Monday, February 22, 2021

युरोपियनांचा वर्चस्ववाद, वैदिक धर्म आणि येथील वास्तव!


 

प्राचीन इराणमध्ये पारशी धर्माचे प्राबल्य वाढले. त्या धर्माने वैदिक धर्माचे आश्रयस्थान असलेल्या सरस्वती (हरह्वैती) नदीचे खोरेही व्यापल्याने वैदिक धर्माची पीछेहाट सुरु झाली. त्यामुळे विदेघ माथव आणि पुरोहित गौतम राहुगन या पुरोहिताच्या नेतृत्वाखाली स्थलांतर करत, हिंदुकुश पर्वत ओलांडत एका नदीच्या काठावर, दलद्लीच्या प्रदेशात वस्ती केली हा इतिहास आपण शतपथ ब्राह्मणाच्या आधारे पाहिला. या व्यतिरिक्त संपूर्ण वैदिक साहित्यात स्थलांतर अथवा आक्रमणाचे कसलेही उल्लेख येत नाहीत. खरे तर आर्य आक्रमण वा व्यापक स्थलांतर सिद्धांत येथेच बाद होतो. तरीही पाश्चात्य विद्वानांनी या सिद्धांताला गौरवीकरण करत एवढ गवागवा का केला याचीही कारणे तपासली पाहिजेत.

प्रबोधन काळाने युरोपियनांनी आधुनिक ज्ञान-विद्यानाची दारे उघडली. औद्योगीकरनामुळे त्यांना अन्यत्र वसाहती उभारत साम्राज्यवाद आणावा लागला. जगातील अन्य समाजांपेक्षा आपण पुढारलेलो आहोत ही जाणवून युरोपियनांचा आत्मविश्वास वाढला. पण युरोपचा इतिहास मात्र तुलनेने खुप अर्वाचीन. त्यामुळे आपला इतीहासही मागे नेण्याच्या प्रवृत्तीतून त्यांनी ऋग्वेदातील फक्त ३६ वेळा येणारी “आर्य” ही संज्ञा उचलुन आर्य पराक्रमी व बुद्धिशाली आर्यवंश अशी कल्पना करून आपले पुरातन पूर्वज कधीकाळी एकाच ठिकाणी वास्तव्याला होते आणि नंतर गटागटाने पसरत त्यांनी युरोप ते भारत या विशाल प्रदेशात आपली संस्कृती व भाषा पसरवली असा सिद्धांत जन्माला घातला. या सिद्धांताने वेळोवेळी अनेक वळणे घेतली असली तरी मुख्य गाभा मात्र कायमचं ठेवला गेला. यामुळे युरोपियनांचा इतिहास किमान सनपूर्व १५०० पर्यंत जात होता.

आर्य सिद्धांताची मोहिनी एवढी अचाट होती कि खुद्द येशू हा सेमेटिक वंशाचा आहे हे सहन न होऊ लागल्याने त्यांनी येशूलाही आर्य ठरवायचा प्रयत्न केला. तो एक वांशिक वर्चास्वतावादाचा एक वेगळाच विषय आहे. सिद्धांत मांडला खरा पण त्याला बळ देईल असे लिहित पुरावे मात्र ना ऋग्वेदात होते ना अवेस्त्यात. जो पुरावा आहे तो केवळ शतपथ ब्राह्मणात पण तो केवळ वैदिक धर्मी भारतीय उपखंडात अल्पसंख्येने गेल्याचा. यामुळे त्यांच्या सिद्धांताला बाधाच येत असल्याने अत्यंत सोयीने या पुराव्याकडे दुर्लक्ष केले गेले. असो.

मग विदेथ माथव व त्याचे अनुयायी भारतात सर्वप्रथम कोठे वसले? ऋग्वेदातील दशम मंडलात येणारे पुरुषसुक्त याबाबत दिशा दाखवते. ऋग्वेदाच्या उर्वरीत भागात तुर्वसा, पर्शु, पार्थव, भलानस, दास, दस्यू इत्यादी टोळ्यांची नावे वारंवार येतात. येत नाही ते फक्त शुद्र टोळीचे. ते फक्त येते ती ऋग्वेदाची सर्वात उशीरा रचना झालेल्या भागात. याचाच अर्थ अन्य टोळ्या मागे सुटल्या होत्या आणि आता ते नव्याच जमातीच्या सान्निध्यात आलेले होते. मॅक्समुलर  म्हणतो, “याच सुक्तात प्रथमच ग्रीष्म, वसंत, व अन्य ऋतू अवतरतात जे इराणमध्ये  नाहीत व ऋग्वेदातही अन्यत्र उल्लेखले गेलेले नाहीत.” म्हणजेच वैदिकांचा भूगोलही बदलला होता तेंव्हा या सुक्ताची रचना झाली.

