Friday, January 7, 2022

पुरातन काळापासुनचे सांस्कृतिक सेतू!

 पुरातन काळापासुनचे सांस्कृतिक सेतू!



रेशीम मार्ग हा जगभरच्या लोकांच्या अपार कुतूहलाचा विषय आहे. चीन पासून युरोपपर्यंत जाणा-या या प्राचीन मार्गावर स्वामित्वासाठी आजवर असंख्य युद्धे झडलेली आहेत. चीनने “वन बेल्ट वन रोड” (ओबोर) हा महत्वाकांक्षी प्रकल्प हातात घेऊन प्राचीन व्यापारी मार्गांचे पुनरुज्जीवन करण्याचा चंग बांधलेला आहे. भारत-चीन हे १९६२ चे युद्ध झाले तेच मुळात चीनने भारतीय हद्दीतून (अक्साई चीनमधून) जाणा-या प्राचीन व्यापारी मार्गावरील १५८ किलोमीटर रस्त्यावर आधुनिक रस्ता बनवायला सुरुवात केल्याने. आताही लदाखमध्ये चीनची जे घुसखोरी सुरु आहे ते तेथून मध्य आशियाला जाणा-या पुरातन मार्गांवर कब्जा मिळवण्यासाठी व आधुनिकीकरण करून ते पुन्हा वापरात आणण्यासाठी. थोडक्यात चीनचा जागतिक व्यापार व लष्करी वर्चस्व वाढवणे हाच हेतू त्यामागे आहे. गिलगीट – बाल्टीस्थान या पाकिस्तानने बळकावलेल्या भारतीय भागातून मध्य आशियातील मुख्य रेशीममार्गाला जोडणारे तीन प्राचीन व्यापारी मार्ग होते. चीनने तेथून काराकोरम हायवे तयार करून पाकिस्तानला जोडून घेतले आहे. अरुणाचल प्रदेशातीलही घुसखोरीला हीच परिमाणे आहेत. म्हणजे व्यापारी मार्ग हे केवळ आर्थिक भरभराट व्हावी यासाठी बनवले जात नसून त्यामागे लष्करी वर्चस्व निर्माण करणे हाही महत्वाचा हेतू असतो हे आपल्या लक्षात येईल.

भारत पुरातन काळापासून पश्चिमोत्तर, उत्तर आणि पूर्वोत्तर भागातून जाणा-या अनेक व्यापारी मार्गांनी जोडला गेलेला होता. हे मार्ग हिमालयीन व हिंदुकुश पर्वतराजीतून जात असल्याने अत्यंत दुर्गम होते. तरीही साहसी व्यापा-यांनी जीवावरची संकटे पेलत जगाशी भारताची नाळ जुळवली. व्यापाराच्या निमित्ताने झालेली सर्वात महत्वाची बाब म्हणजे सांस्कृतिक व तंत्रज्ञानाची देवान-घेवाण. जगभरच्या अनेक पुराकथांमध्ये जे साम्य आढळते ते याच देवान-घेवाणीतून. अनेक शब्द, तांत्रिक सद्न्या, यांचाही प्रसार व्हायला या व्यापारी मार्गांची मदत तर झालीच पण बौद्धादी धर्म याच व्यापारी मार्गांनी आशिया खंडात पसरले हे आपल्याला पाहता येते. पश्चिमोत्तर भागातून जाणा-या चार व्यापारी मार्गांचा वापर तर सिंधू काळापासून सुरु आहे. याच मार्गांनी सिंधूजणांनी प्राचीन इराण, मेसोपोटेमिया ते इजिप्तपर्यंत आपला व्यापार वाढवला. एवढेच नव्हे तर ऑक्सस नदीचे खोरे ते पार सुमेरमध्येही आपल्या व्यापारी वसाहती वसवल्या. प्रसंगी त्यासाठी युद्धेही केली. नंतरच्या काळात भारतीय राजांनी पार बल्ख (Bactria) ते समरंकंदपर्यंत आपल्या सत्ता विस्तारल्या त्या याच मार्गांवरून स्वा-या करत. भारतावर झालेली विविध आक्रमनेही याच मार्गांनी झाली. याला उत्तर भागातून हिमालयाच्या अतिदुर्गम अशा व्यापारी मार्गांचाही अपवाद नाही.

