इसपू ३१०० ते
इसपू २६०० हा सिंधू संस्कृतीचा सर्वोच्च वैभवाचा काळ मानला जातो. या संस्कृतीचे
अवशेष सर्वप्रथम सिंधू नदीच्या खो-यात सापडल्याने तिला “सिंधू” संस्कृती असे नाव
मिळाले असले तरी नंतर झालेल्या देशभरातील उत्खननांत सिंधू संस्कृतीच्याच समकालीन
ग्रामीण, नागरी वसाहतींचे अवशेष प्राप्त झाले असल्याने सिंधू संस्कृतीला भारतीय
संस्कृती असे नाव देणे संयुक्तिक राहील. उत्तर दक्षिण भारतात प्राचीन काळापासून
व्यापारी संपर्क राहिला असल्याचेही पुरावे आता मिळाले आहेत. उत्तर भारती भाषांत
द्राविडी शब्द कसे आले याचे उत्तर या व्यापारी संपर्कात आहे.
वस्तू अत्पादन, व्यापार आणि उपखंडाबाहेर निर्यात
यामुळे भारताला एका प्रकारची भौतिक समृद्धी आली होती. लोक बव्हंशी शिवप्रधान
मूर्ती/प्रतिमा पूजेचा धर्म पाळत होते. हा लोकधर्म असल्याने त्यात संघटीतपणा
नव्हता. विधी-विधान ते सामाजिक तत्वज्ञान प्रांतनिहाय वेगवेगळे होते. प्रत्येक
जमातीचे नियमही वेगळे होते. श्रेणी संस्थेने जरी व्यापार-उत्पादनात वर्चस्व मिळवले
असले तरी सर्व समाज या भौतिक प्रगतीचे भागीदार नव्हते. म्हणजे एक प्रकारची विषमता
होती. तिचे एकुणातील परिमाण केवढे होते याचे लिखित पुरावे उपलब्ध नसले तरी नगर व
ग्रामीण वसाहतींच्या एकंदरीत स्वरूपावरून व जीवनमानातील फरकावरून या विषमतेचा
अंदाज येतो. प्रगतीबरोबरच समाजात अनेक दुर्गुणही घुसू लागतात. भारतातही तसेच झाले.
यातूनच समाजातील विचारकांना अनेक प्रश्न पडू लागणे स्वाभाविक होते. जीवनाचा अंतिम उद्देश
काय आणि तो साध्य करण्याचे नैतिक मार्ग काय हे ते मुलभूत प्रश्न होत. खरे म्हणजे
हे नीतीमूल्यांची पायाभरणी तेंव्हाच होऊ लागते जेंव्हा अनैतिक तत्वे समाजात डोके
वर काढू लागतात. ऐहिक सुखांचा उद्रेक होतो तेंव्हाच विरक्तीचा विचार बळावू लागतो. समन
संस्कृतीची पायाभरणी याच तत्वविचारातून झाल्याचे आपण पाहू शकतो.
या संस्कृतीला
“समन” संस्कृती म्हणतात याचे कारण यातील तत्वचिंतक व अनुयायी सर्व जीवांना समान
मानतात. विषमतेला हेच उत्तर होते. कुंदकुंद आचार्यांनी समयसार ग्रंथात केलेल्या
व्याख्येनुसार “जो शत्रू आणि मित्रांना, प्राणीमात्रालाही समान मानतो,
जीवन-मृत्यूतही भेद करत नाही तो समन होय.”
मुलभूत
तत्वज्ञान समता आणि सांसारिक पाशातून मुक्त होत जीवनाचे सर्वोच्च ध्येय गाठणे हा
मुलभूत हेतू समान असला तरी तात्कालीन विचारकांत हे साध्य करण्याचे मार्ग कोणते यात
मतभेद होते. या विचारकांत वादळी चर्चाही होत. त्यातून वेगवेगळे विचार
साम्प्रदायाही निर्माण होत गेले आणि वैचारिक क्रांती सुरु झाली व मानवी जीवनाकडे
पाहण्याची भारतीयांची दृष्टी व्यापक झाली असे आपल्याला दिसून येते.
