मानवाचे भूतलावर आगमन झाले
तेंव्हा त्याला अन्न आणि शिकारीसाठी भटकावे लागायचे. अनुभवाने कोठे जास्त शिकार
मिळेल वा कोठे फळे-कंदमुळे विपुल प्रमाणात असतील हे त्याला माहित झाल्याने त्याची
भ्रमंती अशाच भागांमध्ये व्हायची. स्थलांतरे व्हायची ती दुष्काळ, रोगराई, किंवा
एखाद्या नैसर्गिक आपत्तीमुळे. पण आपत्ती दूर झाली को टोळ्या आपापल्या ज्ञात प्रदेशात
परतत असत. तो शिकारीसाठी पत्थर, लाकडी सोटे हत्यार म्हणून वापरत असे. त्यांचा
उपयोग तो फळे-कंदमुळे काढण्यासाठीही करत असे. नंतर तो हाडांपासून शस्त्रे, ते अगदी
टोचण्याही बनवू लागला. नंतर कठीण दगड तासून अणकुचीदार हत्यारे बनवायची कला विकसित
केली. पण त्यासाठी विशिष्ट प्रकारचे कठीण पत्थर, स्फटिके, गारगोट्या लागत. त्यांची
ठिकाणे सीमित होती. पाचीन मानव अशा ठिकाणी जाऊन आपली हत्यारे बनवत राहिल्याने अशा
ठिकाणांना कारखान्यांचे स्वरुप आले. जगभरात अनेक ठिकाणी असे अश्मयुगातले हत्यारांचे
व उपकरणांचे कारखाने सापडलेले आहेत. महाराष्ट्रात गोदावरी नदीकाठीही असे कारखाने
सापडले आहेत. म्हणजे अन्न्संकलक मानव हा तीस-पस्तीस लाख वर्षांपूर्वीच उत्पादक
मानव व्यापारीही बनला तो जगण्याच्या अनिवार जिजीवीषेने.
जगातील पहिल्या व्यापाराची नि
उत्पादनस्थळांवर ताबा मिळवण्यासाठी युद्धांची सुरुवातही तेवढीच प्राचीन आहे.
आपल्या आजच्या मानवप्रजाती आधीच्या आज नष्ट झालेल्या निएन्दरथल प्रजातीही आपल्या
आपल्या भागात मिळणा-या नैसर्गिक संसाधनांपासून निर्मित हत्यारे, अलंकार ते शोभिवंत
खनिजे यांचा विनिमयाने व्यापार करत असत याचे पुरावे आता उपलब्ध होऊ लागले आहेत.
सरासरी दोन लक्ष वर्षांपूर्वी आपल्या आजच्या मानवाचा पूर्वज होमो सेपियन भूतलावर
अवतीर्ण झाला. त्याने निएन्दरथल मानवाला नष्ट तरी केले किंवा तो होमो सेपियंसशी
स्पर्धा न करू शकल्याने नष्ट झाला याबाबत विद्वानांत मतभेद असले तरी तो नष्ट झाला
हे वास्तव आहे.
असे म्हणतात कि विविध मानवी
गटांत संभाषण सुरु झाले ते मुळात व्यापाराच्या गरजेतून. भाषेची निर्मिती आणि विकास
यात व्यापाराचा मोठा हात आहे यात शंका नाही. एका अर्थाने जग हे सरासरी वीस हजार
वर्षांपूर्वी आलेल्या हिमयुगापर्यंत स्थिर झाले होते. त्यांच्या भ्रमंतीच्या,
शिकारीच्या आणि विनिमयाच्या मार्गांतही स्थैर्य आलेले होते. पण हिमयुगामुळे स्थिती
बदलली. समुद्राची पातळी चारशे फुटांनी खालावली. बहुसंख्य प्रदेश हिमाने भरून गेले.
या काळात अनेक महाकाय प्राण्यांचा भूतलावरून अस्तही झाला. माणसाला जगण्यासाठी
मोठ्या प्रमाणात स्थलांतरे करावी लागली. या विपरीत हवामानाला तोंड देण्यासाठी
माणसाने कल्पकतेने कातड्याचे कपडे शिवणे आदी काही शोधही लावले. या काळात मानवी लोकसंख्याही लक्षणीयरीत्या घटली.
पण हळूहळू उबदार वातावरण पसरू लागले. गोठलेल्या नद्या वाहू लागल्या. जगातील
सृष्टीच हिमयुगाच्या अस्तानंतर बदलून गेली. ती माणसाला सहाय्यक होती. या स्थितीने माणसाला
शिकवलेही खूप. हिमयुगाच्या अस्तानंतर मानव पुन्हा नव्याने जगात वितरीत झाला. स्थिर
होण्याची गरज भासल्याने त्याने शेतीचाही शोध लावला आणि शेतीसाठी उपयुक्त ज्ञान-तंत्रद्न्यानातही
विस्फोट झाला. एकाच ठिकाणी राहायचे तर तशा टिकावू निवा-यांचीही आवशक्यता होती.
