‘लव्ह जिहाद’ हा विषय आज हिरिरीने चर्चेत आला आहे. पूर्वीही अधूनमधून यावर चर्चा झाल्या आहेत. वैदिकवाद्यांचा तर तो अत्यंत लाडका प्रश्न आहे. या प्रश्नामुळे आपला मुस्लिमद्वेष दाखवायची त्यांना संधी मिळते आणि ते ती संधी कशी सोडतील? द्वेषयुक्त विखार ओकल्यामुळे अनेकदा खर्या प्रश्नांचंही मातेरं होतं हेही लक्षात घेतलं पाहिजे. त्याकडे पुरेशा गांभीर्याने पाहिलं जात नाही आणि जे पाहतात त्यांना खरोखर प्रश्न सोडवण्यात रस असतो असंही नाही. द्वेष पसरवण्यासाठी साधनं हवी असतात. एवढंच काय ते त्यांच्यालेखी अशा प्रश्नांचं महत्त्व असतं. अलीकडेच या विषयाला भाजप, सेना आणि संघीय लोकांनी पुन्हा उकळवलं आहे. साक्षी महाराज म्हणतात की, ‘लव्ह जिहाद’ हा मदरशांमध्येच शिकवला जातो. सेनेने गरबात मुस्लीम मुलांना शिरू देऊ नये असं मत मांडलं आहे तर गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणतात की, ‘लव्ह जिहाद’ हा काय प्रकार आहे हेच त्यांना माहीत नाही. त्याचवेळीस देवबंदने नुकतंच प्रसिद्धीसाठी दिलेल्या निवेदनात म्हटलंय की, राजकीय ध्रुवीकरण करण्यासाठी ‘लव्ह जिहाद’चा खोटा प्रचार केला जातो, त्याला माध्यमांनी फार प्रसिद्धी देऊ नये. खोटी आमिषं दाखवत दुसर्या धर्मातील मुलींची धर्मांतरं केली जात असतील तर ते लग्नही अवैध आहे. व्यक्तिगत पातळीवर असे जे प्रकार होतात त्यांना कसलाही धार्मिक आधार नाही.

‘लव्ह जिहाद’ ही संकल्पना खरंच अस्तित्वात आहे काय हे प्रथम आपण पाहिलं पाहिजे. ‘लव्ह’ किंवा ज्याला जगभर ‘रोमिओ जिहाद’ या नावाने ओळखलं जातं, म्हणजे ही संकल्पना केवळ भारतात नाही तर जगभरातच गेला बराच काळ चर्चेत आहे. अधिकृत तपासांत यामागे कटकारस्थान असल्याचं तरी २००९ ते २०१४ या काळात केल्या गेलेल्या विविध तपासांत आढळून आलं असलं तरी व्यक्तिगत तक्रारी मात्र वाढत आहेत हेही वास्तव आहे. हिंदू जनजागृती समितीचा आरोप आहे की, यामागे मुस्लीम समुदायांचा हिंदू मुलींना प्रेमात फशी पाडून इस्लाममध्ये धर्मांतरित करण्याचा व्यापक कट आहे आणि त्याची पाळंमुळं फाळणीच्या काळापर्यंत मागे जातात.

‘लव्ह जिहाद’ ही संकल्पना असली आणि त्यामागे कट आहे की नाही हे अनिश्चित असलं तरी मी स्वतः अत्यंत जवळून पाहिलेल्या दोन घटना इथे नमूद करतो…

