Saturday, December 7, 2019

पानिपत - ओढवून घेतलेला पराजय

पानिपतचे युद्ध हा भावनिक विषय नसून नेतृत्वाचे निश्चित धोरण व नीतीच्या अभावात कोणते भयंकर संकट ओढवू शकते याचा एक वस्तुपाठ आहे. हा एका अर्थाने ओढवून घेतलेला पराजय आहे. त्यातही समाधान शोधता येईल पण ते फारसे कामाला येत नाही. एका विस्कळीत युद्धाचा वा फसलेल्या पलायनाचा हा इतिहास आहे. या युद्धात महाराष्ट्राने घरटी एक माणूस गमावला असे म्हणतात. हजारो पुरुष-स्त्रिया गुलाम झाले. पराजयानंतर पराजयाची कारणे कोणावर तरी थोपावी लागतात. पण पराजयाचे विवेचन कोणी करत बसत नाही. युद्धात जे ठार होतात त्यांच्याबाबत अधिक सहानुभूती निर्माण होणे हेही ठीकच. पण यातून एखाद्या ऐतिहासिक दुर्दैवी घटनेतून नेमके काय शिकावे हे भावी पिढ्यांना कधीही शिकता येणार नाही.
पा निपत हा प्रत्येक मराठी माणसाच्या दृष्टीने हळवा करून सोडणारा विषय आहे. यावर अनेक ग्रंथ, कादंबऱ्या व काही नाटकेही लिहिली गेली आहेत. आता तर चित्रपटही आलाय. इतिहासावर आधारित चित्रपट ही एक वेगळीच कला आहे. भारतीय निर्माते-दिग्दर्शकांना ती अद्याप साधायची आहे. पण त्यानिमित्ताने पानिपतच्या दुर्दैवी इतिहासाकडे एक नजर फिरवायला हवी. पानिपतचा पराभव हा संहार झाला असला तरी वस्तुत: मराठ्यांचा विजय होता असा एक मतप्रवाह आहे, तर पानिपत युद्धाने मराठ्यांचे कंबरडे मोडले असाही एक मतप्रवाह आहे. किंबहुना इतिहासकारांनीही या प्रकरणाचे तटस्थ, वस्तुनिष्ठ चित्रण केलेले आहे असे दिसत नाही. कोणावर तरी या पराजयाचे खापर फोडणे अथवा कोणाला तरी दोषमुक्त करणे अशीच पद्धत बव्हंशी वापरली गेलेली आहे. त्यात पानिपतचे आकलन दूर राहिले आहे.

एखादे युद्ध होते तेव्हा त्याला दीर्घ कारणपरंपरा असते. पानिपतही त्याला अपवाद नाही. मराठे आणि मोगलांचा शिवाजी महाराज व औरंगजेबानंतर सामाजिक/सांस्कृतिक/राजकीय तत्त्वज्ञानाचा जो क्रमश: ऱ्हास होत गेला त्याची अपरिहार्य परिणती म्हणून पानिपत युद्धाकडे पाहायला हवे. ताराराणीनंतर इकडे छत्रपती नामधारी बनून पेशवे सर्वोपरी बनले तसेच तिकडे औरंगजेबानंतरचे पातशहा बक्षी-वजीराहातची कठपुतळी बनले. रयतेसाठी म्हणून राज्यकर्ते असतात ही भावना शिवोत्तर काळात जवळपास नष्ट होत गेली. मराठा सरदारांची स्वतंत्र बेटे बनत गेली. उत्तरेतही जवळपास असेच झाले. केंद्रीय सत्ता क्रमशा: नामशेष होत गेली.

