Tuesday, June 29, 2021

अनिश्चिततेचे तत्व आणि ज्योतिषशास्त्र

 अनिश्चिततेचे तत्व आणि ज्योतिषशास्त्र


अनिश्चिततेचे तत्व जसे सूक्ष्मयामिकीला कवटाळून बसले आहे त्याहीपेक्षा जीवनाला त्याने जास्त ग्रासून टाकले आहे. म्हणजे अनिश्चिततेच्या हेलकाव्यांवर आपले जीवन झुलत असते. पुढच्या क्षणी काय होईल याचे भाकीत अगदी योजनाबद्ध कृती केली तरीही वर्तवता येणे अशक्य असते. मुळात जीही काही कृती केली ती जे परीणाम घडवते ती स्थितीच अनिश्चित आणि प्रति क्षणी बदलणारी असते त्यामुळे परिणामही वेगवेगळी रुपे घेतात आणि अपेक्षित रूपे मात्र कवेत येतच नाहीत. साकार होतच नाहीत. आणि काही वेळा कृतीचे अपेक्षित परिणाम दिसतात हे खरे असले तरी ते अपेक्षित परिणाम पुन्हा अनपेक्षित शक्यतांना जन्म देतात हेही आपल्या अनुभवाला येत असते. एकुणातच अनपेक्षितता आपले जीवन व्यापते. पण अनपेक्षिततेत अपेक्शितता आणायचा मानवी प्रयत्न असतो आणि कोणतीतरी शक्ती अपेक्षित असेच घडवू शकेल या अपेक्षेतून ईश्वरासकट ज्योतिष नावाचे भविष्य अशास्त्रसुद्धा डावाला लावले जाते. जेथे शास्त्रातच मुळात अनिश्चिततेचे तत्व राज्य करीत असताना, किंवा ती अनिश्चितता हीच निश्चितता आहे की नाही हेही सध्या तरी ठामपने सांगू शकत नसतांना ईश्वर किंवा भविष्य शास्त्र निश्चित आहे असे जे मानतात ते काही गंभीर चूक करतात असे म्हणणे भाग आहे.

अनिश्चितता सूक्ष्म स्तरावर जशी लागू पडते तशीच ती वैश्विक स्तरावरही लागू पडते. म्हणजे सूर्याचा उदयास्त निश्चित वेळेला होण्याचे भाकीत “वेळ” नावाच्या संकल्पनेत काही काळ (म्हणजे कदाचित कोट्यावधी वर्ष) खरे होऊ शकत असले तरी कोणत्या काळात आणि नेमके कधी आणि कशामुळे या वेळा बदलू शकतील याचे भाकीत करता येणार नाही. कारण मुळात ही भाकिते मर्यादित काळचौकटीच्या परिप्रेक्ष्यात केली गेलेली असतात. प्रकाशवेग हा स्थिर मानून सध्या वैश्विक गणिते मांडली जातात. पण तोही स्थिर नाही असे म्हणण्यासारखी स्थिती आहे. प्रबळ गुरुत्वाकार्षानाच्या स्थितीत त्याचा वेग अथवा दिशा बदलते. म्हणजेच त्या सापेक्षतेत त्या प्रकाशाचा काळ बदलतो. प्रकाशसापेक्ष काळ आणि मनुष्यसापेक्ष काळ हा सारखाच असेल असे म्हणणे अथवा मानने ही मानवी सापेक्षता झाली पण ते सत्य आहे असे म्हणावे अशी निरपेक्ष स्थिती मुळात अस्तित्वात नसते. म्हणजेच प्रकाशाचा वेग वेगवेगळ्या प्रबळ गुरुत्वक्षेत्रांतून जातांना बदलत असेल तर निश्चितता प्रकाशवेग या स्थिरांकाने गिळंकृत करते असे म्हणणे भाग आहे. म्हणजे सूक्ष्म स्तरावरच नव्हे तर व्यापक स्तरावरही अनिश्चितता हे तत्व अबाधित राहत असून विश्व हे एकच ठरलेल्या (पूर्वनिर्धारित? नियमांप्रमाणे चालते असे म्हणणे चुकीचे होऊन जाईल. एक गणित एका स्थितीत चालू शकते पण दुस-या स्थितीत ते बादही होऊ शकते हे विद्न्यानानेच आपल्याला शिकवले आहे.

विश्वाच्याच वर्तनाचे भाकीत जेंव्हा अशक्य आहे तेंव्हा मानवी जीवनाचे/वर्तनाचे भाकीत करता येईल असे जेंव्हा मानले जाते, असे शेंडा-बुडुख नसलेले विषयही अभ्यासक्रमात येऊ लागतात तेंव्हा मानवी युगाची वाटचाल ही पुन्हा आदिम अशास्त्रीय आणि अज्ञानी युगाकडे चालली आहे असे म्हणावे लागते.

