Sunday, July 11, 2021

चाणक्याचे ऐतिहासिकत्व आणि कौटिल्याचा काळ



सम्राट चंद्रगुप्ताबाबतच्या माझ्या दिनांक २७ जूनच्या लेखात मी “चाणक्य” हे काल्पनिक पात्र होते. अर्थशास्त्र लिहिणारा कौटील्य उर्फ विष्णुगुप्त हा इसवी सनाच्या तिस-या शतकात झाला. काल्पनिक चाणक्य आणि कौटिल्य एक समजले जातात तसे ते नाहीत.” असे विधान केले. यावर मला अक्षरश: शेकडो फोन आले व वास्तव जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मराठी माणसातील ही जिज्ञासा आणि इतिहासात मान्य संकल्पनांपेक्षा वेगळे काही सापडले तर तेही स्वीकारण्याची प्रवृत्ती वाढत आहे ही एकंदरीत इतिहास लेखकांच्या दृष्टीने स्वागतार्ह बाब आहे. मी येथे चाणक्य खरेच ऐतिहासिक पात्र होता कि नव्हता आणि कौटिल्य व चाणक्य एक कसे नाहीत यावर अधिक प्रकाश टाकू इच्छितो.

सम्राट नंदाने दरबारात अपमान केल्याने चाणक्याने आपल्या शेंडीची गाठ सोडली आणि जोवर नंदाचा विनाश करणार नाही तोवर शेंडीला गाठ बांधणार नाही अशी प्रतिज्ञा त्याने केली आणि मग चंद्रगुप्त या सामान्य पण तेजस्वी युवकाला हाताशी धरून शेवटी नंदकुलाचा उच्छेद करून चंद्रगुप्ताचा स्वत: राज्याभिषेक केला या दंतकथेचा आपल्यावर खूप मोठा पगडा आहे. “अर्थशास्त्र” हा जगप्रसिद्ध ग्रंथही त्यानेच लिहिला असाही लोकांचा विश्वास आहे. “चाणक्य नीती” हा परवलीचा नुसता शब्दच बनला असे नाही तर चाणक्याच्या नावावर आजही सोशल मिडीयात असंख्य वेगवेगळ्या व्यक्तींचे विचार खपवण्यात येतात. एकूण दंतकथेचा नायक चाणक्याचा महिमा इतका वाढला आहे कि साम्राज्य उभारणारा चंद्रगुप्त पुरता झाकोळला गेला आहे.

पण वास्तव काय आहे? चंद्रगुप्तकालीन व जरा नंतरचेही सर्व ग्रीक इतिहासकार चंद्रगुप्ताचा अलेक्झांडरशी झालेला संघर्ष नोंदवतात पण त्याला घडवणा-या महान गुरुचे एकदाही नाव घेत नाहीत. शिवाय हा संघर्ष जेंव्हा झाला तेंव्हा बलाढ्य नंद राजा पाटलीपुत्र येथून राज्य करत होता. त्याचा विनाश झालेला नव्हता. आणि दंतकथेनुसार तर चाणक्याने चंद्रगुप्ताला हाताशी धरून प्रथम नंदाचा विनाश केला असे सांगितले जाते. या दंतकथेत ग्रीक अथवा त्यांच्याशी ऐतिहासिक संघर्षाचा काडीमात्र उल्लेख नाही. आणि आपण पाहिले आहे कि चंद्रगुप्ताचा पहिला संघर्ष इसपू ३२६ पासून अलेक्झांडरशी झाला आणि नंतर ग्रीक मागे फिरल्यावर इसपू ३२२ पासून नंदाशी युद्ध करून इसपू ३२१ मध्ये तो सत्तेवर आला.

मग यात शेंडीची गाठ आणि चंद्रगुप्ताला तयार करून नंदाचा विनाश कोठे बसतो? तथाकथित चाणक्याने नंदाच्या विनाशासाठी चंद्रगुप्ताला तयार केले होते! मग चंद्रगुप्ताने त्या पुर्वीच ग्रीकांशी जो संघर्ष केला तो कसा आणि कोणाच्या प्रेरणेने? चाणक्याबाबतच्या दंतकथांत तर ग्रीकांचा साधा उल्लेखही नाही. आणि समकालीन ग्रीकांच्या साधनात चाणक्याचाही उल्लेख नाही. याचा अर्थ शेंडीची गाठ आणि चाणक्य ही दंतकथा केवळ वैदिक श्रेष्ठच असतात हे दर्शवण्यासाठी निर्माण करण्यात आली.