१७५२ मध्ये शाह वलीउल्लाहच्या जिहादी प्रेरणेने अब्दालीने पहिली स्वारी केली. दुसऱ्या स्वारीच्या वेळीस सफदरजंगाने पातशहाच्या वतीने मराठ्यांशी अहदनामा (तख्ताच्या रक्षणाचा करार) केला. नंतर याच प्रकरणी सफदरजंगालाही दुखावले. पुढे अब्दालीने तीन वेळा भारतावर स्वाऱ्या केल्या, दिल्ली लुटली...लूट घेऊन गेलाही...पण मराठे अहदनामा पाळायला आले नाहीत. एकदाही अब्दालीशी भिडले नाहीत. किंबहुना अब्दालीच्या १७५६ मधील स्वारीच्या वेळेस रघुनाथराव पेशव्याच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्य दिल्लीकडे निघालेही होते, पण त्यांची वाटचाल एवढी धीमी होती की हे दिल्लीला पोहोचेपर्यंत अब्दाली परत निघूनही गेला होता. हे नेतृत्व जर मल्हारराव होळकराकडे दिले असते तर अब्दालीशी तेव्हाच भिडत झाली असती, असे जदुनाथ सरकार म्हणतात. १७५८ मध्ये मराठा फौजा अटकेपर्यंत पोहोचल्या तेव्हा त्यांच्या ताब्यात आला तो आधीच लुटला गेलेला मुलूख. अब्दाली तेव्हा इराणच्या शहाशी संघर्षात गुंतलेला होता. अडचणीत होता. तेव्हा मल्हाररावाने रघुनाथरावाला मसलत दिली होती की अब्दालीशी तह करावा, तो अडचणीत असेल तेव्हा मराठ्यांनी त्याला मदत करावी आणि कार्य पडल्यास त्याने मराठ्यांच्या मदतीस फौज पाठवावी. याबाबत अब्दालीशीही बोलणे चालले होते. पण रघुनाथरावाने ही मसलत फेटाळून लावली व स्वत: पुण्यातून बोलावणे आल्याने हातात आलेल्या सुभ्यांची कायमस्वरूपी कसलीही व्यवस्था न लावता परत फिरला. समजा असा काही तह झालाच असता तर त्याचे भविष्यातील परिणाम वेगळे असते.

नजीबखान यमुना ओलांडण्यासाठी नावांचा पूल बांधून देईल व त्याचा उपयोग करुन शुजाउद्दौलावर स्वारी करता येईल या आशेवर दत्ताजी शिंदेचे अनेक महिने वाया गेले. शुजावरील स्वारी ही पेशव्यांच्या आदेशाने होती. नजीब-गाजीउद्दीन या दोन मातब्बर वैऱ्यांचे नेमके काय करायचे याबाबत नानासाहेब पेशव्याचे धोरण धरसोडीचे होते. पेशवे गाजीउद्दीनचे समर्थक होते. अब्दाली पुन्हा भारतात आला आणि त्याला निमंत्रण होते खुद्द पातशहा आणि नजीबाचे. आपल्या वैऱ्याला मराठे मदत करत आहेत याचा राग त्याच्या मनात होता. याची परिणती अशी झाली की बुराडी घाटावर युद्धात दत्ताजी शिंदेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर जखमी जनकोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर हाय न खाता अब्दालीला गनिमी काव्याने त्रस्त करू लागले. त्यात उन्हाळा जवळ आल्याने अब्दालीचे सैन्यही या पळापळीने वैतागून मायदेशात परत जायची मागणी करू लागले. अब्दालीला भारतात तख्त गाजवायची महत्त्वाकांक्षाही नव्हती. अब्दाली शेवटी मराठ्यांशी तह करायला तयार झाला. १२ मार्च १७६० रोजी अब्दाली व मराठ्यांत तह घडून आला होता आणि हा तह केला होता मल्हारराव होळकर व शिंद्यांनी हाफिज रहमत खानच्या मध्यस्थीने. या तहानुसार नजीबचा प्रदेश त्याच्याकडेच कायम ठेवून त्याच्यामार्फतच अब्दालीला परत पाठवावे. सूरजमल जाटानेही या तहासाठी सहकार्य केले होते. पण तेवढ्यात भाऊ उत्तरेकडे रवाना झाला आहे, हे कळताच नजीब घाबरला आणि छावणी उठवून परत जायला निघालेल्या अब्दालीला त्याने थांबवले. त्यामुळे करार फिसकटला. तरीही होळकरांनी तहासाठीचे प्रयत्न सुरूच ठेवले.

