Saturday, October 2, 2021

देशाला वैभवाच्या शिखरावर नेणारा प्राचीन वस्त्रोद्योग!

 


आदिम काळी, जेंव्हा मनुष्य शिकारी मानव होता, तेंव्हा शिकार केलेल्या प्राण्यांचे चर्म वा झाडांच्या साली (वल्कले) गुंडाळुन प्रतिकुल हवामानाला तोंड देत होता. हळु हळु तो काही प्राण्यांना माणसाळुन पाळुही लागला. शिकारी मानव पशुपालक मानव बनला हा मानवी जीवनशैलीच्या बदलाचा एक महत्वाचा टप्पा आहे. मनुष्य अद्याप भटकाच होता. चरावु कुरणांच्या शोधात त्याला सतत भटकावेच लागे. सरासरी २० हजार वर्षांपुर्वीच मानवाला सर्वप्रथम लोकर व वनस्पतीजन्य धाग्यांपासुन वस्त्रे बनवण्याची कल्पना सुचली असावी. पक्षांची घरटी, कोळ्यांची जाळी यांच्या सुक्ष्म निरिक्षणातुन आपणही कृत्रीमपणे नैसर्गिक धाग्यांपासुन वस्त्र बनवू शकतो ती ही अभिनव संकल्पना. कल्पना सुचुन ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्याला जे सायास पडले असतील...त्यासाठी जी कृत्रीम साधने बनवायला जी प्रतिभा वापरावी लागली असेल तिची आपण फक्त कल्पनाच करु शकतो. हजारो प्रयत्न वाया गेल्यानंतरच त्याला वस्त्रनिर्मिती जमली असनार. त्यासाठीचा त्याचा पराकोटीचा संयम आदर वाटावा असाच आहे.


 भारतात अकरा हजार वर्ष जुन्या वस्त्रांच्या अस्तित्वाचे पुरावे मिळालेत तर सिंधु संस्कृतीतही हडप्पा व लोथल येथेही रंगवलेल्या सुती वस्त्रांचे अवशेष मिळालेले आहेत. एवढेच नव्हे तर सुत कातण्याच्या चरख्याचे व चात्यांचेही अवशेष मिळालेले आहेत. तेथेच सापडलेल्या मानवी प्रतिमांनी बेलबुट्टीदार तलम वस्त्रे नेसलेली आपल्याला पहायला मिळतात. म्हणजेच भारतात कापसापासुन वस्त्रे बनवण्याची कला दहा-बारा हजार वर्षांपुर्वीपासुनच विकसीत होवू लागली होती असे म्हणता येते. धागे (मग ते लोकरीचे का असेनात.) पिंजणे, कातने ते धाग्यांची शिस्तबद्ध उभी रचना करत मग आडवे धागे अत्यंत कौशल्याने गुंफत नेत वस्त्र बनवणे ही किचकट व कष्टदायक प्रक्रिया होती. त्यामुळे भारतात विनकरांनी लावलेला महत्वाचा शोध म्हणजे हातमागान्चा. त्यामुळे इसपु ३५०० ते इसवी सनाच्या अठराव्या शतकापर्यंत जागतीक वस्त्रोद्योगावर भारताने स्वामित्व गाजवले. किंबहुना भारतीय अर्थव्यवस्था ही वस्त्रांना केंद्रस्थानी ठेवतच भरभराटीला आली. हातमागाचा भारताने लावलेला शोध म्हणजे औद्योगिक क्रांतीचा श्रीगणेशा होता. अत्यंत मुलायम, सोपी ते क्लिष्ट संरचना, पोत आणि विण असनारी साधी ते तलम नक्षीदार वस्त्रे निर्माण करण्यात अठराव्या शतकापर्यंत भारताशी स्पर्धा करु शकणारा एकही देश नव्हता. भारतीय विणकरांनीव अवघ्या जगात भारताची निर्विवादपने शान वाढवली.अगदी इजिप्तमधील ममींना गुंडाळलेल्या जात असलेल्या वस्त्रांत भारतीय कापसाचीही वस्त्रे मिळाली आहेत. याचाच अर्थ असा कि सनपुर्व ३२०० पासुनच भारतीय सुती वस्त्रे जगभर पसरु लागली होती.

