Tuesday, August 31, 2021

अफगाणिस्तान- रक्तरंजित इतिहासच ज्याचे वर्तमान झाला आहे!


 

अफगाणिस्तान प्राचीन इराण व नंतर अनेक पर्शियन साम्राज्यांचा भाग होते. हिंदुकुश पर्वतराजीने वेढलेला हा प्रदेश दक्षिण आशियाचे प्रवेशद्वार म्हणून परिचित होता.  भारतीय उपखंडात पुरातन काळापासून याच भूभागामार्गे असंख्य मानवी स्थालांतरे जशी झाली तसेच येथूनच विस्थापनेही झाली. अफगानिस्तानच्या दक्षिणपूर्व भागावर गांधार, कंबोज या सत्तांनी राज्य तर गाजवलेच काबुल व झाबुल येथून सुरुवातीला हिंदू शाह्या तर नंतर बुद्धिस्ट शाह्यांनी अनेक शतके सत्ता गाजवल्या. ज्ञात इतिहासात सर्वप्रथम चंद्रगुप्त मौर्याने बल्खपर्यंत मौर्य साम्राज्याच्या सीमा भिडवल्या तर सम्राट अशोकाने तेथे सत्ता अबाधित ठेवत बौद्ध धर्मही पसरवला. नंतरच्या काळात आठव्या शतकातील काश्मीरचा सम्राट ललीतादित्याने भारताच्या पश्चीमोतर भारतात बस्तान बसवू पाहणा-या अरबांना हाकलून तर लावलेच पण त्यांचा पाठलाग करत काबुलीस्तान व झाबुलीस्तानच्या शाही सत्तांना मांडलिक करत तुर्कस्थानही अरबांच्या तावडीतून सोडवले व आपली सत्ता कायम केली. गीलगीट-बाल्टीस्तान हे प्रदेश काश्मीरला जोडत त्याने मध्य व पश्चिम आशियाच्या संस्कृतिशी काश्मिरी संस्कृतीची नाळ जोडली. नंतर अकबराच्या काळात अफगानिस्तानचा मोठा भूभाग एक सुभा म्हणून भारताशी जोडला गेला.

भारताने जशी या मार्गाने पश्चिम आशियावर आक्रमणे केली तशीच तिकडूनही अनेक आक्रमणे भारतावर झाली. ग्रीक, शक, हूण, कुशाण, मोगल ही आक्रमणे त्यातल्या त्यात प्रमुख म्हणता येतील. या मार्गाने भारतात तीन धर्मही आले. पहिला धर्म म्हणजे दक्षिण अफगाणिस्तानात स्थापन झालेला वैदिक धर्म. सनपूर्व १२०० च्या सुमारास शरणार्थी वैदिक धर्मियांनी भारतात आश्रय घेतला व नंतर काही प्रमाणात येथे त्यांचा धर्म पसरवला अशी मान्यता आहे. नंतर पारशी धर्मियान्नाही भारतात आश्रय घ्यावा लागला. त्यानंतर या मार्गाने तुर्क-मोगलांच्या माध्यमातून आलेला इस्लाम. मुघल सत्ता भारतात प्रदीर्घ काळ टिकली. 

अफगाणिस्तानचा पुरा-इतिहास प्राचीन असून तो किमान सनपूर्व ३००० वर्ष एवढा मागे जातो. सिंधू संस्कृतीचा विस्तार अफगानिस्तानच्या दक्षिण-पूर्व सीमांपर्यंत भिडलेला तर होताच पण अफगाणी संस्कृतीवर तिचा प्रभाव होता. ऋग्वेदात आणि अवेस्त्यात तत्कालीन अफगानिस्तानचा भूगोल मिळतो. हरोयू (शरयू), हरेवेती (सरस्वती) गोमल (गुमल), काबुल इत्यादी नद्यांकाठी अफगानिस्तानाची पुरातन संस्कृती बहरली. तेथेल पर्जन्यमान कमी असले तरी पर्वतशिखरांवरून वितळना-या बर्फामुळे नद्या भरून वाहतात. पण कृषीसंस्कृती हा अफगानिस्तानाचा मुल आत्मा कधीच नव्हता. पशुपालन हाच मुख्य व्यवसाय होता.

पश्चिम व मध्य आशिया पुरातन काळापासून असंख्य टोळ्यांनी व्यापलेला आहे. या टोळ्या आपापसात रक्तरंजित युद्धे तर करताच पण अगदी चीन ते बल्खसारख्या नागरी वस्त्या असलेल्या भागांवर हल्ले करत लुटालूट करत असत. चीनची जगप्रसिद्ध भिंत मध्य आशियातील मंगोल व तुर्की टोळ्यांचा अटकाव करण्यासाठीच उभारली गेली होती. मध्य आशियातून जाणारे व्यापारी मार्ग अफगानिस्तानच्या बल्ख शहराच्याच मार्गे पुढे मध्यपूर्व ते इजिप्तपर्यंत जात. भारताचा प्रसिद्ध व्यापारी मार्गही खैबर खिंडीतून जात बल्खला जावून भिडे. भारताचा व्यापार सिंधूकाळापासून एवढा मोठा होता कि सिंधू संस्कृतीच्या लोकांनी ऑक्सस नदीच्या खो-यात शोर्तुगाई येथे तर कंदाहार प्रांतात मुदिगाक येथे आपल्या व्यापारी वसाहती स्थापन केल्या होत्या. अफगाणिस्तानातील लापिझ लाझुली सारख्या मूल्यवान स्फटीकांची आयात करून त्यांच्यापासून अलंकार तयार करून निर्यात केले जात.  पूर्व आणि पश्चीमेशी व्यापार सुलभरीत्या होऊ शकायचा तो अफगाणिस्तानच्या वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक स्थानामुळे.