याचा अर्थ हा नाही की आजचे विज्ञान “ज्ञानी” आहे. ते नाही. आणि म्हणूनच त्याची एक महत्ता आहे. काहीही झाले तरी ते आजच्या मानवाच्या प्रज्ञेचे उच्चांक गाठलेले टोक आहे. यात पुढेही भर पडेल. अनेक सिद्धांत बाद होतील. नवे सिद्धात येतील. पण ते अग्रगामी राहण्यासाठी. मागे जाण्यासाठी नव्हे. काळ सांत आहे की अनंत आणि दोन्ही स्थितीत कालाचे वर्तन आणि वास्तव काय असेल हे आपल्याला आज तरी माहित नाही. काही गृहीतके धरून सिद्धांतान केले जाते ते काही समस्या सोडवण्यासाठी. समग्र विश्वव्यवहारांचे गणित अद्याप गवसलेले नाही.

ज्योतिष शास्त्र हे अत्यंत मुर्खपणावर आधारीत अशास्त्र आहे. मुळात विश्वात सारे काही अनिश्चित आणि म्हणूनच अभविश्यीत असताना व्यक्तीचे अथवा घटनांचे भविष्य मर्यादित ग्रह-नक्षत्राधारित वर्तवने म्हणजे बिनबुडाच्या सिद्धांतावर ठोकताळे बांधत लोकांना मूर्ख बनवणे आहे. अवकाशातील प्रत्येक गोलातून/वस्तुतून निघणा-या गुरुत्वीय व विद्युत चुंबकीय लहरींचा प्रारनांचा परिणाम माणसावर (जीवसृष्टीवर) ढोबळमानाने होतच असतो यात वादाचा मुद्दा नाही. पण येथे असे कारक संदर्भव्यूह अक्षरश असंख्य आहेत. त्यांच्यापासून निघणा-या वेगवेगळ्या तरंगलांबीच्या आणि प्रकारच्या लहरीही एकमेकांशी कशा वर्तन करतात आणि नंतर काय परिणाम दाखवतात हे सध्या तरी गणिताला समजने अवघड आहे. त्या एकमेकांशी करणारे वर्तनाचे गणित आणि त्याचा एकुणातील परिणाम आणि त्याला प्रत्येक जीव देत असलेला प्रतिसाद आणि त्या आधारीत त्याचे वर्तन आणि त्या वर्तनातून दिसून येणारा अथवा होणारा परिणाम याचे गणित जोवर करता येत नाही आणि एका व्यक्तीच्या वर्तनामुळे इतरांवर होणारे असंख्य उपपरीनाम मोजता येत नाहीत, कारणमीमांसा करता येत नाही आणि आगावूच हे परिणाम वर्तवता येत नाहीत तोवर भविष्य शास्त्र हे सर्वस्वे त्याज्ज्य असले पाहिजे असे म्हणावे लागते. सध्याचे मर्यादित ग्रह, छद्म ग्रह (रांहुं-केतू) आणि भासमान नक्षत्रे या आधारावर त्यांचे कसले\ही भौतिक परिमाण माहित नसतांना केलेले चुकार गणित कोणतेही आनि कसलेही भविष्य वर्तवू शकत नाही.

अनिश्चिततेच्या तत्वाला उत्तर म्हणून ईश्वर शोधला गेला तो एक प्रकारे भयभीत जीवांचा आधार होता हे मान्य केले तरी तो फक्त मानसिक आधार होता...वास्तव नव्हते हे नीट लक्षात घेतले पाहिजे. मुळात जीवांचे काय कि सृष्टीचे काय, वर्तन मर्यादित काळाच्या परीप्रेक्शात काही प्रमाणात भविष्य वर्तवता येण्यासारखे असले तरी सूक्ष्मात जायला लागते तसे ते भविष्यही अनिश्चित होते हे प्रत्ययाला येते. ही सापेक्षतेची मर्यादाही आणि विशालताही. निरपेक्ष स्थितीत विश्वाचे आणि जीवामात्रांचे वर्तन कसे असेल हे शोधायला आपल्याकडे अजून कोणता सिद्धांत नाही. आणि त्या स्थितीत मुळात मानवाचे स्थान अथवा अस्तित्व काय असू शकेल काय हा वेगळा प्रश्न उपस्थित होईल.

असे म्हणूयात की तेही भाविष्य अज्ञात आहे. मग माणसांच्या भविष्याची मातब्बरी ती काय?

केवळ पोट भरण्याची संधी काहींना मिळावी यासाठी असे अभ्यासक्रम राबवण्यात येणार असतील तर मग या देशाचे भविष्य काय असेल?

(क्रमश:)

No comments:

Post a Comment

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...