मी साधारणपणे २०१०मध्ये पुण्यातील एका उच्चवर्णीय आणि उच्चशिक्षित तरुणीच्या पित्याने हतबल होऊन दिलेली केस स्वीकारली होती. (मी खाजगी गुप्तहेर संस्था चालवतो.) या पित्याच्या कार्यालयात एक मुस्लीम मुलगा साधा ऑफिस बॉय म्हणून कामाला होता. मुलगी उच्च शिक्षण घेत होती. मुलगी आणि तो प्रेमात पडले. बापाच्या लक्षात येताच त्यांनी मुलाला कामावरून काढून टाकलं. पण तिथेच हे प्रकरण थांबलं नाही. मुलीने गुपचूप त्याच्याशी नुसता विवाह केला असं नाही तर धर्मही बदलला. ही बाब तिने किमान दोन वर्षं आपल्या माता-पित्यापासून लपवून ठेवली आणि संधी मिळताच (म्हणजे उच्चपदस्थ नोकरी मिळताच) घर सोडलं. यात वरकरणी काहीही वावगं वाटणारं नाही. प्रेमात सर्व माफ असतं आणि तो प्रत्येक जीवाचा आपल्याला प्रिय वाटणार्या जोडीदाराशी विवाह करण्याचा आणि हवा तो धर्म स्वीकारण्याचा घटनात्मक हक्कच आहे आणि तो मान्य केलाच पाहिजे.

पण तसं ते तेवढं सरळ नव्हतं. त्या मुलीला त्या मुलाने पुणे सोडायला लावलं. मुलाची व्यक्तिगत पार्श्वभूमी चांगली नव्हती हे तोवर माझ्या तपासात सिद्ध झालेलं होतं. पुणे सोडून तो मुलगा तिला हैदराबादला घेऊन गेला. आम्ही पोलीस कमिशनरांना भेटलो. त्यांनी यात काहीही कायद्याने करू शकण्यास असहमती दर्शवली. मुलीचं आता काय होणार ही काळजी बापाला वाटणं स्वाभाविक होतं. हैदराबादला नवीन नोकरी ती कशी मिळवणार हाही प्रश्नच होता. हा विवाह केवळ ‘प्रेमविवाह’ या सदरात बसणारा नाही हे सरळ दिसत होतं. मग मी माझ्या एका हिंदुत्ववादी मित्राला फोन केला. त्याने तर मला उडवूनच लावलं. त्याचं म्हणणं होतं की, ही प्रकरणं वाढत आहेत आणि त्यात काहीच होऊ शकत नाही. बापाला सांगा, मुलीला विसरून जा. केस माझ्यादृष्टीने इथेच संपली होती. मात्र साधारणपणे मला एक वर्षानंतर समजलं की त्या मुलीला त्या मुलाने तलाक दिला आहे आणि ती आता महिन्याभरच्या मुलाची आई आहे. तिला बाप घरात घेईना आणि एवढ्या लहान बाळाला घेऊन ती कोणती नोकरी करणार?

पण ही झाली एक घटना… मला अजून एक अनुभव यायचा होता. २०१२मध्ये अजून एक केस आली आणि ती होती इंग्लंडमधून. मुलगी होती ब्रिटिश ख्रिस्ती. मुलगा होता मुस्लीम आणि तो होता पुण्यातील एका निम्न-मध्यमवर्गीय वस्तीतला. पण तो होता रेसकोर्सवरील जॉकी… (Jockey). साधारणतः तीन वर्षांपूर्वी या तरुणीचा भारत (पुणे) भेटीदरम्यान या तरुणाशी संबंध आला. प्रेमात पडली आणि तिने धर्म बदलला आणि विवाह केला. तरुणी श्रीमंत होती. ती त्याला इंग्लंडला घेऊन गेली. त्यांना एक मुलंही झालं. तद्नंतर या तरुणाने इंग्लंड सोडलं आणि परत इथे आला. तिच्याशी संपर्क थांबवला. तपासात आढळलं की त्या मुलाचं पहिलं एक लग्न आधीच झालेलं होतं. त्याने पुन्हा इंग्लंडचा रस्ता पकडला नाही हे उघड आहे.