आता आपण भारतीय साधनांकडे वळूयात. चाणक्याचा उल्लेख कोठे येतो? या दंतकथा कधी निर्माण झाल्या?  तर इसवी सनाच्या चवथ्या शतकानंतर लिहिल्या गेलेल्या “मुद्राराक्षस” या विशाखादत्ताच्या नाटकात सर्वप्रथम चाणक्य अवतरतो. शेंडीची गाठ ते चाणक्याचे कुटील राजनीतीचे पाठ व नंदाचा नाश या नाटकात येतात. यात ग्रीकांचा उल्लेख नाही. शिवाय एकही हिंदू पुराणात चाणक्याची कथा येत नाही हेही येथे लक्षणीय आहे. गुप्तांनी वैदिक धर्माला राजाश्रय दिला त्याच काळात हे नाटक लिहिले गेले हे येथे लक्षणीय आहे.

दुसरा उल्लेख येतो तो “महावंस टीका” या सरासरी सातव्या शतकातील बौद्ध साहित्यात. त्यात मुद्राराक्षसमधीलच दंतकथा जरा फेरबदल करून आलेली आहे. तिसरा उल्लेख मिळतो तो बाराव्या शतकातील जैन मुनी हेमचंद्र यांच्या “स्थविरावली चरित” या ग्रंथात. आणि अजून उल्लेख येतो तो अकराव्या शतकातील क्षेमेंद्रच्या “बृहत्कथामंजिरी” आणि सोमदेवाच्या कथासरीत्सागराच्या परिशिष्ट कथांत. मुद्राराक्षस हे नाटक असल्याने त्यातिल दंतकथा झपाट्याने पसरली असल्याचे हे निदर्शक आहे.

म्हणजे मुद्राराक्षस हे नाटक इ.स.चवथ्या शतकातील मानले तरी ते चंद्रगुप्त होऊन गेल्यावर किमान सातशे वर्षांनी लिहिलेले आहे. नाटकात मुळात इतिहास अपेक्षिता येत नाही. नाटककार आपल्या कल्पनेने इतिहासाचे एखादे बीज घेऊन त्यावर कल्पनांचे रंजक महाल उभे करत असतो. चाणक्य ही अशीच रंजक पण काल्पनिक व्यक्ती नाट्य खुलवण्यासाठी आणि वैदिक वर्चस्ववाद ठसवण्यासाठी निर्माण केली गेलेली.

 मग कौटिल्य कोण होता? महत्वाचा प्रश्न आहे हा. कौटिल्याचे अर्थशास्त्र (जे चाणक्याचे समजले जाते) या ग्रंथात “चाणक्य” असा एकही उल्लेखच नाही. लेखक म्हणून कौटिल्य तथा विष्णुगुप्त असे आपले नाव स्वत: लेखकानेच दिले आहे. मग हा ग्रंथ  चाणक्याचा आहे असे समजायला कोणता आधार आहे? खरे तर कोणताही नाही. अर्थशास्त्रातील अंतर्गत पुरावे हेच सांगतात. मुळात अर्थशास्त्रात एका काल्पनिक छोट्या राज्याचा आदर्श कारभार, कायदे, राजाच्या जबाबदा-या , मित्र-शत्रू बाबत बाळगायच्या सावधानता, कररचना ते विदेशनीती (जादुटोना ते तोडगे यासह) अनेक मुद्द्यांचा उहापोह या ग्रंथात आहे. तो तत्कालीन सामाजिक व राजकीय स्थितीवर प्रकाश टाकतो पण चंद्रगुप्त मौर्यकालाचे पुसटसेही दर्शन त्यात नाही.