सिंधू नदीच्या खो-यात “शुद्र” नावाची जमात खरेच अस्तित्वात होती. महाभारतात या जमातीचे उल्लेख शिबी, अहिरांसोबत तर केले गेले आहेतच पण पुरानांतही या जमातीचे उल्लेख आलेले आहेत. इतकेच काय अलेक्झांडरने केलेला पश्चिमोत्तर भारतावरील आक्रमणात त्याचे “सोद्राई” जमातीशी युद्ध झाल्याचे उलेख त्याच्या दायोदोरस या इतिहासकाराने करून ठेवलेत. इतिहासकार राम सरण शर्माही या विधानाला दुजोरा देतात व म्हणतात, “शुद्र एक टोळी (जमात) म्हणून इसपू चवथ्या शतकापर्यंत अस्तित्वात होती याबाबत शंका नाही.” ऋग्वेदात भारतात पश्चिमोत्तर, मध्य आणि दक्षिण भारतात इतर असंख्य टोळ्या असतांनाही याच टोळीचे नाव येते व तिला वैदिक समाज रचनेत स्थान देते म्हणजे वैदिक लोक भारतात जे सर्वप्रथम स्थायिक झाले ते शूद्रांच्या राज्यात, व या सर्व भूप्रदेशात शूद्रच राहतात असा त्यांचा समाज झाला. भारतीय उपखंडातील अन्य समाजांशी व भूगोलाशी त्यांचा परिचय नंतर झाला व त्याचे प्रतिबिंब मनुस्मृतीतही पडलेले आपल्याला दिसते.

आधीच सांगितल्याप्रमाणे प्राकृत शब्दांवर ध्वनीसंस्कार केल्याची असंख्य उदाहरणे ऋग्वेदात आहेत. शुद्र हा मुळचा “सुद्द” हा प्राकृत शब्द. या सुद्द जमातीचे अवशेष आजही सिंध-पंजाब प्रांतात मिळतात. सोधा वा सूद समाज या प्राचीन सुद्द जमातीचे वंशज असावेत असा निष्कर्ष अनेक विद्वानांनी काढला आहे. पुढे वैदिकांनी जोही कोणी तीन वर्णाचा नाही, म्हणजे वैदिक नाही तो शुद्र अशी व्याख्या बदलली. मनुस्मृती शक, हूण, कुशाण अशा विदेशी राजांनाही शूद्र म्हणते. अंगविज्जा या दुस-या शतकातील महाराष्ट्री प्राकृतात रचल्या गेलेल्या ग्रंथातही कुशाण व शकांनाही शूद्र म्हणण्यात आले आहे. जेही वैदिक धर्मीय नाहीत ते सर्वच वैदिकांच्या दृष्टीने शूद्र होते. म्हणजेच वैदिकांचा धर्म वेगळा व शुद्रांचा धर्म वेगळा हे वैदिकांना माहित होते तसेच अन्यांनाही. 

शूद्रांच्या राज्यातच ऋग्वेदाची पहिली पुनर्रचना केली गेली. यानंतर वैदिक पुढे कुरु प्रांतात सरकले. धर्मप्रसाराची सुरुवात वाटेतच झालेले होती. पंजाब-हरियाणा प्रांतातील व्रात्य लोकांना वैदिक धर्मात घेण्यासाठी व्रात्यस्तोम  विधीचा जन्म येथेच झाला. कुरु प्रांतात आल्यावत मात्र वेदांची पुन्हा नव्याने आखणी केली गेली. सर्वात आधी पैल, मग इंद्रप्रमती व बाष्कल, सत्याश्रव, सत्यहित वगैरे २७ मुख्य प्रचारक (शाखा) निर्माण झाले व त्यांनी उत्तरेतील विविध भागांत धर्मांतराची मोहिम सुरु केली. दक्षीणेत जाणारा अगस्ती हा त्यांचा शेवटचा मुख्य प्रचारक. ऋग्वेदातील ऋचाकर्ता अगस्ती व हा अगस्ती एकच नव्हे हेही येथे लक्षात घ्यायला हवे. 

