Saturday, June 12, 2021

इतिहासातील कृष्णविवरे आणि सम्राट खारवेल




 भारताच्या इतिहासात अनेक कृष्णविवरे आहेत. अनेक राजे, सम्राट व विद्वानही काळाच्या कुपीत बंदिस्त झाले असल्याने ते आपल्याला माहित नसतात. अनेक राजे त्यांचा इतिहास प्रयत्नाने शोधता येण्यासारखा असूनही केवळ इतिहासकारांच्या अनास्थेमुळे त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे जनसामान्यांसाठी अज्ञातच राहतात. भारतातील पूर्वोत्तर राज्ये असोत, काश्मीर, लडाख असोत, त्यांचा प्राचीन ते मध्ययुगीन इतिहास मुख्य प्रवाहातील इतिहासकारांनी अदखलपात्र ठरवल्यामुळे त्याबद्दलही लोकांना विशेष माहिती नसते. खरे तर प्रत्येक राज्याचा, त्यातील राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक घडामोडींचा इतिहास मिळून देशाचा इतिहास तयार होतो. त्यातून राष्ट्रीय भानही विस्तारायला मदत होते, हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. पण दुर्दैवाने अजून आपला इतिहास तेवढा प्रगल्भ झालेला नाही. त्यावर धार्मिक, जातीय व प्रांतिक अस्मितांचाच मोठा पगडा आहे, हे आपल्या लक्षात येईल;

पण त्यामुळे आपण काय गमावतो हे आपल्या लक्षात यायला हवे. उदाहरणार्थ आपल्याला काश्मीरच्या आठव्या शतकातील सम्राट ललितादित्याने सुदूर तुर्कस्तानपर्यंत आपले साम्राज्य कसे पसरवले आणि चीन व तिबेटला कसा शह दिला, याचा इतिहास माहित नसतो. १८३६ मध्ये लडाख जिंकून तो काश्मीरला जोडणारा सेनापती जोरावरसिंग आपल्या इतिहासाच्या खिजगणतीत नसतो. आक्रमकांनी उद्ध्वस्त केलेल्या सोमनाथ मंदिराचा पहिला जीर्णोद्धार करणारा आणि नंतर जैन धर्म स्वीकारणारा पराक्रमी सम्राट कुमारपाल दुर्लक्षित ठेवला जातो. ही खूप थोडकी उदाहरणे झाली; पण धार्मिक, प्रांतिक आणि सामाजिक गंड असेलल्या इतिहासकारांनी इतिहासाची अक्षम्य हानी करून ठेवली आहे, असे दुर्दैवाने म्हणावे लागते.

माहितीच कोठेही उपलब्ध नाही म्हणून अज्ञात राहिलेल्या राजे-सम्राटांची तर यादी खूप मोठे भरेल. काही राजे तर आपल्याला केवळ नाणी आणि शिलालेखांमुळे माहित आहेत. त्यांचे कार्यकतृर्त्व आणि त्यांचे काळाला काय योगदान होते, हे आपल्याला कदाचित कधीच समजणार नाही. माहितीच उपलब्ध नाही म्हणून कोणी अज्ञात राहणे ही बाब आपण समजू शकतो; पण धार्मिक-पांथिक कारणामुळे माहिती उपलब्ध होण्यासारखी असूनही कसलाही प्रयत्न न करणे हा एक दोष आहे. त्यामुळेच मौर्य घराण्यातील सम्राट अशोकाचा नातू जैनधर्मीय सम्राट संप्रती किंवा सम्राट कुमारपाल कधीही इतिहासकारांच्या खिजगणतीत नसतो.

केवळ शिलालेखावरून माहित असलेला अजून एक महत्त्वाचा सम्राट आहे आणि तो म्हणजे कलिंगचा सम्राट खारवेल. त्याने आपल्या शिलालेखात स्वत:च्या शासनकाळातील महत्त्वाच्या घटना कोरून ठेवल्याने तो इतिहासाला माहित असला, तरी समकालीन कोणत्याही, वैदिक, हिंदू अथवा जैन साधनांमध्ये त्याचा साधा उल्लेखही मिळून येत नाही; पण शिलालेखातील स्वत: खारवेलानेच ओरिसातील उदयगिरी लेण्यांतील हाथीगुंफा लेण्यात कोरवून घेतलेल्या १७ ओळींच्या लेखावरून त्याच्या कारकीर्दीतील महत्वाच्या राजकीय घडामोडींची माहिती मिळते. त्यावर संशोधन करून इतिहासातील एक अज्ञात पर्व उलगडायला मदत झाली असती; पण तसे विशेष प्रयत्न झालेले नाहीत.

शिलालेखात कोणताही संवत कोरलेला नसल्याने आणि लेखातील काही शब्द व वाक्ये कालौघात खंडित झालेली असल्याने निश्चित कालनिश्चिती करायला अडचण होत असली, तरी तत्कालीन राजांची नावे शिलालेखात असल्याने थोड्या कष्टाने का होईना आपण खारवेल आणि त्याचा काळ याबद्दल निश्चित माहिती घेऊ शकतो.