पूर्वोत्तर भारतातून जाणारे व्यापारी मार्ग चीन (युनान) आणि दक्षिण-पूर्व आशियातील पार थायलंडपर्यंत पोचत होते. या मार्गांवरून अनेक मानवी स्थलांतरेही झालेली आहेत. भारतात वैदिक, शक, हूण, कुशाण, अरब, मोगल, तुर्क इ. आक्रमणे व स्थलांतरे झाली तीही उत्तरेतून, अथवा पश्चिमोत्तर भागातून येणा-या मार्गांनीच. या सा-यांचा आर्थिक व सांस्कृतिक प्रभाव अर्थातच भारतीय, विशेष करून उतर भारतीय संस्कृतीवर पडला. संस्कृतिचा प्रवास हा कधीच एकतर्फी नसतो. कारण आपले व्यापारी जसे बाहेर जात तसेच तिकडील व्यापारीही भारतात येत. भारतीयांनीही आशिया व युरोप खंडाच्या संस्कृतीवर विलक्षण प्रभाव टाकला. तो केवळ व्यापार आणि या मार्गांवरून जाणा-या साहसी प्रवाशांमुळे. आक्रमणे हेही एक कारण आहेच. भारताने बाह्य भूभागावर कधी आक्रमण केले नाही ही एक वदंता आहे. त्यात सत्य नाही. पश्चिम आशिया व मध्य आशियावर भारतीय भाषा व संस्कृतीचा प्रभाव अमिट असा आहे. उत्तर भारतीय भाषांवर बाहेरून आलेल्या तथाकथित आर्यांच्या भाषांचा प्रभाव नसून खरा प्रकार त्या उलट आहे हे भारताचे पुरातन काळापासुनचे मध्य व पश्चिम आशियाशी असलेले व्यापारी संबंध पाहिले कि सहज लक्षात येईल अर्थातच भारतीयांनीही आपल्या भाषेत अनेक शब्द व सद्न्या उधार घेतले असणारच आहेत. तीच बाब धार्मिक संकल्पनांची. भारतात सूर्यपूजा आली ती पश्चिम आशियातून. शिवलिंगपूजा पश्चिम आशियात गेली ती भारतातून. अर्थात संकल्पनांची देवान-घेवाण होत असतांना त्या स्वीकारणारे त्या जशाच्या तशा स्वीकारत नाहीत तर आपले संस्कारही करतात. यातूनच संस्कृती नव्या नव्या स्वरूपात फुलत गेली आहे. वास्तुशास्त्रावरचेही असेच प्रभाव आपल्याला प्राचीन काळापासून पहायला मिळतात. अंकगणित, भूमिती ते ग्रह-ता-याबद्दलचे ज्ञानही याच मार्गांमुळे पसरू शकले.

थोडक्यात प्राचीन व्यापारी मार्ग हे केवळ अर्थ समृद्धीचे साधन नव्हते. त्यातून सांस्कृतिक प्रवासही मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. व्यापारी मार्ग हे अनेक युद्धांचे कारणही बनले आहेत. प्राचीन काळात ज्याची व्यापारी मार्गावर सत्ता त्याची भवतालच्या भूभागावर सत्त्ता असाच नियम असल्याने बव्हंशी युद्धे ही या मार्गांवर स्वामित्व मिळवण्यासाठी झालेली आहेत. भारतावर महम्मद कासीमचे आक्रमण धर्मप्रसारासाठी झाले नव्हते तर देवल येथील व्यापारी बंदर व अफगानिस्तानातून जाणा-या व्यापारी मार्गांवर स्वामित्व मिळवण्यासाठी झाले होते. अरब, इराणी, भारतिय, मध्य आशियातील नगरसत्ता, तिबेट, चीन यांनी मध्ययुगापर्यंत केलेली युद्धे ही या व्यापारी मार्गांवरील स्वामित्वासाठी होती. चीन आजही या मार्गांचे पुनरुज्जीवन करत असेल तर त्यामागील अर्थ आपण समजावून घ्यायला हवा.

दुर्दैवाने भारतीय अभ्यासकांनी भारतातील अंतर्गत प्राचीन व्यापारी मार्गांचा काही प्रमाणात अभ्यास केला असला तरी भारतातून जगाला जोडणा-या मार्गांबद्दल फारच नगण्य संशोधन केले होते. माझ्या संशोधन प्रस्तावाला भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंडळाने मान्यता दिल्याने मी हे संशोधन करू शकलो. या प्राचीन व्यापारी मार्गांचा इतिहास समजावून घेतल्याखेरीज आपण वर्तमानातले त्यांचे व्यापारी आणि सामरिक महत्व समजावून घेऊ शकणार नाही. या सदरातून मी आपणासमोर या मार्गांचा प्राचीन काळापासूनचा चित्तथरारक इतिहास ठेवणार आहे. गतवर्षीच्या “इतिहासाचे कवडसे” या सदराला आपण जसा प्रतिसाद दिला तसाच याही सदराला द्याल आणि एक महत्वाचा इतिहास समजावून घ्याल ही आशा आहे.

-    संजय सोनवणी

 

No comments:

Post a Comment

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...