या दोन प्रत्यक्ष अनुभवांवर मी माझ्या ब्लॉगवर लिहिलं. हिंदू जागरण समितीच्या एका मुंबईतील नेत्याने मला लिहिलं, ‘…आणखी सखोल अभ्यास केल्यास या विषयाची खोली आपणास नक्कीच समजून येईल. त्याकरता हिंदू जनजागृती समितीचा ‘लव्ह जिहाद’ हा ग्रंथ वाचावा. ‘लव्ह जिहाद’ हे एक षड्यंत्र असून एक हिंदू स्त्री धर्मांतरित झाली की, हिंदुंचं एक कुटुंब वाढण्यास आळा बसतो. शिवाय दुसर्या बाजूने मुस्लिमांच्या संख्येत आणखी भर पडते (त्या स्त्रिपासून होणारी संतती इत्यादी) शिवाय या गोष्टीला कायद्याच्या आधाराने काही करता येत नाही. लग्न करून धर्मांतरित केलं की मुलं जन्माला घालायची आणि लाथाडायचं. मूल जन्माला घातलं की मुलीच्या घरचेही तिला स्वीकारत नाहीत, त्यामुळे तिच्या मजबुरीचा लाभ घेऊन परदेशात (किंवा भारतातही) देहविक्रय करण्यास तिला भाग पाडायचं. अशा धर्मांतरित मुलींचा वापर दहशतवादी कारवायांतही केला जात असल्याचं आता उघड झालं आहे…’ या प्रतिनिधिने खरोखरच त्यांनी प्रकाशित केलेल्या ‘लव्ह जिहाद’वरील पुस्तिका माझ्याकडे त्यांच्या साधकांमार्फत पाठवून दिल्या. त्या मी वाचल्या आणि हे वैदिकवादी अत्यंत भडकपणे गोष्टींचं स्वरूप बदलून टाकतात हेही लक्षात आलं.

असं असलं तरी परधर्मी मुलींशी लग्न करून, मुलांना जन्म देऊन त्यांना लाथाडलं जातं काय? तर त्याचं उत्तर काही प्रमाणात का होईना ‘होय’ असं द्यावं लागतं. मी याबाबत अधिक माहिती गोळा करत असताना लक्षात आलं की केरळ, मंगलोर, आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्रात यासंबंधात मोठ्या प्रमाणावर चलती आहे. २००९मध्ये कर्नाटक सरकारने याबाबत जाहीर चौकशी करण्याचे आदेश सी.आय.डी. ला दिले होते. त्यामागे कोणती संस्था/संघटना आहे आणि त्याला धन कुठून येतं याचा तपास करण्याबाबत हा आदेश होता. याचाच अर्थ असा की, ही प्रकरणं दखल घ्यावीत एवढी वाढली होती. केरळ उच्च न्यायालयानेही याची दखल घेऊन अशा प्रेमाच्या नावाखालील धर्मांतरं थांबवण्यासाठी कायद्याची आवश्यकता प्रतिपादन केली होती. गेल्या चार वर्षांत किमान ३०,००० हिंदू आणि ख्रिस्ती मुलींची अशी प्रेमळ (?) धर्मांतरं झाली आहेत असा दावा असला तरी समजा याच्या ५० टक्के जरी असे प्रकार घडले असतील तर त्याची चिंता करायला हवी. वैदिकवादी आणि ख्रिस्ती धार्मिक संस्था/संघटना या विषयाचं राजकारण करण्यासाठी संख्या फुगवून सांगत असणं स्वाभाविक आहे. मात्र मुळात काहीच नाही असं चित्र मात्र नक्कीच नाही.

या सर्व हिंदू वा ख्रिस्ती संघटनांचा आणि सरकारचाही संभ्रम आहे वा होता की ‘लव्ह जिहाद’ नावाची संघटना तर नाही ना? पण तसं तपासात काहीही आढळून आलेलं नाही. ‘लव्ह जिहाद’ ही एक अत्यंत योजनाबद्ध रितीने निर्माण केलेली संज्ञा आहे. स्वधर्मियांची संख्या वाढवणं, संतती वाढवणं हा मुख्य हेतू या नव्या संकल्पनेत आहे. एकेकाळी इतरांना जबरदस्तीने वा आमिषं दाखवून धर्मांतरित केलं जात होतं. आधुनिक काळात ते शक्य नाही. याची जाण आल्याने तरुण मुलींनाच टार्गेट करून त्यांनाच प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्यासाठी आणि आपल्या धर्मात घेण्यासाठी या ‘लव्ह जिहाद’ची निर्मिती झाली आहे असं दिसतं.

