ओडीसी
-संजय क्षीरसागर
काल रात्री संजय सोनवणी यांची ' ओडीसी ' हि कादंबरी वाचली. ' ओडीसी '. ग्रीक इतिहासावर आधारित या कादंबरीतील पात्रं, त्यांची पार्श्वभूमी सारं काही अपरिचित ! तरीही हि कादंबरी आपली वाटणारी ! यातील मनुष्य स्वभाव, संवाद, तत्वज्ञान सारं काही इथलचं. या मातीतलंच वाटणारं. जणू काही रोजच्या आयुष्यात अनुभवला येणारं !
या कादंबरीचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे यातील सात प्रमुख व्यक्तिरेखा या कमालीच्या परस्पर विरुद्ध असून एका पात्राचा दुसऱ्या पात्रावर अजिबात प्रभाव नाही. पात्र निर्मिती मधील हि विविधतता क्वचित अनुभवास येते. तसेच या सात पात्रांपैकी ६ पात्रं म्हणजे मानवी विकारवश मनाचे पुतळे आहेत. मनात उद्भवणाऱ्या विकारांच्या आहारी जाऊन मनुष्य एखादे कृत्य करून बसतो व परत आपल्या कृतीचे जोरदार समर्थन --- तेही उदात्त भावनेने प्रेरित होऊन केलेलं कृत्य --- असं करतो याचे हे उत्तम चित्रण आहे. सातवी व्यक्तिरेखा हि तत्ववेत्त्याची असून स्थितप्रज्ञ मनुष्यच असतो हे दर्शवणारी आहे.
कादंबरीचा मुख्य नायक आहे ओडीसियस. ओडीसियस हा देखील एक मनुष्यच आहे. तो पण विकारवश होतो. चुका करतो. परंतु, त्यातून धडाही शिकतो. प्रसंगी नियतीवर मात करण्याचं धाडस दाखवतो. माझ्या मते, ओडीसियस म्हणजे मनुष्य जातीच्या विकासाचं प्रतिक आहे. हजारो वर्षे अनेक संकटांना तोंड देत आपली प्रगती साधत आलेल्या मनुष्य जातीचं प्रतिक म्हणजे ओडीसियस ! परंतु, निव्वळ एवढ्याच मर्यादेत ' ओडीसियस ' ला बसवता येत नाही. हेच तर कादंबरीकाराच मुख्य वैशिष्ट्य आहे कि, फक्त ओडीसियसच नव्हे तर यातील सातही पात्रं ठराविक अशा कोणत्याही साच्यात न बसवता येणारी आहेत. हि माणसं मनुष्य स्वभावाचं प्रतिनिधित्व करतात. कधी विकारांच्या अधीन होतात तर कधी निर्मोही बनत तत्ववेत्त्याचे रूप धारण करतात. जणू काही कादंबरीकाराचं मानसिक द्वंद्व या पात्रांच्या रूपाने आपल्या समोर येते.
मानसिक द्वंद्व यासाठी कि, हि पात्रं शब्दबद्ध करताना लेखक या ७ ही व्यक्तिरेखा जगला आहे. या पात्रांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यांचे बव्हंशी संवाद काव्यमय भाषेत आहेत. काव्यमय भाषेत ७ विविध व्यक्तिरेखांचे स्वभाव रेखाटने, संवाद लिहिणे हे कार्य ३० वर्षांचा तरुण करतोय हे माझ्यासाठी अविश्वसनीय आहे. एक लेखक म्हणून व एक वाचक म्हणून पण !
कादंबरीच्या प्रथम आवृत्तीचे मी वर्ष पाहिले तर ते १९९४ असून लेखकाचे जन्मवर्ष १९६४ आहे. म्हणजे या कादंबरीचे लेखन सोनवणीने वयाच्या २९ - ३० व्या वर्षी केले. माझ्या समवयस्क या तरुण लेखकाच्या कलाकृतीकडे एक लेखक म्हणून मी पाहतो तेव्हा प्रथम ईर्षेचा भाव मनात जागुत होतो व नंतर कौतुकाचा ! ईर्ष्या इतक्यासाठी कि, याच वयात मी हे असं का लिहू शकत नाही ? माझ्या लेखणीत, शब्दभांडारात एवढं सामर्थ्यं का नाही ? तर कौतुक यासाठी कि, तिशीच्या आतील व्यक्ती अवघ्या सव्वाशे पानांत कादंबरीमय पण काव्यमय भाषेत तत्वज्ञान लिहिते आणि वाचकांच्या गळी उतरवण्यात, त्यांना अंतर्मुख करण्यात यशस्वी होते.
No comments:
Post a Comment