Wednesday, June 16, 2021

सव्यसाची

 सव्यसाची.... (आता स्टोरीटेलवर!)

- संतोष देशपांडे


आज खूप दिवसांनी काही विलक्षण वाचनाचा आनंद लाभला. अनेक वर्षांपासून मी जिच्या शोधात होतो, ती संजय सोनवणी यांची सव्यसाची ही कादंबरी परवा हाती पडली. अक्षरशः तुटून पडल्यागत ही कादंबरी एका बैठकीत वाचून काढली. अगदी पहिल्या पानापासून ही कादंबरी पकड घेत जाते. खरं तर ही कादंबरी नव्हे तर एका संक्रमणकाळाची गाथा आहे. बंगालच्या राजकीय, सामाजिक, औद्योगिक पार्श्वभूमीवर अलगद उलगडत जाणारा थरार `सव्यसाची`मधून अनुभवायास मिळतो. यातील प्रत्येक पात्र, त्याची स्वतःची अशी कहाणी आणि त्यांची परस्परांधील अनिवार्य अशी गुंफण क्वचितच अशी पाहायला मिळते.
कथानक त्यातील पात्रांमधील अंतरंगाचे दर्शन घडवून आणताना कथेचा प्रवाह, वेग कुठंही कमी होत नाही. संजय सोनवणी यांच्या शेकडो साहित्यकृतींमधील माझ्या दृष्टीने ही सर्वश्रेष्ठ म्हणता येईल.
याची कारणं अनेक आहेत. एक म्हणजे, यातील दाखवलेला कालखंड हा देशात जागतिकीकरणाचे वारे वाहू लागली तेव्हाचा आहे. त्याचवेळी राजकीय पटलावर झपाट्याने बदलत असणारं जातीय व धार्मिक ध्रूवीकरण आणि त्या अनुषंगानं त्याचा समाजातील शेवटच्या घटकावर होत असणारा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम यात टिपला गेला आहे. समतेचं तत्वज्ञान आणि नैतिकतेच्या गोष्टींमधील फोलपणा प्रत्येकाच्या मनातील विचारांवर किती गहिरा आघात करीत राहतो, हे त्रिकालाबाधित सत्य यातून मांडलं गेलं आहे.
सव्यसाची म्हणजे नेमकं कोण, ही एक व्यक्ती आहे की प्रवृत्ती? दोन्ही हातांनी लक्ष्याचा वेध घेऊ शकणाऱ्या अर्जूनास सव्यसाची असं म्हटलं जातं. डावे-उजवे-मध्यममार्गी अशा सर्वांच्याच राजकीय जाणीवांचा, उणीवांचा आरसा जणू या कादंबरीतून आपणापुढं येतो. अर्थात, जेव्हा आरशात इतरांना पाहण्यासाठी आपण डोकावतो, तेव्हा त्यात आपणही स्वतःस दिसणं अपरिहार्यच नव्हे का....
आज आपण बंगालचं राजकारण जे काही अनुभवतो आहोत, त्याची मूळं सुमारे २१ वर्षांपूर्वी लिहिण्यात आलेल्या या कादंबरीत पानोपानी आढळतील. बाबरीचं पतन, त्यातून देशाच्या राजकारणाची बदललेली कूस आणि कोणत्याही देशांतर्गंत बदलांविना अथवा अंतर्गत तयारीविना आमंत्रित केल्या गेलेल्या जागतिकीकरणाचे समाजातील एकूणच मानसिकेतवर होत जाणारे परिणाम एका थरारपटासम यातून उलगडत जातात.
सुमारे साडेपाचशे पानांची ही कादंबरी केवळ फिक्शन म्हणून न राहता तो काळाची स्पंदनं टिपणारा एक कालातीत दस्तऐवज बनतो, प्रत्येकाच्या मनात दडलेल्या `सव्यसाची`चं एक अद्भूत दर्शन घडवतो. हीच कादंबरी बंगालीमध्ये असती, तर कदाचित तिचा यथोचित गौरव झाला असता, असं राहून राहून वाटतं.

No comments:

Post a Comment

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...