दुसरी बाब अशी की, जरी इस्लाममध्ये ४ पत्नी करण्याची धार्मिक अनुमती असली तरी प्रत्यक्षातील वास्तव वेगळं आहे. म्हणजे स्त्रियांची दरहजारी पुरुषांमागील संख्या ही ९४५ (२००१ सेन्सस) एवढीच आहे. म्हणजे एका पुरुषाने ४ सोडा एक लग्न करता येईल अशी तुलनात्मक स्त्रीसंख्या अस्तित्वात नाही. दुसरं असं की मुस्लीम स्त्रियांना धर्मात जो दुय्यम दर्जा आहे, बंधनं आहेत, त्यामुळे त्यांचा शिक्षणदर अत्यल्प तर आहेच पण तोही मदरशांपर्यंत सीमित आहे. या वास्तवाचाही इथे विचार करणं भाग आहे.

‘लव्ह जिहाद’मध्ये भाग घेणारे ज्ञात तरुण हे उच्चशिक्षित अल्पांश आहेत हेही वास्तव आहे. तेही बरंचसं शिक्षण मदरसे वा फार फार तर माध्यमिक शाळांत घेतलेले आहेत. त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढता आलेल्या तरुणी काही अपवाद वगळता उच्चभ्रू (आर्थिकदृष्ट्या) कुटुंबातील नाहीत. या ‘लव्ह जिहाद’च्या तक्रारी सर्वाधिक मुस्लिमबहुल प्रांतांतून आहेत आणि सर्वच लोक तक्रारी दाखल करत नाहीत. कारण कुटुंबाच्या बेइज्जतीची भावना आडवी येते हे एक वास्तव आहे.

हे वास्तव लक्षात घेता, यात अशा जिहादींना यश कसं मिळतं हा सखोल संशोधनाचा विषय आहे. या संदर्भात नवीन पिढी कसा विचार करते तेही पहायला हवं.

मुस्लीम तरुण हे हिंदू तरुणांपेक्षा अधिक स्मार्ट आहेत काय की, ज्यायोगे उच्चवर्णीय मुलीही त्यांच्या सापळ्यात अडकाव्यात? या प्रश्नाचं उत्तर नकारार्थी आहे. भारतीय स्त्रियांवर पूर्वापार वैदिक धर्माने शुद्रत्व लादलं आहे. म्हणजे पुरुष उच्चवर्णीय असला तरी त्याच्याच जातित जन्मलेली स्त्री ही धर्माने मुळात शूद्र मानलेली आहे. म्हणजे अन्य जातीयांचं सोडून द्या, एकाच जातित अशी विषम धार्मिक विभाजनी पूर्वापार झालेली आहे. आधुनिक काळात ज्ञान-विज्ञान-समाजाशी नाळ जुळलेल्या या वंचित स्त्रियांनी आपली जीवनादर्श बदलली आणि परंपरेला त्यांच्या पद्धतीने लाथ मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे समाजशास्त्रीय वास्तव नाकारण्यात अर्थ नाही.

