Saturday, August 14, 2021

इतिहासाचे गुलाम होण्याचे नाकारण्यासाठी...

  


इतिहासाचे गुलाम होण्याचे नाकारण्यासाठी...

 

इतिहासाचे दृश्य आणि अदृश्य रूप आणि त्यातून निर्माण होणारे विचित्र ताण हा सर्वच जागतिक समाजासमोरील एक प्रश्न आहे. त्याची व्याप्ती प्रत्येक नागरिकाच्या मानसीकतेशी जावून भिडते आणि हीच मानसिकता वर्तमान आणि भविष्यातील समाजजीवन आणि स्वाभाविकपणेच त्या त्या राष्ट्राचे भविष्य सुनिश्चित करत असल्याने तर इतिहास हा तसा निरुपद्रवी वाटणारा घटक अण्वस्त्रांच्या विस्फोटांपेक्षा गंभीर रूप धारण करत असतो. इतिहासाला कलाटणी मिळण्याचे अनेक प्रसंग त्या त्या राष्ट्रांच्या अथवा समाजांच्या इतिहासातूनच निर्माण होत असतात. आज मनाला सुखद अभिमानास्पद संवेदना देणारा इतिहास वर्तमान सुसह्य करत असला तरी इतिहास हा आपल्याला शिकवला गेला त्यापेक्षा विपरीत होता हे सत्य सामोरे येते तेंव्हा जी समाजमानसिक पडझड होते ती अन्य कोणत्याही विनाशक गोष्टींपेक्षा भयंकर असते. थोडक्यात इतिहास हा अत्यंत काळजीपूर्वक हाताळण्याची आणि समजावून घेण्याची बाब आहे.

 

भारत स्वतंत्र होऊन आता सात दशके उलटून गेली असली तरी भारताचा “इतिहास” लिहिला गेलेला आहे असे दुर्दैवाने म्हणता येत नाही. आपला बहुतेक इतिहास मिथके, दंतकथा आणि आत्मप्रौढी किंवा न्युनगंडात्मक आणि बचावात्मक पद्धतीने लिहिला गेला असल्याने आपल्या इतिहासाचे सर्वांगीण तथ्यात्मक दर्शन घडेल आणि त्याच पद्धतीने आकलन करून घेतले जाईल अशी स्थिती नाही. आपला अगदी मध्ययुगीन इतिहाससुद्धा सत्याचे केवळ धूसर दर्शन घडवतो तर मग प्राचीन इतिहासाची बाब वेगळी. मिथकांना काटेकोरपने वगळत अथवा त्यांची नि:पक्ष चिकित्सा करत तटस्थ इतिहास मांडायची आपल्या इतिहासकारांना मुळात सवयच नाही. दरबारी भाटांनी लिहिलेल्या प्रशस्ती, त्यातील अतिशयोक्ती किंवा पुराणामधील पक्षपाती वर्णने हीच आपल्या इतिहासाचे मुख्य साधने मानले गेली आहेत. उत्खानीत इतिहासाची आकलने इतिहासकार कोणत्या स्कूलचा आहे त्यावर अवलंबून असल्याने राजकीय अथवा धार्मिक अहंभावातून केली जाणारी आकलने खरे तर इतिहासाचा भाग बनू शकत नसली तरी आपले हे दुर्दैव आहे कि नेमकी तीच पक्षपाती आकलने आमच्या इतिहासाचा भाग बनतात. लबाड्या-खोटेपणा हा दुर्गुनही अनेक इतिहासकारांनी दाखवला आहे हे वेगळेच. त्यामुळे भारतीय इतिहासाची अपरंपार हानी झालेली आहे.

शिवाय आपला जोही काही इतिहास लिहिला गेलेला आहे तो प्रामुख्याने राजकिय (राजा-महाराजांचा) आणि धार्मिक (आणि तोही एकांगी) स्वरूपाचा आहे. यात सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक इतिहास वगळला गेलेला असल्याचे अथवा दुर्लक्षित ठेवल्याचे आपल्या लक्षात येईल. भारतातील असंख्य समाजघटक इतिहास-दुर्लक्षित ठेवले गेले असल्याने आता प्रत्येक समाज आपापला इतिहास लिहित आपापली पाळेमुळे शोधण्याच्या प्रयत्नांना लागलेले आहेत. याचे कारण म्हणजे त्यांचा इतिहास समग्रपणे आणि प्रामाणिकपने जातीय अथवा धार्मिक भेदाभेद न करता लिहिला पाहिजे हेच आजवर भारतीय इतिहासकारांना उमगलेले नाही. त्यामुळे झालेय असे कि ज्या ज्या जाती आपापला इतिहास शोधतात तोही अहंभाव आणि उदात्तीकरण आणि जमेल तेवढा खोटेपणा करत असल्याने त्यांचे प्रयत्नही इतिहासाचे अवमूल्यन करत जातात.