जैन ही या समन
संस्कृतीतील टिकून राहिलेली सर्वात प्राचीन परंपरा. बौद्ध परंपरा समन संस्कृतीतूनच
निर्माण झाली असली तरी तिचे प्रवर्तक खुद्द भगवान बुद्ध होते. त्यांनी समन
संस्कृतीला एक वेगळा आशय प्रदान केला. जैन आणि बौद्ध या दोन परंपरा भारताच्या समन
संकृतीच्या विचारवैभवाचे दर्शन घडवणा-या परंपरा आजही जीवित असल्या तरी आरंभ काळात
समन असंख्य संप्रदाय होते हे इतिहासाचे अवलोकन केले असता दिसून येते.
जैन परंपरेला
आधी निगंथ असे नाव होते. निगंथ म्हणजे ज्याने ऐहिक सुखांच्या बंधनांपासून स्वत:ला
अलिप्त केले आहे अशी व्यक्ती. ऋषभनाथ हे आद्य तीर्थंकर सिंधू संस्कृतीच्या समकालीन
जन्माला आले. योग्यांची परंपरा तेंव्हा अस्तित्वात असली तरी योगसंस्कृतीची
विचारदृष्टी वेगळी आणि ऐहिक होती. ऋषभनाथांनी सुरु केलेल्या निगंथ परंपरेने
समकालीन शिव आणि योग संस्कृतीचा अंगीकार केला असला तरी त्यांना वेगळा स्वतंत्र
तार्किक आशय दिला. तो इतका पुढे दृढ झाला कि आदिनाथ शिव आणि आदिनाथ ऋषभनाथ हे एकच
असा दृढ भाव निर्माण झाला. आद्य तीर्थंकर ऋषभनाथ, अजितनाथ आणि नेमीनाथ हे ऐतिहासिक
तीर्थंकर वैदिक धर्मीय भारतात प्रवेशन्यापुर्वीच होऊन गेले होते हे आपल्याला
त्यांची नावे यजुर्वेदात आल्याने लक्षात येते. वैदिक धर्मीय येथे आल्यानंतर
त्यांना समन संस्कृतीचाही परिचय झाला. त्यांच्याशी तत्व संघर्ष होणे स्वाभाविक
होते. पण हा संघर्ष लगेच झाला नाही. सुरुवातीला वैदिकांनी मुनी, यती, व्रात्य व
जिनांचा आदराच केल्याचे आपल्याला वैदिक साहित्यावरून दिसते. अनेक वैदिकही या
परंपरेत प्रवेशल्याचे आपल्याला अथर्ववेदातील व्रात्यकांडावरून स्पष्ट दिसते. पण
मगध प्रांतात जेंव्हा वैदिकांना प्रवेश झाला तेंव्हा तेथे प्रबळ असलेल्या समन
परंपरेने वैदिक यज्ञ व त्यात होणारी हिंसा याला कडाडून विरोध केल्याने दोन विभिन्न
परंपरांत संघर्ष निर्माण झाला. तो तात्विक संघर्षाचा इतिहास आपल्याला वैदिक, जैन
आणि बौद्ध साहित्यात पहायला मिळतो.
प्राकृत आणि
वैदिक साहित्यातून आपल्याला पुरातन समन परंपरेतील विविध प्रवाहांचे चित्र मिळते.
समन संस्कृतीमध्ये जिन, आजीवक, व्रात्य, तापस, गेरुए (भगवी वस्त्रे घालणारे), मुनी,
यती, दिगंबर, परिव्राजक (भटके), अज्ञानवादी, योगी, नियतीवादी, लोकायतीक असे अनेक
पंथ होते. या पंथांचे मुलभूत तत्वज्ञान समतेवर आधारित असले तरी जीवनाचा अंतिम
उद्देश साध्य करण्याबाबतचे विचार भिन्न होते. हे सारेच पंथ कालौघात टिकले नाहीत.