१२ जून रोजी होळकर लिहितात, 'गिलच्यांच्या फौजेतून हाफिज रहमत खान भरतपुरास आला. गंगाधरपंतांशी बोलत आहे. नजीब खानाने सलुखाचा संदर्भ चालविला आहे, पण आमचे विचारानुरूप बनत नाही. श्रीमंतही संनिध आले.' (मराठी रियासत - खंड ४) आपण चंबळेपारच थांबा असे सांगूनही भाऊने आपली वाटचाल चालूच ठेवली. आपला प्रतिस्पर्धी असलेल्या गाजीउद्दीनाला सहकार्य करणारे पेशवे उत्तरेत आल्यावर पहिल्यांदा आपलीच धूळधाण करतील अशी भीती त्याला वाटली. अब्दाली थांबला. शुजा आपल्या बाजूने येईल अशी त्याला आशा होती. पण जो दत्ताजी शिंदे मुळात शुजावरच स्वारी करण्यासाठी आतुर होता तो शुजा मराठ्यांच्या बाजूने कसा येणार? अगदी सूरजमल जाटही मराठ्यांची छावणी सोडून निघून गेला. राजपूत-शीख तर दूरच राहिले. अब्दालीचा समूळ नाश करणे हा त्याचा हेतू असता तर असा कालापव्यय केला नसता. सोयीची युद्धभूमी पाहून निर्णायक युद्ध केले असते. उलट भाऊ अब्दालीने लुटलेली दिल्ली ताब्यात घेऊन यमुनापार थांबलेल्या अब्दालीशी तहाच्या वाटाघाटी करत बसला. पण तसे येथेच काय पानिपतावरही घडले नाही. अगदी युद्धाआधीच्या रात्रीपर्यंत भाऊ अब्दालीला तहाचे संदेश पाठवत राहिला. अब्दालीच्या समूळ नाशासाठी भाऊ उत्तरेत आला असता तर त्याच्या हालचालीही वेगवान असत्या. त्याने उत्तरेतील अनुभवी सरदार होळकर, शिंदे, पवारांशी नीट मसलत केली असती. त्यांचे सल्ले घेतले असते. पण तसे झाले नाही. उलट तो नव्यानेच सेवेत आलेल्या इब्राहिमखान गारद्यावर विसंबून राहिला. खरे म्हणजे कुंजपुरा ताब्यात घेतल्यानंतर यमुना उतरून अब्दालीला पुरते चेंगरण्याची दुसरी संधी भाऊला मिळाली होती. पण रियासतकारांच्या मते ती त्याने गमावली. उलट बागपतजवळ यमुना ओलांडून अब्दालीने हिंमत दाखवली आणि भाऊला पेचात पकडले. भाऊला सैन्य मागे सरकावे लागले आणि पानपत गावाजवळ छावणी बनवावी लागली. इब्राहिमखानाच्या सल्ल्याने खंदक खणून व मातीचे उंचवटे करून आक्रमक नव्हे तर संरक्षणात्मक बंदोबस्त करून अब्दाली आपल्यावर चाल करून येईल, मग तोंड देऊ, असा विचार करून स्वस्थ बसला. प्रश्न रसदेचा होता. ती तुटली आणि मराठ्यांचे काय हाल झाले हे सर्वविदित आहे. रसद तर सोडा, अब्दालीने मराठ्यांचे पत्राद्वारे होणारे दळणवळणही बंद करून टाकले. उलट भाऊ दक्षिणेतून आपल्याला सैन्यसाहाय्य मिळेल याची वाट बघत बसला. पण तसेही झाले नाही. नोव्हेंबर १७६० मध्ये त्याला अब्दालीशी विजयी टक्कर घ्यायची संधी होती, पण तीही गमावली. रणखांबाजवळील पोकळ द्वंद्वे आणि अधूनमधून छापे यातच तो रममाण राहिला. रसद पूर्ण आटण्याची परिणती अशी झाली की पानिपतवरून पलायन करण्याखेरीज कोणतेही गत्यंतर मराठ्यांच्या सेनापतीला राहिले नाही.