भोवताली उपलब्ध नैसर्गिक साधनांतून त्याने तसे निवारेही बनवले. जीवनव्यवहार
गुंतागुंतीचा बनला तशी भाषाही प्रगत होत गेली. शेतीमुळे असंख्य नव्या शब्दाची
निर्मिती या काळापासून व्हायला जगभरच सुरुवात झाली. त्यातूनच प्राथमिक व्याकरणही
साकार होऊ लागले. शेतीमुळे अधिकचे उत्पादन शक्य झाल्याने अतिरिक्त उत्पादन अन्यत्र
विकणे आणि आपल्याकडे नसलेले विकत घेणे याचे गरज निर्माण झाली. तोवर तांब्याचाही
शोध लागला होता. तांबे काही सर्वच ठिकाणी उपलब्ध नव्हते. त्यामुळे त्या धातूचा
व्यापारही होऊ लागला. त्याबरोबरच धातू शुद्ध करणे ते त्यापासून वस्तू बनवणे या
आद्य तंत्रज्ञानाचाही प्रसार होत गेला. व्यापारांची ठिकाणेही निश्चित होऊ लागली.
या ठिकाणांना आणि मानवी वस्त्यांना जोडणा-या आद्य व्यापारी मार्गांच्या निर्मितीची
सुरुवात अशी झाली.
त्या काळात सुसज्ज रस्त्यांची
गरज भासली नव्हती. मालाची वाहतूक ही ओझेवाहू जनावरांच्या पाठीवरून किंवा
माणसांच्या श्रमाने होत असे. या मर्यादांमुळे हा व्यापार जवळच्या प्रदेशातच सीमित
असे. अतिदुरचा व्यापार अजून शक्य झालेला नव्हता. दूरच्या भूगोलाचे आणि तेथील
माणसांबाबतचे अज्ञान हेही त्याला कारण होते. पण मनुष्य हा निरंतर साहसी आणि कल्पक
राहिलेला आहे. काही धाडशी आद्य प्रवाशांनी अपार जिज्ञासेतून किमान आपल्या खंडांतील
दूरच्या प्रदेशांची ओळख करून घेतली आणि व्यापारी त्याचा लाभ घ्यायला पुढे सरसावले.
बैलगाडीच्या शोधाने मालवाहतूक
सुलभ झाली. जगातील आद्य बैलगाडी सिंधू संस्कृतीत बनल्याचे इसपू ३५०० मधील पुरावे
हरप्पा येथे सापडले आहेत. हा शोध फार लवकर आशिया खंडात पसरला. जुब्लीजाना
(स्लोवेनिया) येथे इसपू ३२०० मधील गाडीचा पुरावा उपलब्ध आहे. मेसोपोटेमिया आणि
इजिप्तमध्ये या पाठोपाठ आपल्याला मालवाहू गाड्यांचा प्रसार झालेला दिसतो. या
गाड्या बैल, उंट किंवा खेचरांकरवी ओढल्या जायच्या. अधिक माल दूरवर वाहून नेणे
त्यामुळे सोपे झाले. त्यामुळे जुन्या वाटांचीही पुनर्रचना झाली. पायवाटा रस्ते बनू
लागले. गाड्यांचे तंत्रज्ञान संपूर्ण आशिया खंडात पसरले ते व्यापारामुळे होणा-या संपर्कामुळे.
अर्थात दुर्गम डोंगराळ आणि
वाळवंटी प्रदेशांत बैलगाड्या कुचकामी होत्या. मुळात पर्वतांपलीकडे जाण्यासाठी
खिंडी शोधणे आणि त्या वापरण्यायोग्य बनवणे हे एक आव्हान होते. त्यात रानटी लुटारू
टोळ्या, हिंस्त्र श्वापदे आणि बदलती हवामाने यांचे संकट सतत डोक्यावर असे. तरीही
जीवावरचे धोके पत्करत लोकांनी सुदूर देशांशी व्यापार का केला असेल? असे कोणते अचाट
वेड आणि धैर्य त्याच्यात होते? मानवाचा इतिहास हाच मुळात त्याच्या अचाट धैर्याचा
आणि संयमाचा आहे हे आपल्याला या निमित्ताने लक्षात येईल.
-संजय सोनवणी
No comments:
Post a Comment