काही पंथ जैन आणि बौद्ध धर्मांत मिसळून गेले. असे असले तरी या विचारकेंद्रांनी
तत्कालीन राजसत्तांना आकर्षित केले. जीवनाच्या उत्तर काळात सम्राट चंद्रगुप्त मौर्य
जैन धर्मात प्रविष्ट झाला, सम्राट अशोकाने बौद्ध धर्माला आलिंगन दिले. अशोकाचा
पिता बिंदुसार आजीवक विचाराचा अनुयायी होता. आजीवक धर्माचा प्रवर्तक मक्खली गोसाल
हा बुद्ध-महावीरांचा समकालीन. पण आजीवक धर्मही नंतर विस्कळीत झाला. त्याचे अनुयायी
जैन अथवा बौद्ध या तेंव्हापर्यंत संघटीत बनलेल्या धर्मात विलीन झाले. लोकायातीक तत्वज्ञान हे सरळ सरळ वैदिक
धर्मतत्वांवरच आघात करू लागल्याने वैदिकांनी त्याचा हिरीरीने प्रतिकार करत या
तत्वज्ञानाला पीछेहाट स्वीकारावी लागली. असे असले तरी आधुनिक काळात लोकायातीक
तत्वज्ञानाचे अनुयायी वाढत आहेत.
समन परंपरेने
जगाला दोन महत्वाचे धर्म दिले ते म्हणजे जैन आणि बौद्ध. उत्कृष्ठ नितीमुल्ये जगाला
मिळाली असतील तर ती या धर्मामुळे. सत्य, अहिंसा, अपरिग्रह, अनासक्ती, अनेकांतवाद,
कर्म सिद्धांत, संन्यास ही तत्वे व त्यामागील समृद्ध विचारपरंपरा या संस्कृतीने
दिली. किंबहुना जागतिक विवेकवादाची नवी दृष्टी या तत्वज्ञानाने दिली. आधुनिक काळात
बँरिस्टर वीरचंद गांधी, राहुल सांस्कृत्यायन यासारखे द्रष्टे विचारवंत या परंपरेला
लाभले. महात्मा गांधींनी समन तत्वज्ञानावर आधारित अहिंसक लढ्याची देणगी आधुनिक
जगाला दिली. बाबासाहेब बौद्ध धर्माचे महान भाष्यकार तर होतेच पण भारतीय राज्यघटनेत
समान तत्वज्ञानाचा गाभा आणण्याचे अतुलनीय कार्य त्यांनी केले. जगभर समन तत्वज्ञानाचा
आज अभ्यास होतो. त्या तत्वज्ञानावर आधारत समतेचे, स्त्री-मुक्तीचे, शोषणरहित
समाजाचे लढे आज लढले जातात. भावी शांततामय जग निर्माण करण्यासाठी समन तत्वज्ञानच
मूलाधार ठरेल असं विश्वास जागतिक विचारवंत व्यक्त करत असतात. कोरोनानंतरचे जग अधिक
जवळ यायचे असेल तर त्याला पर्यायही नाही.
समन
संस्कृतीने माणसाला माणूस व्हायला शिकवले. नवनव्या क्रांतीकारी विचारांची रुजुवात
केली. जवळपास सिंधू काळात या विचारांची बीजे रुजू लागली, बुद्ध-महावीर काळात
त्यांना वटवृक्षाचे स्वरूप आले. आजही हे महनीय तत्वसिद्धांत आधुनिक तत्वज्ञाच्या
सिद्धांतांतून वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिध्वनित होत विकसित होत आहेत. प्रागतिक होत
अव्याहत वाहत राहणे हा समन तत्वज्ञानाचा स्वभाव. याचा जन्म आणि विकास आपल्या भूमीत
झाला याचा आपल्याला यथार्थ अभिमान वाटला पाहिजे.
-संजय सोनवणी
(दै. पुण्यनगरीमध्ये प्रकाशित)
No comments:
Post a Comment