चंद्रगुप्ताने साम्राज्य उभारले होते पण “साम्राज्य” ही संकल्पनाच अर्थशास्त्रात गायब आहे. ग्रीकादी परकीय आक्रमकांचाही उल्लेख नाही. चंद्रगुप्ताने पश्चिमोत्तर व पुर्वोत्तर भारतातील राज्ये व गणराज्ये आपल्या आधिपत्याखाली आणली होती. पण कौटिल्य मात्र सिंधू, कम्बोज, कुरु-पांचाल, वज्जी इत्यादी राज्ये व गणराज्यांचा स्वतंत्र म्हणून उल्लेख करतो. कौटिल्य मौर्य काळात झाला आता तर त्याने ही गंभीर चूक केली नसती. इसवी सनाच्या तिस-या शतकात मात्र ही राज्ये स्वतंत्र होती याचे पुरावे तत्कालीन त्या त्या राज्य-गणराज्यांच्या नाण्यांच्या उपलब्धतेमुळे मिळालेले आहेत. शिवाय श्री (लक्ष्मी) या देवतेच्या प्रतिमांचा उदय गुप्तकाळात झाला हे बव्हंशी विद्वानांनी मान्य केले आहे. वैदिकांत प्रतिमापूजा निषिद्ध होती. पण दुस-या शतकानंतर येथील लोकधर्म हिंदूंशी स्पर्धा करण्यासाठी लक्ष्मीच्या व विष्णूच्या प्रतिमा बनू लागल्या. गुप्तकाळात तर या प्रतिमांनी नाण्यांवरही स्थान मिळवले. कौटिल्य शिव, दुर्गा, कुबेर या अनेक हिंदू देवतांच्या मंदिराबरोबरच लक्ष्मीमंदिरांचाही उल्लेख करतो. (अर्थशास्त्र २.४.१७). मौर्यकाळात ही स्थिती नव्हती. आणि मुख्य बाब अशी कि कौटिल्य इतर मंदिरांसोबत कुलदेवता मंदिराचाही उल्लेख करतो. पहिली बाब अशी कि हिंदू धर्मात मूर्तीपूजा पुरातन असली तरी ती घरगुती होती आणि ग्रामदेवतांची व यक्षांची पूजा गावाबाहेर वृक्षाखाली उघड्यावर होत असे. मंदिर एखादुसरे क्वचित असे. पण इसपू पहिल्या शतकानंतरच विपुल प्रमाणात मंदिरे बांधली जावू लागली. अर्थशास्त्रांत नगरातील अनेक मंदिरांचे येणारे उल्लेख पाहता कसल्याही स्थितीत कौटिल्याचा काळ सनपूर्व चवथ्या शतकात जावू शकत नाही. थोडक्यात अर्थशास्त्राचे लेखन चंद्रगुप्ताच्या काळातील नाही. कौटिल्य मौर्यकाळातील नाही हे सिद्ध करणारे अर्थशास्त्रातच अजून अनेक पुरावे आहेत पण जागेअभावी ते येथे देत नाही.

 नाटकातील एक काल्पनिक वैदिक पात्र सत्य समजून त्याला शिरोधार्य मानत मुख्य जननायकाला कसे तुच्छ बनवायचे ही अलौकिक कला वैदिकांना साध्य आहे. जगात त्यांच्याशी याबाबत कोणी क्वचितच स्पर्धा करू शकेल. येथे वाचकांनी एकच लक्षात घ्यायचे आहे कि चाणक्य एक काल्पनिक पात्र होते. त्याला “आर्य” अये संबोधून वर्चस्ववादाचा एक हातखंडा प्रयोग केला गेला जो कमालीचा यशस्वी ठरला. कौटिल्य तथा विष्णूगुप्त हा अस्तित्वात होता पण तो इसवी सनाच्या तिस-या शतकात (म्हणजे चंद्रगुप्तानंतर सहाशे वर्षांनी) झाला. थोडक्यात चंद्रगुप्ताचा कोणीही वैदिक गुरु नव्हता हेच काय ते उपलब्ध पुराव्यांवरून दिसणारे सत्य आहे.

-संजय सोनवणी

 

6 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. म्हणजे महान राज्यकर्त्यांचा पराक्रम बाजूला सारून वैदिक गुरुचे उदात्तीकरण करण्याची परंपरा एवढी जुनी आहे तर

    ReplyDelete

Classical Language Status: Marathi

  Why the Marathi language should get Classical Language Status?   The Marathi language has been spoken in Maharashtra and adjoining reg...