दुसरं असं की समाजमानसावर प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष प्रभाव गाजवणारं माध्यम म्हणजे चित्रपटसृष्टी. या सृष्टीवर मुस्लीम कलावंत/गायक/गीतकारांनी/दिग्दर्शकांनी अबाधित राज्य केलं आहे हेही एक वास्तव आहे. ते अयोग्य नव्हतं, पण त्याचा झिरपत येणारा तरुणाईवरील परिणाम दुर्लक्षिता येत नाही. मुलांवर होणारा परिणाम आणि मुलींवर होणारा परिणाम यात मूलभूत फरक करावा लागतो. दोहोंचे प्रत्यक्ष जगाकडे पहायचे दृष्टिकोन आणि तत्त्वज्ञान यात फरक असतो. हा फरक प्रामुख्याने भावनिकता/वास्तवता/परिस्थितीला प्रतिक्रिया देण्याची पद्धत आणि सुप्त मानसिक आणि शारीरिक अशा नैसर्गिक प्रेरणा यामुळे निर्माण होतो. याबाबत आपल्याकडे फारसा अभ्यास होत नाही. प्रबोधन तर खूप दूरची बाब राहिली.

जो काही ‘लव्ह जिहाद’ यशस्वी होतो तो यामुळे.

या प्रकारात जर कोणी संघटनात्मक कार्य करत असेल तर त्यासाठी सिमीकडे बोट दाखवलं जातं. अर्थात याबाबत एकही पुरावा मिळालेला नाही. पण शाहरुख खान आणि गौरी हे आयडॉल बनवून (त्या दोघांना हे माहीतही नसेल…) मुली पटवण्याचं कार्य होतं हेही वास्तव आहे. मुलगी दिसायला सुंदर असली पाहिजे अशी मुळात अटच नसून यात मुळात निवडीचा प्रश्नच नसल्याने, जिलाही आपल्या धर्मकक्षेत ओढता येईल ती मुलगी निवडणं अशीच निवडपद्धती असली तर काय करणार?

म्हणजे धर्मांतरासाठी प्रेमाचा खेळ खेळलाच जात नाही असं नाही. त्याचं प्रमाण सांगितलं जातं तेवढं नक्कीच नसलं, अतिरंजित असलं तरी त्याचं अस्तित्व असणं आणि केवळ धर्मासाठी एखादीचं जीवन उद्ध्वस्त करणं हे अन्याय्य आणि गुन्हेगारी स्वरूपाचं कृत्य आहे याबाबत शंका असू नये. मुलींच्या बंडाच्या प्रेरणा काहीही असू शकतील. ज्यांच्याविरुद्ध जास्त बोललं जातं त्यांच्याबद्दल आकर्षण वाटू लागणं हाही स्त्रियांचा मानवी स्वभाव आहे हेही लक्षात घेतलं तरी अशा प्रेमात खरं प्रेम नसेल, हेतूच अशुद्ध असतील आणि मुलींचं नुकसानच होणार असेल तर एक समाजशास्त्रीय प्रश्न म्हणून याकडे पाहिलं पाहिजे.

तरुणांनी (जात-धर्म न पाहता) प्रेमात पडलं पाहिजे. प्रेम धर्मावर नव्हे तर जोडीदारावर असलं पाहिजे. खरं तर आंतरधर्मिय विवाह जेवढे होतील तेवढं चांगलंच आहे… पण मग प्रश्न असा आहे की, धर्म बदलायची सक्ती का? आपापला धर्म आहे तिथेच ठेवून वैवाहिक आयुष्य जगता येतं… मुलांना हवा तो धर्म निवडण्याचं स्वातंत्र्य देता येतं. माझ्या पाहण्यात अत्यंत यशस्वी अशी आंतरधर्मिय लग्नंही आहेत. वैदिकवादी जसा तरुणांचा अनेकदा गैरवापर करत आपले मुस्लिमद्वेषाचे अजेंडे रेटत राहतात. तसंच काही मुस्लीम हिंदुद्वेषाचे अजेंडे राबवण्यासाठी त्यांच्या तरुणांचा गैरवापर करत असतील तर ही बाब अत्यंत समाजविघातक आहे हे आपण समजावून घ्यायला हवं. कट्टरतावाद्यांपासून दूर राहणं यातच सर्वांचं खरं हित आहे.

– संजय सोनवणी