Thursday, December 5, 2019

पानिपत : प्रत्यक्षात लढलं कोण? सिनेमात कौतुक कुणाचं?

पानिपत : प्रत्यक्षात लढलं कोण? सिनेमात कौतुक कुणाचं?
०५ डिसेंबर २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

अफगाणिस्तानातून आलेल्या अहमदशाह अब्दालीच्या विरोधात उभे राहिलेले मराठे यांच्यातलं पानिपत युद्ध इतिहासात गाजलं. या युद्धाने भारताचा इतिहास बदलला. त्यावर पहिल्यांदाच सिनेमा बनतोय आणि तोही हिंदीत. आशुतोष गोवारीकरांच्या या सिनेमात इतिहासाच्या नावाखाली भलतंच काही दाखवलं जाण्याची शक्यता खूप दिसतेय.

आम्हाला विजयाचीच चिकित्सा नीट करता येत नाही तर पराजयाची काय करणार? पानिपत हा मराठ्यांचा पराभव नाही तर तो विजयच होता. कारण पानिपत नंतर अहमदशाह अब्दालीने पुन्हा हिंदुस्तानावर आक्रमण करायची हिंमत केली नाही, असं काही विद्वान हिरीरीने सांगत असतात. पण ते वास्तव नाही हे समजायला पाहिजे.
अब्दालीने भारतावर एकंदरीत सात स्वाऱ्या केल्या. अब्दालीचं पहिलं आक्रमण १७४८ मधे झालं. पानिपतचं युद्ध त्याच्या पाचव्या आक्रमणाच्या वेळीस झालं. लागोपाठ त्याचं सहावं आक्रमण १७६२-६३ या काळात पंजाबवर झालं तर १७६४-१७६७ या काळात सरहिंदेलगतच्या सियालकोटवर सातवं आक्रमण झालं.
पंजाब आमच्या हिंदुस्तान या संज्ञेत कदाचित बसत नसेल. पण अब्दालीने मराठ्यांची दहशत घेतली आणि पुन्हा हिंदुस्तानाकडे वक्रदृष्टी करायची त्याने हिंमत केली नाही हे विधान केल्यावर जातीची माती खाऊन छाती फुगवायची सोय लागत असेलही. पण ते वास्तव नाही.

विनाशक युद्धाचं गौरवीकरण

आता पानिपतवर सिनेमा येऊ घातलाय. हा सिनेमा या विनाशक युद्धाचं गौरवीकरण करणारा आहेच. पण त्याहीपुढे जाऊन असं म्हणावं लागेल की युद्धाचा सेनापती भाऊसाहेब पेशवा आणि त्याची पत्नी पार्वतीबाई यांचं उदात्तीकरण करणारा असावा. शिवाय या युद्धातले अन्य मराठी सेनानी दुय्यम होते, असं दाखवणारा असावा, असंही सिनेमाच्या ट्रेलरवरुन लक्षात येतं.
ट्रेलरमधे दाखवलीय तशी पार्वतीबाई पानिपत युद्धात लढलेली दाखवली असेल, तर ते इतिहासाला धरून नाही. तरीही हा सिनेमातला मनोरंजनाचा भाग म्हणून सोडून दिलं तरी पानिपत युद्धातून पळ काढणाऱ्या महिलांत पार्वतीबाई सर्वात पुढे होती. तिची वाटेत भेट झाल्यावर मल्हारराव होळकरांनी तिला चंबळेपार सुरक्षित पोचवलं, हा इतिहास आहे.
रणमर्दानी म्हणून ट्रेलरमधे दर्शन देणाऱ्या पार्वतीबाईने पानिपतावर प्रत्यक्षात काय केलं, हा इतिहास उपलब्ध नाही. पानिपतच्या रणधुमाळीत पार्वतीबाईंचा रोल एवढाच होता की पती युद्धात पडला हे समजताच तिथून बाहेर पडणं. आणि तो तिने यशस्वीपणे पार पाडला.
बचेंगे तो और भी लडेंगे
पराजय झाला की त्याचं खापर कुणा ना कुणावर फोडणं हे ओघाने आलंच. असे बळीचे बकरे इतिहासात अनेक झालेत. दत्ताजी शिंदेंचा मृत्यू बुराडी घाटावर झाला. तो शुक्रतालावर अकारण अडकून पडला याबाबत त्याच्या पराक्रमाचे आणि `बचेंगे तो और भी लडेंगे` या वीरश्रीयुक्त विधानाचे कौतूक करत असतांनाही त्याला सरदेसाईंसारखे इतिहासकारही दोष देतात.
पण मुळात यमुनेवर नावांचा पूल बांधून शुजाउद्दौलावर स्वारी करुन पैका वसूल करुन आपल्या कर्जाचे निवारण करावे अशी पत्रे दत्ताजी शिंदेंना वारंवार लिहिणारा, कधी आपल्याही कथनात विसंगती करणारा नानासाहेब पेशवा कसा आपल्या इतिहासकारांच्या चिकित्सेत येत नाही? बरे हा पूल बांधायचा तर कोणाच्या मदतीने? तर ज्याला सारे इतिहासकार आणि त्यामुळे जनसामान्यही शिव्या घालतात त्या नजीबखानाच्या मदतीने.
एकीकडे नजीबाला जिवंत सोडला म्हणून मल्हाररावालाही दोष द्यायचा आणि आपणच दत्ताजीला त्याच खली नजीबाची मदत घेऊन नदी ओलांडायला पूल बाधून घ्यायचा सल्ला देणारा नानासाहेब पेशवा मात्र चिकित्सेच्या पार राहतो.

