Saturday, November 13, 2021

शिवण कलेने केलेली क्रांती!

 





शिवलेल्या वस्त्रांशी भारतीयांचा परिचय झाला तो आधी इसपू तिसऱ्या शतकात आलेल्या ग्रीक आणि पुढे इसवी सनाच्या पहिल्या शतकात सत्ता स्थापन केलेल्या कुशाणांमुळे; परंतु त्यांचे विशेष अनुकरण देशात झाले नाही. जी काही थोडकी वस्त्रे शिवली जात ती घरगुती पातळीवर. या काळात भारतीय ्त्रिरयाही काही प्रमाणात शिवलेल्या कंचुकी (चोळी) तर पुरुष कंचुक (पायघोळ चोगा) परिधान करू लागले.

वस्त्रांशिवाय माणसाची आपण कल्पनाच करू शकत नाही. आदिम काळात, म्हणजे सरासरी एक लाख वर्षांपूर्वीच माणूस चामडं आणि झाडांच्या सालींचा, म्हणजे वल्कलांचा उपयोग वस्त्र म्हणून करू लागला. मनुष्याला अन्य प्राण्यांसारखी हवामानाला तोंड देता येतील अशी नैसर्गिक देणगी नसल्याने त्याला अंगरक्षणासाठी वस्त्रांची गरज भासणे स्वाभाविक आहे; पण मारलेल्या प्राण्यांची कातडी गुंडाळून त्याने ही आधी गरज पूर्ण केली असली तरी वेगवान हालचाली करायला त्याला अडचणी येऊ लागल्या. त्याच काळात चामड्याचा उपयोग करून तो कृत्रिम निवारेही बनवायला शिकला होता.पण त्यातही ओबड-धोबडपणा असे. प्रत्येक प्राण्याचा कातडीचा आकार वेगळा. त्यांना एकत्र ठेवत निवारा तयार करणे अवघड असायचे.

पण मानव हा कल्पक आणि जात्याच शोधक असल्याने त्याने त्यावरही मात केली. त्याने हाडे-गारगोट्या किंवा कठीण दगडापासून आद्य सुया तयार करायला सुरुवात केली. कातड्याला भोके पाडून कातड्याच्याच वाद्यांनी ते एकमेकांना घट्ट जोडल्यामुळे त्याचे काम सुलभ तर झालेच; पण त्यापासून हालचालींना सुलभ जातील, काही प्रमाणात आरामदायकही वाटतील अशी आद्य वस्त्रेही तो बनवायला शिकला. कल्पकतेने सुखसुविधा कशा निर्माण करता येतात याचे हे आद्य उदाहरण होते.

कठीण पाषाणांपासून मनुष्य हत्यारे बनवायला लाखो वर्षांपूर्वीच शिकला होता. आता अशा दर्जेदार पातळ सुया बनवेपर्यंत त्याने जी प्रगती केली ती नक्कीच विस्मयकारक आहे. अशा अनेक दगडी (गारगोटी) सुया फ्रान्समधील सोलुटर या प्रागैतिहासिककालीन (इसपू २२०००) स्थानावर सापडल्या आहेत. या सुयांच्या अग्रभागी आजच्या सुयांना असतात तशी दोरा ओवण्यासाठी भोकेही होती हेही विशेष. शिवणकाम करण्यासाठी दोरा म्हणून अर्थातच चामड्याच्या पातळ वाद्या वापरल्या जात. हे प्राथमिक दर्जाचे कातडी कपडे होते. त्यामुळे त्याच्या हालचालीही सोप्या झाल्या. थोडक्यात माणसाने शिवणकलेचा शोध चाळीस-पन्नास हजार वर्षांपूर्वीच लावला होता, असे अनुमान काढता येऊ शकते.