इसपु दुसऱ्या शतकात चेट घराण्यातील सम्राट खारवेल कलिंगच्या राजपदी आरूढ झाला. हे घराणे स्वत:ला महामेघवाहन असेही संबोधित असे. मौर्य साम्राज्य खिळखिळे झाल्यावर पुष्यमित्र शृंगाने मगधाची सत्ता बळकावली. त्याच वेळीस खारवेलाने कलिंग पुन्हा स्वतंत्र करून घेतले. तत्पूर्वी त्याचे चेट घराणे मौर्यांचे मांडलिक होते. या शिलालेखाची सुरुवातच जैन धर्मात अत्यंत प्रतिष्ठित असलेल्या णमोकार मंत्राने सुरू झाली असून, या मंत्राच्या प्राचीनतेचा हा एक शिलालेखीय पुरावा आहे. एवढेच नव्हे, तर आपले देशनाम 'भारत' हे जर सर्वप्रथम येत असेल, तर ते याच शिलालेखात. त्यादृष्टीनेही या शिलालेखाचे ऐतिहासिक महत्त्व अपरंपार आहे.

खारवेल हा प्रजाहितदक्ष आणि सहिष्णू राजा होता. वयाच्या अवघ्या चोविसाव्या वर्षी तो सत्तेत आला. त्यानंतर त्याने लगेच सार्वजनिक बांधकामे व दुरुस्त्या हाती घेतल्या. त्याने तत्कालीन जैनेतर धर्मांच्या पूजा, प्रार्थनास्थळांच्या बांधणीलाही उदार हस्ते मदत केली. दुसऱ्या वर्षी त्याने सातवाहनांची सत्ता असलेल्या वैनगंगेच्या परिसरातील असिक प्रांतावर स्वारी केली. सातकर्णी व खारवेलामध्ये तह झाला व बदल्यात खारवेलाला हत्ती-घोडे आणि रथ खंडणीत मिळाले. रठीक आणि भोजक गणराज्यांनाही त्याने पराजित केले. तो योद्धा होता, तसेच उत्सवप्रिय संगीत-नृत्याताही रुची ठेवणारा होता. वयाच्या एकतिसाव्या वर्षी त्याला धुसी नामक पत्नीपासून एका पुत्राची प्राप्ती झाली.

त्याच्या पुढच्याच वर्षी त्याने राजगृहवर स्वारी केली. तेथून डीमित्रियस (पहिला) या यवन आक्रमकाला उखडून काढत मथुरेपर्यंत मागे रेटले. याचा काळ निश्चित असल्याने खारवेलाचाही काल निश्चित करायला मदत होते. सत्तेवर आल्यानंतर बारा वर्षांनी त्याने मगधावर स्वारी करून बृहद्रथ मौर्याला ठार मारून सत्तेवर आलेला पाटलीपुत्रचा राजा बहसतीमितला (बृहस्पतीमित्र) शरण आणले. बहसतीमित हे पुष्यमित्र शृंग (मूळ प्राकृत नाव-पूसमित सुग) या राजाचे आणि त्याच काळात झालेल्या राजाचे पर्यायी नाव मानले जाते. पुष्यमित्र शृंग त्याच काळात पाटलीपुत्र येथूनच राज्य करत असल्याने बहसतीमित आणि तो एकच होते याविषयी शंका राहत नाही. ही माहिती मगधाच्या मौर्योत्तर इतिहासावर एक महत्त्वाचा प्रकाश टाकते.

या स्वारीत खारवेलाने केलेली महत्त्वाची कामगिरी म्हणजे तीनेकशे वर्षांपूर्वी नंद राजांनी कलिंगला हरवून तेथील ऋषभनाथांची (अग्रजिन) प्रतिमा पाटलीपुत्र येथे नेली होती. ती त्याने सन्मानाने कलिंग येथे परत आणली. कलिंगचे साम्राज्य त्यावेळी ओडिशा, आंध्र, विदर्भ, तसेच मगधाच्या काही भागापर्यंत पसरले होते. त्याने विद्वानांना आपल्या राज्यात आश्रय दिला. जैन धर्मीय असूनही त्याने अन्य धर्मांबाबत तेवढाच आदरभाव ठेवला. हे सारे शिलालेखात नोंदलेले आहे.

या शिलालेखामुळे इसवी सनपूर्व दुसऱ्या शतकातील इतिहासावर काही प्रमाणात प्रकाश पडतो आणि आपले अनेक गैरसमज दूर व्हायला मदत होते; पण दुर्दैवाने त्याकडे दुर्लक्षच केले गेले आहे. शिवाय शिलालेखाचे वाचन तर अनेकदा जाणीवपूर्वक सदोष पद्धतीने केले गेले आहे की काय अशीही शंका येते.

खारवेलाचा इतिहास सखोलपणे शोधला गेला, तर इतिहासातील अनेक गाळलेल्या जागा भरून निघायला मोठी मदत होईल. पुष्यमित्र शृंगाचा, सातवाहनांचा, परकीय आक्रमणांचा आणि एकुणातच तत्कालीन इतिहास नव्याने दुरुस्त करून घ्यावा लागेल आणि इतिहासाची कालरेखा किमान सुसंगत करता येईल. ज्यांची माहिती मिळणे अशक्य आहे त्यांचा इतिहास वगळता किमान ज्यांची थोडीतरी माहिती उपलब्ध आहे ती समकालीन इतिहासाच्या अनुषंगाने परिपूर्ण करता येणे अशक्य नाही, हे मी सम्राट ललितादित्याचा इतिहास लिहून दाखवून दिले आहे; पण त्यासाठी धार्मिक, पांथिक, प्रांतीय आणि जातीय अस्मितांची झापडे उतरवावी लागतील.

अन्यथा मागील लेखात लिहिल्याप्रमाणे भविष्यात केवळ एकांगी असा केवळ वैदिक दृष्टीतील इतिहास शिल्लक राहील आणि इतिहासाने ठेवलेल्या पाउलखुणा पुरेपूर पुसट होऊन एके दिवशी विस्मृतीत जातील. ही इतिहासाची अक्षम्य अशी हानी असेल.

No comments:

Post a Comment

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...