Friday, October 30, 2020

भारतीय मुस्लिमांचा हा मूर्खपणा कशासाठी?


नृशंस घटनांवर काही गोष्टी अनेकदा लिहून झालेल्या असतात. घटनांची पुनरावृत्ती होतच राहते. अमानुष हिंस्त्रपणा माणसाची पाठ सोडत नाही. त्या अमानुष घटनांवर लिहायचाही कंटाळा येत जातो. हिंस्त्रपणा ही कोणा एका धर्म/पंथाची मक्तेदारी राहिलेली नसली तरी जेंव्हा त्या हिंस्त्रपणाचे मोर्चे काढून समर्थन धर्म/पंथीयांकडून होते तेंव्हा तो धर्म/पंथ एक दिवस संपुष्टात येणार यात शंका नाही.
पैगंबरांचे चित्र किंवा व्यंगचित्र काढण्यात गैर का असावे? कोणी गैरही मानले तर त्याचा विरोध करण्याचा मार्ग हिंसा हाच आहे काय? येशुपासून कृष्ण-गणपतीची असंख्य व्यंगचित्रे काढली गेलेली आहेत. त्यामुळे येशू ते कृष्ण/गणपती छोटे झाले काय? होत असतील तर ते मग तेवढे महान नव्हतेच. पैगंबरही मग सांगितले जातात तेवढे मुस्लिमांच्या दृष्टीने महान वगैरे नसले पाहिजेत, एका भ्रमाच्या भोपळ्याला गुलदस्तात ठेवण्यासाठी केलेली ही नृशंस योजना आहे असे म्हटले तर ते मग कसे अयोग्य ठरेल?
धर्मावर, प्रेषितावर प्रेम वगैरे ठीक आहे. पण त्या प्रेमाचा वेडपटपणा करत जीव घेणे, जीव देणे यात कोणता धर्म आणि प्रेषिताची महत्ता आहे? धर्मातले आदेश हे अपरिवर्तनीय ईश्वरी संदेश असतील तर मग त्या ईश्वरावरच प्रश्न उपस्थित केले पाहिजेत. परीवर्तनशिलता हाच (मानत असाल तर) ईश्वरी सृष्टीचा नियम आहे असे म्हणतात. सृष्टीच काय मनुष्यही बदलत असतो. अपरिवर्तनशील असे काहीही, अगदी असला तर ईश्वरही नाही. मग त्याचे त्या काळात दिलेले संदेश अपरिवर्तनीय कसे? उंटावर बसून समशेरी फिरवत इतरांना मारण्याचा आणि स्त्रिया पळवायचा काळ कधीच मागे पडला. ते जग राहिले नाही की ती संस्कृती राहिली नाही. आता तसे वागताही येत नाही. चरितार्थाची साधनेही बदललेली आहेत. हे सारे होत असतांना धर्मादेशांच्या हास्यास्पद अपरीवर्तनीयतेची मातब्बरी कोणी सांगत असेल तर तो मूर्ख विकृतीचा कळस आहे. इस्लाम खरे तर त्या काळाच्या गरजेचे अपत्य होते. आता त्यातील कालसुसंगत आहे ते घेत बाकी अरबी समुद्रात बुडवता येण्याचे साहस करायला हवे. आणि तेहे जमणार नसेल तर जागतिक संस्कृती आपला द्वेष का करते हा प्रश्न उपस्थित करता कामा नये.
चार्ली हेब्दो मासिकाच्या कार्यालयावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दहा पत्रकारांसहित १२ ठार तर २० जखमी झाले होते. अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर झालेल्या या हल्ल्याचा निषेध करावा तेवढा थोडा होता. नववर्षाची सुरुवात अमानवी रक्तपाताने झाली होती. पण ती साखळी अजून संपली नाही हे ताज्या हल्ल्याने दाखवून दिले.
मोहम्मद पैगंबरांचे व्यंगचित्र काढले म्हणून मुस्लिम दहशतवाद्यांनी हे अमानवी कृत्य केले असे मानले जाते. हा विकृत मुर्खपणा आहे. पैगंबरांची चित्रे काढली गेली नाहीत असे एकही शतक नाही. मोझेस, येशूची व्यंगचित्रेही असंख्य वेळा काढली गेली आहेत. पैगंबरांची काढली तर एवढा गजहब का? हा तद्दन मुर्खपणा...विकृती आणि मेंदुच नसल्याचे लक्षण आहे.
तेच आयसीसचे. या क्रूरकर्मा संघटनेने २०११ पासून निर्माण केलेल्या हिंसक संघर्षात दोन लाखाहुन अधिक ठार झालेले आहेत.आयसिसच्या दहशतवाद्यांनी हाती पडलेल्या सिरियन/इराकी नागरिकांसह परकीय नागरिक व पत्रकारांची ज्या नृशंस पद्धतीने हत्या केली आहे ती "सैतानी" या शब्दातच वर्णन करता येईल. परंतू हा मध्यपुर्वेतील राष्ट्रांपर्यंत मर्यादित असलेला मामला युरोपच्याच भुमीवर जावून पोहोचेन याची कोणी कल्पनाही केली नव्हती. चार्ली हेब्दो मासिकातील व्यंगचित्रांच्या बदल्यासाठी हा आतंकवाद फ्रांसमद्ध्ये घुसला. त्यानंतर लगेच ब्रुसेल्स या बेल्जियमच्या राजधानीत विमानतळ आणि मेट्रो स्टेशनवर झालेल्या दहशतवादी स्फोटांत तीसहून अधिक ठार झाले. युरोपमध्ये आयसिसचे नेटवर्क किती पसरले आहे याचा अंदाज या अनपेक्षित हल्ल्यामुळे येतो.
आणि त्याहून घृणास्पद बाब आहे ती या दहशतवाद्यांना समर्थन देऊ पाहणारे मोर्चे आणि तेही भारतात निघावेत ही. भारतीय मुस्लिमांचा दहशतवादाला पाठींबा असल्याचा संदेश यातून जातो आहे हे समजायची बुद्धीही येथील मुस्लीम नेते गमावून बसलेले आहेत. नेते गमावून बसलेत कारण स्थिर बुद्धीने चिकित्सा करणारे मुस्लीम अभावानेच आहेत हे खरे कारण आहे. पुराणपंथी समाज कधीही वैश्विक मानवतावादी विचारांचा होऊ शकत नाही.
पण ज्याला स्वत:चा कडेलोटच करून घ्यायचा आहे त्याला काय सांगणार?
भारतीय मुस्लिमांनी या मूर्खपणापासून दूर रहायला हवे होते. पण तेही चुकत आहेत हे लक्षात कोण घेणार?

No comments:

Post a Comment

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...