यातूनच पुढे विणकामाचा शोध लागला. लोकर हे अर्थातच जगातील पहिले विणले गेलेल्या वस्त्रासाठी वापरले गेलेले उत्पादन. नंतर माणसाने नैसर्गिक वनस्पती धाग्यांचे, म्हणजे ताग, प्यपिरस इत्यादींचे वीणकाम करत त्यांचा उपयोग वस्त्रांसाठी सुरू केला तोही याच समांतर काळात. जॉर्जिया आणि झेकोस्लाव्हाकिया येथे विणलेल्या वस्त्रांचे सुमारे २० ते २८ हजार वर्ष एवढे जुने पुरावे मिळाले आहेत. फ्रान्स आणि भीमबेटका (भारत) येथील प्राचीन गुहाचित्रात तत्कालीन माणसे कशा प्रकारचा पेहराव करत होती याचे दर्शन आपल्याला मिळते.

भारतातील शिवणकलेचा इतिहासही जागतिक इतिहासाच्या जवळपास समांतर जातो. भारतात अग्रभागी टोक असलेल्या सुया सापडल्या नसल्या. तरी धारदार आणि पातळ टोचण्या मात्र सापडल्या आहेत. अगदी महाराष्ट्रातील सावळदा, इनामगाव आदी ठिकाणीही त्या सापडल्या आहेत. सातवाहन काळात तर एवढ्या पातळ सुया बनवायची कला साध्य केली होती की त्या सुया पाण्यावरही तरंगत अशी वर्णने आपल्याला गाथा सप्तशतीत मिळतात; पण भारतीयांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कापसापासून सुती वस्त्रे बनवण्याची साध्य केलेली कला. परदेशी प्रवाशांनी भारतात झाडांना लोकर येते, असे नमूद करुन ठेवले आहे. कारण त्यांना कापूस माहीत नव्हता. हिरोडोटसने भारतीय तलम कपड्यांची मुक्त कंठाने प्रशंसा केली आहे.

सिंधू संस्कृतीत पुरातन विणलेल्या वस्त्रांचे अवशेष सापडले आहेत. वैदिक मंडळी अफगाणिस्तानाच्या प्रतिकूल शीत हवामानात रहात असल्याने भारतात येईपर्यंत ते लोकरीचीच वस्त्रे वापरत असे ऋग्वेदावरून दिसते. भारतातून सिंधू काळापासूनच सूत कातणे, विणणे आणि शिवणे या कला विकसित होऊन त्यांची मोठ्या प्रमाणावर निर्यातही होत असे. या काळात शिवणकला माहित होती, असे ऋग्वेदातील २.३२.४ या ऋचेवरून दिसते. तो उपयोग फक्त ्त्रिरयांसाठी कंचुकीसदृश चोळी शिवण्यासाठी केला गेला असावा, असे संशोधकांचे अनुमान आहे; पण त्याबाबत ठोस असे काही सांगता येत नाही; पण जातक कथांतून इसपू ६०० मध्ये ्त्रिरया या शिवलेल्या कंचुक्या वापरत असत असे उल्लेख मिळतात. त्यांना बाह्या असत; पण गुंड्या नसत. कंचुकीच्या पुढील काळात वेगवेगळ्या फॅशन आल्या तरी त्या मर्यादित वर्गापुरत्याच होत्या असे दिसते. म्हणजे कंचुकी वापरण्याऐवजी उरोभाग कपड्यानेच (उतरीय) झाकला जात असे, असे आपल्याला महाभारतातील अनेक उल्लेखांवरून दिसते. कमरेलाही गुडघ्यापर्यंत येणारे वस्त्र गुंडाळले जात असल्याने त्यांना शिवण्याचा प्रश्नच येत नव्हता.

भारतातील समशीतोष्ण हवामानामुळे शिवलेली वस्त्रे वापरण्याची प्रथा जवळपास नव्हती. कमरेभोवती वा संपूर्ण शरीरभर विशिष्ट पद्धतीने गुंडाळलेली वस्त्रे हीच भारतीयांची जवळपास काही हजार वर्षे वेशभूषा राहिली. अजंतामधील भित्तीचित्रे, तसेच मध्ययुगीन ते प्राचीन शिल्पे यात तर ्त्रिरया उरोभाग उघडाच ठेवत असत असे आपल्याला दिसते. किंबहुना तीच तत्कालीन फॅशन होती, असेही आपल्याला दिसते. आजकालच्या तथाकथित संस्कृतीरक्षकांना हे माहित नसते हे आपल्याला माहितच आहे.

