त्यांनीच लिहिले आणि लडाखमध्ये सापडलेल्या मुळ हस्तलिखिताचा अनुवाद म्हणून केवळ प्रसिद्धी आणि धनाच्या आशेने खपवले हा त्याच्यावर आरोप केला त्यात अगदी मॅक्समुल्लर सारख्या विद्वानानेही केला होता हे लक्षात घेतले पाहिजे. याचे कारण या हस्तलिखितात त्रुटी आहेतच. ते मुळ कोठे लिहिले गेले, कोणत्या भाषेत लिहिले गेले आणि याचा मुळ लेखक कोण हे अज्ञात आहे. ती भारतीय लेखकांची सवयही आहे. आजही असंख्य ग्रंथांच्या मुळ लेखकांची नावे आपल्याला अज्ञात आहेत. शिवाय या अनुवादात येणारे भारतीय समाजजीवन मात्र -यापैकी अस्सल भारतीय आहे. इसवी सनाच्या पहिल्या शतकात भारतात कुशाणांची सत्ता होती, पण त्याचे विवेचन यात येत नाही. हे सुद्धा भारतीय लेखकांची खास सवय. या काळात जैन, बौद्ध आणि सांख्य-अवैदिकही मुर्तीपुजेविरुद्ध होते. इझ्राएलमध्ये तेंव्हा मुर्तीपुजा सर्रास होती. येशू जन्माला ज्यू म्हणून आला आणि त्याचा मृत्युही ज्यू म्हणुनच झाला. हा विरोध तो येथेच शिकला असल्याचीही शयता नाकारता येत नाही. या हस्तलिखितावर बायबलची छाप आहे हे तर उघडच आहे. कदाचित अध्याय नंतरचा भाग इझ्राएलमधेच घडला असल्याने ही समानता आलेली असावी. या हस्तलिखितातील मजकुराचे अनेक अंगांनी चिकित्सापुर्ण अध्ययन होणे आवश्यक आहे. वीरचंद गांधींच्या प्रस्तावनेतील विवेचनाचाही अनेकांगांनी विचार करणे गरजेचे आहे. 

येशुचा मृत्यू क्रॉसवर झाला नाही, तर तो परत काश्मीरमध्ये आला रोझबल येथे त्याची समाधी आहे असे मानणारा एक वर्गही आहे. त्यावर अनेक विद्वानांनी विस्तृत लेखनही केले आहे. काश्मीरच का हा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. येशू खरोखर भारतात आला की नाही हा मुद्दा महत्वाचाच आहे पण समजा त्याने भेट दिली नसली तरी काश्मीरशी संबंध जोडण्याचा प्रयत्नही हे सुचवतो की काश्मीरची भुमी विविध विचार स्विकारण्याची त्यांना आपलेसे करण्याची प्रवृती काश्मीरींमध्ये आहे.  यावर सखोल संशोधन करण्याची आवश्यकता आहे.

-संजय सोनवणी

No comments:

Post a Comment

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...