Monday, June 28, 2021

ओबीसींचे हित कशात?

ओबीसींचे हित कशात?

मी सर्वप्रथम श्री. बालाजी शिंदे यांनी ओबीसींच्या राजकीय, सामाजिक व आर्थिक समस्यांना मुलभूत हात घालत एक दिशादर्शक अभ्यासू पुस्तक लिहिले आहे याबद्दल त्यांचे मन:पूर्वक
अभिनंदन
करतो. सध्या ओबीसींचे राजकीय आरक्षण संकटात पडले असता आणि त्याच पार्श्वभूमीवर ओबीसींची स्वत:च्याच अधिकारांवर होणा-या अतिक्रमणाबाबत अनास्था असतांना एकुणातच ओबीसी आरक्षणाचा व महाराष्ट्रातील सर्वच सामाजिक चळवळीचा ओबीसी दृष्टीकोनातून घेतलेला सखोल परामर्श आणि जागोजागी नोंदवलेली परखड निरीक्षणे हे या पुस्तकाचे बलस्थान आहे. सर्व ओबेसीन्नी ते वाचायला हवे. त्त्यावर चिंतन-मनन करून आपल्या विचारदृष्टीत परिवर्तन घडवून आणायला हवे.
श्री. शिंदे म्हणतात ते खरे आहे कि ओबीसी समाज ओबीसी म्हणून एकत्र येत नाही. फक्त आपापल्या जातीच्या प्रश्नांसार्ठी एकत्र येतो. जातींची उतरंड आणि त्यातून निर्माण झालेले दुराभिमान एवढे कि सर्व ओबीसींना सर्वसंमत होइल अशा नेतृत्वाचाही उदय होऊ शकत नाही. खरे म्हणजे ओबीसी ही “ओळख” जेवढ्या समर्थपने बनायला हवी होती तशी ती निर्माण झालेली नाही. परिणामी ओबीसी प्रवर्गातील वेळोवेळी सामील झालेल्या जातींमुळे एकंदरीत संख्या तर वाढत गेली पण पदरात काही पडले नाही कारण अपेक्षित ओबीसी ऐक्य निर्माण झाले नाही. भारतीय राजकारणाला संपूर्ण नवी दिशा स्वबळावर देता येईल एवढी क्षमता असतांनाही राजकीय दृष्ट्या सर्वात मागे राहिलेला हा समाज आहे. स्वाभाविकच प्रगतीची अन्य दारेही कधी धडपणे खुली झाली नाही. अन्यायाला प्रखर उत्तरही देता येणे शक्य झाले नाही.
ओबीसींमधील आपापल्या जातीविषयकचे दुराभिमान आणि उतरंडीची (उच्च-नीचतेची) विघातक मानसिकता असंख्य जातीय बेटे निर्माण करते. याचे निराकरण कसे करायचे हा प्रश्न ओबीसी नेते व विचारवन्तांसमोर प्राधान्याने असायला हवा. ओबीसींचे स्वतंत्र राजकीय, आर्थिक व सामाजिक तत्वज्ञान निर्माण करावे लागेल कारण त्याशिवाय कोणतीही सामाजिक उद्दिष्टे साकार करता येणार नाहीत. ओबीसींचा अन्य राजकीय पक्षांनी आजवर केवळ फायदाच उचललेला आहे हे वास्तव आपल्यासमोर आहे. किंबहुना आज ओबीसींची सर्वार्थाने कत्तल केली जात आहे आणि त्याचा ज्या प्रमाणात निषेध व्हायला हवा होता त्या प्रमाणात मुळीच झालेला नाही. किंबहुना हा समाज “विचारमृत” झाला आहे कि काय अशी शंका येते. या औदासिंन्यातून समस्त ओबीसींनी बाहेर पडणे ही काळाची तातडीची गरज आहे.
ओबीसी विचारवंत व नेते यांना त्यांच्या व्यक्तिगत जातींत मर्यादित करून त्यांच्या सर्वव्यापी विचारांनाही संकुचित करण्याचे उद्योग ओबीसी समूहाच्या अंगलट आजवर आलेलेच आहेत. श्री. बालाजी शिंदे यांनाही त्याचा कटू अनुभव घ्यावा लागलेला आहे. असे अनेक नेते- विचारवंत असतील. असे होऊ देणे लज्जास्पद आहे.
बालाजी शिंदे यांनी अत्यंत तळमळीने व परखडपणे हे पुस्तक लिहिले आहे. त्याला अभ्यासाचा आणि अनुभवांचा भरभक्कम आधार आहे. अनेक अज्ञात बाबी या पुस्तकाच्या रूपाने समोर येत आहेत. त्याहीपेक्षा यातील सर्वहिताय विचार ओबीसीन्साठी प्रेरक आहे. परिवर्तनाच्या वाटेवरील प्रत्येक कार्यकर्त्याला दिशा देण्याचे सामर्थ्य या पुस्तकात आहे.
मी पुन्हा श्री. बालाजी शिंदे यांच्या प्रस्तुत पुस्तकाला शुभेच्छा देतो आनि त्यांचे
अभिनंदन
करतो.
-संजय सोनवणी

No comments:

Post a Comment

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...