शिवलेल्या वस्त्रांशी भारतीयांचा परिचय झाला तो आधी इसपू तिसऱ्या शतकात आलेल्या ग्रीक आणि पुढे इसवी सनाच्या पहिल्या शतकात सत्ता स्थापन केलेल्या कुशाणांमुळे; परंतु त्यांचे विशेष अनुकरण देशात झाले नाही. जी काही थोडकी वस्त्रे शिवली जात ती घरगुती पातळीवर. या काळात भारतीय ्त्रिरयाही काही प्रमाणात शिवलेल्या कंचुकी (चोळी) तर पुरुष कंचुक (पायघोळ चोगा) परिधान करू लागले. अर्थात ते फक्त उच्चभ्रू समाजापुरतेच मर्यादित राहिले. विदेशी लोकांमुळे भारतात नव्या वेशभूषांचीफॅशन आली एवढे मात्र खरे.

शिवणकला ही आधी ्त्रिरयांचीच मक्तेदारी होती, असेही इतिहासावरून दिसते. आपल्या कंचुक्या ्त्रिरया स्वत:च शिवत. पहिल्या शतकातील महाराष्ट्रात हालाच्या गाथा सप्तशतीवरून ्त्रिरया शिवलेल्या चोळया सर्रास वापरत, असे पुरावे मिळतात. पुरुषांचा वेष मात्र बराच काळ परंपरागत, न शिवलेला असाच राहिला. बौद्ध भिक्षू मात्र संघाटी नामक शिवलेला अंगरखा वापरु लागले होते. त्याचेच रूपांतर पुढे कंचुक या पायघोळ सदऱ्यात झाले जे अनेक पुरुष वापरू लागले. असे असले तरी सामान्य प्रजेच्या परंपरागत वेषभूषेत फारसा फरक पडला नाही; पण सातव्या-आठव्या शतकाच्या दरम्यान भारतीय हवामानाला साजेशा बंड्या, बाराबंद्या आणि कोपऱ्या या नवीन फॅशन पुढे आल्या. नवजात मुलांसाठी अंगडी-टोपडीही आली. या नव्या फॅशन्स लोकप्रिय होऊ लागल्या. हे कपडे शिवण्यासाठी विशेष कौशल्याची गरज भासू लागली. त्यामुळे या शिवणकलेत विविध जातींतील तरबेज प्रशिक्षित लोकांनी प्रवेश केला.

या शिवणकाम करणाऱ्या समाजघटकांनी आपापल्या प्रदेशातील पर्यावरणाला साजेशा आणि सुखकर होतील अशा पद्धतीची वस्त्रे शिवायला सुरुवात केल्याने केवळ वेशभूशेवरूनही कोण कोणत्या राज्यातील हे ओळखणे सोपे जायचे. राजे-सरदार-सैनिक यांच्यासाठीही विशिष्ट प्रकारची वस्त्रे शिवणे गरजेचे झाल्याने त्यातही वेगवेगळया पद्धती आल्या. मोगल काळाने भारतावर पर्शियन पद्धतीच्या वस्त्र-प्रावरणांचा मोठा प्रभाव पडला. ब्रिटीश काळाने तर मोठीच क्रांती घडवली. आजच्या वस्त्र-प्रावरण पद्धती बव्हंशी पाश्चात्य प्रभावाखालील आहेत. शिवणकाम करणाऱ्यांनी त्या त्या काळात लोकप्रिय होऊ लागलेल्या फॅशन अधिक प्रचारित केल्या. भारतीय वस्त्रप्रावरण पद्धते जी कालौघात असंख्य वेळा बदललेली आहे. अमुक प्रकारची वस्त्रभूशा म्हणजे आमची संस्कृती असे म्हणायला खरे तर काहीही जागा नाही. शिवणकलेने मानवी जीवन अधिक उत्साही, रम्य आणि प्रभावी केले हे मात्र नाकारता येत नाही.

No comments:

Post a Comment

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...