१४ जानेवारी १७६१ रोजी मराठे जिंकू किंवा मरू या भावनेने अब्दालीच्या सेनेवर तुटून पडले हे खरे नाही. सत्य सांगते ती आदल्या रात्रीची सर्वांची मसलत : "गिलच्यांचे बळ वाढत चालले. आपले लष्कर पडत चालले......तेव्हा हा मुक्काम सोडून बाहेर मोकळे रानी जावे...दिल्लीचा राबता सोडून दुसरीकडे जाऊ...पण झाडी मोठी मातब्बर....गिलचा जाऊ देणार नाही...यास्तव बंदोबस्ताने निघावे." म्हणजे निकराच्या युद्धाचा बेतच नव्हता. करायचे होते ते सुरक्षित पलायन. आणि अशा सुरक्षित पलायनासाठी इब्राहिमखान गारद्याने विलायती पद्धतीच्या गोलाची कल्पना सर्वांना समजावून सांगीतली. मल्हारराव होळकर त्याशी सहमत नव्हते. ज्या गनिमी काव्याने आजवर शेकडो लढाया ते लढले होते तोच याही वेळी कामास येईल असा त्यांचा विश्वास होता. पण भाऊंचा गारद्यावरच सर्वाधिक विश्वास होता. गनिमी कावा करत, शत्रूला हूल देत पलायन करण्यापेक्षा शेवटी गोल करून सुरक्षितपणे यमुनेच्या दिशेने जायचे ठरले. प्रत्येक सरदाराला आपली जागा नेमून दिली. गोलाच्या लढाईचे नियम पाळले जातील अशी शपथपूर्वक हमी भाऊने सर्वांच्या वतीने इब्राहिमखान गारद्याला दिली होती. पण ही विलायती पद्धतच माहीत नसलेल्या मराठी सैन्यामुळे गोलाचाही व्यूह कायम राहिला नाही. युद्ध सुरू झाल्यानंतर काही घटकांत तो तुटला. युद्धात बदलत्या स्थितीनुसार व्यूहनीतीत बदल करावा लागतो आणि तो संदेश सर्वांपर्यंत पोहोचावा याची व्यवस्था करावी लागते. पानपत प्रकरणात याबाबतीत सावळागोंधळ होता. गोलाच्या मागच्या बाजूचे सैन्य राखीव सैन्य म्हणून वापरता आले असते, पण ते युद्धात समोर येऊच शकले नाही कारण गोलाची रचना. तरीही मराठा सैन्य ज्या त्वेषाने लढले त्याला तोड नाही. अभाव होता तो योग्य सेनापतीचा. विश्वासराव पेशवा पडल्यानंतर संयम सोडून भाऊने हत्तीवरून घोड्यावर झेप घेतल्याने तोही दिसेनासा झाला. खरे तर हीच वेळ होती नेतृत्वगुण दाखवण्याची. तीही भाऊने गमावली. त्यात विंचूरकरांनी कुंजपुरा युद्धात पदरी बाळगलेल्या शत्रू पक्षाच्या दोन-तीन हजार रोहिले-अफगाणांनी गारद्यांच्या बाजूचा पराभव होताच कपाळावरील खुणेच्या पट्ट्या फेकून देत बुणग्यांत घुसून मराठे हरल्याच्या घोषणा देत बुणग्यांना मारत सुटले. त्यामुळे आघाडीच्या मागील बाजूचा घाबरून पळ सुटला होता. बहुधा याच वेळी यशवंतराव पवार मारला जाऊन त्याचीही फौज उधळली. एकंदरीत सर्वच स्थिती हाताबाहेर गेली. जगले वाचलेले सारेच तेथून निघून गेले. मराठ्यांचा दारुण पराभव झाला. खरे म्हणजे पानिपतचे युद्ध हा भावनिक विषय नसून नेतृत्वाचे निश्चित धोरण व नीतीच्या अभावात कोणते भयंकर संकट ओढवू शकते याचा एक वस्तुपाठ आहे. हा एका अर्थाने ओढवून घेतलेला पराजय आहे. त्यातही समाधान शोधता येईल पण ते फारसे कामाला येत नाही. एका विस्कळीत युद्धाचा वा फसलेल्या पलायनाचा हा इतिहास आहे. गोलाची रचना मुळात सुरक्षित निसटून जाण्यासाठी केली जाते, सर्वंकष युद्धासाठी नाही हेच आधी समजावून घेण्याची गरज आहे. उत्तरेतील कसलेल्या सरदारांचे न ऐकता नवागत तोफखाना दळाच्या प्रमुखावर अवलंबणे कितपत योग्य होते? या युद्धात महाराष्ट्राने घरटी एक माणूस गमावला असे म्हणतात. हजारो पुरुष-स्त्रिया गुलाम झाले. पराजयानंतर पराजयाची कारणे कोणावर तरी थोपावी लागतात. पण पराजयाचे विवेचन कोणी करत बसत नाही. युद्धात जे ठार होतात त्यांच्याबाबत अधिक सहानुभूती निर्माण होणे हेही ठीकच. पण यातून एखाद्या ऐतिहासिक दुर्दैवी घटनेतून नेमके काय शिकावे हे भावी पिढ्यांना कधीही शिकता येणार नाही.

चित्रपट-नाटक अखेर मनोरंजनासाठी असते. त्यात इतिहास शोधायचा प्रयत्न करू नये हे आम्हाला शिकायचे आहे. आजवरचे पद्मावत ते अलीकडचे बहुतेक ऐतिहासिक चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकले किंवा अडकावले गेले हे त्याचेच निदर्शक. पानिपत चित्रपटही त्याला अपवाद नाही. हा केवळ आमच्या इतिहासविषयक जाणिवांचा ठणठणाट दाखवणारा पानिपतपेक्षाही दुर्दैवी विषय आहे!

(लेखक इतिहास संशोधक आहेत. संपर्क - ७७२१८७०७६४)
(Published in Rasik, Divya Marathi)

No comments:

Post a Comment

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...