सेनापती तलवारबहाद्दर होता की पत्रबहाद्दर?

भाऊसाहेब पेशवेंना अब्दालीला हिंदुस्तानातून पार हाकलवून काढायचं होतं. असं म्हटलं जातं. पण युद्ध करायला निघणाऱ्या वीराच्या हालचाली वेगवान असतात. गेल्या चार वेळेस जसा अब्दाली परभारेच निघून गेला होता तसाच याही वेळेस जाईल या होऱ्याने भाऊने अत्यंत संथ वाटचाल केली. उत्तरेतल्या रजवाड्यांना आणि आपल्या कमावीसदारांना भरमसाठ पत्रं लिहिली. इतकी की हा सेनापती तलवारबहाद्दर होता की पत्रबहाद्दर असा प्रश्न पडावा.
नानासाहेब पेशव्यांनी पानिपतच्या स्वारीवर असणाऱ्या सदाशिवराव भाऊंना पत्र पाठवून चांगल्यापैकी दिसणाऱ्या कंचनी म्हणजे नर्तिका पाठवण्याची पत्रंही लिहिलेली आहेत. नानासाहेबांची विषयवासना भागवण्यासाठी अलौकिक जबाबदारी या सेनापतीवरच होती. बरं या सेनापतीला कोणताही तह अथवा लष्करी हालचाल करण्याचेही निर्णायक अधिकार नव्हते. भाऊ उत्तरेत गेल्यानंतरही त्याला ज्या हालचाली कराव्या लागल्या त्या परिस्थितीच्या रेट्याने. सेनापतीला विपरित स्थितीतही परिस्थिती निर्माण करण्याचं कौशल्य लागतं.
लढले पण शिस्त नव्हती
दखनेत निजामाशी पार न पाडला गेलेला तह करुन घेतला म्हणून कुणी सेनानी होत नाही. नुकतेच सेवेत सामील करून घेतलेल्या आणि ज्याला उत्तरेत लढण्याचा कसलाही अनुभव नाही अशा इब्राहिम खान गारद्यावर विसंबून राहणं, उत्तरेतले अनुभवी होळकर-शिंदेंना फाट्यावर मारणं, त्यांनी अब्दालीला परत पाठवण्यासाठी केलेल्या तहाला वाटाण्याच्या अक्षता लावणं हे काही सेनापतीपदाचं लक्षण नव्हतं.
किंबहुना पानिपत ही युद्धभूमी अपघाताने वाट्याला आणून घेऊन लाख-दीड लाख सैन्य आणि सेवेकऱ्यांचं जीवन धोक्यात घालणं हे तर सेनापतीपदाचं अवलक्षण होतं. पण तसं झालं. सर्वांची उपासमार एवढी झाली की त्यांनी शेवटी झाडांच्या सालीही खाल्ल्या असं म्हटलं जातं. पानिपतावरून पळ सुटला, असं वर्णन आहे. पण भाऊ पळूनच जायच्या आणि सुरक्षित ठिकाण गाठण्याच्या बेतात होता. म्हणूनच त्याने गारद्याचं ऐकून गोल केला आणि पहाटेच आक्रमणासाठी नाही तर पळ काढण्यासाठी वाटचाल सुरू केली.
युद्धाला तोंड फुटल्यानंतर व्यूहरचना बदलायला हवी तर तेही केलं नाही. हे खरंय की मराठे लढले. जीवावर उदार होऊन लढले. पण त्या लढ्यात शिस्त नव्हती. ती लावायला सक्षम सेनापतीही नव्हता. किंबहुना सेनापतीच गोंधळलेला होता. सेनापतीने भावनिक व्हायचं नसतं पण विश्वासरावाचा मृत्यू झाल्यानंतर त्याने ‘भाऊगर्दीत’ उडी घेऊन लढणाऱ्यांचं बळ घालवलं. अशाही स्थितीत मल्हाररावाने आपल्याच बाजुला असलेले जनकोजी शिंदे आणि स्वत:चा सरदार संताजी वाघला भाऊच्या मदतीला पाठवले.

