Tuesday, December 17, 2019

संगीतवाद्य रबाबच्या पुनरुज्जीवनासाठी...




भाई मर्दाना हे शीख धर्माचे संस्थापक गुरु नानकदेवांचे पहिले शिष्य. गुरु नानकांच्या देश-विदेशातील प्रवासात भाईनी मरेपर्यंत तब्बल २७ वर्ष नुसती साथ दिली नाही तर गुरु नानकांना धर्मविषयक असंख्य प्रश्न विचारून त्यांनी शीख धर्मविचारात मोलाची भर घालायला मदत केली. ते मुळचे मुस्लिम परंतू शीख धर्म स्विकारणारे ते पहिले. ते रबाब हे मुळचे अफगाणिस्तानातले वाद्य वाजवण्यात कुशल होते. गुरु नानकांच्या रचनांना ते रबाबची साथ देत त्या रचनांचे सौंदर्य वाढवत असत. रबाब म्हटले तर प्रथम आठवतात ते भाई मर्दाना एवढे रबाब आणि भाई मर्दाना यांचे अतूट नाते आहे. सुवर्ण मंदिरात आजही गुरुबानीच्या नित्य गायनात रबाबची साथ असते आणि वादक हा बहुदा मुस्लिम असतो. एका अर्थाने भाई मर्दानांमुळे रबाब हे माणसे-धर्म जोडण्याचे प्रतीक बनलेले आहे.
यंदा गुरु नानकदेव यांच्या ५५० व्या प्रकाशवर्षाच्या निमित्ताने भाई मर्दानांची आठवण येणे अपरिहार्य आहे. पुणे येथील सरहद आणि शिख जनसेवा संघ या संस्थांनी भाई मर्दानांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि रबाब हे विस्मरणात जाऊ पाहणा-या वाद्याचे देशव्यापी पुनरुज्जीवन करण्यासाठी रबाबचे गेली शंभर वर्ष जतन करणा-या रबाबनवाज सनाउल्ला भट या संगीत घराण्यातील विद्यमान सहा रबाबवादक कलावंतांना भाई मर्दाना स्मृती पुरस्कार जाहीर केला असून या पुरस्कार वितरण समारंभाच्या वेळीस रबाब वादनाचा जाहीर कार्यक्रम येत्या आठवड्यात आयोजित केला आहे.
आज भारतात रबाब वादन करणारे मोजकेच कलावंत आहेत. त्यातही बव्हंशी काश्मिरी व्यक्तीच अधिक आहेत. रबाब हे तंतुवाद्य बनवण्याची कला मुळात अवघड. तीही काश्मिरींनी आत्मसात केली. शाहतूत किंवा अक्रोडाचे एकसंघ लाकूड हे वाद्य बनवण्यासाठी वापरले जाते. तुंबाही एकसंघ असतो. त्याच्या विशिष्ट आकारामुळे तार छेडताच ध्वनी धीरगंभीरपणे झंकारतो. य वाद्याला १७ तारा असतात. हे वाद्य बनवू शकणारेही आता संख्येने कमीच. रबाब जीवंत ठेवण्याचे कार्य केले ते काश्मीरनेच असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. काश्मीर खो-यातील सनाउल्ला भट यांच्या घराण्याने ही अवघड कला जीवंत ठेवण्याचे कार्य पिढीजात गेली शंभराहून अधिक वर्ष केले आहे. देश-विदेशात ते व त्यांचे पाच सहकारी रबाब वादनाचे जाहीर कार्यक्रम करत आले आहेत. लोकसंगीताला आणि रागदारीलाही साथ देण्यात या पहाडी वाद्याचा कोणी हात धरणार नाही. काश्मीरी लोकसंगीत या साजानेच खुलते. मात्र पाश्चात्य संगीताच्या वाढत्या प्रभावामुळे रबाब मागे पडत गेले हे दुर्दैव होते. या वाद्याचे पुनरुज्जीवन व्हावे, देशभरच्या संगीतकारांना आणि संगीत प्रेमींना रबाबमधून उठणारे आगळे-वेगळे झंकार अनुभवायला मिळावेत या कल्पनेने झपाटलेल्या सरहदचे संस्थापक संजय नहार यांनी भाई मर्दानांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा उपक्रम हाती घेतला आहे.
आठव्या शतकात अफगाणिस्तानात जन्माला आलेले रबाब हे वाद्य संगीतरसिकांना अगदीच अपरिचित नाही. सरोद या वाद्याचा जन्मही याच रबाबचा पुढचा अवतार आहे. पण रबाबचे ध्वनीतंत्र हे वेगळे आणि त्याचे कारण रबाबच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेत दडलेले आहे. अनेक गीतांत हे वाद्य वापरले गेले आहे. पंजाबमध्येही या वाद्याचे पुनरुज्जीवन करण्याचे काम होत आहे. महाराष्ट्रानेही या उपक्रमातून यात पुढाकार घेतला आहे. रबाब जीवंत ठेवण्यासाठी पिढ्यानुपिढ्या प्रयत्न केलेल्या सनाउल्ला भट घराण्याचे वंशज असलेल्या रबाबनवाज अब्दूल हमीद भट, इश्फाक हमीद भट, मोहंमद अल्ताफ भट, मोहम्मद युसूफ राह, सलीम जहांगिर आणि यावेर नझीर यांना भाई मर्दाना पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. देश आणि देशातील माणसे जोडण्याचे कार्य केलेल्या गुरु नानकदेवांचे शिष्य भाई मर्दाना आणि रबाबची परंपरा जीवंत ठेवत तेच कार्य अथकपणे करत आलेल्या कलावंतांना दिला जाणारा हा पुरस्कार त्यामुळेच महत्वाचा आहे. महत्वपुर्ण सवाई गंधर्व संगीत महोत्सवाच्या सरत्या काळात रसिकांना रबाबचे स्वरवैभव अनुभवण्याची संधीही या निमित्ताने मिळेलच पण विस्मृतीत जाऊ पाहणा-या एका अलौकिक संगीत वाद्याचे पुनरुज्जीवन व्हायलाही यामुळे मोठी मदत होईल.
-संजय सोनवणी
(आज दै. सकाळमध्ये प्रसिद्ध झालेला लेख)

No comments:

Post a Comment

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...