वैदिक धर्मीय इतिहासकार आजही आपली पाळेमुळे शोधत आहेत. वैदिक आर्य हे मुळचे आर्क्टिक प्रदेशातील या प्रतीपादनापासून वैदिक आर्य हे भारतातीलच हरीयानातील अशी वाटचाल करत सिंधू संस्कृतीचे निर्माते वैदिक आर्यच होते हे ठसवण्यासाठी इतिहासाचे पुनर्लेखन केले जात आहे. त्यासाठी अगदी जनुकीय शास्त्राचे निर्वाळेही धुडकावून लावत शास्त्राचाही दुरुपयोग केला जात आहे. म्हणजे वैदिक संघवादी इतिहास लेखनाचा हेतू शुद्ध नाही हे उघड आहे. त्यातून सत्य इतिहासाचे दर्शन घडणे शक्य नाही. त्याच वेळी दाक्षिणात्य इतिहासकार “सिंधू संस्कृतीचे निर्माते द्रविडच आणि आक्रमक आर्यांमुळे त्यांचे विस्थापन दक्षिणेत झाले.” असे प्रतिपादन हिरीरीने तर करतातच पण सिंधू मुद्रांमध्ये प्राचीन तमिळ भाषा शोधात असतात. थोडक्यात द्रविड अस्मितेला पाठींबा देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. इतिहास येथेही असत्याच्या दलदलीत अडकतो. दक्षिण आणि उत्तर भारत यातील सांस्कृतिक संघर्षाची कारणे इतिहासात दडली आहेत ते अशी.

हे झाले उत्खनीत इतिहासाचे. लिखित इतिहासाचे कमी धिंडवडे निघालेले नाहीत. चाणक्यासारखे काल्पनिक पात्र “ब्राह्मण” असल्याचे आमच्या इतिहासकारांना माहित असते पण अखिल भारताला एका सूत्रात बांधणारा चंद्रगुप्त, जो इतिहासात खरेच होऊन गेला, त्याच्या पाळामुळाबद्दल मात्र घोर अज्ञान असते. मग जो तो इतिहासकार आपापल्या सोयीने त्याला आपापल्या जातींशी जोडून घेण्याचा प्रयत्न करत असतो. वैदिक इतिहासकारांचा सर्वस्वी भर असतो तो प्रत्येक काळात सर्व समाज वैदिक स्मृत्यांनुसार आचरण करत होता हे सांगण्याचा मग प्रत्यक्षातील समाजजीवन कितीही विपरीत का असेना. म्हणजे वैदिक प्रभुसत्ता प्रत्येक काळात होती हे अनैतिहासिक विधान वारंवार सांगत तीच काल्पनिक का होईना प्रभुसत्ता आजही निर्माण करण्याचा प्रयत्न होतो. हिंदुंचा (ज्यांना वैदिक धर्मी शुद्र म्हणतात ते) इतिहास तर आजही दुर्लक्षित आहे. मग मुस्लीम आक्रमनांचा इतिहास लिहितांना वैदिकवादी इतिहासकारांच्या कल्पनाशक्तीला उधान येत असल्यास आश्चर्य नाही. कम्युनिस्ट इतिहासकार आणि बहुजनवादी म्हणवणारे इतिहासकारही याच प्रवृत्तीचे बळी असल्याने एकाच इतिहास परस्परविरोधी पद्धतीने समोर येतो आणि सामान्य लोक मात्र गोंधळून जातात हे आपले “इतिहास वास्तव” असावे ही काळजी करण्याची बाब आहे.

आपण जेंव्हा राष्ट्र म्हणतो तेंव्हा राष्ट्राचे अविभाज्य असणारे काश्मीर, उत्तर-पूर्वेतील राज्ये यांचाही समग्र इतिहास असावा आणि तो राष्ट्रभावना वाढण्यासाठी आणि एकमेकांना समजावून घेण्यासाठी देशभर पसरवावा ही भावना तर नाहीच. तसे व्यापक प्रयत्नही नाहीत. त्याचे राष्ट्र-सामाजिक दुष्परिणाम आपल्या डोळ्यांसमोर आहेत. 

भारतातील सामाजिक संघर्षांचे मुळ कारण इतिहासच आहे. आपल्याला फार शौर्याचा इतिहास आहे असे अज्ञानाने मानणारे समाज आणि आपल्याला इतिहासात कसलेही स्थानच नव्हते की काय असे आक्रोशत विचारणारा बहुसंख्य समाज यातील संघर्ष कोणत्या ना कोणत्या रूपाने व्यक्त होत सामाजिक विभाजनाला हातभार लावत जातो हे वास्तव एक विदारक चित्र उभे करते. खरे तर इतिहास नाही असा कोणताही समाज नाही. सर्वांचाच इतिहास सतत उज्वल असेल असेही नाही. उतार-चढाव येतच असतात. पण अवनतीचे दर्शन कोणाला नको असते. खोटी असली तरी अस्मिता मात्र हवी असते. अस्मितांच्या दलदलीत देश रुतला आहे. तो कसा त्यातून बाहेर निघेल आणि वास्तव इतिहास, तोही समग्रपणे कसा लिहिला जाईल आणि लोकांनाही तो तसाच इतिहाससाक्षर होत वाचायची सवय लावली जाईल यासाठी व्यापक प्रयत्नांची गरज आहे.

भारतात इतिहास अनेकदा सामाजिक संघर्षाचे, वादांचे आणि कधी हिंसेचे विषय बनला आहे. वर्चस्ववाद, श्रेष्ठतावाद आणि तो गाजवण्यासाठी प्रसंगी खोटारडेपणा करत कोणा समाज अथवा ऐतिहासिक मानकांची बदनामी केल्याच्या असंख्य घटना भारतात प्रत्यही होत असतात. इतिहास हा कलह निर्माण करण्यासाठी नसतो तर आपले गतकाळाचे वास्तव (मग ते जेही काही असेल) स्वीकारत आणि समजावून घेत भविष्याची दिशा ठरवण्यासाठी असतो. इतिहासाचे गुलाम होणे नाकारत इतिहासाला आम्ही भविष्याकडे जाण्याचा राजमार्ग बनवण्यासाठी काय करू शकतो याचा विचार आम्ही स्वातंत्र्य दिनी तरी केलाच पाहिजे!

-संजय सोनवणी

No comments:

Post a Comment

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...