विदेघ माथवाचे भारतात आगमन झाले तेंव्हा सिंधू संस्कृती नागर संस्कृतीकडून ग्रामीण संस्कृतीकडे गेली होती. विदेश व्यापार थांबला होता. गंगा यमुनेच्या प्रदेशात मात्र या काळात नागर संस्कृतीने पाय रोवलेले होते. हा काल उत्खनीत पुराव्यांवरून सरासरी इसपूचे बारावे ते इसपुचे आठवे शतक हा आहे. म्हणजे इसपू बाराशेनंतर कधीतरी पण निश्चयाने इसपू आठव्या शतकाअगोदर वैदिक धर्मीय (आर्य वंश म्हणून नव्हे) प्रवेशले आणि नंतरच्या काळात धर्मप्रसाराने आपला धर्म कुरु-पांचाल प्रदेशात वाढवला. त्यांना आधी बिहार-ओडीसा-बंगाल या राज्यात प्रवेश निषिद्ध करण्यात आला होता, पण नंतर तिकडेही प्रवेश मिळाला. म्हणजे आज भारतात जे बव्हंशी वैदिकधर्मी आहेत ते मुळचे येथीलच असून मुळ आलेले लोक येथल्या वैदिक धर्मांतरीतांत मिसळून गेले आहेत. त्यामुळे मूलनिवासी विरुद्ध युरेशियन आर्य ही जे आज राजकीय/सामाजिक विभागणी केली जाते ती चुकीची आहे. उलट याच धर्मांतरीतांमुळे वैदिक धर्माला येथील अनेक देवता व तत्वद्न्याने फेरबदल करून का होईना स्वीकारावी लागली.

वैदिक येथे येण्यापूर्वी (व आताही) एतद्देशियांत शिवप्रधान मूर्ती व प्रतीकपुजा, वृक्ष, यक्ष, नदी, पर्वत, पूर्वजपूजा हे मुख्य कर्मकांड असलेला सुफलन विधीवर आहारीत तंत्राधारित धर्म सिंधू काळापासून सर्वत्र प्रचलित होता. या धर्माला समांतरपणे त्याग, अहिंसा, अपरिग्रह इत्यादी महनीय मुल्यांवर आधारित समन संस्कृतीसुद्धा प्रचलित होती. तिचे जिन, यती, मुनी, आजीवक, व्रात्य, असे अनेक वैचारिक पंथही होते. या समनांची वैचारिक दृष्टी वेगवेगळी असली तरी त्यातील साधर्म्य म्हणजे अहिंसा हे मुलतत्व. लोक आवडतील त्या धर्मकल्पनांकडे सहज वळत, चर्चाही करत पण विद्वेषाची भावना असल्याचे आपल्याला महावीर-बुद्ध काळातही आढळत नाही. बव्हंशी समाज हा सर्व विचारप्रवाहांचा आदर करत असला तरी त्याचे दैनंदिन जीवन हे व्यक्तिगत मूर्तीपूजेने व्यापलेले होते.

थोडक्यात, भारतावर आर्य नावाच्या कोणा वंशाने आक्रमण केलेले नाही किंवा त्यांचे व्यापक स्थलांतरसुद्धा झालेले नाही. तसे पुरावे उपलब्ध नाहीत. वैदिक धर्म येथे प्रचाराने काही प्रमाणात पसरला. पण वैदिकांना भारतिय संस्कृतीचे जनकत्व बहाल करण्याचा जो प्रयत्न संघपरिवार करतो आहे त्यातून सांस्कृतिक संघर्ष वाढेल, कमी होणार नाही, हेही सर्वांनी लक्षात घ्यायला हवे. वैदिक धर्म आणि शिवप्रधान मुर्तीपुजकांचा हिंदू धर्म वेगळा आहे हे भान आले तरी पुरेसे आहे.

 -संजय सोनवणी

(दै. पुण्यनगरीमध्ये प्रकाशित. दि. २१.२.२०२१)

No comments:

Post a Comment

शेरशहा सुरी: एक कुशल प्रशासक

  शेरशहा सुरीने हुमायूनचा पराभव केला आणि त्याला भारताबाहेर हाकलले. दिल्लीत आता कोणी शासक उरला नसल्याने शेरशहाने स्वत:ला दिल्लीचा सम्राट घोषि...