युद्धकौशल्य न कळणारा सेनापती

पळ सुटला याला खरा जबाबदार कोण याचा उल्लेख होतो. पण त्या पापाचं खापर मात्र फोडलं जात नाही. कुंजपुऱ्याच्या युद्धात एक छोटा जय काय मिळाला, सेनापती आणि त्याचे स्वजातीय सरदार शेफारून गेले. हरवलेल्या सैन्यातील दीड-दोन हजार पठाण सैनिक सरदार विंचुरकरांनी चक्क आपल्या पदरी घेतले. ते वेगळे आहेत हे समजावं म्हणून एक भगवी पट्टी कपाळावर बांधायला सांगितलं. बस्स. जगात कोणत्याही सेनादलप्रमुखाने असं कृत्य केलेलं नाही. सेनापतीने करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. इथे सेनापती महान होता, उदार-कनवाळू होता. सरदार विंचुरकरांना त्याने ती परवानगी देऊन टाकली.
परिणाम असा झाला की याच पठाण सैनिकांनी मराठ्यांची बाजू कमजोर पडतेय हे लक्षात येताच, कपाळावरील भगव्या पट्ट्या फेकल्या आणि ‘मरहट्टे हार गये’ असा ओरडा करत बुणग्यांकडे धाव घेतली, लुटालूट सुरू केली. घाबरून त्यांचा पळ माजला. गोलाच्या मागच्या बाजुला जे सैन्य होते जे युद्धात कामाला आलंच नाही, तेही मग पळत सुटले. पळातील पळ हा असा माजला. त्यानंतर पराजय निश्चितच होता.
मृत्यू झाला म्हणून उदात्तीकरण करणं चूक
भाऊसाहेब हा व्यक्ती म्हणून महान असेलही. पेशवा म्हणून नानासाहेबांचं मूल्यमापन काहीही असेल. पण राष्ट्रीय समस्येबाबत दोघंही गंभीर नव्हते हे केवळ त्यांचा या काळातला पत्रव्यवहार आणि कृती हे पाहिलं तरी लक्षात येतं. युद्धाच्या आदल्या रात्रीही भाऊ अब्दालीशी तहाचा प्रयत्न करत बसला. मग सर्वंकष युद्ध करण्याचा बेत होता हे विधान पूर्णतः असत्य ठरतं. युद्धातलं काहीएक न कळणाऱ्या माणसाला सेनापती बनवलं तर काय होतं याचं उदाहरण आपण आजच्या वर्तमानातही पाहतोय.
त्यामुळे देशावरचं संकट निवारण्यासाठी ही मोहीम होती हे विधान असत्य आहे. कारण अहदनामा १७५२ साली केल्यानंतर अब्दाली अनेकदा चालून आला तेव्हा मराठे तिकडे फिरकले नव्हते. कारण पेशव्यांची आज्ञाच नव्हती. अटकेपार झेंडे लावल्याबाबत तेव्हा सेनापती म्हणून रघुनाथराव पेशव्याचं कौतुक होत असेल तर पानिपत युद्धाच्या सेनापतीवरही तीच जबाबदारी विरोधार्थाने येते याचं भान मराठी जनतेला असलं पाहिजं.
युद्धात किंवा राजकीय झगड्यात कोणाचा मृत्यू झाला म्हणून त्याचं सर्व ठिकाणी उदात्तीकरण करता येत नाही. अफजलखानही मारलाच गेला होता. म्हणून ते त्याचं बलिदान होत नाही. खरं तर एवढ्या मोठ्या संहाराला जबाबदार झाल्याबद्दल एखाद्या सेनापतीला कसलाही दोष न देता अथवा चिकित्सा न करता केवळ त्याचं उदात्तीकरण केलं जात असेल तर आमच्या समाजाच्या बौद्धिक पातळीवरच संशय घ्यावा लागेल.
पानपताच्या भीषण प्रसंगी सर्व योद्ध्यांनी भाऊच्या आज्ञा पाळल्या. कारण तो युद्धाचा नियमच असतो. रियासतकार सरदेसाईही ही बाब मान्य करतात. यश लाभलं असतं तर तर भाऊचे गुणगाण गाण्यात कुणी थकलं नसतं. या युद्धात ज्या मराठी सैन्याला आघाडीवर ठेवलं होतं ते प्राणपणाने लढले. उपाशी पोटी लढले. त्यांच्या पराक्रमाला आदरांजली वाहत असता हा प्रश्न नक्कीच निर्माण होतो की या सैन्याला मरणाच्या खाईत ढकलणाऱ्या सेनापतीची आम्ही चिकित्सा कधी करणार?
आणि ते सोडाच. लढले कोण आणि कौतुक कुणाचं यावरही आम्ही विचार कधी करणार?

2 comments:

  1. Santaji ki satvoji vagh?
    बाकी पटण्यासारखे सत्य चिकित्सक वर्णन आहे

    ReplyDelete

जनानखान्यांचे अद्भुत विश्व!

  जनानखाना, ज्याला अंत:पूर, राणीवसा किंवा हरम असेही म्हटले जाते त्याबाबत समाजामध्ये अनेक समजुती प्रचलित आहेत. शत्रूच्या जिंकलेल्या स्त्रीय...