Saturday, December 14, 2019

निर्णय तुमचा आहे!

भाजप आणि त्याच्या मातृसंस्था रा. स्व. संघाने आपला अजेंडा कधीच लपवलेला नव्हता. गोळवलकर गुरुजींनी भारतात मुस्लिमांना दुय्यम नागरिकत्व असावे हे तत्वज्ञान सांगीतले होते. वैदिक चातुर्वर्ण्य, राजसत्तेवर धर्मसत्तेचे अधिष्ठाण का असले पाहिजे ते जातीसंस्थेमुळेच देश बळकट होता हे वैदिक तत्वज्ञान विस्ताराने पं. दिनदयाळ उपाध्यायांनी विषद केले होते. धर्मोन्मादात अनेक हिंदू या वैदिकतेत वाहून गेले आणि त्याच धर्माचे (स्वत: नसतांनाही) अगदी सहज सहज प्रचारक बनत गेले. भाजपने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यांतही पक्षाची ध्येयधोरणे वेळोवेळी स्पष्ट केलेली होती जी त्या पक्षाच्या मातृसंस्थेच्या तत्वज्ञानाशी मुळीच विसंगत नव्हती. संघाने आपले हस्तक/स्वयंसेवक प्रशासन, न्यायसंस्था, पोलिस, माध्यमे, प्रकाशन संस्था ते वित्तीय संस्थात कसे घुसवले यावर वेळोवेळी चर्चा झालेली नव्हती असे नाही. सत्ता हातात आल्यावर ते आपले तत्वज्ञान पुढे रेटणार हेही उघड होते. तरीही लोक "अच्छे दिन" च्या मोहमयी घोषणेला बळी पडले. कोंग्रेसला पर्याय पाहिजेच होता पण तो हा पर्याय नव्हता हे कधीच लोकांच्या लक्षात आले नाही. आता तर सेक्युलर म्हणवणारे प्रादेशिक पक्षही भितीपोटी म्हणा कि स्वार्थापोटी त्यांना त्यांचा वैदिक अजेंडा राबवण्याची मुभा देत आहेत.
अशा स्थितीत जे होऊ शकत होते ते झाले आणि भविष्यात जे होणार आहे तेही उघड आहे. हा वर्चस्वतावादी वैदिक धार्मिक राष्ट्रवाद ही या सा-याची अपरिहार्य परिणती आहे. त्याबाबत संताप येण्याआधी स्वत:च्याच मुर्खपणावर नागरिकांनी खेद केला पाहिजे. आत्मचिंतन केले पाहिजे. या वैदिक Fascism ला प्रचारित करणे fascist लोकांचे काम असले आणि त्यांना तो घटनादत्त अधिकार असला तरी त्याच्या आहारी जात, कधीही पुर्ण होऊ न शकणा-या दाखवलेल्या स्वप्नांच्या मोहात सापडत कोणता विनाश ओढवून घेतला आहे याची जाण व भान देशातील नागरिकांना येणे आवश्यक आहे. धोक्याच्या घंटा कैकदा वाजून गेल्या...आता धोका दारात आहे.
वैदिक शब्दाने नेमक्या वैदिक किंवा वैदिकाळलेल्यांकडून माझे हसे उडवले जाते याची मला चांगलीच कल्पना आहे. मी त्याची पर्वा करत नाही. पण समतेचे तत्वज्ञानच मुळात ज्या धर्माचा गाभा नाही त्या धर्माचा वर्चस्वतावाद पुन्हा एकदा लादण्याचा प्रकार सहन करणे हे हिंदुंचे मनो-विचार दौर्बल्य दर्शवते. कदाचित हिंदुंना अजुनही हे समजणार नाही, पण तोफांची तोंडे मुस्लिम. ख्रिस्ती, बौद्ध, जैन आणि शीखांनंतर त्यांच्याकडेच वळनार आहेत. आजच असंख्य हिंदू धोक्यात आलेले आहेत. पण आपापल्या जातींच्या वैदिकनिर्मित वरचढपणाच्या उन्मादात ते याकडे दुर्लक्ष करत आहेत. भूखमरी, बेरोजगारी, वंचितांचे उत्थान हे विषय त्यांनीच दूर सारले आहेत. हे काही केल्या बळकट देशाचे लक्षण नाही.
जे काही झाले, होते आहे ते आपणच निमंत्रित केले आहे हे मात्र निश्चित. हा तंबुत घुसलेला उंट एक दिवस हिंदूना गुलाम करणार हे नक्की. आता एक तर सहन करा, पुढचे सहन करायची मानसिक तयारी ठेवा, अन्यथा य उन्मादाला रोखण्यासाठी सर्व शक्तीनिशी प्रयत्न करा. निर्णय तुमचा आहे.

No comments:

Post a Comment

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...