सर्व शोषित-पिडित समाजांत आत्मभान व आत्मविश्वास आलाच पाहिजे याबाबत दुमत नाही. पण आत्मभान विकृत वर्चस्ववादाकडेच जाऊ लागला तर पुन्हा नवा विसंवाद निर्माण होतो. सत्य, मग ते सापेक्ष का असेना, समजावुन घेत आत्मपरिक्षण करत संयोग्य प्रतिक्रियावदी होण्याऐवजी तुम्हालाच सरसकट द्वेष्ट्याचे लेबल लावले जाते आणि आजकाल हे सर्वच समाजांकडुन होते आहे ही अधिक चिंतेची बाब आहे. बरेचसे विचारवंत तोंड उघडत नाहीत कारण हे विचित्र हल्ले त्यांना नको असतात. मग विचारमंथन होणार कसे? जागरुक समाज निर्माण कसा होणार? हिंदुंच्या चुकीबद्दल लिहिले तर मुस्लिमांच्या चुका आठवत बसण्यापेक्षा आपल्या चुका कशा दुरुस्त करता येतील यावर अधिक लक्ष केंद्रीत केले तर? ते न करता आपण आपल्या मुर्खपनाचे खापर इतरांवर थोपत जात त्याच चुका आम्हीही करतो. वर्चस्ववाद हा भारतीय अवघ्या जनतेला लागलेला शाप आहे. त्यात तथाकथित ज्ञानी, अर्धवट आणि मुर्ख आले. इतिहासाचे विश्लेशन हे चुकीचेही असु शकते...पण ते चुक कसे आहे हे सबळ पुराव्यांनीशी दाखवण्यापेक्षा विश्लेशनकर्त्यांवर अर्वाच्य तुटुन पडणे हा तथाकथित नवविचारवंतांचा धर्म बनला आहे. आधुनिक साधने आम्हाला आधुनिक न बनवता पुरातन टोळीवादात घेऊन जात आहेत आणि त्याची चिंता सर्वांना वाटायला हवी. अस्मिता जागृत होणे गरजेचे आहे...पण अस्मितेचा अर्थ दुस-यांच्या अस्मिता धि:कारणे असा नव्हे तर सुयोग्य तत्वज्ञानातुन परस्पर भावनांचा आदर करत...प्रसंगी एकमेकांच्या चुका सबळ पायावर दाखवत एकमय समाज म्हणुन पुढे जाणे हा आहे. हिंदुंच्या सणांच्या दिवशीच त्या सणांवर हल्ले चढवण्याचे प्रकार गेल्या तीन-चार वर्षांपासुन फार वाढले आहेत. मुस्लिमांच्या सणांवरही तथाकथित हिंदुत्ववाद्यांचे तसेच हल्ले होतात. ख्रिस्त्यांचे सण सर्वांचेच बनल्याने (अपवाद वगळता...कथित हिंदुधर्मरक्षकांचा) विशेष बोंब नव्हे तर उत्साहच उत्साह असतो. वैदिकांना समिक्षेचा राग येत असला तरी ते तुटपुंजे का होईना पण अर्वाच्यतेत सहसा न जाता आपली बाजु मांडतात. पण काही समाजघटकांना स्वास्मितांसाठी अन्य धर्मावर हल्ले चढवण्यात (व तो धर्मही नीट माहित नसता) काय आनंद होतो हे त्यांनाच माहित! यामुळे अकारण आपणच सामाजिक दरी निर्माण करत आहोत याचे भान नसणे हे अधिकचे दुर्दैव. पण असे प्रकार वाढत आहेत आणि ते चिंताजनक आहेत हे नक्की. याचा एक पडसाद म्हणजे लक्ष्मण गायकवाडांचा वड्डर समाजाविषयकचा लेख...(गेला सप्तरंग) लेखा अंती त्यांनी दिलेली टीप. म्हणजे अन्य जातीय/धर्मीय माणसाने विजातीय समाज/धर्म याबाबत लिहुच नये कि काय? मग डिकास्ट होण्याचे म्हणायचे ढोंग कशाला? डिकास्ट आपण बापजन्मी होऊ शकत नाही हेच सत्य नव्हे काय?
जर हा समाज जातीयतेतच जगला आणि मरणार असेल तर त्याचे पाप अन्य कोणावर थोपता कसे? धर्म बदलुन या देशात जात बदलत नाही. इस्लाम, शीख, जैन , ख्रिस्ती ई. याचे साक्षी आहेत. जात बदलत नाही कारण जात बदलण्याची इच्छा होत नाही. जात सोडा...पोटजातही बदलायची इच्छा नसते. जातीयता हा ब्राह्मणांनी दिलेला कलंक नव्हे तर भारतीय मानसिकतेने सुरक्षेच्या जाणिवेने निर्माण केलेला कलंक आहे. "ब्राह्मणांत एवढी शक्ती कधीच नव्हती."(बाबासाहेबही नेमके हेच म्हणतात...किंवा हे विधान मी बाबासाहेबांपासुन घेतले असे म्हणा!) दोन-तीन टक्के समाज हजारो वर्ष उर्वरीत समाजाला ठकवत राहतो हेच विधान मुळात अनैतिहासिक आहे किंवा उर्वरीत षंढ होते हे तरी मान्य केले पाहिजे. आमच्या नपुंसकतेला कारण ब्राह्मण नाही...आम्हीच आहोत.
काल एका बौद्ध विद्वानाने प्रश्न केला...बुद्ध पुरुषसत्ताकतेला मानत होता याचा पुरावा काय? अहो...बुद्ध स्त्रीयांना संघात प्रवेश द्यायच्या विरोधात होते. आनंदाच्या विनंतीमुळे त्यांनी प्रवेश दिला...कोणाला? पजापती आणि अन्य ५०० स्त्रीयांना...पण काय म्हणतात भगवान गौतम बुद्ध? ते म्हणतात "माझा धम्म जो हजार वर्ष टिकनार होता तो आता पाचशेच वर्ष टिकेल." आणि भिक्खुनींवर आठ जाचक अटी लादल्या गेल्या. (उदा. भिक्खुनी शंभर वर्षांची झाली तरी तिने भिक्खुला प्रणाम केलाच पाहिजे....ई) तो त्या काळाचा महिमा होता जेंव्हा स्त्रीया दुय्यमच होत्या. एकाही भिक्खुनीचा ग्रंथ नाही. स्त्री "बुद्ध" होऊ शकत नाही हा बौद्ध धर्माचाच निर्वाळा आहे. तेंव्हा मला पुरावे काय मागता? स्वत: शोधा कि!
असो. आपण एका अत्यंत विलक्षण काळात आलो आहोत. हा काळ कोणत्याही पद्धतीने आधुनिक नाही. येथे गतकाळही समजावुन घेणारे लोक नाहीत...त्या काळाच्या चौकटी समजावुन घेणारे नाहीत...आणि आजच्या चौकटी लांघणारे नवविचारवंत तर आजिबात नाहीत.
विखंडन आणि अविरत विखंडन हेच भवितव्य ज्यांचे... असा एक देश आम्ही बनलो आहोत....
पण आम्हाला कधीतरी एक व्हावेच लागेल!
No comments:
Post a Comment