Saturday, October 9, 2021

सांस्कृतिक अपहरण?

 

भारतीय साधनसंपत्ती परिषदेत मी म्हणालो होतो कि...
"आपल्या विचारांच्या टोळक्यात सर्वमतान्वये अनुकूल तेच ते विचार मांडत टाळ्या घेत पाठ थोपटून घेण्यापेक्षा ज्यांच्या विरोधात तुमचे विचार आहेत त्यांच्यासमोर जाऊन बोला. तुम्ही शहाणे आणि खरे असाल तर समोरच्यांपैकी किमान दोन लोक तरी तुमचे विचार समजावून घेतील. दोनाचे चार आणि चाराचे आठ व्हायची प्रक्रिया त्यातुनच सुरु होईल. समतेचे विचार ख-या समतावादी आचरणातुनच जातात. विचार हे सर्वांसाठीच असतात. तुमचे विचार पक्के असतील तर कोणाहीपुढे कधीही तुमचे विचार मांडता आले पाहिजेत. सत्याचा तोच महिमा आहे. कोणी संस्कृतीचे अपहरण केले असे आपण म्हणतो तेंव्हा फक्त आरोप करुन चालत नाही तर पुराव्यानिशी तसे सिद्ध करावे लागते. आमचा सांस्कृतिक अभ्यासच मुळात नगण्य आहे....मग नुसते आरोप करुन आमची संस्कृती काय होती आणि अशी का झाली हे कसे समजणार? आम्हाला अभ्यास नको आहे. आम्हीच जातीयवादी आहोत, वक्त्यांच्या जाती व माझा प्रवर्ग सांगितला जातो आहे....आणि आम्ही जाती नष्ट करायची स्वप्न पाहतोय. हा विरोधाभास आम्हाला समजावून घ्यावा लागेल. जाती नष्ट करायच्या नसतील तर नका करु...किमान जातींतील समता तरी आधी आणाल? पण आम्हाला तेही करायचे नाही. मग आम्ही समतावादी आहोत हे म्हणायचा आम्हाला काय अधिकार? बुद्ध, बाबासाहेब, फुले, शाहुंना अभिवादन करायचा काय अधिकार? आम्ही गेल्या वर्षी हीच अभिवादने करतांना जिथे होतो तिथेच आजही आहोत आणि पुढच्या वर्षीही तिथेच राहणार असू तर आम्ही पुरोगामी कसे?
"संस्कृतीची अपहरणे झाली आहेत. पुरातन वारसा नाकारायच्या नादात आम्हीच आमचेच व्यास-वाल्मिकी ते कालिदास नाकारत गेलो आहोत. आम्ही सारेच नाकारायच्या नादात आम्हाला संस्कृतीच नव्हती हेच उरबडवेपण करून सांगत आहोत. पण सिंधू संस्कृती आज समजते ती तत्कालीन कुंभारांच्या मृद्भांड्यामुळे, शेतक-यांच्या शेती करण्याच्या पद्धतीमुळे, गवंड्यांच्या शिस्तबद्ध बांधकामांमुळे, मुर्तीकारांच्या रचनांमुळे आणि अलंकार बनवणा-या कारागिरांच्या कुशल कारागिरीमुळे. आम्हाला ही संस्कृती समजते ती देशोदेशी व्यापार करणा-या तत्कालीन साहसी, दर्यावर्दी व्यापा-यांमुळे आणि त्यांना लागणारी शिडाची भव्य जहाजे बनवणा-या सुतारांमुळे. वैदिकांचे साहित्य आम्हाला आमचा इतिहास सांगत नाही. वैदिक साहित्यात आमचा इतिहास शोधणे मुर्खपणाचे आहे. आमचा इतिहास प्रत्यक्ष पुराव्यांनी सामोरा आहे....शाब्दिक नाही...आणि प्रत्यक्ष जे असते तीच संस्कृती असते....लेखनात चो-या, प्रक्षेप होऊ शकतात....प्रत्यक्ष वास्तवदर्शी वस्तुंत नाही. आमचा इतिहास निर्माणकर्त्यांचा आहे...लेखनिकांचा नाही हे आपण समजावून घेतले पाहिजे.
"सांस्कृतिक अपहरण झाले आहे हे खरे मानले तरी आमचे काय होते हे शोधायची आमची तयारी नाही. किंबहुना सारे काही नाकारायचेच ठरवले असेल तर मग आज आम्हाला आमची संस्कृतीच नाही हेही मान्य करावे लागेल. बरे, तेही ठीक आहे असे समजू. पण मग आम्ही नवी संस्कृती घडवायला तरी तयार आहोत काय? नाही. संस्कृती ही अर्थकारण, सत्ताकारण आणि त्याहीपेक्षा मोठे म्हणजे ज्ञानकारण यातून साकार होते. अर्थकारण म्हणावे तर आमचा डोळा गेला बाजार नोक-यांवर. सत्ताकारण म्हणावे तर ते आजही भिकेच्या तुकड्यांवर. आणि ज्ञानकारण....ते तर आम्हाला आजही दुरचे स्वप्न झाले आहे. त्याच्या अभावात संस्कृतीचे पुनर्रचना अशक्य आहे, याचे भान आम्हाला जर येत नसेल तर आमचे कसे होणार यावर आम्हीच नीट विचार केला पाहिजे."

No comments:

Post a Comment

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...