जातककथा, ब्राह्मणे, जैन साहित्यात विविध प्रकारच्या वस्त्रांच्या व विणकर व्यवसायाबाबतच्या नोंदी मिळतात. ढाक्क्याची मलमल, बनारसी वस्त्रे (भारतात बनारसी साड्यांसाठी अधिक प्रसिद्ध.) पैठणच्या सुप्रसिद्ध पैठण्या व सुती व रेशमी तलम वस्त्रे, याचे जगावर अद्भुत गारुड पसरले होते. इतके कि भारतीय मलमली वस्त्रंसाठी रोमचे नागरिक एवढा पैसा (सोन्याच्या रुपात) मोजत असत कि रोमची तिजोरी रिकामी व्हायला लागली आणि त्यामुळे रोमचा बादशहा अस्वस्थ झाला. ही हकीकत इसवी सनाच्या पहिल्या शतकात प्लिनी (थोरला) या इतिहासकाराने नोंदवून ठेवली आहे.


 या निर्माणकर्त्यांनी आपले कौशल्य वापरत असंख्य पोतांची, नक्षांची, संरचनांची वस्त्रे निर्माण केली. देशाची पत जगभर वाढवली. सिंधु संस्कृतीच्या काळानंतर चेऊल, सोपारा, भडोच ई. बंदरांतुन वस्त्रांचे तागे निर्यात होत. भरतकामातही एवढी प्रगती केली कि मार्को पोलो या जगप्रसिद्ध प्रवाशाने तेराव्या शतकात भारताला भेट दिल्यावेळी आपल्या प्रवास वर्णनात भरतकामातील अद्भुत प्रगतीबद्दल भारतीय कोष्ट्यांची/साळ्यांची मनसोक्त तारिफ केली आहे. पेरिप्लसनेही पहिल्या शतकातील आपल्या ग्रंथात येथील मलमली वस्त्रांची तारीफ केलेली आहे.


      विदेश व देशांतर्गत व्यापारामुळे देशाचे आर्थिक वैभव तर वाढलेच पण विणकर व्यावसायिकाचीही  आर्थिक भरभराट होत गेली. हातमागाच्या शोधामुळे हा उद्योग ख-या अर्थाने देशातील पहिला इंजिनियरिंग उद्योग बनला. कापुस व हातमाग भारतातून युरोपमद्धे गेले ते इसपू चवथ्या शतकातील अलेक्झांडरच्या स्वारीच्या वेळीस. थोडक्यात या विणकर व्यवसायाने जगभर अद्भुत गारुड निर्माण केले. त्या काळात  भारतात एक नाही-दोन नाही...जवळपास दोनशे प्रकारची वैविध्यपुर्ण वस्त्रे निर्माण होवू लागली होती...यावरुनच विणकरांच्या प्रतिभेची कल्पना करता येवू शकते. या व्यवसायातील समृद्धी पाहून तिस-या शतकानंतर राजसत्ताही या उद्योगात पडल्याचे आपल्याला कौटिल्याच्या अर्थशास्त्रावरुन दिसते. विणकामाचे सरकारी कारखाने निघू लागले. विणकरांना तेथे स्वतंत्र उद्योग सोडुन नोक-या करणे भाग पडु लागले. ही एकार्थाने वेठबिगारीच होती. घायपात, कापुस, लोकर, गवत, झाडांच्या साली व तागापासुन तंतू काढणे, कातणे व त्याची वस्त्रे विणने ही कामे सरकारी देखरेखीखाली होऊ लागली. सूत कातायचे काम विधवा, दंड देण्यास असमर्थ असणा-या स्त्रिया, जोगिणी व वेश्यांकडुन करवून घेवू जावू लागले. या काळात (इसवी सन ३०० ते ६००) विणकरांच्या स्वातंत्र्यावर गदा आल्याचे आपल्याला दिसते. त्यानंतर मात्र जशी राजकीय स्थिती बदलली, पुन्हा विणकर स्वतंत्र झाले. पण राजसत्तांनी या उद्योगात उडी घेतल्यापासून शतकापासुनच विणकरांचे काम हे हलक्या प्रतीचे मानले जावू लागले हा आपलाच सामाजिक दोष होता.

 असे असले तरी या व्यावसायिकांनी जिद्द सोडली नाही.  तेराव्या शतकात एकट्या ठाण्यात पाच हजार विणकर मखमली कापड बनवत असत असा उल्लेख अरबी व्यापा-यांनी करुन ठेवला आहे. बु-हाणपुरही या काळात वस्त्रनिर्मितीचे मोठे केंद्र म्हणुन उदयाला आले होते.

 
 अठराव्या शतकापर्यंत आपल्या विशिष्ट कौशल्याने जगभर आदराचे कारण बनुन राहिलेल्या वस्त्रोद्योगाला  शेवटचा झटका दिला तो औद्योगिक क्रांतीने. पण याच उद्योगाने भारताला हजारो वर्ष आर्थिक सुस्थितीत ठेवले हा इतिहास आपण विसरता कामा नये.

-संजय सोनवणी

 


No comments:

Post a Comment

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...