खरे तर अफगाणिस्तान हे जागतिक संस्कृतींचे पुरातन काळापासुनचे एक मिलनस्थळ. त्यामुळे येथील संस्कृती अधिक प्रगल्भ आणि उदारमतवादी व्हायला हवी होती. आज तुर्कस्थान व अफगाणिस्तानात बी.एम.ए.सी. (Bactria-Margiarna Archaeological Complex) अथवा ऑक्सस संस्कृती या नावाने ओळखल्या जाणा-या संस्कृतीतील सनपूर्व २२०० ते सनपूर्व १७०० या काळातील अवशेषांत तत्कालीन समृद्धीचे दर्शन घडते. पण तो सहिष्णू वारसा पुढे टिकून राहिलेला दिसत नाही. अफगाणिस्तानात असंख्य टोळ्या वावरू लागल्या व हिंसकतेचे दर्शन घडवू लागल्या. त्याचे दर्शन आपल्याला सनपूर्व १५०० ते सनपूर्व १२०० या काळात रचल्या गेलेल्या ऋग्वेद आणि अवेस्त्यात घडते.

ऋग्वेदात व अवेस्त्यात अशा किमान ४० टोळ्या उल्लेखल्या गेलेल्या आहेत आणि त्यांच्यात वारंवार होणारी युद्धे हा तर ऋग्वेदाच्या कथनाचा आत्माच आहे असे म्हणता येईल. तुर्वसा (तुर्क), पर्शु (पर्शियन), पख्त (पख्तून-पठान), भलानस (बलुची) अशा काही टोळ्या आजही अस्तित्वात आहेत. या टोळ्या आपापसात युद्धे तर करतच पण एकमेकांची नगरेही उध्वस्त करत याचीही वर्णने ऋग्वेदात आहेत. पारशी धर्माचा संस्थापक झरथुस्त्राची हत्या तुरीया (तुर्क) टोळीच्या हेयोना वंशीयांनी केली असे पारशी धर्माचा इतिहास सांगतो.  थोडक्यात सुरुवातीला प्रगल्भतेकडे वाटचाल करू लागलेली ही संस्कृती टोळीयुद्धांनी रक्ताने माखून गेली असे म्हणावे लागते. पुढे कुशाण, इराणी सस्सनियन साम्राज्यानेही अफगानिस्तानावर कब्जा मिळवला असला तरी अंतर्गत संघर्ष कोणीही थांबवू शकले नाही. हा प्रांत एक राज्य मानून उदयाला आला ते मोहम्मदशहा अब्दालीमुळे. हा तोच अब्दाली ज्याच्याशी मराठ्यांचे पानिपत येथे युद्ध झाले. इंग्रजांनाही अफगाणिस्तानवर स्वामित्व मिळवण्यात अपयश आले. टोळ्यांची मानसिकता त्यांच्या शुष्क पर्यावरणाने हिंसक व टोकदार बनवलेली आहे. तेथील प्रत्येक टोळी हे एक स्वतंत्र राष्ट्र आहे असे म्हटले तरी चालू शकेल असे तेथील टोळ्या-टोळ्यांतच नव्हे तर उप-टोळ्यांतही अस्मितांचे टोकदार संघर्ष आहेत. धर्म हे त्यांचे आज एक हत्यार बनले असले तरी जेंव्हा इस्लाम नव्हता, सारे आपापले टोळीधर्मच पाळत होते तेंव्हाही हीच स्थिती होती. शांततेचे अल्प काळ इतिहासात येवून गेले असले तरी त्यात स्थायीभाव कधीच राहू शकला नाही हे एक वास्तव आहे. स्त्रीयांना दुय्यम स्थान, हिंसेचे अतिरेकी आकर्षण, जीवनाकडे बेपर्वाईने पहायची वृत्ती व क्रौर्य ही टोळीजीवनाची अंगभूत वैशिष्ट्ये आहेत. मुईलात इस्लामची स्थापनाही अनेक टोळ्यांनी गजबजलेल्या अरबस्तानात झाली. टोळीजीवनाची मुलभूत तत्वे कुराणमध्येही सामाविष्ट झाल्याचे आपल्याला पहायला मिळते ते यामुळेच. त्यामुळे इस्लामी मुलतत्ववाद हा अफगाणी टोळ्यांना प्रिय वाटणे स्वाभाविक आहे. तालिबान हे त्याचेच अपत्य आहे. सत्ताबदल होताच सर्वप्रथम स्त्रियांवर जी अमानवी बंधने लादण्यात आली त्याचे कारण हे मुळच्याच स्त्रीविरोधी मानसिकतेत आहे.

मानवी समाजमानसिकता हे त्या त्या प्रदेशातील भूगर्भशास्त्र आणि पर्यावरण ठरवते. यावर मात करत विकासवादी, उदारमतवादी, सहिष्णू आणि मानवतेला श्रेष्ठ मूल्य मानणारी मानसिकता निर्माण करणे हे अशा स्थितीत एक आव्हान बनून जाते. केवळ आधुनिक शिक्षणच या मानसिकतेतून बाहेर पडायला मदत करू शकते. पण टोळीवादी तालिबान हे घडू देणार नाही हे उघड आहे. खरे तर तालिबानचा अर्थ आहे ‘विद्यार्थी’ आणि या विद्यार्त्यांनी केवळ हिंसेचे पाठ गिरवावेत आणि पुरातन इतिहासाचेच पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती करावी हे अखिल मानवजातीच्या दृष्टीने दुर्दैव आहे. जागतिक मानवी समुदाय यावर काही सकारात्मक तोडगा काढेल अशी आपण आशा बाळगुयात!

-संजय सोनवणी

 

No comments:

Post a Comment

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...